Categories

Most Viewed

19 मार्च 1940 भाषण 1

“व्यवहारज्ञान व शील हे महाराष्ट्रीयांचे दोन गुण होत असे माझे मत आहे”

तारीख 19 मार्च 1940 रोजी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य स्वातंत्र्य दिनानिमित्त आले असताना त्यांना महाड म्युनिसीपालिटीने मानपत्र अर्पण केले. त्या प्रसंगी महाड म्युनिसीपालिटीचे सभासद व महाडातील प्रमुख नागरिक हजर होते. रा. खोडके यांनी मानपत्र वाचले.

मानपत्र येणे प्रमाणे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर,
एम. ए. पीएच. डी.. (कोलंबिया). डी. एससी., (लंडन). बार अँट लॉ, एम. एल. ए., जे. पी., मुंबई यांचे सेवेशी, विद्वत्मान्य भारतभूषण डॉक्टरसाहेब,

बरोबर तेरा वर्षांपूर्वी तारीख 19 मार्च 1927 रोजी आमच्या या महाड शहरात आपल्या नेतृत्वाखाली अस्पृश्य जनतेने चवदार तळ्यात पाणी भरून आपला नागरिक समानतेचा जन्मसिद्ध हक्क प्रस्थापित केला. त्या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती जागृत ठेवण्याच्या हेतूने तारीख 19 मार्चचा आजचा दिवस ‘अस्पृश्य-स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करण्याच्या निमित्ताने आपण येथे आला आहात. अशा या ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रसंगी महाड शहरातील नागरिकांतर्फे आम्ही महाड म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सभासद आपले हार्दिक स्वागत करतो.

विद्यार्थी दशेत आपण नाना प्रकारचे कष्ट सोसून ज्ञानार्जन केलेत. आपली असामान्य बुद्धिमत्ता व ज्ञानलालसा पाहून कै. श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड यांनी आपल्याला परदेशी जाऊन ज्ञान संपादन करण्याची संधी आणि साधन प्राप्त करून दिले. तत्त्वज्ञान, राजकारण, शास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा वगैरे गहन विषयात आपण स्वदेशी व परदेशी विश्वविद्यालयात पारंगतता प्राप्त करून घेतली आहे. केवळ स्वार्थबुद्धीने आपण मोठ्या अधिकाराच्या सरकारी नोकरीचा हेतू धरला असता तर आपल्या थोर विद्वत्तेच्या बळावर आपल्याला सहज साध्य करून घेता आला असता. परंतु आपण सरकारी नोकरीच्या मोहपाशात न सापडता आपल्या स्वतंत्र वृत्तीला साजेसा बॅरिस्टरचा पेशा पत्करला व उत्तम कीर्ती संपादन केली.

आपण आपल्या प्रभावशाली नेतृत्वाने ह्या देशातील सात कोटी अस्पृश्य जनतेचा स्वाभिमान जागृत केलात. तिच्यात नवचैतन्य आणि स्फूर्ती निर्माण करून तिला आपल्या माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कांची जाणीव करुन दिलीत. आपण आपल्या असामान्य कर्तृत्वाने अस्पृश्य जनतेच्या आचार विचारात अभूतपूर्व क्रांती घडवून आणलीत. इतकेच नव्हे तर स्पृश्य हिंदू समाजालाही अंतर्मुख करून विचारप्रवण बनविलेत. ते आपण केवळ दोन दशकांच्या अल्पावधीत घडवून आणलेत ही गोष्ट जितकी आश्चर्यकारक तितकीच आनंदप्रद आणि आशादायक आहे. अतिदलित व अस्पृश्य समाजात आपल्यासारखा अद्वितीय नेता निर्माण झाला आहे. हे अस्पृश्य जनतेचे नव्हे तर अखिल हिंदी जनतेचे परमभाग्य होय.

तेरा वर्षांपूर्वी आपल्या नेतृत्वाखाली या शहरातील चवदार तळ्यावर पाणी भरून हजारो अस्पृश्य बंधूनी आपला नागरिक समानतेचा हक्क बजावला. त्यानंतरच्या काळात येथील लोकमतात स्पृहणीय क्रांती झाली असून तिचे श्रेय मुख्यतः आपल्यालाच दिले पाहिजे. आपल्या अस्पृश्योन्नतीच्या महत्कार्याला येथील स्थानिक लोकांचा पाठिंबा आहे. असे आम्ही आपल्या महाडच्या नागरिकांच्या वतीने आश्वासन देऊ इच्छितो.

ज्यांच्यामध्ये आपण जन्म घेतलात त्या अस्पृश्य समजाच्या उन्नतीसाठी आपल्या अंतःकरणाला लागलेली तळमळ गेल्या वीस वर्षांत अनेक लहानमोठ्या प्रसंगी जनतेच्या निदर्शनास आली आहे. ज्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीत आपल्याला अस्पृश्य जनतेची राजकीय व सामाजिक प्रगती करावयाची आहे तिचा विचार करता आपल्या चळवळीचे स्वरूप बाह्यतः जरी जातीय दिसत असले तरी अंतरंगी ती पूर्णपणे राष्ट्रीय आहे. ही गोष्ट विचारवंतांना कबूल करावीच लागेल. गोलमेज परिषदांच्या व पुणे कराराच्या प्रसंगी परिस्थितीनुरूप स्वजनहित आणि राष्ट्रहित यांचा योग्य समन्वय करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केलात. राजकीय क्षेत्रात आपण केलेल्या कामगिरीची ज्यांना यथातथ्य जाणीव आहे अशा हिंदी नागरिकांच्या अंतःकरणात आपल्याविषयी पूर्ण आदर वसत आहे.

गेल्या तीन वर्षात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून आपण आपल्या राजकीय कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढविली आहे. केवळ अस्पृश्य नव्हे तर देशातील श्रमजिवी, दलित, शेतकरी कामकरी वर्गाच्या उन्नतीकरणासाठी आपण जे अविश्रांत श्रम करीत आहात ते खरोखर अभिनंदनीय आहेत.

ह्या देशातील दलित आणि श्रमजिवी वर्ग आपल्याकडे मोठ्या आशेने पाहात आहे. त्यांच्या आशा आपल्या हातून सफल होवोत व त्यासाठी आपल्याला दीर्घायुरारोग्य प्राप्त होवो. अशी जगन्नियंत्या प्रभुच्या चरणी प्रार्थना करून आम्ही हे मानपत्र आदराने आणि आपुलकीच्या भावनेने आपल्याला अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार व्हावा अशी आमची विनंती आहे.

आपले नम्र सेवक,
विष्णु नरहरी खोडके,
प्रेसिडेंट,
महाड म्युनिसीपालिटी.

मानपत्र वाचून दाखविल्यावर डॉ. आंबेडकरांनी उत्तरादाखल छोटेसे भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले.

अध्यक्ष महाराज, सभासद व नागरिक जनहो,
आपण मला दिलेल्या मानपत्राबद्दल मी आपला फार आभारी आहे. मला आपण मानपत्र दिले नसते तरी मी आपला ऋणी राहिलो असतोच. माझ्या सार्वजनिक कार्याचा उगम महाडात झाला. त्या कार्यास लागणाऱ्या स्फूर्तीचा पुरवठाही मला येथूनच मिळाला आहे. याच शहरातून मला सहकाऱ्यांचा लाभही झाला आहे.

चौदा वर्षांपूर्वी आमच्या चळवळीने महाडात जो दंगा झाला त्यामुळे काही स्थानिक लोकांचा आम्हास विरोध होणे हे स्वाभाविकच आहे. आज आपण उदारपणे या तंट्यास कारणीभूत होणाऱ्या आम्हास सन्मानाने वागवीत आहा हे पाहून मला आनंद होत आहे. महाडच्या सहकाऱ्यांची माझ्या कार्यास बहुमोल मदत होत असते. यामुळेही मला महाडकरांबद्दल अभिमान वाटत असतो. वरून जातिवाचक भासणारे माझे कार्य अंतर्यामी खरे राष्ट्रीय स्वरुपाचे आहे हे आपण ओळखले आहे. यावरून आपला चाणाक्षपणा चांगला व्यक्त होत आहे.

माझा नेहमीचा रवंथ करण्याचा विषय राजकारण हाच होय हे आपणास माहीत असणारच. राजकारणासंबंधी बोललो नाही की मला चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागते. मी आपल्या आयुष्याच्या पूर्व वयात सात आठ वर्षे विलायतेत काढली आहेत. विलायतेतच हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतातील लोक एकत्र पाहावयास मिळतात. त्यांच्याशी मैत्रीही करता येते. मला विलायतेत असतानाच महाराष्ट्रीय व इतर प्रांतातील लोक त्यांच्या स्वभावात काय गुण दोष आहेत ते ताडून पाहावयास मिळाले. बंगाल व मद्रास प्रांतातील लोकांपेक्षा महाराष्ट्रीय बुद्धीने थोडे फार कमी असतील कदाचित. पण महाराष्ट्रीयात जे व्यवहारज्ञान (Common sense) ओतप्रोत भरलेले आढळून येते तसे इतर समाजात येत नाही.

मी विलायतेत असताना आम्ही हिंदी विद्यार्थी दर रविवारी एका होस्टेलमध्ये व्याख्यान ऐकण्यास जमत असू. तेथे मला एक विचित्र गोष्ट दिसून आली. आमची महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. आम्ही सात, आठ विद्यार्थीच होतो. आम्ही एका बाजूला बसून व्याख्यान ऐकत असू. व्याख्यानानंतर, व्याख्यात्यास प्रश्न विचारण्यात येत असत. व्याख्यात्याच्या उत्तराने प्रश्न विचारणारांची चांगलीच शोभा होत असे. चार पाच वर्षांच्या अवधीत एकाही महाराष्ट्रीय विद्यार्थ्याने एखादा प्रश्न विचारून आपली शोभा करून घेतल्याचे मला स्मरत नाही.

या महाराष्ट्रीयांच्या धोरणावरूनच त्यांचे व्यवहार ज्ञान उत्तम रीतीने व्यक्त होत नाही काय?

दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. हिंदी चळवळी विरुद्ध विलायतेत पाळत ठेवण्यासाठी हिंदी सी.आय.डी. नेमण्यात येत असत. इतर प्रांतातील विद्यार्थी हे काम करताना आढळून येत. पण मला सांगावयास अभिमान वाटतो की, त्यामध्ये एकही महाराष्ट्रीय कधी आढळून आला नाही. म्हणून व्यवहारज्ञान व शील हे महाराष्ट्रीयांचे दोन गुण होत असे माझे मत आहे. या गुणांमुळेच महाराष्ट्राला हिंदुस्थानात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

सध्या हिंदुस्थानात काल्पनिक (Imaginary) राजकारण धुमाकूळ घालीत आहे. अशा परिस्थितीत व्यवहार व शील यांची सांगड घालून महाराष्ट्राने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. आजचे राजकारण अगदीच उडाणटप्पू व अल्लडटप्पू बनले आहे. या दुर्धर प्रसंगातून हिंदुस्थानची सोडवणूक करावयास हवी आहे. हल्लीची परिस्थिती अत्यंत धोक्याची झाली आहे. आपण जागरुकता राखली तरच तरणोपाय आहे. आपण महाराष्ट्रीयांनी तरी अंधश्रद्धा ठेवून कोणाच्या तरी मागे जाणे हे आपल्या शीलास, व्यवहारास व ज्ञानास शोभण्यासारखे खास नाही.

मानपत्राबद्दल पुनः आपले आभार मानून मी आपले भाषण संपवितो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password