” प्रोफेसरांनी अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या कामी स्वतःला वाहून घ्यावे.”
मुंबई येथील सेंट झेवियर्स कॉलेजातील पुराणवस्तुसंशोधन व पुराणेतिहास या विषयाचे विद्वान् प्रोफेसर रेव्हरंड फादर हेरास यांचे सिद्धार्थ कॉलेजात महें-जो-दारो येथील लेखवाचन या विषयावर एकदा उद्बोधक भाषण झाले. त्यादिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोफेसरांचे संशोधनकार्य या विषयावरच विवेचन करण्यास सुरवात केली. ते म्हणाले,
फादर हेरास यांनी अत्यंत परिश्रम करून महें-जो-दारो येथे सापडलेल्या नाण्यांवरील व विटांवरील लेख कसे वाचावे याचा अपूर्व शोध केला याबद्दल कोणालाही आनंद, अभिमान व आश्चर्य वाटल्यावाचून राहाणार नाही, पण मला वाटते की, ज्याप्रमाणे फादर हेरासनी एकध्येय वृत्तीने या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला स्वतःला वाहून घेतले व अत्यंत प्रचंड असे संशोधन केले तसेच आमच्या हिंदी प्रोफेसरांनी का केले नाही असा एक माझ्या पुढे प्रश्न उभा राहातो. की आमच्या हिंदी प्रोफेसरांना तशी आवडच नाही ? किंवा त्यांच्याजवळ पुरेशी विद्वता नाही किंवा त्यांच्यापाशी पुरेशी साधनसामग्री नाही ? ह्या गोष्टींची कारणे काय असली पाहिजेत याचा आपण बारकाईने विचार करू.
मला वाटते की थोडेसे रुपये मिळवावेत व आपली सुखाने कालक्रमणा करावी यापलीकडे आमच्या प्रोफेसरांना आयुष्यात काही महत्त्वाकांक्षाच नाही. या महत्त्वाकांक्षेच्या अभावामुळे त्यांच्या हातून काहीही भरीव कार्य होत नसावे. ते मधून मधून काही पाठ्य पुस्तकांवर टिपणे लिहितात, टिपणे लिहिण्याच्या पलिकडे काही महत्त्वाचे कार्य आहे याची माहिती त्यांना आहे की नाही कोण जाणे !
इतक्यात एक प्रोफेसर म्हणाले, “आम्ही प्रोफेसर मंडळी हल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळणाऱ्या शिक्षणपद्धती पासूनच निर्माण झालेलो आहोत. यासाठी आपल्याला प्रोफेसरांना दोष न देता तो युनिव्हर्सिटीच्या शिक्षणपद्धतीलाच द्यावा लागेल.
तेव्हां डॉक्टर म्हणाले, आमच्या युनिव्हर्सिटीतील शिक्षणपद्धतीमुळे उत्तम उत्तम प्रोफेसर निर्माण होणे कठीण झाले आहे हे मला कबूल आहे. आमच्यापैकी बऱ्याचशा प्रोफेसरांना शेक्सपियरची नाटके किंवा काव्ये कॉलेजातून शिकवावी लागतात. हे विषय शिकविल्यापासून आमच्या तरुण पिढीचा किंवा हिंदुस्थानाचा काय फायदा होतो ? काहीही फायदा होत नाही. असे मला वाटते. मी सुद्धा कधी कधी झोप येत नसली म्हणजे शेक्सपियर किंवा काव्य वगैरे वाचतो. नाही असे नाही. पण ते केवळ वेळ घालविण्यासाठी, त्या विषयावर मला विचार करता येत नाही.
आमच्या कॉलेजातून हल्लीच्या काळी अगदी साधारण प्रतीचे शिक्षण दिले जाते, अगदी बी. ए. च्या परीक्षेपर्यंत. एखाद्या तात्या पंतोजीच्या पद्धतीने शिक्षण दिले जाते हे कबूल. पण त्यातही आपल्याला सुधारणा करता येणार नाही असे नाही. आता मुंबई शहरातच आर्टस् व सायन्स हे विषय शिकविणारी सहा मोठाली कॉलेज आहेत. प्रत्येक कॉलेज हे हल्लीच्या पद्धतीनुसार युनिव्हर्सिटीशी निगडित असले तरी त्याचे अस्तित्त्व हे एखाद्या स्वतंत्र विद्यालयाप्रमाणे विभक्तच आहे नाही का ! त्यामुळे काय होते की, या सा-याही सहा कॉलेजातून निरनिराळ्या प्रोफेसरांकडून तेच तेच विषय पुनः पुनः शिकविले जातात. यामुळे कामाची निरर्थक पुनरावृत्ती होते. पण समजा या पद्धतीऐवजी आपण असे केले की. एल्फिन्स्टन कॉलेजात फक्त इतिहास व अर्थशास्त्र हेच विषय शिकविले जाण्याची सोय केली. ज्या प्रोफेसरांना हे विषय शिकवावयाचे असतील त्यांना एल्फिन्स्टन कॉलेजमध्येच ते विषय शिकविण्यासाठी आपण धाडले तर एकाच विषयांचे सात आठ प्रोफेसर एकत्र येऊ शकतील आणि मग त्यांच्या कामाची आपणाला साहजिक विभागणी करावी लागेल. एक प्रोफेसर प्राचीन हिंदुस्थानावरच व्याख्याने देतील. दुसरे प्रोफेसर ‘बुद्धांचा काळ व ख्रिस्तयुगाचा आरंभ’ या विषयावर व्याख्याने देतील, तिसरे प्रोफेसर ‘मुसलमानी युग’ यावर व्याख्याने देतील तर चवथे ‘मराठ्यांचे युग’ व पाचवे प्रोफेसर ‘इंग्रजांचे युग’ यावर व्याख्याने देतील. त्यामुळे विषयांची अतिशय उत्तम वाटणी होईल आणि एकेका प्रोफेसराला आपापल्या विषयाचे पूर्ण अध्ययन करण्यास खूपच अवसर मिळेल. त्यामुळे त्याला आपापल्या विषयावर संशोधनकार्य करण्याकरता तयारी करावयाला भरपूर सवड मिळेल. इतर सुधारणा या मुंबई विश्वविद्यालयात घडवून आणण्याची वाट पाहात बसण्याऐवजी आपण पहिल्याने ही अगदी साधी सुधारणा ताबडतोब घडवून आणू या ! दरेक कॉलेजने एक दोन विषयासाठीच आपल्याला वाहून घ्यावे. त्यामुळे त्या विषयाचा संपूर्ण ग्रंथसंग्रह त्या कॉलेजात होऊ शकेल व आवश्यक असलेले वस्तुसंग्रहालयही एकेच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल. सर्व कॉलेजातील प्रोफेसरांना त्यांच्या त्याच्या विवक्षित ठरविलेल्या प्रमाणाने पगार न देता तो विश्वविद्यालयानेच सर्वांसाठी सारखाच ठेवावा. म्हणजे हल्लीप्रमाणे सरकारी कॉलेजात पगाराचे एक प्रमाण व खाजगी कॉलेजात दुसरे असा फरक होणार नाही. पगाराची तक्रार नाहिशी झाल्यावर व कामाची उत्तम वाटणी झाल्यावर शिक्षण देण्याचे कार्य व संशोधनकार्य झपाट्याने चालू होईल.
माझे तर असे मत आहे की, प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके वाहून घ्यावे की, आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळी सवडच मिळता कामा नये. ते काम संपूर्णपणे त्यांच्या पत्नीवरच सोपविण्यात आले पाहिजे. प्रोफेसर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगाच वाढवीत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन यामध्ये संशोधनही आलेच. या तीन गोष्टींखेरीज प्रोफेसरांनी दुसरे कोणतेही काम करता कामा नये.