Categories

Most Viewed

12 एप्रिल 1933 भाषण

“तुम्हालाच तुमची जबाबदारी ओळखणे प्राप्त आहे”

पूर्वी ठरल्याप्रमाणे नगर जिल्हयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. सोळंकी साहेब यांस मानपत्रे अर्पण करावयाचा आणि प्रो. राव यांचा सन्मान करावयाचा समारंभ तारीख 12 व 13 एप्रिल 1933 रोजी मुंबई दामोदर हॉलच्या पाठीमागील पटांगणात मुद्दाम उभारलेल्या भव्य मंडपात निर्विघ्नपणे पार पडला.

पहिल्या दिवशी डॉ. सोळंकीसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस मानपत्र अर्पण करण्यात आले.

प्रथम, रा. आर. एच. आढांगळे यांनी अध्यक्षाची सूचना आणली. तिला रा. सू. ता. रुपवते यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. सोळंकीसाहेब यांनी अध्यक्षस्थान मंडीत केले. डॉ. सोळंकीसाहेब आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, “डॉ. आंबेडकरांचा सन्मान करणे म्हणजे तुमचा आमचाच सन्मान करण्यासारखे आहे.” यानंतर रा. रोहम यांनी मानपत्र वाचून दाखविल्यावर ते सुंदर रौप्य करंडकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांनी त्याचा स्वीकार केल्यावर ते बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले,

हा आजचा समारंभ नगर जिल्ह्यातील मंडळीकडून साजरा करण्यात येत आहे. त्यांच्याकरिता कोणतीही स्पेशल कामगिरी मी केली नसताना फक्त माझ्यावरील त्यांच्या प्रेमामुळेच हा समारंभ घडून येत आहे. याबद्दल या मंडळीचे मी आभार मानतो. नगर जिल्हा इतर जिल्ह्यापेक्षा थोडा मागासलेला आहे. या जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती अडचणीची आहे हे मी जाणून आहे. या जिल्ह्यातील महार लोकांनी खिश्चन धर्माचा स्वीकार केल्यामुळे दोन पंथ झाले आहेत. असे असता या जिल्ह्याकडे विशेष लक्ष पुरविणे मला शक्य झाले नाही, याबद्दल वाईट वाटते. मला नवीन असे काही सांगण्यासारखे राहिलेले नाही. तरी पण या खुर्चीवर बसल्यापासून माझ्या मनात खेदाचे प्रकार घुटमळू लागले आहेत. जमलेल्या लोकांना असे वाटत असेल की, आपण पुढारी झालो असतो तर किती चांगले झाले असते ! डॉ. आंबेडकरांचे नाव बऱ्या-वाईट प्रकारे वर्तमानपत्रातून वाचावयास मिळते. तसे आपले झाले असते. माझी स्वतःची अशी प्रबळ इच्छा आहे की, माझ्या स्थानी दुसरा कोणी येईल तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. माझ्या गळ्यात हार घालणाऱ्याला आनंद झाला

असेल. परंतु त्याच्या उलट माझी स्थिती झाली आहे. तुम्ही माझी जी स्तुती केली आहे त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. तुम्ही माझ्यापासून काही तरी कार्याची अपेक्षा करीत असता. मला पुष्कळ वेळा वाटते की, समाजाची जबाबदारी न घेता मी एकटा राहिलो असतो तर दैववान झालो असतो. माझे सर्व आयुष्य विद्यार्थी दशेत जावे अशी माझी इच्छा होती. म्हणून जिभेला टाचा मारूनसुध्दा मी अनेक पुस्तके खरेदी केली. एखादी प्रोफेसरची नोकरी पत्करून पुस्तके वाचण्यात सुखाने काळ काढावा अशी माझी पहिली इच्छा होती. परंतु सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा मला अस्पृश्यांच्या चळवळीत पडावे लागले. आता मात्र यातून पाय काढण्याची मला भीती वाटते. अस्पृश्य समाजाची जबाबदारी साधी सोपी नाही. निव्वळ स्तुतीने किंवा सभेने फायदा होईल, असे मला वाटत नाही. तसे असते तर यापूर्वीच सर्व काही झाले असते. रोज मजकडे 25 ते 30 पत्रे येतात. ती वाचणाऱ्याला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. त्या कामात नित्य लक्ष घालणारी माणसे पाहिजे. तुमच्यात जी थोड़ी बहुत माणसे आहेत ती माझ्या दुर्गुणामुळे म्हणा किंवा तुमच्या दुर्दैवामुळे म्हणा माझ्याबरोबर काम करण्यास तयार नाहीत. नुसता कार्य करणाऱ्या माणसांचा अभाव आहे. एवढेच नसून पैशाचीही टंचाई आहे. मजकडे जो येतो तो हात हालवीत येतो. न पैसा, न माणूस, न बुध्दिमता असे असताना या समाजाचे काम करणे मोठे कठीण आहे. डॉ. सोळंकीनी मला या कामातून मुक्त करावे. इतर समाजातील लोक चतुर्थाश्रमात वयाची 50 वर्षे उलटल्यानंतर समाजकार्यास आरंभ करतात. परंतु मला वयाच्या 25 व्या वर्षीच समाजकार्य सुरू करावे लागले. आता आपल्या समाजाला राजकीय सत्ता मिळालेली आहे. याउपर माझी समाजाला विशेष आवश्यकता आहे असे वाटत नाही. शिकलेली माणसे तयार होत आहेत. अजून जरी आयुष्याची काही वर्षे माझ्या स्वाधीन होतील तर मला माझे व्यक्तिगत हित साधता येईल. तुम्ही स्वतःचे पायावर काम करा. ज्यांना माझे व डॉ. सोळंकींचे वैषम्य वाटत असेल त्यांनी आम्हास सुचवावे. आम्ही एका पायावर तयार आहोत. प्रत्यक्ष सर्व प्रकारची जबाबदारी यापुढे मी घेऊ इच्छित नाही. सार्वजनिक कार्याची साधनसामग्री तुम्ही तयार केली पाहिजे. काँग्रेसने आपल्या चळवळीसाठी आतापर्यंत 2 कोटी रूपयांपेक्षाही जास्त खर्च केला असेल. मुसलमानांनी आपल्या चळवळीसाठी तितकाच किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च केला असेल. आपल्या लोकांनी आपल्या चळवळीसाठी किती खर्च केला ? फार तर दोन-तीन हजार रुपये ! असला सवंग सौदा मला लाभला आहे. यापुढे मात्र तुम्हाला तुमची जबाबदारी ओळखणे प्राप्त आहे. माझे बरेच दिवसांचे हृद्गत स्पष्ट शब्दात सांगितले. ते ऐकून घेतल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानून आपली रजा घेतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password