Categories

Most Viewed

13 एप्रिल 1947 भाषण

” सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली. या संस्थेचे ध्येय व उद्देश केवळ शिक्षण देण्याचेच नाही, तर शिक्षण अशारीतीने द्यावयाचे की, ज्यामुळे भारतामध्ये बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक लोकशाही प्रचालन करता येईल. या संस्थेने दिनांक 20 जून 1946 रोजी मुंबई येथे सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालय सुरू केले.

सिद्धार्थ कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले.

ते आपल्या भाषणात म्हणाले,
तुमच्या प्रिन्सिपल साहेबांनी आताच तुम्हाला सांगितले की, आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापि बाल्यावस्थेत असल्याने त्याला आपली परंपरा अद्यापि प्रस्थापित करावयाची आहे. त्यामुळे मला व्याख्यान देण्यासाठी तुम्ही दिलेल्या या संधीचा फायदा घेऊन “आमच्या कॉलेजची परंपरा” या विषयावरच मी आता प्रवचन करणार आहे. परंतु प्रत्यक्ष माझे प्रवचन सुरू होण्यापूर्वी मला आजकालच्या विद्यार्थ्यांना दोन शब्द सांगावयाचे आहेत. मी 1923 पासून ते 1937 पर्यंत मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व येथील लॉ कॉलेजचाही मी प्रिन्सिपाल होतो. 1937 सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला. राजकारणी माणसाला आपली एक प्रकारची विवक्षित स्वरूपाची मनोभूमिका बनवावी लागते. आपल्या विचारांना त्याला एक प्रकारचे विवक्षित स्वरूपाचे वळण लावावे लागते. राजकारणी पुरूषाला प्रचारकार्य करणे अत्यंत आवश्यक असते. पण त्याच्या उलट प्राध्यापकाला कधीच प्रचारकार्य करता येत नाही. प्रचारक हा कधीच शिक्षक किंवा प्राध्यापक होऊ शकत नाही. मी ज्याअर्थी आता राजकारणी प्रचारकाचा पेशा पूर्णपणे पत्करला आहे. त्याअर्थी एखाद्या विषयावर प्राध्यापक या नात्याने मी चांगले व्याख्यान देऊ शकेन याची मला शंका वाटते. पण मी उमेद बाळगतो की. आजचे माझे प्रवचन प्रचारकी पद्धतीचे होणार नाही.

माझी एक अशी सवय आहे ती म्हणजे ज्या विषयावर व्याख्यान द्यायचे त्या विषयावर आधी पूर्णपणे साधकबाधक विचार करायचा! पण आज मात्र मला हे कबूल करायला हवे की. ह्या व्याख्यानापूर्वी जेवढा वेळ व जेवढी मनाची स्वस्थता विचारासाठी मला हवी होती तेवढी मिळालेली नाही. पुष्कळ लोक माझ्या भेटीस येऊन विनाकारण माझा वेळ घेत असतात. असो, एक गोष्ट मी सुरुवातीलाच सांगतो की, आजकालच्या विद्यार्थ्यांच्यामुळे माझी पूर्णपणे निराशा झाली आहे ! माझा त्यांचा इतका निकट संबंध आला खरा. पण त्यांना कशाचीही आस्था वाटत नाही, हे मला कळून चुकले आहे. आमच्या देशात पूर्वी असा एक काळ होऊन गेला की, त्यावेळी रानडे, गोखले, टिळक, सर फिरोजशाह मेहता व त्यांच्याचसारखे आणखी किती तरी आस्थेवाईक व अत्यंत कळकळीचे विद्यार्थी निर्माण झाले. त्यांच्यामध्ये आस्था होती, उमेद होती, शिस्त होती. आपल्या अंगावर एकप्रकारची जबाबदारी आहे याचीही त्यांना पूर्णपणे जाणीव होती. पण आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव किंवा शिस्त मुळीच नाही. माझ्या हाताखालून किती तरी विद्यार्थी शिकून गेले असतील आजपर्यंत. पण आता त्यांची माझी रस्त्यात गाठ पडली तर ते तोंड फिरवून मुकाट्याने पुढे चालू लागतात. ते मला आता ओळख देखील देत नाहीत. कित्येक कॉलेजात व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रणे येतात. पण त्यांचे निमंत्रण स्वीकारावयाचे नाही असा मी मनाशी निश्चय केला आहे. सिद्धार्थ कॉलेज हा त्याला एकच अपवाद आहे. सिद्धार्थ कॉलेजने आपली परंपरा कशी प्रस्थापित करावयाची हे मी आता तुम्हाला सांगतो.

आमच्या कॉलेजचे नाव सिद्धार्थ कॉलेज असे आहे. ते का ठेवले गेले ? मी जर एखाद्या कोट्याधीशाला शब्द टाकला असता तर मला काही लाख रुपये सहज मिळविता आले असते. तसे केल्याने मला या कॉलेजला त्या कोट्याधीशाचे नाव द्यावे लागले असते. पण मी तसा विचार केला नाही. या कॉलेजला “सिद्धार्थ कॉलेज” हेच नाव द्यायचे असा मी निश्चय केला. ते बुद्धाचे नाव आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्याचप्रमाणे हे आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापि एक छोटेसे बालक आहे. त्याला अद्यापि नऊ महिने सुद्धा झाले नाहीत. ह्या कॉलेजने अद्यापि आपली परंपरा प्रस्थापित केली नसेल तर त्याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. पण तेवढ्यावरून आमच्या या छोट्या सिद्धार्थ कॉलेजपुढे काही ध्येयही नाही, अशी मात्र तुम्ही आपली समजूत करून घेऊ नका. ध्येयामुळेच ह्या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज असे नाव देण्यात आलेले आहे हे लक्षात ठेवा. बुद्धाच्या नावाने हे कॉलेज का प्रस्थापित करण्यात आले ?

बुद्धानीच हे ध्येय आपल्या समोर ब्रह्मजालसूत्रात सांगून ठेवले आहे. त्या सूत्रात अशी गोष्ट सांगितली आहे. हिंदुस्थानामध्ये औपनिषर्दिक तत्त्वज्ञानाचा प्रसार झालेला आहे अशी आपली समजूत आहे. या तत्त्ववेत्यांचा ब्रह्मावर विश्वास आहे. एकदा बरेचसे ब्राह्मण तत्त्वज्ञानी गौतमाला भेटायला आले. गौतमाच्या शिष्यांनी आपल्या गुरूला सांगितले. “आपल्या भेटीची अपेक्षा करून ते ब्रह्मवादी तत्त्वज्ञानी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. यांनी एक नवीन तत्त्वज्ञान प्रस्थापित केलेले आहे. या तत्त्वज्ञानातील मुख्य दैवत म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे. गुरुजी, आपणाला याविषयी काय सांगावयाचे आहे ते जाणण्याची आम्हा साऱ्यांची इच्छा आहे.

गौतमांनी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारार्ह आहे असे मला वाटते. गौतमांनी या ब्रह्मवाद्यांना प्रश्न केला,
“तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय ?”
“नाही” असे उत्तर मिळाले.
“तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहे काय ? “
“नाही.”
“तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले तरी आहे का ? “
“नाही.
“तुम्ही ब्रह्माची चव घेऊन पाहिली आहे का ?”
पुन्हा उत्तर आले “नाही.”
“मग तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी व पंचकर्मेंद्रियांनी ब्रह्म काय आहे हे अनुभविले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्माचे अस्तित्व आहे हे तरी कशावरून तुम्ही म्हणता ?” यावर त्या ब्रह्मवाद्यांना काही एक उत्तर देता आले नाही.

आता मी तुम्हाला गौतमाच्या आणखी एका व्याख्यानाविषयी सांगतो. त्याविषयी महापरिनिब्यान सूत्रामध्ये विवेचन केलेले आढळून येते. गौतम हे आसन्नमरणावस्थेत होते. त्यावेळी त्यांचे मुख्य शिष्य हे कुशिनारा या ठिकाणी राहात होते. त्यावेळी त्यांचे मुख्य शिष्य आनंद यांनी गौतमाला विचारले, “महाराज, आपल्याला एवढ्या लवकर निर्वाण घेता येणार नाही. अद्याप कितीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत की, ज्याविषयी आपण आम्हाला काही एक निर्णय दिलेला नाही की त्याविषयी आपण आम्हाला काही मार्गदर्शन केलेले नाही !” बुद्धांनी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारणीय आहे. ते म्हणाले, “मी तुम्हामध्ये आज चाळीस वर्षे राहिलो आहे. म्हणजे आता माझ्या वयाला पूर्ण ऐंशी वर्षे झाली आहेत. मी तुमच्या संगतीत इतकी वर्षे राहिलो असल्याने अद्यापिही काही समर्पक उत्तरे माझ्याकडून तुम्हाला मिळाली नाहीत असे तुम्ही म्हणता त्याचे मला फार आश्चर्य वाटते. नसतील हे मला अशक्य वाटते. माझ्याकडून सारी उत्तरे मिळाली. आमच्या आतापर्यंतच्या चाळीस वर्षाच्या संभाषणात सांगण्यासारखे अद्यापि काही बाकी राहिले असेल असे मला वाटत नाही.

या तुमच्या प्रश्नामुळे तुमच्या डोक्यात काही तरी घोटाळा झालेला आहे असे मला वाटू लागले आहे. मी आजपर्यंत तुम्हाला जे जे शिकविले त्याचा तुम्हाला पूर्णपणे बोध झाला नसावा असे मला वाटू लागले आहे. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा व त्याप्रमाणे वागा म्हणजे तुमचे प्रश्न तुम्हाला स्वतःलाच आपोआप सोडवता येतील. म्हणजे केवळ एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहिजे असे तुम्ही बिलकूल मानू नका. ती गोष्ट तुमच्या विचारशक्तीला, तुमच्या तर्कशक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना, नाही तर तुम्ही ती खुशाल टाकून द्या. हीच माझी शिकवण आहे.

गौतम बुद्धांच्या या म्हणण्याचा काय अर्थ आहे बरे ? त्याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक मनुष्याला विचारस्वातंत्र्य आहे. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्यशोधन करण्यात केला पाहिजे आणि सत्य म्हणजे तरी काय बरे ? सत्य हेच आहे की मनुष्याच्या पंचज्ञानेंद्रियांना व पंचकर्मेंद्रियांना ते सत्य पटले पाहिजे. म्हणजे ते सत्य पाहाता आले पाहिजे, ऐकता आले पाहिजे, त्याचा वास घेता आला पाहिजे, त्याचा स्वाद घेता आला पाहिजे व त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला साक्ष पटविता आली पाहिजे.

ही ध्येये गौतमानी आपल्या शिष्यांपुढे ठेवली होती. हीच ध्येये आमचे सिद्धार्थ कॉलेज अनुसरणार आहे. (1) सत्य शोधून काढणे व (2) जो धर्म आपल्याला मानवता शिकविल त्याच धर्माचे अनुसरण करणे.

आधुनिक विचारांची प्रणाली कोणत्या दिशेने वाहते आहे ते मला माहीत आहे. मी तुम्हाला हेही सांगून ठेवतो की, कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाशीही मी काही अपरिचित नाही. त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे अफू आहे! पण हे त्याचे म्हणणे मला पटण्यासारखे नाही. मला वाटते की सत्य शोधून काढणे म्हणजेच सत्यधर्म. सत्य आणि सत्ता या परस्परविरोधी गोष्टी आहेत. (Truth and authority are inconsistent). शास्त्र सुद्धा कोणत्याही गोष्टीची परिपूर्णतः (Finality) मान्य करीत नाही. म्हणून सत्य सुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुनः पुनः शोध करणेच प्राप्त असते. म्हणूनच जगामध्ये पुर्णतया पवित्र ( Sacrosanct) असे काहीच नाही.

धर्म म्हणजे सत्य आहे हे आम्ही शिकले पाहिजे. नहि सत्यात्परो धर्मः ! हेच आपले ध्येय असायला पाहिजे. आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये, हीच आमच्या धर्माची खरी शिकवण असली पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे आपल्या ह्या कॉलेजचे ध्येय आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password