” धार्मिक कायदा विरूद्ध धर्मनिरपेक्ष कायदा, ह्या लढ्यात धार्मिक कायद्याचे वर्चस्व, हा देशाचा -.”
नवी दिल्ली येथे लॉ युनियनच्या वार्षिक दिनानिमित्त ‘हिंदी संस्कृतीच्या -हासाची कारणे’ या विषयावर भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.
प्राचीन हिंदू समाजात कायदा ईश्वर प्रणीत आहे. अशा प्रकारचे कित्येक अपसमज रूढ होते. त्यामुळे एके काळी प्रगतीच्या शिखरावर असलेले आपले राष्ट्र तसे प्रगतीशील राहू शकले नाही. धार्मिक कायदा विरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा असा लढा येथेही झाला. परंतु दुर्दैवाने धार्मिक कायदा येथे श्रेष्ठ ठरला. देशाच्या -हासाचे ते एक प्रमुख कारण ठरले.
आमच्या प्राचीन समाजानी समाजाच्या धारणेतील दोष काढून टाकण्याची केलेली टाळाटाळ हेच त्या समाजाच्या नाशाचे कारण आहे. उलट मनुसारख्या शास्त्रवेत्त्यांनी जे निर्बंध तयार केले त्यांनाच चिकटून राहाण्याची त्यांची प्रवृत्ती होती. समाजाचे दोष सुधारणे हेच कायद्याचे उद्दिष्ट असते.
संस्कृती सुधारणेचे कार्य सतत असे कधीच घडले नाही. एके काळी काही समाज व राष्ट्रे प्रगतीशील न राहिल्यामुळे त्यांचा नाश झाला, हिंदुस्थानच्या इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास ही गोष्ट सहज ध्यानात येईल.
सध्याची विधिमंडळाची पद्धती आपण युरोपियन राष्ट्रांपासून विशेषतः इंग्लंडपासून उचलली असा सर्वसामान्य माणसाचा ग्रह आहे. पण एखाद्याने ह्यादृष्टीने ‘विनय पिटीका’ या प्राचीन ग्रंथाची पाने चाळली तर त्याचा हा भ्रम दूर होईल. विनय पिटीकेच्या अभ्यासकांना विधिमंडळ विषयक पद्धतीचे काही नियम माहित होते. प्रस्ताव मांडला नाही तर विधी मंडळात चर्चा होणार नाही तसेच मत नोंदणीही होणार नाही. ही गोष्ट नवी आहे असा कित्येकांचा समज आहे. तो एक सर्वमान्य अपसमज आहे.
बहुतेक सर्वांचा समज असा आहे की, गुप्त मतदान पद्धती आपण इंग्रजांपासून उचलली. अर्थात हाही गैरसमज आहे. ‘विनय पिटिकेत’ गुप्त मतदानाची विशिष्ट व्यवस्था असे. त्यांना सालपत्रकगृहे असे म्हणत. झाडाच्या सालीचा मतपत्रिका म्हणून उपयोग करीत. काही कारणांमुळे आम्ही आपली राजकीय दृष्टी गमावली ही गोष्ट मी मान्य करतो. आमच्या विधिमंडळासारखा सर्व लोकसंस्थांचा नाश झाला व आम्ही एकतंत्री राजाचे नागरीक बनलो. त्यामुळेच सुसंस्कृती परागतीकडे वळली. इतर समाजाप्रमाणे हिंदी समाजही वेळोवेळी मागे पडत चालला.
समाजातील दोषाचे निर्मूलन करणे हाच कायदा करण्याचा हेतू असतो. दुर्दैवाने प्राचीन समाजांनी समाजातील दोष काढून टाकण्यासाठी कायद्याचा उपयोग केला नाही. त्यामुळे त्यांचा नाश झाला.
ह्या देशात जितक्या क्रांत्या झालेल्या आहेत तितक्या पृथ्वीतलावरील कोणत्याही राष्ट्रात झालेल्या नाहीत. पोपचे वर्चस्व झुगारुन देण्यासाठी युरोपात जेव्हा झगडे झाले. त्याच्या आधी कित्येक वर्षे हिंदुस्थानात धर्माधिष्ठित कायदा विरुद्ध धर्मनिरपेक्ष कायदा असा झगडा चालू होता. दुर्दैवाने हिंदुस्थानात धार्मिक कायदा श्रेष्ठ ठरला. माझ्या मते देशावर ती एक फार मोठी आपत्ती ओढवली. कायद्यात बदल करता येत नाही असा समज हिंदू समाजातील प्रतिगामी लोकांमध्ये त्याकाळी रूढ होता. हेच आपत्ती ओढवण्याचे कारण आहे असे माझे मत आहे.