Categories

Most Viewed

21 मार्च 1920 भाषण

“जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे”

दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाच्या परिषदेची पहिली बैठक मुक्काम माणगाव, संस्थान कागल येथे तारीख 21 व 22 मार्च सन 1920 रोजी भरली होती. पहिला दिवस पाडव्याचा होता. तरी पण सभेस जवळजवळ पाच हजारावर समुदाय जमला होता. याहीपेक्षा जास्त समुदाय जमला असता. परंतु आजुबाजूच्या कित्येक खेड्यापाड्यातील बहिष्कृत लोकांची कुळकर्णी, तलाठी वगैरे लोकांनी अशी समजूत करून दिली की, ही सभा बाट्या लोकांची असून अध्यक्ष देखील बाटलेलेच आहेत. यास्तव अशा सभेस जाणे अप्रशस्त आहे. असे सांगून बऱ्याच लोकांची मने या सभेबद्दल कलुषित केली होती. सभेस कोल्हापूर दरबारातील वरिष्ठ दर्जाची व बहिष्कृतांची हितेच्छू मंडळी हजर होती. काही थोडे ब्राह्मण गृहस्थही हजर होते, परंतु डिप्रेस्ड क्लास मिशन व इतर बहिष्कृतांच्या हितासाठी झटणाऱ्या कोणत्याही संस्थेचे एक पिल्लू देखील आले नव्हते हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.

       : दिवस पहिला : 

परिषदेच्या कामास तारीख 21 रोजी पाच वाजता सुरूवात झाली. प्रथमतः स्वागत कमिटीचे अध्यक्ष श्री. दादासाहेब राजेसाहेब इनामदार यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी प्रतिनिधींनी अशा लहानशा खेडेगावात, सण, वार, घरगुती अडचणी इत्यादी काही न पाहता सभेस येण्याची तसदी घेतली याबद्दल त्यांचे आभार मानले. आजच्या परिस्थितीचे वर्णन करून ही परिषद का बोलावण्यात आली, याचे दिग्दर्शन केले. “हल्लीच्या स्वराज्याच्या काळात इतर लोक आपले बरे करतील असे समजून त्यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या स्वजनोद्धाराचे महत्कार्य आपण स्वतःच केले पाहिजे” असे सांगून त्यांनी आपले भाषण संपविले. नंतर रितीप्रमाणे सूचना व अनुमोदन मिळाल्यावर परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री. भीमराव आंबेडकर हे टाळ्यांच्या कडकडाटात स्थानापन्न झाले.

आपल्या भाषणात ते म्हणाले,
ही परिषद अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे. आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळही देखील तितकीच अपूर्व त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांतिही तशीच अपूर्व आहे. आजवर आपल्या लोकास वाटत होते की, आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय. दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्याकारणाने, आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे. ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्यमात्राचे संघटन दोन आदितत्त्वांना धरून झालेले दृष्टीस पडते. एक जन्मसिद्ध योग्यायोग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्रापवित्रता.

या दोन तत्त्वानुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे तीन वर्ग होतात.

 1. जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो तो.
 2. ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग.
 3. जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो वर्ग तो आपला बहिष्कृत वर्ग होय.

अशारितीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या तीन वर्गांवर परिणाम झाला आहे. जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे. ब्राह्मणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत. तरी पण विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांचेजवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार आहेत. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे. अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे नैतिकदृष्ट्या आपल्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे ती अगदी लोपून गेली आहेत. सामाजिकदृष्ट्या हिंदुधर्मीयांप्रमाणे त्यांना हक्क नाहीत. त्यांना शाळेत जाता येत नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही. रस्त्यावर चालता येत नाही. वाहनाचा उपयोग करून घेता येत नाही. इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ हक्कांना देखील ते दुरावले आहेत. जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झाले आहे. व्यापार, नौकरी व शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत. ते त्यांना खुले नाहीत. विटाळामुळे गि-हाईक मिळत नसल्याकारणाने त्यांना व्यापार करण्याची सोय उरली नाही. शिवाशिवीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही. कधी कधी गुणाने योग्य असूनही खालचे जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी करण्यास कचरतात म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते. याच भावनेमुळे मिलिटरीतून त्यांचा उठाव झाला आहे. शेतीच्याबाबत त्यांची तशीच दशा आहे.. अशा हाडकी हडवळ्यापेक्षा भूईचा तुकडा विशेष कोणाला आहे ? अशाप्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती होणार नाही. नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही दोन उन्नतीची आद्य कारणे आहेत. बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाण नाही. हे सर्वास मान्य आहे. परंतु त्यांचा विकास होत नाही. याचे मूळ कारण त्यांना परिस्थिती सानुकूल नाही, हे होय. परिस्थिती सानुकूल करून घेण्यास अनेक उपाय सुचविले जातात; परंतु याकरिता आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे. जातवार प्रतिनिधीत्त्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही. ‘सत्यमेव जयते’ हे तत्त्व पोकळ आहे. सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेविली पाहिजे, असे सांगून त्यांनी आपले प्रास्ताविक भाषण संपविले. नंतर विषयनियामक कमिटी नेमण्यात येऊन पहिल्या दिवसापुरते परिषदेचे काम संपले.

      : दिवस दुसरा : 

परिषदेच्या कामास तीन वाजता सुरुवात झाली. त्याप्रसंगी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी हजर राहून सर्व बहिष्कृत वर्गास ऋणी करून सोडिले. ते आपल्या भाषणात म्हणाले.

आज माझे प्रिय मित्र आंबेडकर यांनी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. त्यांच्या भाषणाचा लाभ मला मिळावा म्हणून मी शिकारीतून बुध्या येथे आलो आहे. मिस्टर आंबेडकर सर्व मागासलेल्या जातींचा परामर्ष घेतात याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करितो.

महार, मांग, चांभार, ढोर हे खरोखर वैश्य जातीचे असून व विशेषतः महार लोक पूर्वी महारकी सूत काढून व्यापार करीत असता त्यांना अस्पृश्य कोणी ठरविले असेल कोण जाणे. असा वैश्याचा धंदा सोडून दस्यु म्हणजे नोकर आणि नोकर म्हणजे अतिशूद्र. तेव्हा आंबेडकरांनी असा हा धंदा का पत्करला आहे मला कळत नाही. तथापि, मी येथे जमलेल्या सर्व लोकास हीच विनंती करितो की, आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढीत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशूपक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करितात, पक्ष्यात कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते !

आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे ? विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व खिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत, याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानिले पाहिजेत व मीही मानतो.

“माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की. डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एकवेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते”.

नंतर खालील ठराव समेत सर्वानुमते पास झाले.

(1) महायुद्धात ब्रिटिश सरकारला व दोस्त राष्ट्रांना जय मिळाल्याबद्दल ही परिषद आनंद व्यक्त करीत आहे.

(2) श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार इलाखा करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे याबद्दल त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा असे या परिषदेचे मत आहे.

(3) जे राजे, महाराजे व संस्थानिक बहिष्कृताच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचे ही परिषद मनःपूर्वक आभार मानिते.

(4) दरेक व्यक्तीच्या उन्नतीला सानुकूल सामाजिक परिस्थितीची अत्यंत जरूरी आहे. जन्मसिद्ध अयोग्यता व जन्मसिद्ध अपवित्रता यामुळे हिंदुस्थानातील सामाजिक परिस्थिती बहिष्कृत वर्गाच्या उन्नतीस प्रतिकूल आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे हा वर्ग सर्वसाधारण अशा मानवी हक्कासदेखील दुरावला आहे. बहिष्कृत लोक हे हिंदी साम्राज्याचे घटक आहेत. इतर हिंदी लोकांप्रमाणे त्यांना खालील मानवी हक्क आहेत.

(अ) सार्वजनिक रस्ते, विहिरी, तलाव, शाळा, धर्मशाळा तसेच लायसेन्सखाली असलेल्या करमणुकीच्या जागा, भोजनगृहे, वाहने इत्यादि सार्वजनिक सोयींचा उपभोग घेण्याचा त्यांना हक्क आहे.

(ब) गुणसिद्ध योग्यतेने त्यांना व्यापार करण्याचा व नोकरी मिळविण्याचा हक्क आहे.

वरील हक्क उपभोगिताना जेव्हा म्हणून अडचण पडेल त्यावेळी ती दूर करण्यास सरकारने कायद्याने मदत करावी असे या परिषदेचे मत आहे.

(5) प्राथमिक शिक्षण मुलामुलींचा भेद न करिता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर सक्तीचे व मोफत करण्यात यावे.

(6) बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरूरीचे आहे. त्याशिवाय त्यांची उन्नती होणार नाही.

म्हणून त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्यास शाळा मास्तर, डेप्युटी असिस्टंट, डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर त्यांचे हितेच्छू असले पाहिजेत. ज्याअर्थी, इतर वर्गातील माणसे बहिष्कृत वर्गाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष किंबहुना अनुदारपणाही दाखवितात त्याअर्थी, वरील प्रकारचे अधिकाऱ्यात बहिष्कृत वर्गातील माणसे असावीत असे या परिषदेचे मत आहे. तसेच बहिष्कृत वर्गाचे मास्तर ट्रेंड होण्यास त्यांना विशेष सवलत देऊन त्यांचा प्रवेश होण्याची सोय सरकारने करावी अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे. बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यास दरेक जिल्ह्याला बहिष्कृत वर्गापैकी निदान एक डेप्युटी किंवा असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर असावा. त्या दर्जाला ट्रेनिंग कॉलेजची थर्ड इयर परीक्षा पास झालेला किंवा मॅट्रीक पर्यंत शिकलेला इसम लायक समजला जावा, असे या परिषदेचे मत आहे.

(7) खालसातील ज्याप्रमाणे मुसलमानांना व म्हैसूर संस्थानातील ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गाच्या विद्यार्थ्यांना मध्यम व वरिष्ठ शिक्षणार्थ मुबलक शिष्यवृत्त्या दिल्या जात आहेत त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना ब्रिटिश हद्दीत तशाच शिष्यवृत्त्या मिळाव्या अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे.

(8) सर्वत्र स्पृश्य व अस्पृश्यांच्या शाळा एकत्र असाव्या असे या परिषदेचे मत आहे.

(9) हल्ली दिसून येत असलेली महारकी वतनदारांची स्थिती अगदी हलाखीची आहे असे कष्टाने म्हणावे लागते. या हलाखीची कारणे दोन असावी असे या परिषदेस वाटते.

(अ) महार वतनदारांना पड वगैरे अगदी गलिच्छ कामे करावी लागत असल्यामुळे त्यांच्या वतनदारीवर कमीपणाची छटा उमटली आहे.

(ब) वतनी जमीन वतनदारात पिढ्यानुपिढ्या विभागून जात असल्यामुळे जमिनीचे इतके बारीक तुकडे झालेले आहेत की, दरेक महार वतनदारास पुरेशी पैदास होत नसल्यामुळे त्याची अगदी कंगाल स्थिती झाली आहे. यामुळे वतन पद्धतीत फेरफार करणे अगदी जरूर झाले आहे असे या परिषदेचे ठाम मत आहे. महारकी वतन सर्व महार लोकात विभागून सर्वांनी दरिद्री व कंगाल राहण्यापेक्षा ते वतन थोडक्याच लोकात विभागून त्यांची स्थिती मानास्पद व सुखावह करणे बरे. म्हणून महारकी वतनाची जमीन थोड्याच महारांना मोठ्या प्रमाणावर वाटून देऊन ज्या महारांना अशा प्रमाणावर जमीन विभागल्यामुळे वतनी जमिनीस मुकावे लागेल त्यांना शक्य तेथे पड जमीन रयताव्याच्या नियमाने देऊन त्यांची सोय लावण्यात यावी. हल्ली असलेली वतनी जमीन ज्या महार कुळास देण्यात येईल. त्याच्याकडून आपल्या मुलामुलीस साक्षर करून आपल्या दर्जाप्रमाणे राहण्याची अट लिहून घेण्यात यावी.

(10) मेलेल्या जनावराचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे, असे कायद्याने मानले जावे असा या सभेचा अभिप्राय आहे.

(11) तलाठ्याच्या जागांवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका होत जाव्यात, अशी या परिषदेची मागणी आहे.

(12) बहिष्कृत वर्गाच्या उन्नती करिता झटत असणाऱ्या बहिष्कृतेतर संस्थांचे अगर व्यक्तींचे कळकळीबद्दल ही परिषद जरी आभारी आहे. तरीपण बहिष्कृत वर्गाचा राजकीय किंवा सामाजिक हितसंचय करण्यास त्यांच्याकडून जे उपाय सुचविले जातात ते उपाय या बहिष्कृत वर्गास सर्वस्वी मान्य होतात असे सरकारने समजू नये असे या परिषदेचे आग्रहाचे सांगणे आहे.

(13) भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृताचे प्रतिनिधी त्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेच्या प्रमाणात त्यांच्या स्वतंत्र मतदार संघातून निवडून घेण्यात यावेत अशी या परिषदेची हक्काची मागणी आहे.

(14) ही परिषद भरवून आणण्याचे कामी ज्यांनी परिश्रम केले त्यांचे व विशेषतः आप्पा दादगौडा पाटील यांचे ही परिषद फारफार आभार मानते.

(15) वरील सर्व ठराव त्या त्या अधिकाऱ्यांकडे व इतर संबंध असणाऱ्या गृहस्थांकडे पाठविण्याचा अधिकार ही परिषद तिच्या अध्यक्षास देत आहे.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*

  Forgot Password