Categories

Most Viewed

14 एप्रिल 1947 भाषण

” देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करावयाच्या नाहीत, हे माझे धोरण.”

दिनांक 14 एप्रिल 1947 रोजी माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त असंख्य अस्पृश्यांनी मोठ्या थाटात बाबासाहेबांचा सत्कार केला. त्याप्रसंगी डॉ. बाबासाहेब दलित वर्गाला उद्देशून म्हणाले.

अखिल भारतातील दलित जनतेला स्वतःच्या विकृत स्थितीची जाणीव झाल्यामुळे ती आता आपले जीवन परिपूर्णतेला नेण्याकरिता सुसंघटितरित्या उभी ठाकली असल्यामुळे तिच्या वाट्याला उज्वल भविष्यकाल खात्रीने येणार, ही परिस्थिती पाहून मला आनंदाचे भरते येते. मी त्या दिवशी व्हाईसरॉयला स्पष्ट शब्दात सांगितले, “तुम्ही मला पाचारण केले नसते तर मी तुम्हाला भेटण्यास आलोच नसतो. इंग्रजांच्या मागे धावत फिरण्याची माझी मुळीच इच्छा नाही.” दलित जनतेच्या सुखसंवर्धनाची जबाबदारी एकेकाळी इंग्रजांनी स्वतःवर घेतली होती. इंग्रज आपल्या शब्दाला जागतील व आपल्यावरील जबाबदारी पार पाडण्याकरिता पुढे पाऊल टाकतील, असे मला त्यावेळी वाटले होते. पण तसे घडले नाही. इंग्रज हिंदुस्थान सोडून जात आहेत, याची मला मुळीच पर्वा पण तसे नाही. परंतु आपणास ज्या सवलती घटनेत हव्या होत्या त्याची काहीच तरतूद करण्याचा प्रयत्न न करता ते जात आहेत. त्यांचे हे वागणे योग्य आहे की नाही याचा त्यांनीच निवाडा करावा. अस्पृश्यांच्या हितसंरक्षणाची काही तरी तरतूद करण्याची आवश्यकता मी त्यांना शंभर वेळा प्रतिपादन केली. इंग्रजांनी ते काम करण्याचे नाकारले तरी सहा कोटी अस्पृश्यांचा भाग्यकाल उज्वल आहे याची मला खात्री आहे असे मी म्हणालो. मजूर सरकारने जरी न्याय्य हक्क दिले नाही तरी सहा कोटी अस्पृश्य वर्ग कोणत्याही सहकार्याची वा शक्तीची पर्वा न करता जे पाहिजे आहे ते मिळविलच मिळविल, याची माझ्या मनात किंचितही शंका नाही.

जागृती व संघटना यांच्या अभावी आम्ही आतापर्यंत दुसऱ्याचे वर्चस्व सहन केले पण आता तो काळ राहिला नाही. आता आमच्यात नवशक्ती वास करीत आहे. हे हिंदुस्थानातील प्रत्येक इसम जाणून आहे. म्हणूनच कॉंग्रेस व लीग आमचे सहकार्य मिळविण्याचा आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. याचे एकच कारण म्हणजे आपली पोलादी संघटना. 1948 जून मध्ये हिंदुस्थान सोडण्याच्या ब्रिटिशांच्या घोषणेमुळे आपला प्रश्न फारच बिकट होऊन बसला आहे. ही जाणीव होताच, तेव्हा काय होईल त्याची कल्पना करवत नाही. कदाचित् असेही होईल की, परिस्थितीमुळे इंग्रजांना येथे राहाणे भाग पडेल. इंग्रजाच्या घोषणेमुळे आपली घटनात्मक संरक्षणाची मागणी जरी मागे पडल्यासारखी दिसत असली तरी आपला प्रश्न धसाला लावून झाडून सारे जरी नाही तरी बरेच राजकीय हक्क प्रस्थापित करण्यात आपणास यश आल्याशिवाय राहाणार नाही, ही खात्री बाळगा.

मूलभूत हक्क नियामक कमिटीत आपण बरेच यशस्वी झालो, हे सांगण्यात मला आनंद वाटतो. कमिटीला सादर केलेला मूलभूत हक्कांचा माझा मसुदा मंजूर करण्यात आला. फक्त राज्यकारभारात व नोकरीत वर्गवारी करण्याच्या प्रश्नावर थोडा वाद झाला. वर्गभेद टाळण्याखातर मी काही उपाय सुचविले, त्यातही मला यश येईल, असे वाटते. जर तसे झालेच तर कायदेमंडळात व कार्यकारी मंडळात आपणास भरपूर संरक्षण मिळेल. अल्पसंख्यांक पोटकमिटीच्या दोघा अस्पृश्यांनी सर्वसाधारण दलित जनतेला मान्य नसलेला मसुदा सादर केला आहे. हे सांगण्यास मला वाईट वाटते. एकाची संयुक्त मतदार संघाची मागणी आहे (शेम शेमच्या आरोळ्या). दुसऱ्याने तर त्याच्यावर ताण केली व संयुक्त मतदार संघात विभाजक मतदार पद्धतीची मागणी केली (पुन्हा शेम शेम). या बाबतीत पोटकमिटीत असलेल्या इतर अल्पसंख्य जमातीचे सहकार्य मला लाभेल. अशी आशा आहे. कमिटी या प्रश्नांचा निर्णय बहुमताने लावणार आहे की, त्याबाबतीत तडजोडीची बोलणी करणार आहे. याचा मला नक्की अंदाज नाही. परंतु त्यांनी बहुमताच्या जोरावर निकाल लावला तर मी माझा घटना समितीशी असलेला संबंध अजिबात तोडून टाकेन (टाळ्या), मग काय काय करावे ते आपण ठरवू. राजकीय प्रश्नात स्वकर्तव्याची दुहेरी जबाबदारी आपणास पार पाडावयाची आहे. एक स्वजनाविषयी व दुसरी देशाविषयी. हिंदुस्थान स्वतंत्र झाला पाहिजे, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. त्रिमंत्री योजनेमध्ये जरी आमची उपेक्षा केली गेली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करायच्या नाहीत, ही जाणीव ठेवूनच मी वागत आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य संपादन अधिक सुलभ त-हेने करता आले पाहिजे, याच भावनेने व जाणिवेने मी आतापर्यंत बरीच भाषणे केली आहेत. पण त्याबरोबरच मी हेही निश्चयाने म्हणू शकतो की. राजकीय हक्कांची तरतूद करून सहा कोटी अस्पृश्य लोकांना जर संरक्षण देण्यात आले नाही व अस्पृश्यांना हव्या असलेल्या सवलतीसंबंधी तडजोड करण्याची काँग्रेसने जर तयारी दाखविली नाही तर घटना समितीतून बाहेर पडण्याच्या माझ्या भूमिकेबद्दल मला कोणी दोष देणार नाही, याची मला खात्री आहे. 296 सभासदांच्या घटना समितीत मी फक्त एकच एक आहे. कितीही थोर पुरुष असला व त्याच्यात असामान्य बुद्धी व वाद करण्याचे वा समर्थन करण्याचे अचाट सामर्थ्य कितीही असले तरी तो एकटा असल्यावर काय करणार याची जाणीव तुम्ही आपल्या ध्यानात असू द्या. 211 सभासदांनी कोणत्याही गोष्टीची यथार्थता बौद्धिक वा वैचारिक कसोटी लावून ठरविण्याचे नाकारले व फक्त विरोधकाला हाणून पाडण्याचा कट रचला तर मी एकटा मनुष्य काय करणार ?

शेवटी सर्वाना सुबुद्धी आठवून या गोष्टीची जाणीव होईल व आपणास जे साध्य करावयाचे आहे. ते हस्तगत करता येईल, अशी मला आशा आहे, यासाठी आपणास फक्त संघटनेची गरज आहे. आपल्या अव्याहत प्रयत्नामुळे आपणास जे राजकीय हक्क प्राप्त होतील ते फक्त एका विवक्षित कालमर्यादे पर्यंतच अबाधित राहातील हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदुस्थानात असा एक काळ येईल की, ज्यावेळी केवळ आपलेच नव्हे तर सर्व समाजांचे राखीव हक्क नष्ट केले जातील. कारण त्यांची मुळीच आवश्यकता पडणार नाही. जेव्हा असे घडेल तेव्हा आपणास आपली संघटना, शक्ती व एकी यांच्या बळावर अवलंबून राहावे लागेल, म्हणून अभेद्य संघटना निर्माण करावयाचा दृढ निश्चय करा.

हालअपेष्टा सहन करण्यातच तुमची अभ्युन्नती आहे व म्हणून आपत्काळी धीर सोडू नका. त्यातूनच तुमच्यात दिव्य तेज निर्माण होईल, हा एकच एक संदेश मला द्यावासा वाटतो. काही खेड्यात आपल्या दलितांवर होत असलेल्या अन्यायामुळे व अत्याचारामुळे तुम्ही हिम्मत सोडता कामा नये. पूर्ण संघटित होण्याच्या कृतनिश्चयाने प्रेरित होऊन नव्या दमाने, प्रफुल्लित अंतःकरणाने व नवोत्साहाने अव्याहत कार्य करण्याच्या मार्गाला आपण लागलो पाहिजे. म्हणजे या देशातील कोणत्याही हालअपेष्टांची आपणास मुळीच मातब्बरी वाटणार नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password