“सर्व राजकीय पक्षांनी एक होऊन हिंदी राजकारणाची धुरा आपल्या हाती घ्यावी”
रविवार दिनांक 2 एप्रिल 1939 रोजी विलेपार्ले, मुंबई येथील लोकशाही स्वराज्य पक्षातर्फे मुंबई म्युनिसीपल कार्पोरेशनमध्ये निवडून आलेल्या काही हिंदू कार्पोरेटरांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. यावेळी श्री. रामभाऊ तटणीस, अँडव्होकेट तळपदे, प्रि. दोंदे, श्री. भगवंतराव परळकर व डी. व्ही. प्रधान वगैरे सभासद हजर होते. या समारंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खास आमंत्रण देऊन बोलावले होते. प्रथमतः सर्वांची अभिनंदनाला उत्तरे देणारी भाषणे झाल्यावर डॉ. आंबेडकरांना बोलण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणात प्रथमतः गांधीयुग पूर्वीच्या हिंदी राजकीय परिस्थितीचे विवेचन करताना सांगितले की,
गांधी युग सुरू होण्यापूर्वी नेमस्त व जहाल अराजक असे दोनच पक्ष हिंदुस्थानात प्रमुख होते. नेमस्तपक्ष बुद्धी व अभ्यासू वृत्तीवर विशेष भर देत होता. तर अराजकांचा कल देशासाठी अलौकिक स्वार्थत्याग करण्याची पाळी येताच प्राणाची सुद्धा पर्वा बाळगायची नाही असा होता. परंतु गांधी युगाने सर्वच पारडे उलटे फिरले. ढोंगी लोकांचा राजकारणात शिरकाव झाला. दोन आण्याची गांधी टोपी डोक्यावर चढवून गांधींचा दास असल्याचे जाहीर केले की तो देशभक्त झालाच ! यामुळे हिंदी राजकारणात स्वार्थसाधूंचा सावळागोंधळ माजला. ज्या शुद्धीची आता गांधीजी टाहो फोडून आवश्यकता असल्याची ग्वाही गात आहेत त्याला तेच स्वतः जबाबदार आहेत. ज्या घाणीचा असा घाणेरड्या रीतीने उगम झाला त्याला घाणीने भरलेल्या गटारांचा प्रवाह येऊन मिळणारच !
काँग्रेसने असहकारितेची चळवळ केल्यामुळे हजारो लोक तुरुंगात गेले. त्या तुरुंगवासाचे हे लोक मोठ्या मुक्त कंठाने गोडवे गातात. पण या तुरुंगवासात स्त्री-भोगादी सुखे मिळाल्याची उदाहरणे दृष्टिसमोर असताना हे तुरुंगवास खडतर होते, असे कसे म्हणता येईल ? खरे क्लेश, खडतर दुःखे लो. टिळकांनी भोगली. त्यांच्या तुरुंगवासाची तुलना या काँग्रेस पुढाऱ्यांच्या तुरुंगवास बरोबर करणे अशक्य आहे. त्यांच्या तुरुंगवासाच्या भयाण देखाव्याने डोळ्यातून अश्रू प्रवाहाऐवजी रक्ताचे थेंबसुद्धा गळू लागले असते. काँग्रेसची सत्ता म्हणजे एक झोटिंगशाहीचा कारभार आणि या कारभाराला खरे पाहिले असता मतदारसंघच कारणीभूत आहे. त्याने आता काँग्रेसच्या राजकीय खेळखंडोब्याला दूषणे देण्यात काय अर्थ आहे ? याला एकच उपाय आहे आणि तो म्हटला म्हणजे काँग्रेसची ही ढोंगी बुवाबाजी नाहिशी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एक होऊन संघटना केली पाहिजे. कोणत्याही संकटांना न भिता हिंदी राजकारणाची धुरा आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आजच्या मुंबई असेंब्लीमधील काँग्रेस सभासदांकडे चिकित्सक दृष्टीने पाहा. ते असेंब्लीमधील दृश्य पाहिले की, हा किंग एडवर्ड हॉस्पिटलमधील लुळे पांगळे, आंधळे, म्हातारे वगैरे रोग्यांचा राखीव वार्ड आहे की काय असा भास होतो.