Categories

Most Viewed

25 मार्च 1953 भाषण

“संघटनेची ताकद प्रामाणिकपणा, एकनिष्ठता आणि शिस्तपालनावर अवलंबून”

शेडयूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या कार्यकारिणीची बैठक बुधवार तारीख 25 आणि गुरुवार तारीख 26 मार्च 1953 रोजी 26 अलीपूर रोड, दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या निवासस्थानी भरली होती. फेडरेशनचे अध्यक्ष श्री. एन. शिवराज ह्याची प्रकृती बरी नसल्याने ते दिल्लीस येऊ शकले नाहीत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे कामकाज चालले.

बैठकीस खासदार बापूसाहेब राजमोज, सरचिटणीस श्री दादासाहेब गायकवाड (मुंबई), श्री तिलकचंद कुरील (उत्तर प्रदेश), आमदार ए. रत्नम (मद्रास), आमदार पी. एम. स्वामीदोराई (म्हैसूर), श्री. दशरथ पाटील, श्री. हरदास आवळे व श्री. रेवाराम कवाडे (मध्य प्रदेश), श्री. गंगाराम (मध्य भारत), सरदार हरवन्त सिंग (पंजाब), आमदार मियासिंग गिल (पेप्सू). मिल्कीराम (जम्मू व काश्मीर) श्री. बाल मुकुंद (पंजाब) आणि स्वामी दर्शनानंदजी (दिल्ली) आदि सभासद व निमंत्रित हजर होते.

डॉ. बाबासाहेब बैठकीस मार्गदर्शन करताना म्हणाले,
दलित समाजाची उन्नती केवळ दलित समाजाच्या संघटनेच्या ताकदीवर अवलंबून आहे. दलित समाजास घटनेनुसार सरकारकडून ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या कायम स्वरूपाच्या नाहीत! आज ना उद्या त्या काढून घेतल्या जाणार. तेव्हा ह्या सवलतीवर, सरकारच्या ‘कृपाळू’ वृत्तीवर अवलंबून राहून दलित समाजाची उन्नती होणार नाही. त्यासाठी खंबीर, भरभक्कम, देशव्यापी अशी संघटनाच पाहिजे. म्हणून त्या कार्याकडेच आता दलित फेडरेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले लक्ष केंद्रीभूत केले पाहिजे. समाजाच्या प्रत्येक घटकाशी निकटचे संबंध आणून फेडरेशनच्या झेंड्याखाली त्यास आणावयाचे हा निर्धार करूनच कामास लागा. त्याशिवाय दलित समाजास आता दुसरा तरणोपाय नाही.

शिस्त आणि प्रामाणिकपणा ह्या दोन गोष्टींची कार्यकर्त्यांमध्ये विशेष जरूरी आहे. फेडरेशनच्या धोरणाविरुद्ध उघडपणे वा गुप्तपणे काम करणाऱ्यास फेडरेशनमध्ये स्थान नाही. तसेच, संघटनेची ताकद ही केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून सभासदांच्या प्रामाणिकपणावर संघटनेशी एकनिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते. फेडरेशनचे धोरण ज्यांना पसंत नसेल त्यांनी खुशाल फेडरेशनमधून जावे. ज्यांना फेडरेशनमध्ये राहावयाचे असेल त्यांनी मात्र पक्षाची शिस्त मोडता कामा नये. इतर राजकीय पक्षांशी वा गटांशी फेडरेशनच्या धोरणाविरुद्ध जाऊन एकजुटिची अगर कराराची बोलणी करता कामा नयेत. तसेच त्यांनी आपल्या प्रत्येक व्यवहारात फेडरेशनशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले पाहिजे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password