Categories

Most Viewed

13 एप्रिल 1933 भाषण

“डॉ. सोळंकींचे मानपत्रापेक्षा अन्य तऱ्हेने उतराई होणे जरूर”

तारीख 13 एप्रिल 1933 रोजी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सोळंकीसाहेब यांना मानपत्र व प्रो. राव यांचा सन्मान करण्याचा समारंभ झाला. प्रथम रा. ग. सु. दारोळे यांनी अध्यक्षाची सूचना आणली. तिला रा. तिगोटे यांनी अनुमोदन दिल्यावर अध्यक्ष डॉ. बाबासाहेब यांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात अध्यक्षस्थान स्वीकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की,

आजच्या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यास मला अतिशय आनंद होत आहे. सदर प्रसंगी आपणास तीन कार्ये पार पाडावयाची आहेत.
(1) डॉ. सोळंकीसाहेबांना मानपत्र अर्पण करावयाचे आहे.
(2) म्युनिसीपल स्कूल कमेटीचे चेअरमन प्रो. राव यांनी अस्पृश्य वर्गाची अभिनंदनीय कामगिरी केली त्याबद्दल त्यांचा सन्मान करावयाचा आहे.
(3) नगर जिल्ह्याच्या शिक्षणाप्रित्यर्थ बोर्डिंग उघडण्याच्या कार्याचा विचार करावयाचा आहे.

डॉ. सोळंकीसाहेबांनी अस्पृश्य वर्गासंबंधी केलेली कामगिरी तुमच्या आमच्या परिचयाची आहे. ती विषद करून सांगण्याची जरूरी नाही. लोकोपवादाची पर्वा न करता आपल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी आपली सर्व शक्ती खर्च केली आहे. मला स्वतःला कबूल करणे भाग आहे की, त्यांनी कायदे कौन्सिलमध्ये किंवा मुंबई म्यु मध्ये माझ्या शतपटीने कामगिरी केली आहे. मला माझ्या इतर कामामुळे कौन्सिलमध्ये फारसे हजर राहाता येत नाही. कामगिरीचे सर्व श्रेय त्यांच्या चिकाटीला व कार्यकारीपणाला आहे.

श्रीमंत लोक नेहमीच राजकारण व समाजकारण करीत असतात. ज्यांचा बँकेत पुष्कळ पैसा आहे, अशी माणसे सार्वजनिक कार्यात असतात. दर महिन्याला चेक फाडून उदरनिर्वाह चालवितात. आयुष्यातील फावला वेळ मनोरंजनार्थ समाजकार्यात खर्च करतात. स्वतःचा चरितार्थ चालवून समाजकार्य करणे ही गोष्ट साधी सोपी नाही. त्यांची वैद्यकीची परीक्षा पास झाली असूनही स्वतःचा दवाखाना नाही. 24 तास सार्वजनिक कार्यात गुंतलेले असतात. हा त्यांचा समाजावर उपकार आहे.

इंग्लंडात मजुरांचे राजकारण करणारांना चांगले वेतन मिळत असे. 1910 साली पार्लमेंटच्या सभासदांना पगार देण्यात येत नव्हता. त्यावेळी त्यांना 400 पौंड मजुरांच्या संस्थांतून मिळत असत. इकडे काहीच नाही. असे असताना डॉ. सोळंकींनी समाजकार्य चालू केले आहे.

त्यांचे मानपत्रापेक्षा अन्य तऱ्हेने उतराई होणे जरूर आहे. त्यांच्या ठायीचे प्रेम व्यक्त करण्याकरिता आपण त्यांना मानपत्र देत आहोत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password