“सत्याग्रहाच्या यशाचे फळ माझ्या एकट्याचेच नाही तर आपणा सर्वांचे”
दिनांक 19 मार्च 1938 रोजी सोमवंशीय हितकारी समाज आणि ताडवाडी येथील अखिल अस्पृश्य रहिवाशांच्या विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. पी. जी. सोळंकी यांना मानपत्र व थैली अर्पण समारंभ आयोजित केला होता.
उपरोक्त समाजाच्या विद्यमाने महाड सत्याग्रहाच्या अकराव्या स्मृतिदिनाचे शुभप्रसंगी अस्पृश्य वर्गाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पी. जी. सोळंकी यांना त्यांच्या सर्वश्रेष्ठ आणि बहुमोल कामगिरीबद्दल मानपत्र व थैली देऊन अभिनंदन करण्याचा जंगी जाहीर समारंभ, शनिवार तारीख 19 मार्च 1938 रोजी सुप्रसिद्ध विविधवृत्त साप्ताहिकाचे विद्वान संपादक मे. रा. का. तटणीस यांच्या अध्यक्षतेखाली उत्तमप्रकारे पार पडला. सभास्थान रंगीबेरंगी लतापताकानी आणि फुलाच्या तोरणांनी शृंगारण्यात आले होते. आज महाड स्मृतिदिन असल्याने येथील कार्यकर्त्या मंडळींनी त्यानिमित्त समारंभापूर्वी झेंडा वंदन करून सोमवंशीय हितकारी समाजाचे चेअरमन श्री. रामभाऊ रावजी बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिदिन साजरा केला. प्रथमतः श्री. करंदीकरांनी महाड सत्याग्रहाविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर श्री. मिठगावकर च श्री. डोळस वगैरे वक्त्यांची याच विषयावर भाषणे होऊन नंतर रात्री 9.30 वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.
उच्चासनावर मुंबई लेजिस्लेटीव्ह असेंब्लीचे भाई चित्रे, भाऊराव गायकवाड, डी. जी. जाधव, खंडेराव सावंत, भातनकर, इत्यादी आमदार अँड. तळपदे, स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरीद्वय श्री. कमलाकांत चित्रे व एस. ए. उपशाम, नायगाव सेवामंडळाच्या मिस. चॉइल्डबाई, आर. सी. ए. मिशनच्या मिस डेसूरबाई व त्यांच्या सहकारीबाई तसेच अनेक संस्थाचे आणि अस्पृश्यवर्गीय कार्यकर्ते प्रामुख्याने हजर होते. डॉ. बाबासाहेब सभास्थानी येताच बैंड वादनात समता सैनिक दलाने त्यांना लष्करी थाटात सलामी दिली. त्यांच्या आगमनाबरोबर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने आणि जयघोषाने सभोवारचे वातावरण निनादित झाले.
प्रारंभी सामाजिक पदे व पोवाडे झाल्यावर श्री. करंदीकर यांनी अध्यक्षांची थोडक्यात ओळख करून दिल्यावर त्यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. तिला श्री. आर. आर. ढसाळ यांनी अनुमोदन दिल्यावर, अध्यक्ष टाळ्यांच्या गजरात स्थानापन्न झाले. त्यांनी समारंभास आलेले भास्करराव जाधव आदि थोर पुढा-यांचे संदेश वाचून दाखविले. तसेच डॉ. पी. जी. सोळंकी हे प्रकृति अस्वास्थामुळे आपणाला मानपत्र स्वीकारण्यासाठी हजर राहता येत नाही. याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे त्यांचे पत्र वाचून दाखविण्यात आले. गायन मास्तर भामाजी यांच्या मेळ्यातील मुला-मुलींचे स्वागतपर पद्य गायन झाल्यावर, श्री. वि. का. उपशाम यांनी डॉ. पी. जी. सोळंकी साहेब येऊ शकले नाहीत याबद्दल अत्यंत खेद प्रदर्शित करून नंतर डॉ. बाबासाहेबांचे मानपत्र वाचून दाखविले.
त्यानंतर आमदार भाऊराव गायकवाड यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेबांची कामगिरी सर्वश्रेष्ठ आणि अवर्णनीय असल्याचे योग्य शब्दात सांगून स्वतंत्र मजूर पक्षाच्या संघटनेवर भर दिला. त्यानंतर अँड. तळपदे यांनी डॉ. साहेबांच्या विषयी गुण गौरवपर भाषण केले. काँग्रेसच्या पक्षपाती कारवायाचे वर्णन करून स्वतंत्र मजूर पक्षाच्या असेंब्लीतील कामगिरीबद्दल धन्यवाद दिले. त्यावर भाई चित्रे यांनी आपल्या भाषणात महाड चवदार तळ्यावर आत्मोद्धारक चळवळीची मूहूर्तमेढ कशी रोवली गेली आणि आज तीच चळवळ अखिल गांजलेल्या शेतकरी कामकरी वर्गाच्या, वर्गलढ्याच्या तत्त्वावर स्वतंत्र मजूर पक्षाचे रूपाने कशी संघटित आणि जोरदारपणे चालली आहे याचे मुद्देसूद विवेचन करून, आमच्या स्वातंत्र्य युद्धात आम्हास कोणतीच पाशवी शक्ती प्रतिकार करू शकणार नाही. आम्ही अहिंसेची चेगडी जपमाळ ओढत बसून पोटभर मार न खाता, आता आमच्या आड येणाऱ्या हितशत्रूना पोटभर मार देणार असे छातीठोकपणे सांगून आपले भाषण संपविले.
त्यानंतर अध्यक्षाचे हस्ते श्री. गजोबा दगडूजी दूधावडे यांनी डॉ. बाबासाहेबांना चांदीच्या कास्केटमधून मानपत्र व 101 रुपयाची थैली अर्पण केली. हारतुरे घातल्यावर टाळ्यांचा गजर व जयघोष करून श्रोत्यांनी त्यांचा गौरव केला. त्यानंतर अध्यक्षांच्या आज्ञेवरून डॉ. पी. जी. सोळंकी यांचे मानपत्र श्री. वि. ल. डोळस यांनी वाचून दाखविले. डॉ. सोळंकी यांचे मानपत्र व 101 रुपयाची थैली त्यांना अर्पण करण्यासाठी अध्यक्षांनी आपल्या हस्ते मेसर्स दुधावडे, बोरीकर, उपशाम, डोळस, करंदीकर व संस्थेचे सेक्रेटरी श्री भवार इत्यादि कार्यकत्यांच्या स्वाधीन केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या गजरात बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले, बंधु भगिनीनो,
तुम्ही माझे भाषण ऐकण्याला आतुर झाला आहात. परंतु मी आज जास्त बोलू शकणार नाही. कारण प्रकृती स्वास्थ्यासाठी मी आज उपास केलेला आहे. शनिवार म्हणून माझा उपास नाही. माझा देवाधर्मावर बिलकूल विश्वास नाही. देवाधर्माच्या या खुळचट व वेडगळ कल्पनाविषयी एकदा मी माझ्या हिंदू मित्रांना शंकराच्या पिंडीविषयी माहिती विचारली. त्यांना ती सांगता आली नाही. शंकराची पिंडी काय आहे ? येथे त्याचे जास्त स्पष्टीकरण करता येत नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे ते निव्वळ संभोगदृश्य आहे. त्याची धर्मश्रद्धाळू प्राण्यांनी खुशाल षोडशोपचारे पूजा करावी. त्याशी आपणाला काही एक कर्तव्य नाही. सांगावयाचा हेतू हा की, माझा उपास तशाप्रकारचा नाही. माझा उपास आज दुपारी सुरू होऊन तब्बल दोन दिवस दोन रात्री उपास धरून मी सोमवारी दुपारी अन्नप्राशन करितो. या दोन दिवसात मी पाणीदेखील पीत नाही. इतका हा खडतर उपास आहे. दुसरे लोक नवस-सायासानिमित्त उपास करतात. पण मला अपचनाच्या विकारामुळे डॉक्टरने आठवड्यातून दोन दिवस उपाशी राहावयास लावले आहे. शरीर स्वास्थ्यासाठी मला हा उपास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मी जास्त बोलू शकणार नाही. आज मला जे हे मानपत्र व थैली दिली आहे त्याबद्दल मी येथल्या मंडळीचा अत्यंत ऋणी आहे. दुसरे असे की, आजचे मानपत्र काही कोरडे नाही तर त्याबरोबर एक थैलीही आहे. मानपत्राचा आनंदाने स्वीकार करून सदर थैली स्वतंत्र मजूर पक्षास देणगीदाखल दिल्याचे जाहीर करितो.
या मानपत्रात अस्पृश्य वर्गाच्या आतापर्यंतच्या चळवळीचे योग्य शब्दात दिग्दर्शन केल्याबद्दल मला अत्यंत समाधान होत आहे.. माझ्या कामगिरीचे जे अलंकारिक वर्णन केले आहे ते माझ्या एकट्याच्याच श्रमाचे फळ नसून त्याला तुम्हा सर्वांचेच अविश्रांत परिश्रम कारणीभूत झालेले आहेत. त्यातल्या त्यात ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टीमुळे आपली चळवळ जगाच्या निदर्शनास आली आणि यशांगिरीचा टप्पा गाठू शकली. त्या दोन गोष्टी म्हणजे महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह व दुसरा नाशिकचा मंदीर-प्रवेश सत्याग्रह. या दोन्ही प्रसंगी माझे मित्र अनुक्रमे भाई चित्रे व भाऊराव गायकवाड यांची धडाडी आणि अनेकविध संकटांना तोड़ देऊन काम करण्याची चिकाटीच कारणीभूत झाली आहे.