Categories

Most Viewed

19 मार्च 1927 भाषण

“जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका”

कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेची बैठक मुक्काम महाड येथील सि. प्रा. ना. मंडळाच्या नाटकगृहात मार्च 1927 ला शनिवार तारीख 19 व रविवार तारीख 20 रोजी भरली होती. परिषदेत एकंदरीत तीन हजार वर अस्पृश्य लोकांचा जमाव जमला होता. परिषदेस पुष्कळ प्रतिष्ठित मंडळी होती. गं. नि. सहस्त्रबुद्धे, अनंत विनायक चित्रे, सिताराम नामदेव शिवतरकर, बाळाराम त्यात मेसर्स आंबेडकर, पांडुरंग नथुराम राजभोज, शांताराम अनाजी उपशाम, मोरे, रामचंद्र शिंदे, धोंडीराम नारायण गायकवाड, शिवराम गोपाळ जाधव वगैरे बहिष्कृत वर्गापैकी मंडळी हजर होती. परिषदेच्या कामास तारीख 19 रोजी संध्याकाळी 5 वाजून गेल्यावर सुरवात झाली. आरंभी परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड यांनी आलेल्या मंडळीचे स्वागत करून परिषद भरविण्याचा हेतू थोडक्यात सांगितला. नंतर नियमाप्रमाणे सूचना व अनुमोदन मिळाल्यावर परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, एम.ए., पीएच.डी., डी.एससी. बारअँट-लॉ. हे स्थानापन्न झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

सद्गृहस्थ हो !
आज आपण जो माझा गौरव केला त्याबद्दल मी आपला अत्यंत ॠणी आहे, या परिषदेचे अध्यक्षस्थान मी स्वीकारावे अशी जेव्हा मागणी मजकडे करण्यात आली त्यावेळी माझ्या नेहमीच्या स्वभावास अनुसरून मी ती टाळण्याच्या विचारात होतो. परंतु ती मला टाळता येणार नाही व टाळल्यास जनक्षोभ होईल असे जाणून मी ना-नु न करिता स्वसंतोषाने ती जबाबदारी स्वीकारली व तद्नुसार मी आज आपणापुढे उभा आहे.

सद्गृहस्थ हो! आज येथे येण्यास मला एकपरी अती आनंद होतो. ज्याला त्याला आपापल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच. माझे वडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले. माझा पहिला श्रीगणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो. परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षांचा असताना घाटाचा पायथा सोडल्या नंतर घाटमाथ्यावर माझे आजपर्यंतचे जीवित गेले. आज 25 वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे. जो प्रदेश सृष्टीने आपल्या सौंदर्याने श्रृंगारला आहे त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंदच वाटणार आहे. ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिव्हाळ्याचा आहे असे वाटते. त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही. परंतु आजच्या प्रसंगी मला जितका आनंद होतो तितकाच खेदही होतो असे म्हटल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. एकदा स्थिती अशी होती की, हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. एकेकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळीने हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता. त्याचप्रमाणे पांढरपेशे लोक खेरीज करून बाकीच्या वर्गाच्या तुलनेने पाहता अस्पृश्य वर्गच शिक्षणात पुढारलेला होता.

ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करीपेशा हे एक महत्त्वाचे कारण होते. ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकास नशीब काढण्यास किती वाव होता. याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही. परंतु त्याकाळी स्पृश्यास्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की, अस्पृश्यांना चालताना स्पृश्यावर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे. ओळख पटावी म्हणून हाताला काळा दोरा बांधावा लागत असे. त्याकाळी वाव असला तरी अगदीच थोडा असला पाहिजे. इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कोठे या प्रांतातील अस्पृश्य लोकांना डोके वर काढण्यास संधी मिळाली. त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे. किती तेज आहे व त्यांची बुद्धीमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले. याचा पुरावा जर पाहिजे असेल तर जुनी आर्मिलिस्टाची बाडे चाळून पाहिली म्हणजे बस्स होईल. या प्रांतातील अस्पृश्य वर्गात किती सुभेदार झाले. किती जमादार झाले. किती हवालदार झाले. नार्मल स्कूल सारख्या शाळातून पास होऊन किती हेडमास्तरांच्या हुद्यावर चढले. एजुटंट क्लार्क व क्वार्टर मास्तर क्लार्क सारख्या जबाबदारीच्या जागा कितीकांनी चालवून दाखविल्या याचा तपशील जर देऊ गेलो तर हे भाषण मर्यादेचे बाहेर वाढेल. इतके सांगितले म्हणजे पुरे आहे की, एकेकाळी जो अस्पृश्य वर्ग सेवक म्हणून नांदत होता तोच वर्ग पलटणीतील नोकरीमुळे अधिकार संपन्न होऊन दुसऱ्या वर्गावर सत्ता गाजविता झाला होता.. या पलटणीतील नोकरीमुळे हिंदुसमाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. ज्या महार, चांभार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजत. तेच मराठा शिपाई महार व चांभार सुभेदारास लवून सलामी देत असत व “क्यु, बे” म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे. एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकास या देशातील कोणत्याही प्रांतात यापूर्वी केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणता येईल. या प्रांतातील अस्पृश्य लोकांनी आपला दर्जा वाढविला होता इतकेच नव्हे तर त्यांची शिक्षणातही विलक्षण प्रगती झाली होती. त्यांच्यातील 90 टक्के लोक साक्षर होते. इतकेच नव्हे तर 50 टक्के लोक तरी वरच्या दर्जाचे सुशिक्षित होते. त्यातल्यात्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, हा शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियांतही होता. काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भर पुरुषाच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत असत. या शिक्षणातील प्रगतीला त्यांचा लष्करीपेशा बऱ्याच अंशी कारणीभूत झाला.

इंग्रजी राज्यास सुरवात होऊन 150 वर्षे होऊन गेली असता देखील प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात येत नाही. याबद्दल खेद वाटून ते आता तरी सुरु करा असे जे लोक म्हणतात त्यांना एक गोष्ट ठाऊक नाही असे दिसते. ईस्ट इंडिया कंपनीला शिक्षणप्रेमी लोक नेहमी दोष देतात की, कंपनीने राज्य चालविताना आपल्या फायद्याकडे काय ते लक्ष दिले. लोकांच्या शिक्षणाकडे काहीच लक्ष दिले नाही. ही गोष्ट सर्वस्वी खरी नाही. निदान कंपनीच्या मिलटरी खात्यापुरती तरी ही गोष्ट साफ खोटी आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून मिलिटरीत पिढ्यान पिढ्या नोकरी केली आहे ते ग्वाही देऊ शकतील की, कंपनीच्या अमदानीत प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे होते. प्राथमिक शिक्षण मुलांस व त्याचप्रमाणे मुलींसही सारख्याच रितीने लागू केले जात असे. मुलास प्राथमिक शिक्षणाशिवाय खालच्या दर्जाचे दुय्यम शिक्षणही सक्तीने लागू केले जात असे. सक्तीचा प्रकार काही साधा व सोपा नव्हता. मूल शाळेत न गेले तर पालकास दंड देऊन सुटता येत नसे. विशेष ध्यानात घेण्यासारखी गोष्ट ही सक्ती बालक वर्गापुरती नसे. नवीन भरती झालेले वयातील रिक्रूट यांनाही रात्रीच्या शाळेत जाण्यास सक्ती करण्यात येत असे. कंपनीचे राज्य संपुष्टात आल्यानंतर बादशाही अंमल सुरू झाला. सत्तावन सालचे बंड मोडल्यानंतर जेव्हा इंग्रज सरकारने हिंदुस्थानातील सैन्यासंबंधी चौकशी करण्याकरिता एक कमिशन नेमले होते. त्यात काही साक्षीदारांनी सैन्यात शिक्षणाचा प्रसार झाला तर अनर्थ ओढवेल असे प्रलाप काढले. त्यास भिऊन मिलटरी खात्यात जारी असलेल्या शिक्षणाकडे प्रथमतः दुर्लक्ष करण्यात आले व शेवटी शेवटी त्याचा अगदी बिमोड करण्यात आला. ते कसेही असो, जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गाचा अतोनात फायदा झाला होता. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा उत्तम तऱ्हेने केला की त्यांच्याबद्दल स्वाभिमान, वाटल्यावाचून राहणार नाही. या ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथसंग्रह झाला तो त्यांच्या संख्येच्या मानाने अफाट होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. श्रीधर स्वामीच्या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती तर गाड्याने सापडतील, परंतु मुकुंदराज, ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर, इत्यादि महाराष्ट्रातील जुनाट व महान कवींच्या ग्रंथांच्या हस्तलिखीत प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहेत. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांच्या घरी काही दुर्मिळ अशा ग्रंथाच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, ही गोष्ट फारशी ऐकिवात नाही पण हा ग्रंथ मी एका माझ्या आता दिवंगत झालेल्या मित्राच्या घरी पाहिलेला आहे. काही वर्षापूर्वी श्री पांगारकर यांनी राघवचित्तघन या कवीने लिहिलेला “ज्ञानसुधा” नगवाचा ग्रंथ कोणाजवळ असल्यास कळवावे अशी केसरीत जाहिरात दिली होती. या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पाहावयास सापडेल. ज्या अस्पृश्य जातीच्या लोकास ज्या काळी विद्येची सर्व दारे बंद होती त्यावेळी त्यांना असा ग्रंथसंग्रह किती सायास पडले असतील व किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल, याचा विचार ज्याचा त्यांनीच करावा. ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणावह आहे. याबद्दल दुमत होणे शक्य नाही. दुसऱ्या तऱ्हेने पाहता, त्या काळच्या लोकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग योग्यप्रकारे केला असे दिसून येईल. सार्वजनिक व्यवसायात पडणाऱ्या लोकांचे वर्गीकरण केले तर असे आढळून येईल की, काही “नामके वास्ते” तर काही “कामके वास्ते” म्हणून सार्वजनिक कार्यात पडतात. आणि जे पडतात त्यात नामके वास्ते अशांचाच भरणा जास्त असतो. हल्ली अस्पृश्यांची जी चालक मंडळी आहे त्यातही नामके वास्ते लोकांचा काही कमी भरणा नाही. पुण्यातले लोक म्हणतात की, अस्पृश्यातील जागृतीचे मूळ उत्पादक आम्ही आहोत. मुंबईतही हा मान सर्वस्वी आमचा आहे असे म्हणणारे काही लोकप्रिय लोक आहेत. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी, भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या काही चालकांचे असे म्हणणे आहे की, अस्पृश्यातील जागृती ही आमच्यापासून सुरु झाली आहे. जे लोक अशा तऱ्हेने ओढून मान मागतात त्यांना अस्पृश्योन्नतीच्या चळवळीचा खरा इतिहास अवगत नाही असेच म्हटले पाहिजे. मुंबई इलाख्यातील अस्पृश्य समाजात सार्वजनिक काम करण्याकरिता ज्या संस्था कालांतराने स्थापन झाल्या त्यात अनार्य दोष परिहारक मंडळी ही पहिली संस्था आहे असे संशोधनाअंती दिसून येईल. 1893 साली जेव्हा अस्पृश्य लोकांना लष्करात भरती होण्याची बंदी झाली त्यावेळी याच संस्थेने प. वा. महादेव गोविंद रानडे यांच्या सहाय्याने सरकारकडे एक मोठा अर्ज केला होता. यावरून या संस्थेची सल्लामसलत
मोठमोठ्या लोकांशी होत असे हे उघड आहे. 1897 साली काँग्रेसला उद्देशून याच संस्थेने एक प्रश्नमालिका तयार केली होती, तीत सामाजिक सुधारणा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा मागण्याचा काय अधिकार आहे, असा पक्ष मांडला होता. यावरून संस्थेत किती जोम होता है दिसून येते. 1898 साली सर हरबर्ट रिसले साहेबांनी जेव्हा हिंदी लोकांच्या रितीरिवाजाची संकलित माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले होते त्यावेळी सदर साहेबांनी आपल्या प्रश्नाची यादी या संस्थेकडेही पाठविली होती. यावरून संस्थेस सरकारकडून विचारपूस करण्याइतक्या महत्त्वाची ही संस्था होती हे स्पष्ट होते. हे सर्व मी पुराव्यानिशी सांगू शकतो. कारण या संस्थेचे सर्व कागदपत्र हल्ली माझ्या ताब्यात आहेत. परंतु ही सभा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे स्थापन झाली, त्यावरून उघड आहे की, अस्पृश्योन्नतीची चळवळ प्रथम सुरु केल्याचा मान जर कोणास द्यावयाचा झाला तर तो या संस्थेस आणि या प्रांतास देणे प्राप्त आहे. या संस्थेच्या चालकांनी संस्थेच्या मार्फत फक्त अडचणी दूर करण्याचे काम केले असे नाही. लेखनाद्वारे जागृती करण्याचे कामही त्यांनी पुष्कळच केले. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतीबा फुले यांचे खरे साथीदार व उत्साही शिष्यांपैकी बरेचसे या संस्थेच्या चालकांपैकी होते. एकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय माझ्याने राहवत नाही ते गृहस्थ म्हणजे कै. गोपाळबुवा वलंगकर हे होत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे जी जागृती केली ती अनुपम आहे. ज्यांना ती पाहावयाची असेल त्यांनी ‘दीनबंधु’ च्या जुन्या फाईली वाचून पाहाव्यात म्हणजे कळेल.

अशी ज्या लोकांची ऐकेकाळी उन्नत स्थिती होती त्या लोकांची आजची स्थिती किती अवनत झाली आहे? तारतम्य दृष्टीने जर पाहू गेलो तर या प्रदेशातील अस्पृश्य वर्गाची स्थिती इतकी खालावली आहे की, त्यांच्याइतके दरिद्री, अशिक्षित व मूढ लोक इतर प्रदेशातील अस्पृश्य वर्गात नाहीत असे म्हणण्यास काहीच प्रत्यवाय नाही. या प्रांतातील अस्पृश्य वर्गाच्या स्थितीत असा खेदकारक व शोचनीय फेरफार कसा झाला हा एक गूढ प्रश्न आहे. याचे नेहमी देण्यात येणारे उत्तर असे आहे की, ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांची लष्करात भरती करण्याचे बंद केल्यापासून हा अनर्थ ओढवला आहे. या म्हणण्यात पुष्कळसा खरेपणा आहे याबद्दल मला मुळीच शंका नाही. राजकीयदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या अथवा आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रजाजनास सरकारी नोकरीत बंदी करणे अन्यायाचे आहे. अस्पृश्य समाजातील लोकास लष्कर भरतीतून बंद करणे हे पक्षपातीपणाचे लक्षण तर आहेच पण हे विश्वासघाताचे त्याचप्रमाणे मित्रद्रोहाचेही लक्षण आहे असे म्हणावे लागते. अस्पृश्यांच्या सहाय्याशिवाय ब्रिटिश सरकारचा या देशात केव्हाच प्रवेश झाला नसता. मराठेशाहीचे उच्चाटन इंग्रजांना कसे करता आले याची इतिहास संशोधकांकडून अनेक कारणे देण्यात येतात. कोणी मराठेशाहीत माजलेला जातीभेद हे एक कारण देतात. कोणी मराठेशाहीत आपापसात वाढत असलेली तेढ व दुही हे कारण देतात. पण यापैकी एकही कारण खरे नाही असे माझ्या अल्पमतीस वाटते. मराठ्यांमध्ये जातीभेदामुळे किंवा दुहीमुळे दौर्बल्य वाढले होते तर इंग्रज लोक काय सामर्थ्यवान होते? खरे म्हटले असता ज्या काळी इंग्रजांनी हा देश काबीज करून घेतला त्यावेळी इंग्लंड देशाला नेपोलियनने दे माय धरणी ठाय करून सोडले होते. इतके की हिंदुस्थानात राज्य करीत असलेल्या त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीस त्यांना द्रव्यबलाची वा सैन्यबलाची मदत करणे अशक्य होते. उलटपक्षी नेपोलियनच्या तडाख्यातून सुटका करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीपासून द्रव्यबलाची व सैन्यबलाची मागणी केली. हिंदुस्थानात इंग्रजांची अशी दुर्बल स्थिती असताना त्यांनी हा देश कसा काबीज केला याचा उलगडा मराठ्यात तेढ होती किंवा दुही होती या म्हणण्याने होत नाही. मला असे वाटते की याला समाधानकारक असे एकच उत्तर देता येईल, ते हेच की या देशात येऊन एतद्देशीय लोकांचे सैन्य जर इंग्रजांना उभारता आले नसते तर हा देश त्यांना केव्हाच पादाक्रांत करता आला नसता, यावर आमच्या दयाळू व न्यायप्रेमी इंग्रज सरकारास मी अशी सूचना करतो की, त्यांनी आपणा स्वतःला असा प्रश्न विचारावा की या एतद्देशीय सैन्यात कोणाचा भरणा होता? व ते जर आपले जुने दप्तर तपासून पाहतील तर त्यांना दिसून येईल की या त्यांच्या सैन्यात अस्पृश्यांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. तेव्हा हे उघड आहे की, अस्पृश्यांचे बळ जर इंग्रजांच्या पाठीमागे नसते तर हा देश त्यांना केव्हाच काबीज करता आला नसता. ज्या लोकांनी सैन्यात भरती होऊन देश हस्तगत करून दिला त्याच लोकांची सैन्यातून हकालपट्टी व्हावी ही न्यायाची त-हा मोठी मासलेवाईक आहे असे म्हणणे भाग आहे. इंग्रज लोक कसे कार्यसाधू लोक आहेत याचे दुसरेही एक उदाहरण नुकतेच घडलेले आपणा सर्वांस विदित असेलच. 1917 साली काँग्रेसला उद्देशून याच संस्थेने एक प्रश्नमालिका तयार केली होती. तीत सामाजिक सुधारणा केल्याशिवाय तुम्हाला राजकीय सुधारणा मागण्याचा काय अधिकार आहे असा पक्ष मांडला होता. यावरून संस्थेत किती जोम होता हे दिसून येते. 1898 साली सर हरबर्ट रिसले साहेबांनी जेव्हा हिंदी लोकांच्या रितीरिवाजाची संकलित माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी सदर साहेबांनी आपल्या प्रश्नांची यादी या संस्थेकडेही पाठविली होती यावरून संस्थेस सरकारकडून विचारपूस करण्याइतक्या महत्त्वाची ही संस्था होती हे स्पष्ट होते. हे सर्व मी पुराव्यानिशी सांगू शकतो; कारण या संस्थेचे सर्व कागदपत्र हल्ली माझ्या ताब्यात आहेत. परंतु ही सभा रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे स्थापन झाली, त्यावरून उघड आहे की अस्पृश्योन्नतीची चळवळ प्रथम सुरु केल्याचा मान जर कोणास द्यावयाचा झाला तर तो या संस्थेस आणि या प्रांतास देणे प्राप्त आहे. या संस्थेच्या चालकांनी संस्थेच्या मार्फत फक्त अडचणी दूर करण्याचे काम केले असे नाही. लेखनाद्वारे जागृती करण्याचे कामही त्यांनी पुष्कळच केले. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतीबा फुले यांचे खरे साथीदार व उत्साही शिष्यांपैकी बरेचसे या संस्थेच्या चालकांपैकी होते. एकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय माझ्याने राहवत नाही ते गृहस्थ म्हणजे कै. गोपाळबुवा वलंगकर हे होत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे जी जागृती केली ती अनुपम आहे. ज्यांना ती पाहावयाची असेल त्यांनी ‘दीनबंधु’ च्या जुन्या फाईली वाचून पाहाव्यात म्हणजे कळेल.

अशी ज्या लोकांची ऐकेकाळी उन्नत स्थिती होती त्या लोकांची आजची स्थिती किती अवनत झाली आहे? तारतम्य दृष्टीने जर पाहू गेलो तर या प्रदेशातील अस्पृश्य वर्गाची स्थिती इतकी खालावली आहे की, त्यांच्याइतके दरिद्री, अशिक्षित व मूढ लोक इतर प्रदेशातील अस्पृश्य वर्गात नाहीत असे म्हणण्यास काहीच प्रत्यवाय नाही. या प्रांतातील अस्पृश्य वर्गाच्या स्थितीत असा खेदकारक व शोचनीय फेरफार कसा झाला; हा एक गूढ़ प्रश्न आहे. याचे नेहमी देण्यात येणारे उत्तर असे आहे की, ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांची लष्करात भरती करण्याचे बंद केल्यापासून हा अनर्थ ओढवला आहे, या म्हणण्यात पुष्कळसा खरेपणा आहे याबद्दल मला मुळीच शंका नाही. राजकीयदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या अथवा आर्थिकदृष्ट्या कोणत्याही प्रजाजनास सरकारी नोकरीत बंदी करणे अन्यायाचे आहे. अस्पृश्य समाजातील लोकास लष्कर भरतीतून बंद करणे हे पक्षपातीपणाचे लक्षण तर आहेच पण हे विश्वासघाताचे त्याचप्रमाणे मित्रद्रोहाचेही लक्षण आहे असे म्हणावे लागते. अस्पृश्यांच्या सहाय्याशिवाय ब्रिटिश सरकारचा या देशात केव्हाच प्रवेश झाला नसता. मराठेशाहीचे उच्चाटन इंग्रजांना कसे करता आले याची इतिहास संशोधकांकडून अनेक कारणे देण्यात येतात. कोणी मराठेशाहीत माजलेला जातीभेद हे एक कारण देतात, कोणी मराठेशाहीत आपापसात वाढत असलेली तेढ व दुही हे कारण देतात. पण यापैकी एकही कारण खरे नाही असे माझ्या अल्पमतीस वाटते. मराठ्यांमध्ये जातीभेदामुळे किंवा दुहीमुळे दौर्बल्य वाढले होते तर इंग्रज लोक काय सामर्थ्यवान होते? खरे म्हटले असता ज्या काळी इंग्रजानी हा देश काबीज करून घेतला त्यावेळी इंग्लंड देशाला नेपोलियनने दे माय धरणी ठाय करून सोडले होते. इतके की हिंदुस्थानात राज्य करीत असलेल्या त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीस त्यांना द्रव्यबलाची वा सैन्यबलाची मदत करणे अशक्य होते. उलटपक्षी नेपोलियनच्या तडाख्यातून सुटका करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीपासून द्रव्यवलाची व सैन्यबलाची मागणी केली. हिंदुस्थानात इंग्रजांची अशी दुर्बल स्थिती असताना त्यांनी हा देश कसा काबीज केला याचा उलगडा मराठ्यात तेढ होती किंवा दुही होती या म्हणण्याने होत नाही. मला असे वाटते की याला समाधानकारक असे एकच उत्तर देता येईल, ते हेच की या देशात येऊन एतद्देशीय लोकाचे सैन्य जर इंग्रजाना उभारता आले नसते तर हा देश त्यांना केव्हाच पादाक्रांत करता आला नसता. यावर आमच्या दयाळू व न्यायप्रेमी इंग्रज सरकारास मी अशी सूचना करतो की त्यांनी आपणा स्वतःला असा प्रश्न विचारावा की या एतद्देशीयः सैन्यात कोणाचा भरणा होता? व ते जर आपले जुने दप्तर तपासून पाहतील तर त्यांना दिसून येईल की या त्यांच्या सैन्यात अस्पृश्यांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. तेव्हा हे उघड आहे की, अस्पृश्यांचे बळ जर इंग्रजाच्या पाठीमागे नसते तर हा देश त्यांना केव्हाच काबीज करता आला नसता. ज्या लोकांनी सैन्यात भरती होऊन देश हस्तगत करून दिला त्याच लोकांची सैन्यातून हकालपट्टी व्हावी ही न्यायाची त-हा मोठी मासलेवाईक आहे असे म्हणणे भाग आहे. इंग्रज लोक कसे कार्यसाधू लोक आहेत याचे दुसरेही एक उदाहरण नुकतेच घडलेले आपणा सर्वांस विदित असेलच.

1917 साली सुरू झालेल्या महायुद्धाच्या प्रसंगी आमच्या सरकारला पुन्हा अस्पृश्यवर्गाची आठवण झाली. आमच्या अस्पृश्यवर्गाची पलटणीत शिरण्याची उत्सुकता नेहमीच अनावर असते. एका पलटणीपुरती मागणी होती पण दोन पलटणी होतील इतकी माणसे आपखुषीने तयार झाली सरकारने एक पलटण उभी केली. एकदा झालेली बंदी उठवून पुन्हा लष्कर भरती सुरू झाली याबद्दल सर्वांनाच आनंद वाटला.. या प्रांतातील अस्पृश्यांच्या भाग्योदयास पुन्हा प्रारंभ झाला अशी आशा वाटू लागली. परंतु लढाई संपल्यानंतर काटकसरीच्या नावाखाली पलटण कमी करण्यात आली! या सरकारच्या ताल बेताल वर्तनास काय म्हणावे हे समजत नाही! सद्गृहस्थ हो ! माझे असे मत आहे की आम्ही सरकारला नेहमी अनुकूल असतो. म्हणूनच सरकार आमची नेहमी उपेक्षा करते. सरकार देईल ते घ्यावयाचे सांगेल ते ऐकावयाचे, ठेवील तसे राहावयाचे अशी जी आमची दास्यत्त्वाची वृत्ती होऊन गेली आहे, तीच सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेचे मुख्य कारण आहे. आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही मुकाट्याने सहन करतो. उजव्या गालावर कोणी थप्पड मारल्यास आम्ही आपला डावा गाल पुढे करतो, पण मारणाऱ्याचा प्रतिकार करण्यास आमचा हात वर जात नाही. आकाश जरी कोसळले तरी आम्ही एखाद्या हवालदिलाप्रमाणे नशीब म्हणून स्वस्थ बसतो. ह्या आत्मघातकी वृत्तीचा आम्ही जितक्या लवकर त्याग करू तितके आपल्या फायद्याचे आहे. म्हणून मी आपणास असे सांगतो की, लष्कर भरतीची बंदी दूर करण्याचा आम्ही शक्य तेवढा प्रयत्न केलाच पाहिजे.

परंतु मी आपणापुढे जो प्रश्न मांडणार आहे तो असा की, लष्कर भरती झाली तर सर्व कार्यभाग आटोपला काय? आपणातील बऱ्याच लोकांचा असा समज आहे की लष्कराची भरती एकदा मोकळी झाली म्हणजे सर्व काही झाले. बाकी काही करावयास नको. मला असे वाटते की ही चूक आहे. एक तर असे की सर्वच लोकांचा पलटणीत शिरकाव होणे शक्य नाही जेव्हा पलटणीत राहण्यास कोणत्याच वर्गातले लोक तयार नव्हते तेव्हा आपल्या लोकांना मुबलक वाव होता. पण आता तशी स्थिती नाही. इतरांबरोबर आपणास जे मिळावयाचे तेवढेच मिळेल. जास्तीची आशा करणे निरर्थक आहे. यावास्तव पलटणीशिवाय आपल्या उन्नतीसाठी कोणती इतर व्यवस्था करता येईल याबद्दल आपण विचार करावयास पाहिजे. अस्पृश्य समाजात धंदेवाईक जातीत समाविष्ट असलेले लोक फार थोडे आहेत. चांभार लोकच काय ते धंदेवाईक आहेत. पुण त्यांनीही हा धंदा आता जवळजवळ सोडल्यासारखा आहे. म्हणून बिन धंदेवाईकांचाच भरणा जास्त आहे. अमुक एक धंदा म्हणून अमुक एका जातीची खोती असा जेथे प्रघात आहे तेथे अमुक एक धंदा तुम्हास करता येण्यासारखा आहे तो करा असे सांगणे म्हणजे वायफळ उपदेश आहे. त्यांना जर धंद्यात पडावयाचे असेल तर तो धंदा अशा प्रकारचा असला पाहिजे की जो कोणत्याही जातीतल्या माणसास करण्यास मोकळीक आहे. अशा प्रकारचे धंदे मला तरी दोनच दिसतात. एक पांढरपेशा व दुसरा शेती.

पांढरपेशा अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी स्वीकारावा हा उपदेश कितीएक वरच्या वर्गातील लोकांना रुचत नाही हे मला माहीत आहे. त्यांना असे वाटते की अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी सुतारी, लोहारी, विणकरी वगैरे व्यवसाय करावे. पण काही झाले तरी पांढरपेशा स्वीकारू नये. हा त्यांचा उपदेश आपल्या हिताचा नाही हे मी आपणास निक्षून सांगतो. अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यास दोन गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे असे माझे मत आहे. एक त्यांच्या मनावर जो जुन्या, खुळचट व अनिष्ट विचारांचा जंग बसला आहे तो साफ घासून निघाला पाहिजे. आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत अस्पृश्य समाजात जागृतीचे अथवा प्रगतीचे बी कधीही रुजणार नाही. हल्लीच्या स्थितीत त्यांच्या खडकाळ मनावर कसलेही नवे रोप उगवणार नाही. त्यांची मने अशा रीतीने सुसंस्कृत होण्यास त्यानी पांढरपेशाचा अवलंब केलाही पाहिजे. अस्पृश्यांनी पांढरपेशाचा अवलंब करावा असे मी का म्हणतो यास दुसरेही एक कारण आहे. सरकार ही एक मोठी जबरदस्त महत्त्वाची संस्था आहे. सरकार ज्याप्रमाणे मनात आणील त्याप्रमाणे सर्व काही घडून येईल. पण आपण हे विसरता कामा नये की, सरकार कोणत्या गोष्टी घडवून आणील हे सरकारी नोकरांवर सर्वस्वी अवलंबून राहील. कारण सरकारचे मन म्हणजे सरकारच्या नोकरांचे मन. यावरून एक गोष्ट सिद्ध आहे ती ही की, जर सरकारकडून आपल्याला आपल्या हिताचे असे काही करवून घ्यावयाचे असेल तर सरकारी नोकरीत आपला प्रवेश आपण करून घेतला पाहिजे. नाही तर आपली जशी आज हेळसांड होत आहे तशी ती नेहमीच होणार आहे. ती न व्हावी हा जर आपला हेतू असेल तर अस्पृश्य वर्गाच्या लोकांनी सरकारी नोकरीत आपला जास्त प्रमाणात शिरकाव होईल अशी व्यवस्था करावयास पाहिजे. त्याशिवाय त्यांना उर्जित अवस्था केव्हाच यावयाची नाही आणि सरकारी नोकरीत शिरकाव होण्यास पांढरपेशा पत्करल्या खेरीज चालावयाचे नाही. ह्या गोष्टीचे महत्त्व मुसलमान व मराठे या जातीनी ओळखीले आहे. या बाबतीत त्यांची मोठी धडपड चालली आहे. आपणही वेळीच जागे होऊन आपला शिरकाव करून घेतला पाहिजे. ब्राह्मण लोक या चळवळीची निंदा करतात. सरकारी नोकरीत काही नाही म्हणून सांगत फिरतात. परंतु या त्यांच्या म्हणण्यात सत्यही नाही व प्रामाणिकपणाही नाही. सत्य नाही याचे कारण असे की सरकारी नोकरीचा अधिकार या प्रांतातील ब्राह्मणांच्या हाती जर नसता तर इतर प्रांतातील ब्राह्मणाप्रमाणे ते पाणके किंवा स्वयंपाकी झाले असते. येथील ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व नुसत्या पुराणाच्या आधारावर असते तर इतर ठिकाणाप्रमाणे कधीच ढासळले असते. पण त्याला सरकारी नोकरीच्या अधिकाराचा पाठिंबा असल्यामुळे ते टिकले आहे. जसा असत्य तसा हा युक्तीवाद दिशाभूल करणारा आहे. कारण ब्राह्मणांनी सरकारी नोकऱ्यांचा काही अभिलाष सोडला नाही. उलट त्यांची चिकाटी आहे ती आहेच. तेव्हा त्यांच्या असत्य व अप्रामाणिक युक्तीवादाला आपण फसून जाता कामा नये.

सद्गृहस्थ हो ! या प्रसंगी मला एका खेदकारक गोष्टीची आठवण करून देणे भाग पडत आहे. मी मागे सांगितले आहेच की हा प्रदेश सुभेदार, जमादार यांनी गजबजलेला होता. या लोकांनी अनेक उपयुक्त गोष्टी केल्या. पण एक गोष्ट केली नाही व ती जर केली असती तर ती आपल्या सर्वाच्या कामी आली असती. ती गोष्ट ही की, त्यांनी आपापल्या मुलास शिक्षण दिले नाही. सदगृहस्थ हो! हे लोक काही गरीब नव्हते. त्यांच्या कालाच्या मानाने त्यांना फारच मोठे पेन्शन मिळत असे. त्यांनी मनात जर आणले असते तर आपापल्या मुलांना बी.ए. एम.ए. पर्यंतचे शिक्षण त्यांना देता आले असते. त्याचा परिणाम काय झाला असता याची कल्पना सहज करता येण्यासारखी आहे. ही शिकलेली मुले आज मामलेदार, कलेक्टर मॅजिस्ट्रेट वगैरे हुद्यावर जर चढली असती तर आज सर्व अस्पृश्य समाजावर त्यांचा वज्रपंजर असता. त्यांच्या छत्रछायेखाली आपली वाढ झाली असती. परंतु तसे न झाल्याकारणाने आज आपण उन्हात तापत पडलो आहोत. अगदी करपून जात आहोत. माझी अशी दृढ भावना झाली आहे की, आपण अशा प्रकारची आपल्यावर सावली करून घेतल्याखेरीज आपली मुळीच वाढ होणार नाही. ही सावली पांढरपेशा पत्करून सरकारी नोकरीत आपला शिरकाव करून घेतल्याखेरीज होणार नाही. म्हणून आपणा सर्वांस मी अशी सूचना करत आहे की, आपण आधी उच्चप्रतीच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे, एक मुलगा बी. ए. झाल्याने आपल्या अस्पृश्य समाजास तो जसा आधार होईल तसा एक हजार मुले चौथी शिकून पास झाली तरी होणार नाही. प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करावे असे मी म्हणत नाही. मी जे म्हणतो ते हे की हल्लीची आपली परिस्थिती अशी चमत्कारीक आहे की वरच्या प्रतीचे शिक्षण घेत असलेल्या मुलाला जितक्या लवकर शिखरास नेवून पोहचवू तितके बरे. याकरिता या प्रांतात आपल्या लोकांकरिता एखादे बोडींग असणे अत्यंत आवश्यक आहे. ठाणे आणि कुलाबा जिल्हा यातील विद्यार्थ्यास सोईस्कर व्हावे म्हणून मी पनवेल मुक्कामी बोर्डींग काढण्याचे योजिले आहे. त्यास तुम्ही सर्वजण द्रव्यद्वारा शक्यनुसार मदत कराल अशी आशा आहे.

दुसरा धंदा मी जो आपणास सुचविला आहे तो शेती आहे. हा धंदा सुचविण्यात माझा हेतू असा आहे की, आपल्या अस्पृश्य वर्गानी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्ररितीने जीवित घालविण्याची व्यवस्था करावी. आज अस्पृश्य वर्गात समाविष्ट होणाऱ्या जातींपैकी महार जात म्हणजे एक भिकार लोकांचा तांडा आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्याच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालविण्याची या जातीला सवय पडून गेली आहे. ह्या प्रघातामुळे या जातीला मुळी गावात इज्जत नाही. मान, मरातब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान नष्ट झाला आहे. काहीही म्हणा जोड्यात वागवा पण मला तुकडा वाढा. अशी या जातीची वृत्ती बनून गेली आहे. या रिवाजामुळे या जातीला स्वतंत्रतेने आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही. कारण आज जर देवळात शिरू म्हटले, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरू म्हटले, मेलेले जनावर ओढणार नाही म्हटले तर उद्या गावातील लोकांच्या भाकऱ्या बंद झाल्या की यांच्या नाड्या मेल्याच. अशा रितीने शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यांसाठी आपली माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शरमेची आहे. हा तुकडा मागावयाचा सोडून गावातील इतर लोकांप्रमाणे जर शेती केली तर होणार नाही काय ? शेती विकत घेणे हे अस्पृश्य लोकांना कदाचित कठीण जाईल. पण जंगल खात्याच्या कितीतरी पडीत जमीनी आहेत त्या जर एखाद्या अस्पृश्य वर्गाच्या माणसाने मागणी केली तर त्याला मिळण्यासारख्या आहेत.

पण या गोष्टी घडून कशा याव्यात ? मला असे वाटते की जोपर्यंत आम्हाला “शिळे तुकडे खावयाला मिळत आहेत तोपर्यंत आहे ही स्थिती बहुतेक कायमच राहील. जुना मार्ग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत नव्या मार्गाने जाण्यास कोणीच निघणार नाही. जुन्या मार्गाचा अवलंब करून आज माणुसकीला आपण दुरावलो आहोत. तो मार्ग किती दिवस तुम्ही चालू ठेवाल याचा तुम्ही विचार करा सद्गृहस्थ हो! दरेक सुधारणेच्या बाबतीत “वडिलाची रीत” हा या प्रांतातील लोकांचा महामंत्र असतो. सर्व प्रकारच्या नव्या योजनेच्या वेळी मग ती बरी असो किंवा वाईट असो त्याचा जप चालावयाचाच. याचा अर्थ वडिलानी काही बाबतीत असमंजसपणाने एखादा प्रघात सुरू केला तर त्याच्या वंशजांनी मग तो प्रघात त्यांना कितीही विघातक असो तो चालूच ठेवावयाचा. सर्वच ठिकाणी जुने ते सोने या म्हणीस जर आपण धरून बसलो तर नवीन सुधारणा कधीच होणार नाही. शिवाय दरेक आईबापाची अशी इच्छा नसावी काय की आमच्या मुलालेकरांची स्थिती आमची आहे तिच्यापेक्षा काकणभर अधिक असावी. अशी ज्यांची इच्छा नसेल त्या आईबापाच्या जोडप्यात व पशुच्या जोडप्यात काय अंतर आहे मला समजत नाही. सदगृहस्थ हो! तुम्ही आपल्यासाठी जरी नाही तरी आपल्या संततीसाठी मी जे सांगतो याकडे लक्ष द्या. आज आपणास भाकरी मिळते तेवढी बस्स आहे. ह्या मोठ्या भानगडी आम्हास नकोत, अर्धी सोडून सगळीच्या मागे कोणी जावे असा आपण पोक्तपणाने प्रश्न कराल. पण मी आपणास इशारा देतो की मी सांगतो त्या दिशेने तुम्ही प्रयत्न केला नाही तर आज जी चतकोर भाकरी मिळत आहे ती उद्या मिळणार देखील नाही.

हे विचार मी फक्त आपल्या पुढे मांडले असे नाही, जेथे जेथे मला बोलण्याचा प्रसंग आला तेथे तेथे मी हेच विचार मांडले आहेत. आपल्याला विशेषतः सांगावयाची गोष्ट ही की, आपण सर्वांनी जागृतीचे काम विशेष जोराने करावयास पाहिजे. पलटणीतल्या पिढीचा नष्टांश झाल्यापासून या प्रांतातील लोकांना मृत कळा आल्यासारखी झाली आहे. कसल्याच प्रकारची हालचाल नाही. घाटावर अनेक परिषदा होऊन गेल्या. तेव्हा आता कोठे ही सभा होत आहे. जागृतीचा विस्तव तुम्ही कधीही विझू देता कामा नये, या जागृतीच्या कामासाठी तुम्हाला काही स्थानिक पुढाऱ्यांची जरूरी आहे. मार्गदर्शकाशिवाय मार्ग चालणे अशक्य वाटते. आपल्यातील जे काही पेन्शनर लोक आहेत त्यांनी या गोष्टीत भर घालणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते या स्वजनोद्वाराच्या महत्कार्यात पुढाकार घेतील अशी आशा ठेवून मी आपले भाषण पुरे करतो.

दुसऱ्या दिवशी परिषदेच्या कामास पुन्हा सकाळी 9 वाजून गेल्यावर सुरवात झाली व खालील ठराव पास झाले.

: गट 1 ला :

ठराव 1 ला : बहिष्कृत वर्गानी चालविलेल्या आत्मोद्धाराच्या चळवळीमुळे वरिष्ठ वर्ग व बहिष्कृत वर्ग यांच्यामध्ये परस्परात तेढ उत्पन्न होऊ नये अशी वरिष्ठ वर्गातील हिंदुची इच्छा असल्यास ही परिषद त्यांना पुढील सूचना करीत आहे.

(अ) बहिष्कृत वर्गातील लोक सार्वजनिक स्थळे व पाणवठे यांचा उपयोग करून आपले नागरिकत्वाचे हक्क बजावण्याचा प्रयत्न करीत असताना वरिष्ठ वर्गातील लोक त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यवहार बंद करुन त्यांच्याविरुद्ध हरताळ जाहीर करतात. तसे न करिता अशावेळी वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृत लोकांना सक्रिय सहाय्य करावे.

(ब) वरिष्ठ वर्गातील लोकांनी बहिष्कृतास घरगुती नौकर म्हणून नोकरीस ठेवावे.

(क) जातीभेद मोडण्याचा उपाय म्हणून मिश्रविवाह पद्धतीचा प्रघात सुरु करावा.

(ड) बहिष्कृत वर्गातील गरीब विद्यार्थ्याचे आपले घरी वार लावून किंवा त्यांच्या भोजनाची तरतूद करुन त्यांना मदत करावी,

(इ) मेलेली जनावरे ओढून टाकण्याचे बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपणच व्यवस्था करावी.

: गट 2 रा :

ठराव 1 ला.: मागील कायदे कौन्सिलामध्ये श्री. सी. के. बोले यांनी सार्वजनिक विहिरी व तलावासंबंधानेही ठराव आणला आहे. त्याची सरकारने अंमलबजावणी करून त्या ठिकाणी पाट्या लावण्याची व्यवस्था करावी. आणि जरूर तर क्रि. प्रो. कोड सेक्शन 144 अंमलात आणून स्थानिक पुढाऱ्यांचे जामीन घेऊन अस्पृश्यांना सदरील हक्क उपभोगण्यास मदत करावी.

ठराव 2 रा. – ही सभा सरकारास अशी विनंती करीत आहे की, खेडेगावी कित्येक ठिकाणी अस्पृश्यांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय होते ती दूर करण्याची व्यवस्था करावी.

ठराव 3 रा.: बहिष्कृत लोकाच्या आर्थिक उन्नतीस्तव फोरेस्ट जमीनी लागवडीस द्याव्या.

ठराव 4 था.: अत्यंत मागासलेल्या बहिष्कृत वर्गाचा आर्थिक दर्जा वाढविण्याकरिता व त्यांचे दुःख निवारण करण्याकरिता सरकारने खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे. –

(अ) अस्पृश्य वर्गातील अनक्वॉलिफाईड इसमास जेथे शक्य असेल तेथे सरकारी नोकऱ्या द्याव्या.

(ब) अस्पृश्य लोकांची लष्करात भरती करावी.

(क) आरमारी खात्यात अस्पृश्य उमेदवार घ्यावेत.

(ड) सेकंड इअर ट्रेन्ड मास्तरास शाळा खात्यात सुपरवायझरच्या जागा देण्यात याव्यात.

(इ) अस्पृश्यांतील साक्षर लोकास मुलकी पोलिसदलाच्या जागा देण्यात याव्यात.

(क) अस्पृश्य लोकांची शक्य तितकी जास्त पोलीस खात्यात भरती करावी.

ठराव 5 वा. : सरकारी कामानिमित्त रयतेकडून बलुते देण्याची पद्धत बंद करून त्याच्याऐवजी गावकरी लोकांवर सी. पी. वगैरे प्रांतात ज्याप्रमाणे सेस बसविण्यात आला आहे. त्याप्रमाणे येथेही सेस बसवून त्यातून कामगारास मासिक पगार देण्याची पद्धत अंमलात आणावी.

ठराव 6 वा.: बहिष्कृत वर्गाची मृत मांस खाण्याची चाल सरकारने कायद्याने बंद करावी. कारण तीमुळे आरोग्यास धोका पोचून बहिष्कृतांचा दर्जा अत्यंत हीनपणाचा ठरतो.

ठराव 7 वा. शिक्षण व दारूबंदी या बाबतीत सक्ती करण्यात यावी.

ठराव 8 वा. – श्रीयुत एम. के. जाधव यास डेप्युटी कलेक्टरची जागा न दिल्याबद्दल या सभेस अत्यंत दिलगिरी वाटते.

ठराव 9 वा.- 111 च्या पलटणीमध्ये पूर्वी उभारलेल्या फडात महाड तालुक्यातील नोकरीत असलेल्या गृहस्थांची रक्कम आहे. त्यातून या तालुक्यातील अस्पृश्य वर्गाच्या मुलासाठी एक बोडींग काढण्यात यावे.

ठराव 10 वा. शिक्षणाच्या बाबतीत अधोगतीस गेलेल्या बहिष्कृत समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ खालील गोष्टी अंमलात आणाव्या :-

(अ) शिक्षणाची प्रगती कशी होईल याची चौकशी करण्याकरिता एक कमिटी नेमण्यात यावी.

(ब) जिल्हानिहाय बोर्डींगे उघडावी.

(क) खाजगी संस्थांनी चालविलेल्या बोडींगास मुलापाठी प्रत्येकी दरमहा रूपये 10 ग्रँट द्यावी.

(ड) 30 मुले असलेल्या गावी शाळा उघडावी.

(इ) शिष्यवृत्त्या द्याव्या.

: गट 3 रा :

ठराव 1 ला. ही परिषद बहिष्कृत वर्गातील पंचांना पाटलास ( वरठ्यास ) विनंती करते की मुलांच्या लग्नप्रसंगी ठिकठिकाणच्या पंचांनी खालील गोष्टी अमलात आणाव्या – –
(अ) 20 वर्षाच्या आतील मुलांची व 15 वर्षाच्या आतील मुलींची लग्न करण्याची चाल बंद करण्यात यावी.

(ब) ज्या ठिकाणी शाळा असेल तेथील लोकांनी मुलामुलीस शिक्षण दिलेच पाहिजे अशी पंचांनी ताकीद द्यावी. मोडल्यास दोषास पात्र व्हावे लागेल असा नियम करावा.

(क) पुनर्विवाह करण्यापूर्वी उभयता वधुवरांची योग्य चौकशी केल्याशिवाय पुनर्विवाह लावू नये.

(ङ) पुनर्विवाहामध्ये सात रुपये इलोग द्यावा. आणि लुगडेचोळी, पाटल्याचा जोड, नथ व पंचाचे जेवण याशिवाय पंचांचा कर नसावा.

ठराव 2. – (अ) अस्पृश्य लोकांनी महारकी वगैरे सारखे हलके धंदे करण्याचे सोडून शेती वगैरे सारखे स्वतंत्र धंदे करण्याची पद्धत जोराने अंमलात आणावी,

(ब) शेतीस जरूर असलेल्या सहकारी पतपेढ्या काढण्यात याव्यात.

(क) दुष्काळ, अतिवृष्टीस तोंड देण्यासाठी व त्याचप्रमाणे सावकाराचे मगर मिठीतून सुटण्यासाठी “सहकारी गल्ले” स्थापन करावेत अशी या सभेची बहिष्कृत वर्गास आग्रहाची विनंती आहे.

: गट 4 था :

ठराव 1 ला. – स्वामी श्रद्धानंदजींच्या अमानुष खुनाबद्दल या सभेस अत्यंत दुःख होत आहे, व त्यांनी आखून दिल्याप्रमाणे हिंदू जातीने अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन करावे.

नंतर अध्यक्षाने समारोप केल्यावर रा. शिवराम गोपाळ जाधव यांनी आलेल्या मंडळींचे व अध्यक्षांचे आभार मानले. त्यास दुजोरा देण्यास रा. अनंत विनायक चित्रे हे उभे राहिले. त्यांनी आभाराच्या ठरावास अनुमोदन दिल्यानंतर परिषदेस उद्देशून असे सुचविले की, आज जी एवढी मोठी महत्त्वाची परिषद भरली आहे. तिने काही तरी महत्त्वाचे कार्य केल्याखेरीज आपले अधिवेशन संपवू नये असे मला वाटते. या महाड शहरात अस्पृश्य लोकांची पाणी पिण्याची अत्यंत गैरसोय आहे. ही गैरसोय दूर व्हावी म्हणून येथील म्युनिसीपालिटीने येथील तळी सर्व जातीच्या लोकास खुली आहेत असे ठरावाने कधीच जाहीर करून टाकिले आहे. परंतु त्या तळ्यावर पाणी भरण्याचा प्रघात अस्पृश्य लोकांकडून अजूनही सुरु करण्यात आला नाही. तो प्रघात जर आज या परिषदेने पाडून दिला तर या परिषदेने एक मोठी महत्त्वाची कामगिरी बजाविली असे म्हणता येईल. तरी आपण सर्वांनी अध्यक्षांसह महाड येथील चवदार तळ्यात प्रवेश करुन पाणी घेऊ. त्यानंतर परिषदेतील सर्व लोक अध्यक्षांच्या मागोमाग सभा मंडपातून बाहेर पडून त्या सर्वांची एक मोठी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक महाड शहरातील पेठेतून अत्यंत शांतपणाने तळ्यावर गेली.”

“आंबेडकर आता चवदार तळ्याच्या काठावर उभे होते. जगातील पंडितांमधील एक विख्यात पंडितवर्य, उदात्त ध्येयाने प्रेरित झालेले एक थोर हिंदू पुढारी, दलितांचे स्वातंत्र्यसूर्य डॉ. आंबेडकर हे कृतिक्षेत्रात उतरले. स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात. ते स्वसामर्थ्याने संपादावयाचे असतात. देणगी म्हणून ते लाभत नसतात, हे त्रिकालाबाधित महानुभावाचे प्रत्यक्ष पाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांना देत होते. आत्मोद्धार हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो. तो ज्याचा त्याने करावयाचा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः कृतिवीर बनून अनुयायांना श्रीगणेशाचा पाठ देत होते. त्यांना सुसंघटित नि प्रतिकारक्षम बनवीत होते. कृतिशूरपणा हा इतिहास घडविणाऱ्या थोर पुरुषांचा देहस्वभाव असतो.

ध्येयाविषयी अढळ श्रद्धा बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितात निष्ठा निर्माण करीत होते. ज्या ध्येयाचा ते उद्घोष करीत राहिले होते, ते ध्येय आता झगड्याच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघत होते. डॉ. आंबेडकर आता स्वतः तळ्याच्या काठावर उभे राहिले. ज्या पानवठ्यावर पशु-पक्षी आपली तहान भागवीत, त्यातले पाणी पिऊन आपली तहान भागविण्यास ज्याला आपल्या पुण्यभूमीत नि मायभूमीत मज्जाव होता, ज्याला सार्वजनिक स्थळे नि देवळे ह्यांची द्वारे बंद होती, असा तो महापुरुष हिंदुधर्म मार्तंडांचा नि हिंदुधर्ममतांचा ढोंगीपणा भारताच्या वेशीवर टागीत होता. सर्वाभूती परमेश्वर आहे असा धर्मप्रणित उद्घोष उच्चरवाने करणाऱ्याा नि कुत्र्या-मांजरांना जवळ करीत असताही स्वधर्मियांना पशुहून नीच मानणाऱ्या त्या घोर पातक्यांचे अघोर पातक तो क्रांतिपुरुष जगाला उघड करुन दाखवीत होता.

आंबेडकर चवदार तळ्याच्या पायऱ्या उतरुन खाली गेले. ते खाली वाकले. त्यांनी तळ्यातील एक ओंजळभर पाणी प्राशन केले. त्या प्रचंड जनसमुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले! त्यांनी आपला नागरिक, त्याचप्रमाणे मानवी हक्क बजावला. लागलीच परिषदेच्या ठिकाणी मोर्चा शांतपणे परतला नि विसर्जन पावला. नेत्याने योग्य वेळी कृतिपूर्ण पाऊल टाकले पाहिजे. जे काम शेकडो ठरावांनी होत नाही ते अशा एका कृतीने सफल होते. कार्लाईलने म्हटलेच आहे की, कृती हे मानवाचे खरे उद्दिष्ट होय.

अशा प्रकारे प्रचंड कार्य करुन परिषद समाप्त झाली. जो तो घरी परतण्याच्या तयारीला लागला. भारताच्या तीन सहस्त्र वर्षाच्या इतिहासातील परममंगल असा तो भाग्याचा दिवस, माणुसकीचा अन् समानतेचा संदेश भारतास देणारा तो सोन्याचा दिन 20 मार्च 1927 हा होय! डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील परम भाग्याचा तो दिवस. त्या दिवसापासून डॉ. आंबेडकरांच्या कीर्तीच्या लाटा एकामागून एक सर्व देशभर पसरत गेल्या.

: महाड येथील वरिष्ठ वर्गाच्या लोकांचा अत्याचार :

परिषद संपल्यानंतर अध्यक्ष व इतर मुंबईची पाहुणे मंडळी जेथे उतरली होती तेथे म्हणजे सरकारी बंगल्यावर गेली व बाकीचे लोक आपापल्या गावी जाण्याकरिता निघण्यापूर्वी भोजनगृहाकडे गेले. सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास विरेश्वराच्या देवळातील गुरव अस्पृश्यलोक विरेश्वराच्या देवळात शिरणार आहेत. तरी तुम्ही धावून देवळाचे संरक्षण करण्यास चला, अशी खोटी दवंडी गावात देत सुटला. अस्पृश्य वर्गांनी तळे बाटविले याचा वचपा काढण्यासाठी सिद्ध असलेल्या वरिष्ठ वर्गाच्या लोकास हे आयतेच निमित्त मिळाले. दवंडी ऐकल्याबरोबर चारशे पाचशे लोक विरेश्वराच्या देवळात काठ्या सोटे घेऊन जमा झाले. देवळात अस्पृश्यलोक शिरणार आहेत असा गोंगाट करु लागले. हे पाहून शहर फौजदार डाक बंगल्यावर आले व डॉ. आंबेडकरांना विचारु लागले की, “आपले लोक देवळात शिरणार आहेत यास्तव शहरातील लोकांनी देवळाजवळ गर्दी केली आहे तर मी त्यांना काय सांगू ?” यावर डॉ. आंबेडकरांनी त्यास सांगितले की, “आम्हाला देवळात शिरण्याची इच्छा नाही व जरूरीही नाही तरी तुम्ही लोकांची या बाबतीत खातरजमा करून त्यास शांत करावे.” फौजदार निघून गेल्यानंतर आपल्या लोकांना ताकीद देण्यासाठी आपल्यातील काही लोकास भोजनगृहाकडे पाठवले. त्याप्रमाणे परिषदेस आलेले अस्पृश्यलोक आपापले जेवण आटोपून आपापल्या गावी जाण्यास सिद्ध झाले. बरेच अस्पृश्यलोक आपापल्या गावी गेल्यानंतर देवळाजवळ जमलेल्या गावगुंडांनी पेठेतून घरोघरी जात असलेल्या अस्पृश्य लोकांवर हल्ला केला व बऱ्याच लोकास जखमा झाल्या. इतका अतिप्रसंग होईतोपर्यंत महाडचे मामलेदार यांनी गर्दी कमी करण्याचा काहीच उपाय अंमलात आणिल्याचे दिसले नाही. शेवटी 4.15 च्या दरम्यान मामलेदार साहेब पोलीस सबइन्स्पेक्टर सह डाक बंगल्यावर आले. डॉ. आंबेडकरांना म्हणू लागले की आपण शांतता राखण्यास आमच्या बरोबर चला. तुमच्या लोकास तुम्ही समजवा व आमच्या लोकास मी समजावतो. खरे म्हटले असता त्यावेळी अस्पृश्य लोकास समजावण्याचे काही कारणच नव्हते. कारण जमलेल्या अस्पृश्य लोकांच्या अफाट जनसमूहानी शांतता कधीच मोडली नव्हती. शिवाय बरेचसे अस्पृश्य लोक शहराबाहेर निघूनही गेले होते. तरी पण मामलेदार साहेबांच्या सांगण्याप्रमाणे डॉ. आंबेडकर व त्यांच्याबरोबर बंगल्यावर उतरलेली इतर मंडळी शहराकडे जाण्यास निघाली. वाटेत विरेश्वराच्या देवळाजवळ वरिष्ठ वर्गाच्या जमलेल्या लोकांनी त्यास अडविले व त्यांच्यातर्फे डिंगणकर व तुळजारामशेटचा भाऊ चुनिलाल हे देवळाच्या बाबतीत खुलासा करा वगैरे प्रश्न विचारू लागले. त्यास डॉ. आंबेडकरांनी फौजदारास जे उत्तर दिले तशाच प्रकारचे उत्तर दिले. परंतु लोक शांत होतील अशी वर्तणूक ठेवण्याऐवजी लोकांची मने प्रक्षुब्ध होतील अशारीतीचा वाद करण्यास त्यांनी सुरुवात केली. म्युनिसीपालिटीचा ठराव तो काही लोकांचा ठराव नाही, तुम्ही तळ्यावर गेलात ते आम्हाला अगोदर सूचना देऊन का गेला नाहीत वगैरे वगैरे प्रश्नाचा मारा करू लागले. तोंडास तोंड देण्यात अर्थ नाही हे जाणून डॉ. आंबेडकरांनी व त्यांच्याबरोबरच्या मंडळीनी पुढे जाण्यास सुरुवात केली. वाटेत अस्पृश्य लोक देवळात शिरले रे शिरले अशी ओरड करीत काही लोक धावपळ करू लागले. मॅजिस्ट्रेटसाहेब यांनी हे प्रत्यक्ष पाहिले असताना त्यांना कैद करण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. उलट हंशावरी ती गोष्ट घालवून दिली! शेवटी ज्या अस्पृश्य लोकांची समजूत घालण्याकरिता डॉ. आंबेडकरांना नेण्यात आले होते त्यापैकी एकहीं अस्पृश्य तेथे नव्हता हे पाहून डॉ. आंबेडकर व त्यांच्याबरोबरची मंडळी बंगल्यावर परत आली. तो तेथे अदमासे 100 अस्पृश्य लोक जमून बसले होते. त्यात काही जखमी झालेले लोक होते. हा प्रकार दृष्टीस पडेतोपर्यंत दंगलीचा शेवट रक्तपातात झाला याची कोणास कल्पनाही नव्हती! ही कल्पना झाल्यानंतर अस्पृश्यातील पुढारी लोकास, एका गोष्टीचा मोठा अचंबा वाटला. तो हा की, दंग्याच्या दिवशी मॅजिस्ट्रेट शहरात हजर असताना दंग्यास वेळीच आळा का घालता आला नाही. परंतु तो विचार करण्याचा प्रसंग नव्हता. सर्व गोष्टी बाजूस ठेवून आधी जखमी झालेल्या लोकास हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था केली. तेथून त्यांना घेऊन पोलीस चौकीवर त्यांच्या फिर्यादी गुजरण्यात आल्या. पुरावा गोळा करण्याचे काम अत्यंत बिकट असे होते. वरिष्ठ वर्गाचे लोक एक कटाने वागत असल्यामुळे खरे सांगण्यास कोणी पुढे येईना. भीतीने गांगरुन गेल्यामुळे नावे सांगण्यास धजेनात. अस्पृश्य वर्गातील लोक अशा परिस्थितीत मुंबईहून गेलेल्या पुढारी लोकांनी दोन दिवस राहून शक्य तेवढा पुरावा गोळा करण्याची व्यवस्था केली. स्थानिक पोलिसांचा उत्साह आरोपी लोकास कायद्याने ठरविलेले प्रायश्चित भोगावयास लावण्याच्या कामी अगदी कमी दिसला. हे पाहून नामदार गव्हर्नर साहेब व जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडे झालेल्या हकिकतीचा संदेश तारेने पाठविण्यात आला. पोलिसांस या बाबतीत योग्य ताकीद देण्यात यावी असे सुचविण्यात आले होते. या मारामारीच्या आगीचा वणवा महाड शहराच्या बाहेरही पसरला होता असे दिसून आले. शहरातील मारामारी थंडावल्यानंतर वरिष्ठ वर्गातील काही दुष्ट लोकांनी आजुबाजूच्या काही खेड्यातील मराठे लोकास निरोप पाठविला की, तुमच्या गावावरुन महार लोक जेव्हा परततील तेव्हा त्यास ठोक द्या. त्याचप्रमाणे या दुष्ट लोकांनी लांबलांबच्या खेडेगावापर्यंत “महाडचे तळे अस्पृश्यांनी बाटविले. तुमच्या विहिरी तरी सांभाळा.” अशाप्रकारचे चिथविणारे लेखी संदेश पाठविले. याचा परिणाम असा झाला की, ही आग सर्वत्र पसरली व दरेक गावात अस्पृश्य लोक इतर समाजाच्या दृष्टीने अल्पसंख्यांक असल्याने सर्वच ठिकाणी त्यांना मार खावा लागला. काही ठिकाणी तर त्यांना जबर दुखापतीही झाल्या.

या लोकांचा बचाव व्हावा म्हणून ज्या गावामधून अशा प्रकारचे अत्याचार झाले व ज्या ज्या लोकांनी केले अशांची एक यादी तयार करून कुलाबा जिल्ह्याचे पोलीस सुपरिन्टेन्डेंट याच्याकडे पाठविण्यात आली. इतके झाल्यानंतर मंगळवारी सकाळी मुंबईतील लोक अधिक रजा नसल्याकारणाने परत आले. डॉ. आंबेडकर व चित्रे हे मागे राहिले. त्यांनी डिस्ट्रिक्ट सुपरिन्टेन्डेंटची पुन्हा गाठ घेऊन झालेली सर्व हकिकत कळविली. पोलीसांनी अस्पृश्य लोकांचा तरणोपाय होण्यास काय काय केले पाहिजे हे समजावून सांगितले. मंगळवारी संध्याकाळी महाड शहरातील ब्राह्मणेतर पुढारी यांची एक खाजगी बैठक बोलाविण्यात आली. झालेल्या महाड येथील दंग्यात ब्राह्मणेतरांनी विशेष पुढाकार घेतल्याचे दिसून आल्यावरून, त्यांच्या पुढाऱ्यांकरवी अशा दुष्ट कृत्यास आळा घालण्याची काही तरी उपाययोजना व्हावी या हेतूने ही खाजगी बैठक बोलावण्यात आली होती. परंतु खेदाची गोष्ट आहे की, एक दोन माणसे खेरीज करून अशा प्रकारच्या वर्तनास आळे घालण्याचे कामी सर्वांनीच अंग झटकले. एवढा खटाटोप करून चित्रे व आंबेडकर बुधवारी मुंबईस परत आले. ही परिषद कोणत्याही दृष्टीने पाहता महत्त्वाची झाली यात संशय नाही, तिचे परिणाम बरे की वाईट हे कालांतरानेच ठरेल. परंतु ती परिणामकारक झाली असे म्हणावयास हरकत नाही.

परिषद यशस्वी करण्याचे कामी तसेच मारामारी होऊन जखमी झालेल्या लोकांस मदत करण्याचे कामी महाड येथील चांद्रसेनीय कायस्थ जातीतील तरुण पिढीने जी अंगमेहनत केली त्याबद्दल कुलाबा जिल्ह्यातील अस्पृश्य वर्ग त्यांचा सदैव ऋणी राहील.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password