Categories

Most Viewed

11 एप्रिल 1925 भाषण

“घनघोर संग्राम केला तरच माणुसकी परत मिळेल”

बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे जिल्हातून लोकजागृतीसाठी सभा भरविण्याचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्रर केला. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी गावी मुंबई इलाखा प्रांतिक बहिष्कृत परिषद अधिवेशन तिसरे ही सभा बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10-11 एप्रिल 1925 रोजी भरविली. परिषदेला संबोधित करताना दिनांक 11 एप्रिल 1925 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

या देशात आजकाल ज्या घडामोडी चालल्या आहेत त्यात आपल्याला अत्यंत जिव्हाळ्याची बाब म्हटली म्हणजे वैकम येथील सत्याग्रह ही होय. म्हणूनच वैकम येथील सत्याग्रहावरून जे विचार मला सुचले आहेत ते मी आपणापुढे मांडीत आहे.

वैकम येथे कसला वाद चालू आहे हे बहुतेकास विदित आहेच. ज्या रस्त्यावरून सर्व लोकांना व जनावरांना जाता येते त्या रस्त्यावरून आपणासही जाता यावे, असा आग्रह वैकम येथील अस्पृश्यांनी धरला आहे. या सत्याग्रहात ज्या काही रदबदल्या घडल्या त्या सर्वांचे आपल्याला फारसे प्रयोजन नाही. ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, हा सत्याग्रह वर्षाधिक कालपावेतो चालून अखेर निष्फळ झाला. या सत्याग्रहासंबंधाने काही राजकीय पुढाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला आहे ही गोष्ट खरी आहे. कारण आधी राजकीय मग सामाजिक, ही मीमांसा अगदी नादानपणाची आहे हे आता सिद्ध झाले आहे. कारण आज इतके दिवस नुसते राजकारण शिजत घातल्यानंतर जर राजकीय ध्येयाच्या आड कोणती बाब येत असेल तर ती सामाजिकच होय. सामाजिक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की त्याला कितीही भिजत पडू दे म्हटले तरी तो प्रश्न दत्त म्हणून पुढे उभा राहतोच. ज्या राजकारणी धुरंधर पुरुषांनी सामाजिक प्रश्न बाजूस ठेवून नुसते राजकारण हाती घेतले व इतरास घेण्यास लावले त्यांनी काहीच साधले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक प्रश्न बाजूस टाकल्यामुळे त्याच्या राजकीय ध्येयाची साध्यता त्याची त्यांनीच बिकट करून टाकली. यास आजची परिस्थिती साक्ष देत आहे. तो सामाजिक प्रश्न त्यांनी वेळीच हाती घेतला असता तर आज सर्वत्र दिसून येत असलेली तेढ व दुही दृष्टीस पडती ना! ही तेढ व दुही नाहीशी करण्यास या देशात घडत असलेले सामाजिक अन्याय दूर करणे हे अव्वल महत्त्वाचे कार्य आहे. ते दरेक हिंदी जनाने आपले पवित्र कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे, असे सांगणारा मुत्सद्दी या देशात महात्मा गांधीपूर्वी कोणीच झाला नाही. त्यांच्या मते सामाजिक व राजकीय या बाबी दोन नाहीत त्या एकच आहेत. म्हणूनच हिन्दू-मुसलमानांचे ऐक्य व अस्पृश्यता निवारण या दोहोशिवाय स्वराज्य मिळणार नाही, असे ते नेहमी सांगत फिरतात.

बारीक नजरेने पाहिले असता ज्याप्रमाणे कस्तुरबा गांधी व लक्ष्मी यांच्यामध्ये सापत्नभाव आहे. त्याप्रमाणे महात्मा गांधी व अस्पृश्यता यांच्यामध्येही थोडासा सापत्नभाव आहे असे म्हणावे लागते. कारण ते जितका खादीप्रसार व हिन्दू मुसलमानांचे ऐक्य यावर भर देतात, तितका अस्पृश्यता निवारणावर देत नाहीत. तसा जर त्यांनी दिला असता तर ज्याप्रमाणे काँग्रेसच्या बाबतीत सुतावाचून मत नाही असा त्यांनी हट्ट धरला. त्याप्रमाणे अस्पृश्यता निवारणावाचून काँग्रेसमध्ये शिरकाव नाही, असाही आग्रह त्यांना धरता आला असता. असो ! जेथे कोणीच जवळ करीत नाही तेथे महात्मा गांधींनी दर्शविलेली सहानुभूती काही कमी नाही. त्या त्यांच्या सहानुभूतीप्रमाणे वैकम येथील सत्याग्रहाची काहीतरी वासलात लावावी म्हणून ते स्वतः वैकम येथे गेले होते. त्यांनी तेथील ब्रह्मवृंदापुढे तडजोडीच्या तीन सूचना मांडल्या.

त्यांनी सांगितले की (1) एकतर जनतेचे लोकमत घ्या. (2) दुसरे ज्या शास्त्रात अस्पृश्यता सांगितली आहे ती खरी की खोटी हे पंडितांमार्फत ठरवून घ्या. अगर (3) त्रावणकोरचे दिवाण यास सरपंच नेमून निवडक पंडिताच्या पंचामार्फत ही बाब लवादात काढा. पण सखेदाश्चर्याची गोष्ट ही की हे तिन्ही अनुमतीचे मार्ग तेथील ब्रह्मवृंदांना मान्य झाले नाहीत. त्यांनी अस्पृश्यांना मज्जाव करण्याचा आपला निश्चय ढळू दिला नाही. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांस हा अन्याय आहे असे म्हणणाऱ्या महात्माजीपुढे कोणतेही शास्त्र ठेवून दिले.

ही हिंदूची शास्त्रे मी काही वाचून पाहिलेली नाहीत. त्यांच्या पोटात काय काय कोडी साठविलेली आहेत त्याची मला माहिती नाही. माझी खात्री आहे की, त्या शास्त्रात अस्पृश्यता सांगितलेली आहे. परंतु व्यवहारात अस्पृश्यता पाळणे हा धर्म आहे. असे आमचे धर्ममार्तंड निधड्या छातीने सांगतील असे मला वाटले नव्हते. याचा उघड अर्थ असा की, आम्ही एकतर सगळी शास्त्रे जाळून राख केली पाहिजे अगर शास्त्रे चाळीत बसून अस्पृश्यतेसंबंधी जे निर्णय असतील ते खोटे ठरवित बसले पाहिजे. ते निर्णय जर आम्हाला फोल ठरविता आले नाहीत तर आम्हाला अस्पृश्यता ही आदीअंतापावतो भोगावी लागणार आहे. असाच जर आमच्या धर्ममार्तंडाचा दुराग्रह असेल तर या शास्त्रांची विल्हेवाट अगदी निराळ्या रीतीने लावणे भाग आहे.

इंग्लंडमध्ये बर्कले नावाचा एक फार मोठा तत्त्ववेत्ता होऊन गेला. तो नाना तऱ्हेची तात्त्विक कोडी रचून लोकांना अडवीत असे. लोक त्याच्या कोड्यापुढे अगदी कुंठित होत असत. अशापरी गाजलेल्या एका गृहस्थाने डॉ. जॉन्सन यांची मदत घ्यावी म्हणून त्याकडे गेला व बर्कलेचे एक कोडे सांगून ते उकलण्यास आर्जव करू लागला. काही वेळानंतर जवळच धोंडा पडला होता. त्यावर तो कागद ठेवून ठोकर मारून डॉ. जॉन्सन म्हणाला. हे पहा अशा रीतीने मी त्याचे कोडे सहज उकलतो. हाच न्याय या हलकट शास्त्रांना लागू करणे रास्त आहे. खरोखरी ही शास्त्रे सर्व जनतेचा अपमान करणारी आहेत. ही सरकारने केव्हाच जप्त करायला पाहिजे होती. निदान त्याचा जप करणारांनी सामाजिक प्रश्नांची तडजोड होत असता ती मधे आणू नयेत. नाहीतर भयंकर प्रसंग ओढवण्याची भीती आहे. सर्वांनी बरोबरीचे नाते राखून, एकमेकास प्रसंगोपात्त मदत करून, जेणेकरून समाजात सौख्य नांदेल अशा रीतीने आपले वर्तन ठेवणे हाच समाज रचनेचा आद्य हेतू आहे. ज्यावेळी समाजातील काही लोक प्रबल होऊन इतरांवर जुलूम करू लागल्यामुळे समाज संघटनेचा हा हेतू सिद्धीस जात नाही असे दृष्टोत्पत्तीस येईल. त्यावेळी तेथेच चाचपडत न बसता आपले सर्व इतर उद्योग बाजूस सारून मोठ्या नेटाने श्रम करून प्रबळ झालेल्या त्या मदांधांची शेंडी धरून त्यास खाली वाकविणे हेच समाजातील प्रत्येक व्यक्तिमात्राचे कर्तव्यकर्म होय. सर्व लोकांची स्थिती सर्वतोपरी तंतोतंत सारखी ठेवण्याविषयी सर्वांनी झटावे ही आमची मागणी नाही.

ज्याप्रमाणे लहान नवरा व मोठी बायको यांचा जोडा जमला असता मुलीस यौवनावस्था प्राप्त होऊन मुलाची फजिती न व्हावी म्हणून मुलीचे मीठ तोडा असे सुचवितात त्याप्रमाणे आम्ही दरिद्री आहोत म्हणून इतरांचे द्रव्य लुबाडून त्यांना आमच्या बरोबर दरिद्री करा असे आम्ही सुचवित नाही. आम्ही आपले मानव जातीस प्राप्त असलेले समान हक्क मागत आहोत. परंतु ते मिळण्यासदेखील आम्हाला शास्त्रांची आडकाठी आहे. जेथे जेथे म्हणून हे हक्क हिरावून घेण्यात आले होते तेथे तेथे मोठी रणे माजली होती. फ्रांसमधील वरिष्ठ लोकांनी छळ केल्यामुळे कनिष्ठ लोकांनी त्यांची कत्तल उडविली: अमेरिकेतील निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सहा वर्षे अमेरिकन लोकांनी आपसात यादवी केली. त्या यादवीत अनेक लोक मेले ही गोष्ट खरी. पण जे मेले ते व्यर्थ गेले नाहीत. तर त्यांनी जे उरले त्यांचे जीवन सुखावह केले. असा एखादा घनघोर संग्राम केला तरच आपली हरण करण्यात आलेली माणुसकी आपणास परत मिळेल किंवा एखाद्या सौम्य उपायाने लाभेल.

हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवला तरी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे व ती ही की इतका अन्याय, इतकी अवहेलना इतकी जबरदस्ती जरी आम्हावर होत आहे तरी आम्ही मुक्यासारखे स्तब्ध आहोत व गायीप्रमाणे गरीब झालो आहोत. आम्हाला त्याचे काही दुःख नाही. चीड नाही. जाणीव नाही. नवल आहे ते हेच. लहान सहान मुंगीवर जरी पाय दिला तरी ती डसते. पण आम्ही किड्याएवढे मोठे प्राणी असता आम्हाला कोणी लाथा मारल्या असता देखील आम्ही उलटून पडत नाही याची कारणे शोधून पाहू गेलो असता मुख्यतः दोन दिसतात. एक आपल्यात ज्ञान व शहाणपण नाही. ही ज्यांच्याजवळ होती त्यांनी त्यांच्या बळावर आपल्या लोकांवर जुलूम केला. अमुकच नियमाबरहुकूम वागावे असे आपल्या सल्ल्यावाचूनच ठरवून आम्हावर तसे वागण्याविषयी अन्यायाने सक्ती केली. हे सर्व आपल्या कर्तव्यकर्माची हयगय केल्याची फळे आपण भोगीत आहोत. आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. आपले माणुसकी रूपी धन दुसऱ्यांनी हरण केले. त्यांना योग्य वेळीच शिक्षा केली असती तर आज आपल्या लोकात दृष्टीस पडत असलेली अत्यंत शोचनीय व नीच अवस्था आपणास कधीही प्राप्त झाली नसती. या सुवर्णभूमीत अन्नान्नगत होऊन लाजिरवाण्या तोंडाने दुस-याची याचना करण्याचाही प्रसंग आपणावर कधी आला नसता. परंतु अन्यायाचा प्रतिकार करण्यास सज्ज होण्याऐवजी आम्ही जुन्या चालीरीतीस कवटाळून अगदी खंगत चाललो आहोत. आमच्यात काही प्राण उरला नाही. आम्ही निस्तेज झालो आहोत. असे होण्याचे कारण हेच की मुलांच्या संबंधाने आईबापांची कर्तव्यकर्मे काय आहेत, याकडे आपल्या लोकांनी पाहिजे तितके लक्ष पुरविले नाही. नसत्या जबाबदाऱ्या आपल्या डोक्यावर घेतल्यामुळे व त्या हव्या तशा हातून न वढल्यामुळे आपल्यातील आईबाप मुलांच्या नाशास कारणीभूत होतात.

आपल्यात बापाने मुलाचे लग्न केलेच पाहिजे ही नसत्या जबाबदारीपैकी एक जबाबदारी आहे. लग्न करून संसाराची जमवाजमव होते न होते तो इकडे मुलांची परंपरा सुरू झालीच. चारपाच वर्षात एक दोन पोरे जयदत्त म्हणून पुढे उभी। ती वाढली न वाढली तो त्यांची नवीन भावंडे त्यांच्या पाठीवर पाय देऊन आली. पहिल्यांची लग्ने होत आहेत नाहीत तो मागल्यांची येऊन ठेपली. मग पोरांच्या पोराची काळजी ! हा प्रकार वरिष्ठ लोकातही आहे. पण याचे अनिष्ट परिणाम जितके आमच्या लोकास भोवतात तितके ते त्यांना भोवत नाहीत. याचे कारण असे की, जरी ते लोक लग्न करण्याचे काम आपल्या शिरावर घेतात तरी त्याबरोबर जेणेकरून मुलगा स्वावलंबी व त्याच्यावर लादलेला प्रपंच आणि त्याच्यावर येणारी प्रजोत्पादनाची व पालनाची जोखीम घेण्यास सामर्थ्यवान होईल, अशाप्रकारचे शिक्षण त्यास देण्याची काळजी घेतात. आमच्यातील लोक मुलांचे लग्न करून देण्यापलीकडे काही करीत एकतर कर्ज काढून लग्न करावयाचे. मुलगा अडाणी असल्यामुळे त्यास स्वतंत्रपणे कमाई करण्याची धमक नसल्यामुळे आधीच तो कर्जाखाली चेंगरून जातो. त्याचा प्रपंच त्याला भागत नाही. इतक्यात त्याला मुले झाली म्हणजे तो आणखी एक भार त्याच्यावर पडतो. त्यांना शिक्षण देऊन आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आणण्यास जवळ ऐपत नसते. इकडे त्याचा प्रपंच वाढत चालल्याने आपल्या उत्पन्नात भर पडावी म्हणून आपल्या मुलांना त्यांच्या अज्ञानी अडाणी स्थितीत कोठेतरी तो उद्योगास लावतो. त्याच्या कमाईवर आपला संसार चालवितो. लग्नाच्या फेऱ्यात सापडल्यामुळे बाप बुडत असतो. पण तो काही शहाणपणा शिकत नाही. उलट तो आपल्या मुलांस त्याच गर्तेत लोटून देऊन साफ बुडवितो !

ज्याप्रमाणे आपल्यातले आईबाप मुलांचे नुकसान करतात त्याचप्रमाणे ते मुलींचेही मातेरे करतात. मुलांचे लहानपणी लग्न केल्यामुळे जे समाजाचे नुकसान होते त्यापेक्षाही जास्त मुलींना मुरळी सोडल्याने होते. हिंदू देवांना लहान मुली वाहण्याचा जो चमत्कारिक प्रघात या देशात पुरातन काळापासून चालत आहे, त्याचा फैलाव काही भागातील आमच्या लोकात विशेष जोराचा आहे. पूर्वी कदाचित ही चाल सद्भावना प्रेरित असेल, पण हल्लीच्या काळी देवाची दासी म्हणजे विश्वाची योषिता हेच खरे आहे. हिने आपला देह विकून आपल्या नातेवाईकांची पोटे भरावी ! हा मुरळी सोडण्याचा प्रकार जेथे चालू आहे. तेथे त्याच्या पाळ्या मुळ्या इतक्या खोल गेल्या आहेत की, या चालीला बळी पडलेले लोक कायद्याला सुद्धा जुमानीत नाहीत. हे लोक केवळ आपल्या मुलींचेच हितशत्रू नाहीत तर ते समाजाचेही शत्रू आहेत. कारण यांच्या करणीचा प्रत्यक्ष आघात समाजाची आद्यव्यवस्था म्हणजे कौटुंबिक व्यवस्था हिच्यावर होतो. एक पत्नी व एक पती हीच कौटुंबिक पद्धत रास्त आहे. कुटुंब म्हणजे आपल्या प्रजेचे संरक्षण व संगोपन करण्यास समाजाने स्थापन केलेली एक संस्था आहे. ही संस्था चालविणारी दांपत्ये जितकी जास्त शुद्ध, सात्त्विक व अभिमानी असतील तितकीच त्यापासून निपजणारी संतती शुद्ध, सात्त्विक व अभिमानी असू शकेल. एका बाईने पुष्कळ नवरे करावेत किंवा एका पुरुषाने पुष्कळ बायका कराव्यात, ही कौटुंबिक पद्धत फार अप्रशस्त आहे.

आपण जे आज मानसिक दौर्बल्यामुळे इतरांचे गुलाम बनलो आहोत. याचे कारण हेच की, ज्यांचे हाती आपले भवितव्य ईश्वराने दिले आहे त्यांना त्यांच्या आद्यकर्तव्याची ओळख नाही. ती ओळख जर त्यांना असती तर आपली स्थिती हीन दीन झाली नसती. आपणाला लोक गुलामाप्रमाणे वागवितात, ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. पण आपले कर्तव्यशून्य आईबाप मागचा पुढचा विचार न करता बेसुमार मुले जन्मास आणून हा गुलामांचा बाजार मांडून ठेवतात. ही किती अनर्थाची गोष्ट आहे !

सज्जनहो ! आपण म्हणतो आपली स्थिती फार वाईट आहे. लोक आपणाला फार अन्यायाने वागवितात. या सर्व गोष्टी ख-या. पण या अन्यायाचा परिहार व्हावा कसा ? तुम्हाला कबूल करावे लागेल की, एकदा लादलेल्या वर्चस्वाचा पेच सुटण्यास योग्य उपाय म्हटला म्हणजे ज्यांना त्या पेचाने रग लागली असेल त्यांनी शहाणपण शिकावे आणि सामर्थ्य संपादावे. दिवसाउजेडी प्रतिपक्षाशी सामना करून त्यांच्या वरचढ होऊन त्यांच्या हातून निसटून जावे अशा प्रकारचे शहाणपण व सामर्थ्य आम्हास कसे व केव्हा प्राप्त होणार ? ज्या कारणामुळे आपल्यात शहाणपण व सामर्थ्य नाही ती सर्वच काही वरिष्ठांच्या दडपणामुळे उत्पन्न झालेली नाहीत. यदाकदाचित तसेही असले तरी त्यातील काहीचा परिहार आपल्या हाती नाही असे नाही. आपल्या लोकांना जितक्या हलक्या प्रतीचे अन्न खावे लागते तितके दुसऱ्या कोणास खावे लागत नसेल! पण याबद्दल आपल्या लोकांनी केव्हातरी तक्रार केली आहे काय ? उलट गावातून तुकडे मागून आणण्यात आपल्यातील किती एक लोक केवढा मोठा अभिमान बाळगतात. इतर लोक चांगला पोषाख घालून फिरतात. आपल्या लोकास एक पंचा, एक घोंगडे आणि जाडे भरडे पाच पन्नास हात मुंडासे यापेक्षा जास्त काही प्राप्त होत नाही: पण या दारिद्र्याबद्दल आपल्या लोकांनी केव्हा तरी आपली नाराजी व्यक्त केली आहे ? उलट मेलेल्या मुडद्यावरचे कफनाचे कपडे आणण्यास आमची नेहमीच तयारी असते. सरकार दरबार कोर्ट कचे-यात आम्हास आत घेत नाहीत. पण आमच्या लोकांनी आपले हक्क गेल्याबद्दल कधी जळफळ केली आहे ? उलट वरच्यापैकी कोणी एखाद्याने आमच्यातील माणुसकीला मान देऊन वर बसा म्हणून सांगितले, तरी सरकार मला जोड्यात वागवा असा आम्ही आग्रह धरतोच ! या मानसिक दौर्बल्यास आमचे आम्हीच कारणीभूत नाहीत काय ? आपल्यातील आईबापांनी आपल्या खऱ्या कर्तव्याला जागून, कर्ज काढून मुलांची लग्ने करून अगर मुलीना मुरळ्या करून त्यांच्या कमाईवर संसार चालविणे इत्यादी अक्षम्य गोष्टी सोडून देऊन जर त्यांना ज्ञानसंपन्न केले तर आपली अशी स्थिती राहील काय ? ह्या गोष्टी करणे आपल्या हाती नाही काय ? त्या जर आपण अंमलात आणू लागलो तर आपणाला कोणी आडवा येईल काय ?

सज्जनहो ! सदोदित जुने ते सोने म्हणून चालणार नाही. वडिलांनी जे केले तेच त्याच्या मुलानी करावे हा शिरस्ता काही रास्त नाही. वस्तुस्थिती बदलल्याबरोबर आचार विचार पालटणे आवश्यक असते. तसे जर आपण केले नाही तर आपल्या परिस्थितीशी टक्कर देण्यास आपण केव्हाही समर्थ होणार नाही. नुसती काळावर भिस्त ठेवून चालणे हितावह होणार नाही. कालगती बरोबर आपल्या हातून होईल तेवढे कार्य करणे अवश्य आहे.

तसे जर आपण केले नाही तर काळ बदलेल पण आपल्या स्थितीत मात्र बदल होणार नाही. विधायक कार्य केल्याशिवाय इतका वेळ गेला आहे की जास्त वेळ जाऊ देणे हे आपल्या बऱ्याचे होणार नाही. या प्रांतातील आपल्या लोकात शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नाही. त्याचप्रमाणे तंबाखूचा या प्रांतातील बहुतेक सर्व व्यापार आपल्यातील लोकांच्या हाती आहे. तो इतका आहे की दरेकाने मोठ्या पाटीस आठ आणे दिले तर दरसाल पाच सहा हजार रुपये मिळू शकतील. हा योग जर साधून आला तर या प्रांतात पंधरा, वीस मुलांचे बोर्डिंग उत्तमप्रकारे चालू शकेल असे मी ऐकतो. ही सूचना आपल्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी ध्यानात घ्यावी अशी माझी त्यांना आग्रहाची विनंती आहे. जर त्यांनी विनंतीस मान दिला तर तुम्ही परिषद भरविल्याचे व मी आल्याचे सार्थक झालेसे होईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password