Categories

Most Viewed

14 एप्रिल 1929 भाषण

“स्वावलंबन आणि स्वाभिमानाशिवाय तरणोपाय नाही”

रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे रविवार तारीख 14 एप्रिल 1929 रोजी भरवण्यात आली होती. पाहुणे मंडळीपैकी मुंबईचे श्री. देवराव नाईक, द. वि. प्रधान, भा. र. कद्रेकर, शंकरराव गुप्ते, शंकर वडवलकर, श्री. शिवतरकर, बाबा आडरेकर, गायकवाड, मोरे वगैरे मंडळी हजर होती. स्थानिक मंडळीपैकी श्री. विनायकराव बर्वे, साठे, राजाध्यक्ष, खानसाहेब देसाई, पितापुत्र बेंडके, शिवराम जाधव वगैरे मंडळी हजर होती.

वरील परिषदेच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. यानंतर श्री. रगजी यांचे भाषण झाले. यानंतर श्री. बेंडके यांनी रायबहादूर बोले अँडव्होकेट, आनंदराव सुर्वे, श्री. साळवी. सबजज्ज वगैरे मंडळीचे संदेश व तारा वाचून दाखविल्यावर अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी भाषण केले. ते म्हणाले.

मला असे वाटते की, माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठीच असावा. मी देखील मजूर वर्गापैकी एक असून इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या चाळीत राहतो. इतर बॅरिस्टरप्रमाणे मला देखील बंगल्यातून राहता आले असते. पण माझ्या शेतकरी व अस्पृश्य बंधुंकरिता चाळीत राहूनच काम केले पाहिजे. याबद्दल मला केव्हाही वाईट वाटत नाही. मला मुंबईला येऊन अवघी चार वर्षे झाली. अत्यंत हीन मानलेल्या समाजात जन्म झाल्यामुळे त्याच समाजासाठी जीवापाड मेहनत करणे मला भाग पडले आहे. तशात अस्पृश्य कामगारांना इतर कामगारांचे हक्क मिळवून देणे माझे कार्य आहे.

गेल्या दोन वर्षापूर्वी श्री. बेंडके यांचा परिचय झाला. त्यांनी खोती प्रकरणाची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे व ती मी मान्य केली आहे. खोती पद्धतीचा फायदा व तोटा याचा विचार करून त्यासंबंधी नक्की योजना बिलांच्या रुपाने कायदे कौन्सिलात आणणे माझे कर्तव्य आहे. खोतीसारखी दुष्ट पद्धत कशी अंमलात आली याचे मला मोठे आश्चर्य वाटते. ह्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या चित्ताला शांती नाही. काबाडकष्ट करून तयार केलेल्या शेतीवर धनिकांनी आयत्या बिळावर नागोबा’ या नात्याने हल्ला करून त्या आपल्या ताब्यात घ्याच्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवन चारी बाजूंनी संकटात राहिले तरी धनिकांना व खोतांना त्याची पर्वा नसते. अशा वेळी श्रमजिवी शेतक-यांच्या कष्टाचे मेहनतीचे फळ सरकारने मिळवून दिले पाहिजे. माणसाच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. अशा बाबतीत सरकारने गरिबांची दाद घेतली नाही तर ते सरकार सुधारलेले आहे असे म्हणता येणार नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील एक जुलमी खोत आपल्या अधिकाराचा अतिरेक स्त्रियाच्याही अब्रुवर घाला घालून करू शकतो. शेतकरीवर्ग आज खोती पद्धतीमुळे गुलामगिरीत खिचपत पडला आहे. सत्तेचा दुरुपयोग ही न्यायनीती आहे असे कसे म्हणता येईल! ब्रिटिश राज्यात चाललेली गुलामगिरी सरकारला नालायक ठरवित आहे. अन्यायाच्या चौकटीवर कोणत्याही समाजात स्वास्थ निर्माण होणार नाही. शांतता टिकवायाची असेल तर सरकारने न्याय दिला पाहिजे. न्यायी सरकारने इतके दिवस खोती पद्धती चालू ठेविली ही गोष्ट अन्यायाची आहे. सरकारी रानावर खोतांनी हक्काचा अंमल गाजवावा आणि कुळांना जुलुमाखाली नाहक छळावे हे काय गौडबंगाल आहे हेच कळत नाही. सारासार विचार करता खोतीची पद्धत मुळासकट सदोष आहे. सरकार कधीही लहानसहान ओरडीला भीक घालीत नसते. तुम्ही तुमची चळवळ अत्यंत धिटाईने चालू ठेविली पाहिजे. आपल्यावरील अन्यायाची ओरड सारखी करीत राहून उलटपक्षाशी लढत राहिले. तरच चारपाच वर्षात स्वराज्याला पोषक असे हक्क मिळणार आहेत. आजतागायत चळवळी करताना सरकारची मिनतवारी करावी लागत असे. पण चारपाच वर्षांनी पूर्ण सत्ता स्थापन होणार आहे. कौन्सिलमध्ये तुमच्या प्रांतातर्फे प्रतिनिधी पाठविताना योग्य काळजी घ्या. काही झाले तरी कुणाच्या भिडेस बळी न पडता आपल्या मताला पाठिंबा देणारा मनुष्य कौन्सिलात पाठविला पाहिजे. तावून सुलाखून प्रतिनिधी पाठवा. खोतांच्या व खोतांच्या जातभाईना मते देऊन कौन्सिलात पाठवू नका. समाजाचे जीवन परस्वाधीन असल्यामुळे एकमेकावर अवलंबून राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. कुणबी लोकांनी आपल्या स्वाभिमानाला जागून वरिष्ठ लोकांची हलकीसलकी कामे करून स्वतःचा सामाजिक दर्जा मुळीच कमी करून घेऊ नये. स्वावलंबन आणि स्वाभिमान बाळगून आपण आपले कार्य नेटाने करताना ऐक्य व संघटना स्थापन करा. अशा एकोप्याच्या संघटनेच्या चळवळीने आपल्या गा-हाण्यांची दाद कौन्सिलपर्यंत जाऊन लावून घेता येईल. असल्या नेटाच्या प्रयत्नांचा परिणाम खात्रीने यशस्वी होईल याची मला खात्री वाटते.

अध्यक्षांच्या भाषणानंतर खालील ठराव एकमताने पारित करण्यात आला.

“खोतीपद्धत ही निखालस गुलामगिरी आहे. ह्या पद्धतीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सर्वस्वी खोताचा ताबेदार झाला आहे. उपरी कुळांची दशा तर होतेच होते. पण पोचपावती देण्याची पद्धत अस्तित्त्वात नसल्यामुळे कायम धारेकऱ्यांचे हक्कही सुरक्षित राहत नाहीत. आर्थिक दृष्ट्या खोतीपद्धत कुळांना घातक आहे. इतकेच नव्हे तर, नैतिकदृष्ट्याही ही पद्धत विघातक असून कुळांना कोणत्याही प्रकारे सुस्थिती करून घेण्यास उरत नाही. अशा या खोती पद्धतीचा ही परिषद तीव्र निषेध करते व ती नाहीशी करावी अशी सरकारास आग्रहाची सूचना करते.”

वरील ठरावावर श्री. रगजी, श्री. बेंडके यांची भाषणे झाली. याशिवाय किरकोळ ठराव पास झाल्यावर या परिषदेचे काम सायंकाळी 7 वाजता संपले. “डॉ. आंबेडकर की जय” ह्या घोषणेत परिषद आभार प्रदर्शन व पानसुपारीच्या समारंभानंतर बरखास्त करण्यात आली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password