“जातीभेद नष्ट केल्याशिवाय उन्नतीचा मार्ग असंभव”
कोकण पंचमहाल (राजापूर ते गोवाहद्द) महार समाज सेवा संघ मुंबई यांचे विद्यमाने रविवार तारीख 16 एप्रिल 1933 रोजी रात्रौ माझगाव बोगद्याची वाडी, सिमेंट चाळ येथे एक मोठा सहभोजन समारंभ अतिशय उत्साहाने पार पडला. सदर सहभोजन प्रसंगी अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच में. सुभेदार सवादकर, नामदेव बुवा येरलेकर, डोळस, दुधवडे, रामभाऊ सोनवणे, उपशाम, बनसोडे, रा. ग. भातनकर, सु. अ. ल. शिरावले, शि. गो. हाटे, गो. ग. वरघरकर व मे. कवळी बी. ए. एलएल. बी. इत्यादी मंडळी हजर होती.
प्रथम रा. शि. ना. बालावलकर यांनी आजच्या सहभोजनाचा उद्देश सांगताना सांगितले की, “महार समाजात बेले महार, पान महार अशा प्रकारचे जे भेद आमच्या कोकणात आहेत ते नाहीसे झाले पाहिजेत.” याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन शब्द सांगण्यास त्यांनी विनंती केली. श्री. नामदेव बुवा येरलेकर म्हणाले की, “अगदी पूर्वी काही आपसातील भांडणामुळे हे भेद पडले असावेत. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत. तेव्हा हे भेद मोडणे अत्यंत जरूर आहे.” या म्हणण्यास रा. ग. धु. जाधव, क. का. पोइपकर, ल. सो. अस्वेकर यांनी अनुमोदन दिले.
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड गजरात बोलावयास उभे राहिले, ते म्हणाले,
प्रिय बंधु भगिनींनो,
आज मला अतिशय महत्त्वाची कामे होती. दोन-चार दिवसांनीच मी विलायतेस जाणार असल्यामुळे माझ्यामागे अतिशय निकडीची कामे आहेत. परंतु आजच्या समारंभाला माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्व असल्यामुळे मी मुद्दाम या सहभोजनाला आलो आहे. जातीभेद काढून टाकल्याशिवाय आपल्या उन्नतीचा मार्ग मोकळा होणार नाही. महार समाज हा मुसलमान समाजाप्रमाणे जातीभेद न मानणारा समाज आहे. ही महार समाजाबद्दल अतिशय चांगली गोष्ट आहे. कोणत्याही प्रांतातील महार एकत्र जेवू शकतात. मी मुंबई इलाख्यात सर्वत्र फिरलो आहे. त्यावेळेस महारात भेद नसल्याचे मला दिसून आले आहे. फक्त कोकणात काही ठिकाणी महारात बेले व पान असे भेद आहेत. ते तेथे का झाले हे माहीत नाही. यापुढे हे दोन भेद महार समाजात का चालू ठेवावे हेही कोणी सांगू शकत नाही. असे जर आहे तर बेले व पान महार यांच्यात भोजन व विवाह का होऊ नयेत ? पूर्वापार वडिलांची चाल हे कोणी कारण सांगू शकतील. परंतु पूर्वापार चालत आलेल्या वडिलांच्या चालीच चालवावयाच्या असतील तर आपणास त्यांच्यासारखेच खितपत पडावे लागेल याचा विचार करा.
पूर्वीची परिस्थिती अगदी निराळी होती. त्यांना पूर्ण अज्ञानात ठेवण्यात आले होते. त्यांची परिस्थिती पूर्ण गुलामीची होती. त्यांना राजकीय, धार्मिक सामर्थ्य नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट होती. वडिलांच्या चुकांमुळेच आज आपणास दुःख भोगावे लागत आहे. हे दुःख नाहीसे होऊन आपल्या मुलाबाळास सुख लाभावे असे आपणास वाटत असल्यास आपण वडिलांनी केलेल्या चुका दुरूस्त केल्या पाहिजेत. या बाबतीत जुन्या लोकांपेक्षा तरुणांवर जास्त जबाबदारी आहे. ती जबाबदारी ते पार पाडतील अशी माझी खात्री आहे.
या आपसातील भेदामुळे आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात बोर्डिंग निघू शकले नाही. तोच अनुभव सार्वजनिक चळवळीतही येत आहे. समजा एका गावात बेले महार व पान महार अशा दोन्ही पोटभेदाचे लोक असले तर एकाने मृतमांस खाण्याचे सोडून दिले तर दुसरा ते खातो. त्यामुळे होते काय की, दोघांवरही गावच्या लोकांचे वर्चस्व वाढते. परंतु त्यांच्यात भेद नसेल तर असा दुष्परिणाम होणार नाही. आपली प्रगती करून घेण्यासाठी आपण जातीभेद मोडला पाहिजे. आपल्यातील ही भेदाची घाण काढून टाकली तरच आपणास दुसऱ्याला तशीच घाण काढून टाकण्यास सांगता येईल.
मला आनंद वाटतो की. अशाप्रकारचे जोराचे प्रयत्न आपल्या लोकात झाले सुरू आहेत. थोड्याच दिवसात आपल्यातले हे भेद नाहीसे होतील अशी माझी खात्री आहे. आजच्या प्रसंगाबद्दल मी सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो.