Categories

Most Viewed

19 मार्च 1940 भाषण

“नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम”

स्वतंत्र मजूर पक्षातर्फे महाड येथे 19 मार्च 1940 रोजी ‘अस्पृश्य स्वातंत्र्य दिन’ समारंभ आयोजित करण्याविषयक पत्रक काढण्यात आले होते. ते खालीलप्रमाणे.

तारीख 19 मार्च 1927 रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली अस्पृश्य समाजाची विराट सभा झाली. त्या सभेत डॉ. आंबेडकरांनी अखिल भारतीय अस्पृश्य समाजाच्या वतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाहीप्रणित तत्त्वत्रयीची जाहीर घोषणा केली. सभेनंतर हजारो अस्पृश्यांनी मिरवणुकीने चवदार तळ्यावर जाऊन सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा आपला नागरिक स्वातंत्र्याचा आणि समानतेचा हक्क प्रस्थापित केला. त्या प्रसंगाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन यापुढे 19 मार्च हा दिवस अस्पृश्य जनतेने स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा प्रघात सुरू करणे अवश्य आहे.

महाड येथे 19 मार्च 1940 मंगळवार रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची प्रचंड जाहीर सभा, मिरवणूक, झेंडावंदन, स्वातंत्र्याची प्रतिज्ञा वगैरे कार्यक्रम होणार आहे.

ज्या ज्या अस्पृश्य बंधुभगिनींना शक्य असेल त्यांनी महाडच्या तारीख 19 मार्चच्या समारंभात अवश्य भाग घ्यावा. ज्यांना महाडास येता येत नसेल त्यांनी त्या दिवशी आपापल्या गावी स्वातंत्र्योत्सव करावा. उत्सवाचा कार्यक्रम सर्व साधारणपणे खालीलप्रमाणे असावा.

  1. सकाळी घरोघरी स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा उभारावा.
  2. डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसह झेंड्याची सार्वजनिक मिरवणूक वाजत गाजत, दांडपट्टा वगैरसह काढावी व महारवाड्यात मंडप श्रृंगारून झेंडावंदन करावे.
  3. झेंडावंदन नंतर सर्व स्त्री पुरुषांनी व मुलाबाळानी स्वातंत्र्य प्रतिज्ञा करावी.
  4. सभा भाषणे वगैरे कार्यक्रम करावा.

विशेष सूचना :- स्वतंत्र मजूर पक्षाचे निशाण.

हा झेंडा लाल रंगाचा असून त्यावर मधोमध स्वतंत्र मजूर पक्ष असे लिहिले आहे. झेंडयाच्या डाव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात 11 तारे दाखविलेले आहेत. हे 19 तारे हिन्दुस्थानातील 11 प्रांताचे द्योतक होत. वरील सर्व प्रांतात स्वतंत्र मजूर पक्षाचा असा हा झेंडा सदैव फडकत राहिला पाहिजे. झेंड्याचा आकार सोयीप्रमाणे लहान मोठा करण्यास हरकत नाही.

“स्वातंत्र्य दिनाची प्रतिज्ञा”

आम्ही माणुसकीचे हक्क मिळविणार अशी आमची प्रतिज्ञा आहे. स्पृश्य समाजाने आम्हास बहिष्कृत करून वाळीत टाकले असून तो समाज आम्हास अनुपाणी व जीवनास इतर आवश्यक असणारी सुख साधनेही मिळवू देत नाही. त्याने आम्हास महारवाड्यात डांबून टाकिले आहे. आम्हास उद्योगधंदा करणे व आमच्या लायकीप्रमाणे चाकरी मिळणे या गोष्टीही स्पृश्यांनी दुरापास्त केल्या आहेत. आमच्या या दुःस्थितीची सर्व जबाबदारी स्पृश्य वर्गावरच आहे. आमचे मानवी हक्क हिरावून घेणाऱ्या या लोकांच्या हाती सर्व राजसत्ता देणे म्हणजे माकडाचे हातात कोलित दिल्याप्रमाणेच होणार आहे.

काँग्रेस सरकारने महार वतनदार कामगारांना विनावेतन राबवून पन्नास हजार अस्पृश्य कामगारांवर लादण्यात आलेली सनातनी बिगारी नाहीशी करण्यासाठी काहीही केलेले नाही. यावरून काँग्रेस सरकारचे ‘हरिजन प्रेम’ उत्तम व्यक्त होत नाही काय? आपल्या समाजाची, कॉंग्रेस सरकारच्या राज्यात देखील पूर्वापार पद्धतीप्रमाणे शारिरीक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आध्यात्मिक पिळवणूक चालू होतीच म्हणून आमचे असे ठाम मत झाले आहे की, आमच्या शत्रूच्या हाती राज्यसत्ता सर्वस्वी देणे हे आमच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे.

आपणास माणुसकीचे अधिकार मिळविण्याचा मार्ग म्हटला म्हणजे देशाच्या राज्यकारभारात आपला वाटा मिळविणे हाच होय. म्हणून अस्पृश्यांना राजकीय सत्तेचा वाटा मिळवून देऊन मानवी हक्क मिळवून देण्याची पुनरपी आम्ही प्रतिज्ञा करीत आहो.

जातीभेद मोडून जाती, धर्म व वर्ण हे ऐहिक व्यवहाराच्या आड येणार नाहीत अशी घटना करणे हे आमचे ध्येय आहे. असे आम्ही समजतो.

डॉ. आंबेडकरांनी आपल्या समाजास राजकीय सत्ता मिळवून देण्यासाठी जो लढा चालू केला आहे तो आम्हास पूर्णपणे मान्य असून डॉ. बाबासाहेबांच्या आज्ञेनुसार आम्ही त्या लढयात भाग घेण्यास सदैव सज्ज राहू अशी आमची प्रतिज्ञा आहे.

चवदार तळ्याच्या लढ्याच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हायकोर्टापर्यंत न्याय मिळविण्यासाठी जावे लागले. त्यात अस्पृश्य समाजाचा विजय झाला. त्यासंबंधी संपूर्ण वृत्तांत दिनांक 27 मार्च 1937 च्या जनतेत प्रकाशित झाला. तो येणेप्रमाणे :-

: चवदार तळ्याच्या लढ्यात मिळालेला विजय :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली स्वाभिमानाची आणि माणुसकीच्या हक्काची चळवळ 1927 साली मार्च महिन्याच्या 19 व्या तारखेला सुरु केली. अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण उन्नतीची मुहूर्तमेढ रोविली होती. महाड येथील चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा आपला समान हक्क आहे अशी अस्पृश्य बांधवांनी मागणी करून त्याप्रमाणे चळवळ सुरू करताच तेथील सनातनी व काही विघ्नसंतोषी स्पृश्यांनी या समान हक्काच्या लढ्यास विरोध केला. अस्पृश्यांविरुद्ध मनाई मिळवून कायदेशीररितीने या चळवळीला प्रतिबंध केला होता. परंतु हा दावा महाडच्या सब-जज्जानी काढून टाकल्यावर याच सनातनी मंडळीनी त्यांच्याविरुद्ध ठाणे कोर्टात अपिल केले. तेथे बरेच दिवस या खटल्याबाबत काम होऊन शेवटी याही कोर्टाने खालच्या कोर्टाच्या हुकूमावर निकाल देताच महाडच्या स्पृश्य मंडळींनी पुन्हा एकदा प्रयत्न करून, अस्पृश्य समाजाच्या या समान हक्काच्या लढ्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली. येथे हे अपिल बरेच दिवस लांबणीवर पडले. परंतु शेवटी गेल्या महिन्यात सुनावणीस निघाले. या खटल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर चौघे अस्पृश्य प्रतिनिधी यांना प्रतिवादी केले होते. कोर्टाने या खटल्याची सर्व प्रकारची हकिगत तेथील परिस्थिती या तळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि जुना रीतिरिवाज याविषयी माहिती करून घेतली. काही दिवस निकाल देण्याचे तहकूब करून शेवटी तारीख 17.03.1937 रोजी न्या. ब्रमफील्ड यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यांनी निकालात स्पष्टपणे सांगितले की, चवदार तळ्याच्या मालकीबद्दल आता वादीचे काही म्हणणे उरलेले नाही परंतु लॅन्ड रेव्हेन्यू कोडप्रमाणे महाडचे चवदार तळे हे सरकारच्या मालकीचे होते आणि डि. म्यु. अँक्टप्रमाणे सध्या या तळ्याची मालकी महाड म्युनिसीपालिटीकडे आहे. असे प्रतिवादीने प्रतिपादन केले आहे. या तळ्याचा मुसलमानासारख्या अहिंदू समाजाकडूनही उपयोग केला जातो. यावरून फक्त स्पृश्य लोकांनाच या तळ्याचा उपयोग करण्याचा हक्क पोचत नाही. तथापि प्राचीनकाळी या तळ्यावर अस्पृश्य लोकांना पाणी भरण्याची व पिण्याची मनाई होती असे वादीचे म्हणणे आहे. रूढीने वादीला कायदेशीर हक्क पोचत नाही. तशात ही प्राचीन रुढी आहे. परंतु या प्राचीन असेही वादीना समाधानकारकरित्या पुराव्याने सिद्ध करता आले नाही. अशा रीतीने या खटल्यात शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी झाले. महाडचे चवदार तळ्यात यापुढे अस्पृश्यांना कायदेशीररितीने पाणी पिण्यास व वापरण्यास हक्क प्राप्त झाला आहे. डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण चळवळीची जी दहा वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ केली होती त्यात आज अपूर्व असे यश मिळाले आहे. यावरून संघटना आणि शिस्त या चळवळीने आपणाला कोणतेही अवघड कार्य कसे यशस्वी करता येते याचे अवलोकन करणे अवघड नाही. या खटल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादि प्रतिवादीतर्फे मि. गुप्ते व मि. मोडक वकील यांनी कायद्याच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीस ते अभिनंदनास प्राप्त आहेत.

: डॉ. आंबेडकर यांचे महाडास प्रयाण :

तारीख 19 मार्च 1940 रोजी महाड, कुलाबा जिल्हा येथे अस्पृश्यांचा 14वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी डॉ. बाबासाहेब हे तारीख 18 रोजी धरमतर मार्गाने महाडास जाण्यासाठी मुंबईहून निघाले. त्यांजबरोबर स्वतंत्र मजूर पक्षातील त्यांचे सहकारी श्री. दौलतराव जाधव, श्री. मडकेबुवा श्री. भातनकर, श्री. पाटणे, श्री. सवादकर व श्री. सहस्त्रबुद्धे वगैरे मंडळीही होती.

महाड येथे जाताना रेवस बंदरावर रा. नारायणराव थळे व रा. कुंडलीक कमळ पाटील या घरी शेतकरी संघ व अलीबाग येथील स्वतंत्र मजूर पक्षाच्या आग्री पुढाऱ्यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केले.

यानंतर धरमतर येथे बंडू पांडुरंग पाटील (आग्री) व गोपाळ चांगू जाधव (अस्पृश्य) यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुष्पहार अर्पण केले. बंदरावर डॉ. आंबेडकरांच्या स्वागतासाठी नारायण नागोजी पाटील, सौ. पाटील, अनंतराव चित्रे, श्री. कोवळे व श्री. सुरबा टिपणीस वगैरे कुलाबा व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी पुढारी उपस्थित होते.

यानंतर महाडास जाता गडप गावच्या शेतकऱ्यांतर्फे श्री दामोघर खंडू पाटील या आग्री पुढा-याने त्यांचे स्वागत करून त्यास पुष्पहार अर्पण केला.

कोलाड येथे रावसाहेब बारटक्के. श्री. किंजळे, पुना म्युनिसीपालिटीचे माजी नगराध्यक्ष श्री. शेखा खोत व श्री. जोसेफ खोत यांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर इंदापूर येथे श्री बापूसाहेब देशमुख यांनी डॉ. साहेब व इतर पाहुणे मंडळी यांचे टोलेजंग स्वागत करून त्यांना अल्पोपहार दिला. या स्वागत समारंभात कु. भागीबाई तुकाराम गायकवाड या अस्पृश्य तरुणीने उत्साहाने भाग घेतला होता. नंतर माणगाव येथे श्री. अनंत गंगाराम खुळे व श्री. शंकरराव खुळे या बंधूद्रयांनी डॉ. बाबासाहेब यांचे स्वागत करून त्यांना पुष्पहार अर्पण केला.

येथून पाहुणे मंडळी लोणेरे या गावी पोहोचताच तेथे श्री. पांडूरंग बुवा चोरवे (कुणबी) या शेतकरी पुढा-याने डॉ. साहेबांचे स्वागत करून त्यांना पुष्पहार अर्पण केला.

: महाड अस्पृश्य स्वातंत्र्य दिन – झेंडावंदन :

सोमवार, तारीख 19 मार्च 1940 रोजी कुलाबा जिल्ह्यातील महाड गावी 14 वा अस्पृश्य स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या स्वातंत्र्यदिनी सकाळी महाड येथील सुप्रसिद्ध चवदार तळ्यावर ‘झेंडावंदन’ समारंभ साजरा करण्यात आला.

या समारंभासाठी स्वतंत्र मजूर पक्षाचे सुमारे 200 स्वंयसेवक डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली इतर बाहेरगावाहून परिषदेसाठी आलेल्या मंडळीसह मिरवणुकीने सकाळी 11 वाजता चवदार तळ्यावर उपस्थित झाले. समारंभाच्या आरंभी श्री. मचंडे यांनी बिगूल वाजवून समारंभाच्या सुरवातीचा इशारा जमलेल्या मंडळीना दिला. यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाचे कुलाबा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पुढारी श्री. सुरबा टिपणीस यांनी सभाजनास शांतता राखून समारंभ पार पाडण्याची विनंती केली.

नंतर खानदेशातील स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी रा. दौलतराव जाधव यांनी 1927 साली चवदार तळ्याबाबत झालेल्या लढ्याची माहिती सांगून स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा कसा विजयी झालेला आहे याचे थोडक्यात विवेचन केले.

यानंतर थोडावेळ बिगूल वादन होऊन झेंडावंदनाकरिता केलेले पदरा चंद्रकांत केशव यांनी तडफदाररीतीने झटकले व स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडा डॉ. बाबासाहेबांच्या हस्ते उभारण्यात येऊन त्याला सामुदायिकरित्या वंदन करण्यात आले.

झेंडावंदनानंतर आमदार जाधव यांनी झेंड्याला साक्षी ठेवून अस्पृश्यांनी घ्यावयाची प्रतिज्ञा जमलेल्या मंडळीस वाचून दाखविली.

: आपली चळवळ अव्याहतपणे फोफावत आहे :

हा प्रतिज्ञाविधी संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे टाळ्यांच्या गजरात भाषण करावयास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले. भगिनी आणि बंधुजनहो,

आता आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातील पहिला कार्यक्रम पार पाडीत आहो. दुपारी मिरवणुकीचा दुसरा कार्यक्रम पार पाडून आपली सभा सायंकाळी होणार आहे. मिरवणुकीत व सभेत आपण शिस्त व शांतता राखली पाहिजे. गेल्या पंधरा वर्षाच्या अवधीत आपणास कुलाबा जिल्ह्यात, विषेशतः महाडास स्पृश्यांपैकी अनेक सहकारी लाभून आपली चळवळ अव्याहतपणे फोफावत आहे. तरी पण आपल्या समारंभात कोणीही काहीच उपद्व्याप करणार नाही अशी खात्री देता येत नाही. जुन्याकाळची आपली आठवण अद्याप ताजी आहे. म्हणून आपण मिरवणुकीत व समारंभात शिस्त व शांतता राखण्याची शिकस्त केली पाहिजे. समारंभाचा खेळ खंडोबा करण्यास एखाद दुसराही माणूस पुरेसा होत असतो. एखादा अपशब्द वापरण्यात आला. एखादा दगड फेकण्यात आला तरीही शांतताभंग होण्याचा संभव असतो. असे काही झाले तरी आपण शांतता राखावी असा मी आपणास इशारा देत आहे. समारंभाचा बेरंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी त्याकडे दुर्लक्ष करा व समारंभ यशस्वी करा असे माझे आपणास सांगणे आहे. माझे स्वातंत्र्य दिनाबाबतचे भाषण संध्याकाळच्या सभेत होणार असल्यामुळे आता जास्त काही बोलण्याची जरूरी नाही.

डॉ. बाबासाहेबांच्या भाषणानंतर स्वयंसेवक मंडळी चवदार तळ्याला फेरी घालून घरी गेली. झेंडावंदन समारंभाप्रसंगी लाऊड स्पीकर लावल्यामुळे झेंडावंदनाचा कार्यक्रम चवदार तळ्यापासून एक मैलपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत होता.

: अस्पृश्य स्वातंत्र्यदिनाची विराट सभा :

दुपारी सुमारे तीन वाजता सभाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक जंगी मिरवणूक काढून त्यांना सभास्थानी आणण्यात आले. महाडच्या इतिहासात ही मिरवणूक व सभाही अद्वितीयच होती. या सभेस पुण्याचे श्री. गोपीनाथराव पोतनीस यांजबरोबर सुमारे एक हजार मावळे मुद्दाम येथे आले होते.

मिरवणुकीस सुरवात वीरेश्वर रोडवरून होऊन ती पोष्ट ऑफिस, उभा प्रांतिक रस्ता, साळवाडा अलावा, सरेकर आळी, चवदार तळ्याची दक्षिण बाळी, डोंगरे पूल, पेठ व सुकाळी गल्ली या मार्गाने सभास्थानी नेण्यात आली. मिरवणुकीची लांबी सुमारे मैल ते दीड मैल होती.

मिरवणुकीच्यावेळी स्वतंत्र मजूर पक्षाचा विजय असो. ‘आंबेडकर झिंदाबाद, महात्मा फुले की जय, महात्मा आगरकर की जय, ‘शेतकऱ्यांचा विजय असो. कामक-यांचा विजय असो. ‘खोतशाही नष्ट करा,’ ‘सावकारशाही नष्ट करा,’ भांडवलशाही नष्ट करा. साम्राज्यशाही नष्ट करा.’ ‘भिक्षुकशाही नष्ट करा, “जातीभेदांना मूठमाती द्या.’ ‘अस्पृश्यता नष्ट करा. ‘समतेचा विजय असो, “मालकशाही नष्ट होवो, अस्पृश्य स्वातंत्र्याचा विजय असो, वगैरे विधिनिषेधात्मक गर्जनांनी महाडचे वातावरण दुमदुमून गेले होते.

मिरवणूक चालू असता श्री. भानुदास कांबळे व श्री. भाई शेठ वडंके या दोघांनी जुन्या पेठेत डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केले. साळवाड्यात साळी मास्तर यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला. सरेकर आळीत श्री. भिकोबा मालुसरे व श्री. यशवंतराव टिपणीस यांनी त्यांचा सत्कार केला. चवदार तळ्याच्या नजीक श्री. दगडोबा साळुंके श्री. दत्तोबा देशपांडे व श्री. चिंतोबा देशपांडे यांनी त्यांचा सन्मान केला. नव्या पेठेतील महाड मुंबई मोटार युनियनतर्फे साळी मास्तर यांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहारानी मंडीत केले.

अशा थाटाने ही टोलेजंग मिरवणूक सुमारे पाच वाजता सभास्थानी येवून दाखल झाली व सभेच्या कार्यास सुरवात करण्यात आली.

या सभेस महाड शहराबाहेरील श्री. गोपीनाथराव पोतनीस, राजारामभाऊ भोळे, भाऊसाहेब गडकरी, आमदार सावंत, श्री. अधिकारी वकील आमदार घाडगे व शंकरराव खुळे ही मंडळी उपस्थित होती.

स्थानिक मंडळीपैकी रा. ब. कर्णिक, श्री. अण्णासाहेब भिलारे, यशवंतराव वीरकर, कॅप्टन जगताप, पी. बी. गांधी, हिरालाल शेठ मारवाडी, विष्णुपंत चांदे, डॉ. चितळे, डॉ. खेडकर, बुटाला वकील, शंकरशेट डोळस, महादेवशेठ बनारसे, दत्तोपंत देशपांडे, हरिभाऊ बनारसे, भानुदास कांबळे, नारायणराव मांगडे व सावंत वकील वगैरे मंडळी सभास्थानी उपस्थित होती.

सभेच्या आरंभी कु. इन्दु गुप्ते व कु. विमल गुप्ते या भगिनींनी स्वागतपर पद्य व कु. वृंदा चित्रे यांनी आभार प्रदर्शक पद्य म्हटल्यावर सभेचे स्वागताध्यक्ष श्री. सुरबा टिपणीस यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात नियोजित अध्यक्षांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. श्री. सुरबाच्या भाषणानंतर श्री नारायणराव पाटील यांनी अध्यक्षांच्या निवडणुकीच्या सुचनेस पाठिंबा दिला.

पनवेलचे आमदार भातणकर यांनी पाटलांच्या भाषणास पाठिंबा दिल्यावर टाळ्यांच्या प्रचंड गजरात व आंबेडकर झिंदाबाद या गर्जनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले.

यानंतर अध्यक्षांच्या आदेशानुसार श्री. चिंतामणराव देशपांडे यांनी सभेस आलेले ना. भास्करराव जाधव, श्री. केशवराव ठाकरे, दामुअण्णा पोतनीस, गोविंदराव वरघरकर, देवराव नाईक, कारखानीस श्री. राजभोज, काकासाहेब लिमये वगैरे स्पृश्यास्पृश्य पुढाऱ्यांचे संदेश वाचून दाखविले.

“सुरवातीच्या हँडबिल प्रमाणे 19 मार्च 1940 रोजी अस्पृश्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारा महाड क्रांतीदिन, स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेऊन त्या दिवशी महाड येथे स्पृश्य, अस्पृश्य, मुसलमान समाजातील पंधरा ते वीस हजार लोक एकत्रित झाले होते. या जनसमुदायाला बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले.

‘सभेचा हेतू हँडबिलावर आपणास कळून चुकलाच आहे. महाडमध्ये आज सुखाचे, शांततेचे व ऐक्याचे वातावरण नांदत आहे. पण चौदा वर्षांपूर्वी, त्याचवेळी याच महाडात कोण दुर्धर प्रसंग ओढवला होता त्याची आपणापैकी पुष्कळ जणांना आठवण असणारच. सन 1927 च्या सभेस हजर असणारे सभाजन आजच्या सभेस हयात असून गैरहजर आहेत, असे सहसा होणार नाही.

ती चौदा वर्षापूर्वीची एक मामुली सभा याच थियेटरात भरली होती. अस्पृश्यांना सार्वजनिक तळी खुली करावी असा एक ठराव त्या सभेत पास करण्यात आला. या ठरावास सर्व पक्षांच्या लोकांचा पाठिंबा मिळाला होता. या पाठिब्यांने उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी आमच्या अनंतराव चित्र्यांची स्थिती झाली. आम्ही सर्व समाजन हुरळल्या मेंढीप्रमाणे चवदार तळ्यावर सामुदायिकरित्या पाणी पिण्यास गेलो. आमच्या मंडळीनी तेथे येथेच्छ जलपान केल्यावर आम्ही कृतार्थ होऊन परत आपआपल्या ठिकाणी गेलो. माझी राहाण्याची व्यवस्था त्यावेळी ट्रॅव्हलर्स बंगलो मध्ये करण्यात आली होती. मी व माझे सहकारी बंगल्यावर गेलो. आमची जेवणाची काही सोय त्या दिवशी करता येणे शक्य झाले नाही.

दुपारच्या वेळी आम्हास रक्तबंबाळ झालेल्या अस्पृश्यांचे दर्शन मात्र घडून आले. महाडातील स्पृश्यानी अस्पृश्यांना एकटे दुकटे गाठून पिटून काढले होते. स्पृश्य मारेकऱ्यांचा मोर्चा आम्हाकडे बंगल्यावर दुपारी चारच्या सुमारास आला होता. या मोर्चात सुमारे दोन हजार माणसांचा जमाव होता. विरेश्वराच्या देवळात डॉ. आंबेडकर जाणार अशी कंडी उठवून त्यांना चेतविण्यात आले होते. पण त्या जमावाबरोबर पोलीस अधिकारी असल्याने त्या दिवशी आमचे मरण टळले. पोलीस अधिकारीही त्यावेळी घाबरले होते. मुंबईला जा नाहीतर पोलीस खात्यात राहा असे त्यांनी मला स्पष्ट सांगितले. जखमी लोकांना टाकून मुंबईला जाणे मला शक्य नव्हते. म्हणून मी पोलीस खात्यात राहू लागलो. श्री. सुरबा टिपणीस यांनाही लोकांची भीती होतीच. तरी देखील ते मला थोडे फार चोरून मारून अन्न पुरवीत असत. वीरगावचा म्हातारा वीरकर मात्र नित्य नेमाने मला जेवण आणीत असे.

सन 1927 साली डिसेंबर महिन्यात आम्ही सत्याग्रहासाठी पुन्हा सभा भरविण्याचे ठरविले. आम्हावर मनाई हुकूम बजावण्यात आला. लोक मनाई हुकूम तोडण्यास एका पायावर तयार होते. पण आमच्या सभेत सनदशीर मार्गाने जाण्याचे धोरण ठरविण्यात आले. पुष्कळ मित्र नाराज झाले. शत्रु आम्ही तुरुंगाला भितो असे म्हणू लागले. पण आमचे धोरणच रास्त होते, असे इतिहासाने सिद्ध केले आहे.

आजच्या सभेत स्पृश्य, अस्पृश्य, हिंदू, मुसलमान खाद्याला खांदा लावून बसले आहेत. त्यावरून आमचेच धोरण बरोबर होते, हेच सिद्ध होत नाही काय ? आज आपण अस्पृश्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. अस्पृश्यांचे स्वातंत्र्य हा बहुतांशी सामाजिकच प्रश्न आहे. या प्रश्नाचे मी आज सिंहावलोकन करणार आहे. सामाजिक स्थित्यंतराचा मी आज विचार करणार आहे. राजकीय चळवळीविषयी या सभेत मी फारसे लक्ष देणार नाही.

नुसत्या राजकीय स्वातंत्र्याने जनतेचे कल्याण होईल, हा भ्रम आहे. इंग्रज गेला की आपण सुखी होऊ, अशी खात्री कोणासही देता येणार नाही. जगातील अनेक स्वतंत्र देशातील जनता आजही दुःखी कष्टी आहे, असे अनुभवाने दिसून येते. रुमानिया, अल्बेनिया, सव्हिया व युगोस्लोव्हाकिया हे देश स्वतंत्र आहेत. पण ते सुखी आहेत काय? फिनलँड व रशिया यांची स्थिती आपल्या डोळ्यांपुढे आहेच. ज्या राष्ट्रात समाजस्थिती सुव्यवस्थित तेच राष्ट्र स्वातंत्र्य मिळवून टिकवू शकते.

कै. सर. टी. माधवराव या हिंदी पुढा-याने एका ठिकाणी असे म्हटले आहे की, जनतेच्या दुःखाला सामाजिक दुःस्थितीच कारणीभूत होत असते. आपली सामाजिक चौकट आर्य संस्कृतीने हाडकासारखी कठीण करून सोडली आहे. तिच्यामध्ये लवचिकपणा मुळीच उरला नाही. परिस्थितीनुरूप तिच्यात फेरफार करणे सुकर होत नाही. आर्य संस्कृती श्रेष्ठ मानून तिला उराशी कवटाळण्यात अर्थ नाही. या संस्कृतीचा मानीव श्रेष्ठपणा हा निव्वळ भ्रम आहे. आर्याची अमानुष हिंसावृत्ती त्याच्या यज्ञसंस्थेने चांगलीच प्रतीत होते. यज्ञात अगणित पशुंचे हनन आर्य लोक बेदरकारपणे करीत असत. एका एका यज्ञात पाच सातशे पशू धर्माच्या नावाखाली मारले जात. आर्य लोक हे पट्टीचे सोमपान करणारे असत. त्यांच्याइतके दारूबाज क्वचितच पाहावयास मिळतील. ते शूद्रांना तुच्छ मानीत व स्त्रियांना शूद्रापेक्षाही हीन मानीत. आपल्या माय बहिणीच्या स्त्री-जातीला हीन मानणाऱ्या या आर्याची संस्कृती काय दर्जाची होती. हे सांगणे नकोच. याच आर्यांनी चार वर्ण करून समाजाचे तुकडे पाडले व शूद्रांना हीन स्थितीत नेऊन लोटले. ही आर्य संस्कृतीच आजच्या आपल्या हीन स्थितीस कारणीभूत झाली आहे.

भगवान बुद्धाने ही दुःस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याने यज्ञसंस्थेला विरोध केला. स्त्रिया, शूद्राची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले व मद्यपानासही बंदी केली. पण ब्राह्मणी धर्माला हा बुद्ध धर्म मानवला नाही. त्या धर्माच्या विरोधापुढे बुद्ध धर्म तगला नाही. बुद्धानंतरही अनेकांनी समाज सुधारण्याचे प्रयत्न केले. पण ते सफल झाले नाहीत.

अगदी अलीकडच्या काळातही कै. आगरकर व महात्मा जोतिबा फुले यांनी समाज सुधारण्याचे भगीरथ प्रयत्न केले. हे सर्व अतिरथी-महारथी थकले, पण आपल्या गेल्या पंधरा वर्षाच्या चळवळीस मात्र थोडेफार यश मिळाले आहे. ही आनंदाची गोष्ट होय.

चवदार तळयाचा लढा हा समाजसमतेचा लढा होता. या लढयाचे परिणाम दूरवर पोहचले आहेत हे ध्यानात येते. ते अवलोकन केल्यानेच या लढयाचे व्यापक स्वरूप हा लढा सुरू झाल्यापासूनच आपण मृतमांस भक्षणाची व गावात तुकडे मागून पोट भरण्याची दुष्ट चाल सोडून दिली आहे. आपल्या या चळवळीच्या सुरवातीस आपणातील रूढ चाली पाळणारे ‘आपले पूर्वज मूर्ख होते काय ?’ असा प्रश्न आम्हास विचारीत असत. यावरून त्यावेळेच्या जनमनाची वृती कळून येते. आज ही वृत्ती पालटली आहे. हा पालट चवदार तळयाच्या लढयातूनच उत्पन्न झाला आहे. आपल्या लोकात नानात-हेच्या देवदेवतांचा बुजबुजाट होता. आपणात खंडोबा व मुरळ्याचे प्रस्थ फार माजले होते. आपणातून पूर्वीच्या भूताखेताची व देवदेवताची हकालपट्टी झालेली आहे. आता आज महार समाजाची कायिक, मानसिक व आत्मिक अशी त्रिशुद्धी झालेली आहे. आपण आजचा हा स्वातंत्र्य दिन पाळण्यास सर्वतोपरी लायक झालेलो आहो. “मन स्वतंत्र तर मनुष्य स्वतंत्र” ही गोष्ट ध्यानात धरा. चवदार तळ्याच्या लढ्यातून स्वतंत्र मजूर पक्षाचा उगम झाला आहे. हा पक्ष या लढ्याची राजकीय फलश्रुतीच होय. चवदार तळ्याच्या लढ्यानेच आपल्या वर्गात राजकीय, सामाजिक, आर्थिक जागृती झाली आहे. ही गोष्ट कोणीही विसरता कामा नये.

या लढ्याचा स्पृश्य वर्गावरही परिणाम झालाच आहे. महाराष्ट्रात महाडकरांचा पहिला नंबर लागतो. तो या लढ्यामुळेच. ही जागृती व ही प्रगती संग्रामजन्यही होत. चौदा वर्षापूर्वी फुटलेल्या डोक्यांनी ही जागृती व ही प्रगती घडवून आणलेली आहे. येथे जमलेल्या कुणबी व मराठा बांधवांना मी आता दोन शब्द सांगणार आहे, ते त्यांनी लक्ष देऊन ऐकावे.

महार समाजात सध्या स्पृहणीय जागृती झाली आहे. महाराष्ट्रापुरतेच बोलावयाचे तर महार व ब्राह्मण यांनाच राजकारण कळते, असे म्हणण्याची पाळी आली आहे. कुणबी-मराठ्यांमध्ये जागृती नाही.

अशी परिस्थिती का असावी याचा तुम्ही विचार करावयास हवा. तुम्हामध्ये आपण महारांपेक्षा श्रेष्ठ असा अभिमान भरपूर आहे. पण महारापेक्षा मोठे होण्यात काय भूषण आहे. ते मला समजत नाही. समाजाच्या तळाच्या लोकांशी ताठ्याने वागण्यात पुरुषार्थ कोणता ?

कुलाबा जिल्ह्यात सात मामलतदार आहेत, त्यातले कुणबी-मराठ्यांचे किती आहेत, याचा तुम्ही विचार करावयास हवा. अधिकारी वर्गात तुमचे लोक किती आहेत ? प्रांताधिकारी तुमच्यापैकी आहेत काय? कलेक्टर तुमच्यापैकी आहेत काय? या महत्त्वाच्या गोष्टींचा तुम्ही विचार करावयास हवा. तुम्ही 70 टक्के, 80 टक्के लोक आहात. निव्वळ झाडूवाले व पट्टेवाले याजकडे पाहूनच का तुम्ही अभिमान बाळगणार ?

महार समाज खंबीर बनला आहे. आता तो बुडणार नाही व तुमच्या पायाखालीही राहणार नाही, ही गोष्ट ध्यानात बाळगा. यापुढे तुम्हीतरी जागे व्हा. तुम्ही 70-80 टक्के लोक असता तुम्हाला निव्वळ हमाली करण्यात आयुष्य कंठावे लागावे, कोण ही तुमची दैना ?

तुम्ही काँग्रेसला मिळालात तरी कॉंग्रेस तुम्हाला स्वतंत्रपणे वावरू देणार नाही. तुम्हाला काँग्रेसचे गुलाम म्हणूनच राबावे लागेल. हे लक्षात ठेवा. आमच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा पाया महारच होत. धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या पिळल्या जाणाऱ्या आपल्या समाजाच्या तळाच्या वरच स्वतंत्र मजूर पक्षाचा पाया रचला असल्यामुळे तो पक्ष अभेद्य असाच राहणार आहे. हे निश्चित समजा.

आमची शिडी घेऊन तुम्ही कामास लागा. पण आपण आपली स्वतःची शिडी तयार करण्यास मात्र विसरू नका. आमच्या अस्पृश्यांनी विटाळलेल्या पक्षास, नको असेल तर तुम्ही मिळू नका. पण आम्ही जी कासवाची पाठ तयार केली आहे. तिचा अवलंब करून आपल्या दुःखसागरातून तरून जाण्यास मात्र अनमान करू नका, हेच माझे तुम्हास सांगणे आहे.

अध्यक्षीय भाषणानंतर महाड तालुका, माणगाव व मुंबईतील फोर्ट भागात राहणारे कुलाबा रहिवासी यांनी डॉ. साहेबांस रूपये 318, रूपये 210 व रूपये 31 च्या थैल्या अर्पण केल्या.

डॉ. बाबासाहेबांनी यापैकी अर्धी रक्कम महाड येथील सुभेदार सवादकर बोर्डिंग या संस्थेस व राहिलेली रक्कम स्थानिक कार्यास देण्यात येईल असे जाहीर केले.

रा. जाधवांच्या भाषणानंतर मडकेबुवा जाधव यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभासदांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे जरूर आहे असे सांगितले. सभेच्या शेवटी दोन अस्पृश्य मुलांनी अस्पृश्य चळवळीस पोषक अशी पद्ये गाऊन दाखविली. रा. पोतनीस यांनी सर्वांचे आभार मानण्याचा ठराव मांडला.

आभारदर्शक ठरावानंतर, स्वतंत्र मजूर पक्ष कुलाबा जिल्हा, सुभेदार सवादकर बोडिंग, महाड, स्वतंत्र मजूर पक्ष, माणगाव तालुका, श्री. सुरबा टिपणीस, महाड, श्री. ओहोळ मास्तर, श्री. शंकरशेठ खुळे व श्री. भास्करशेठ खुळे यांच्यातर्फे बाबासाहेबास पुष्पहार अर्पण करण्यात आल्यावर सभा समाप्त झाली.

हा स्वातंत्र्य दिन पार पाडण्याचा श्री राघो दगडू ओहोळ, विठोबा गणपत वरघरकर, देऊ रामा जोशी, यशवंत भिकाजी साळवे, लक्ष्मण विरकर, भिकू राया महाडकर व गुणाजी देवजी कोलकर यांनी अत्यंत परिश्रम केले म्हणून त्याचे मानावे तितके आभार थोडेच होत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password