Categories

Most Viewed

20 एप्रिल 1938 भाषण 1

“दुसऱ्यावर विसंबून राहाणे म्हणजे पेशवाईतले गाडगे गळ्यात बांधून घेणे होय”

दिनांक 20 एप्रिल 1938 रोजी दुपारी तीन वाजता मु. ओंड येथे सभा भरविण्यात आली. या सभेला निव्वळ अस्पृश्य जनसमुदाय सहा हजारांवर होता. आमदार के. एस. सावंत यांनी ओंड गावची व तेथील प्रमुख मंडळींची ओळख करून दिल्यावर स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रत्येकाने सभासद होण्याची विनंती केली. यानंतर कराडचे श्री. थोरवडे यांनी जनता पत्र व स्वतंत्र मजूर पक्षाची माहिती सांगितल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास उभे राहिले.

डॉ. आंबेडकरसाहेबांनी आपल्या भाषणात अस्पृश्यांची पूर्वीची व सध्याची स्थिती याची तुलनात्मकदृष्ट्या माहिती सांगितल्यावर ते म्हणाले.

आपणामध्ये आजच्यापेक्षा अधिक बळकट संघटना झाली पाहिजे, ही संघटना स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होऊन केल्यास आपल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणीची योग्य रीतीने दाद लागेल. हाच पक्ष तुमच्या हितसंबंधांचे संरक्षण करील. तुम्ही दुसऱ्यावर कधीही अवलंबून राहू नका. दुसऱ्यावर विसंबून राहणे म्हणजे पेशवाईतले गाडगे गळ्यात बांधून घेणे होय.

यानंतर प्रत्येक गावातर्फे डॉ. आंबेडकरसाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर वाटेत मु. शिवडे, तालुका क-हाड येथे पानसुपारी समारंभ झाला. येथे गावकऱ्यांप्रमाणे मेघराजानेही आपल्या शुभ आगमनाने थोडावेळ डॉ. बाबासाहेबांचे स्वागत केले. या समारंभाच्यावेळी मे. उबाळे यांनी जमलेल्या मंडळीस विनंतीपूर्वक सांगितले की, प्रवासात डॉ. आंबेडकर साहेबांना बराच त्रास झाला आहे. तरी त्यांना आपण विशेष त्रास देऊ नये. तरी लोकांच्या आग्रहास्तव डॉ. साहेब भाषण करावयास उठले. त्यांनी सांगितले की, “पुढील महिन्याच्या 24 तारखेस या जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाच्या निवडणुकी होणार आहेत. या तालुक्यातर्फे आपल्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे श्री. गणपत भिकाजी वाघमारे हे उभे आहेत. तरी आपण सर्वांनी त्यांनाच निवडून द्यावे. मी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व मतदार वागाल अशी आशा आहे.” यानंतर डॉ. साहेब मोटारीने साता-यास आले. तेथे मे. काशिनाथ कांबळे, भोसले, केरवा मेढेकर व बंदसोडे मास्तर वगैरे मंडळींनी डॉ. साहेबांना हारतुरे घातल्यावर ते पुढे पुण्यास निघून गेले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password