“भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे”
आग्रा येथे रविवार दिनांक 18 मार्च 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे भाषण आयोजित केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी उत्तर प्रदेश शे का फेडरेशनचे अध्यक्ष श्री. तिलकचन्द कुरील हे होते. व्यासपीठावर पंडित श्रीकृष्णदत्त पालीवाल आणि उत्तर प्रदेशातील अनेक नामांकित सार्वजनिक कार्यकर्ते व पुढारी उपस्थित होते. सभेला दोन लाखाचा जनसमूह उपस्थित होता.
ज्या ठिकाणी त्यांचे भाषण झाले त्या रामलीला मैदानावर डॉ. बाबासाहेबांचे साडेसहा वाजता आगमन झाले.
रामलीला मैदानावर त्यांनी प्रवेश करताच आंबेडकर की जय हो’ अशा गगनभेदी घोषणानी वातावरण दुमदुमून गेले. त्यांच्या भाषणासाठी आग्रा शहरातीलच नव्हे तर आसपासच्या अनेक शहरे व खेडी यातून हजारोंच्या संख्येने अस्पृश्य समाज आला होता. मोटारीतून उतरल्यानंतर त्यांना दुसऱ्याचा आधार घेऊन काठी टेकवित व्यासपीठाकडे जावे लागले. परंतु भाषण देताना फक्त एका स्टूलच्या आधाराने ते ताठ उभे होते. याप्रसंगी त्यांना एक पाच हजार रुपयाची व दुसरी एक हजार रुपयांची थैली देण्यात आली. ते आपल्या भाषणात म्हणाले,
25 वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनात तीन उद्देश होते. प्रथम उद्देश होता अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह नेणे. हा माझा उद्देश बऱ्याच अशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य प्रगती करू शकतील, हा मला आत्मविश्वास आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधीत्व, मिळवून देणे हा माझ्या कार्यातील दुसरा उद्देश होता. माझ्या प्रयत्नांना आलेले यश आज तुम्हा सर्वांना दिसतच आहे. मला या दोन्ही उद्देशात सफलता प्राप्त झाली आहे. परंतु खेड्यापाड्यातून राहाणान्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा तिसरा उद्देश म्हणावा तेवढा सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे.
जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात राहायला येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवन स्थितीत सुधारणा होणार नाही. आमच्या खेड्यातून राहाणा-या या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी राहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी त्यांना कुत्र्यासारखे वागवले जाते. ज्या ठिकाणी त्यांचा पदोपदी मानभंग होतो. जेथे त्यांना अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे. खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडीत जमीन असेल ती ताब्यात घेऊन त्यावर मालकी दाखवावी. जर कोणी जमीन ताब्यात घेताना अडवले तर त्यांना सांगावे की, आम्ही जमीन सोडणार नाही. परंतु योग्य तो शेतसारा सरकारला द्यावयाला तयार आहोत. नवीन गावे बसवून स्वाभिमानपूर्ण माणुसकीचे जीवन जगावे. तेथे नवा समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून अपमानास्पद वागणूक देणार नाही. माझी प्रकृती ठीक होताच मी स्वतः अस्पृश्यांनी पडीत जमिनी ताब्यात घेण्याची चळवळ चालविणार आहे.
आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवाची सेवा करणे, हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. बड्या हुद्द्याच्या जागी गेल्यावर या सुशिक्षिताना आपल्याच अशिक्षित बांधवांचा विसर पडतो. याचे कारण त्यांच्यात स्वतःच्या समाजाविषयी आपुलकीची भावना नाही. त्यांच्या ठिकाणी आपल्या बांधवाबद्दल कळकळ व तळमळ नाही, हे होय. धर्मभावनेचा अभाव हेही एक कारण आहे. जर त्यानी आपल्या या असंख्य बांधवाकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा -हास होईल.
दुसऱ्या कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे. माझी इच्छा आहे की, तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर बौद्ध धर्माचा या वर्षी स्वीकार करावा. मी या बाबतीत तुमच्यावर सक्ती करणार नाही. हा तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. परंतु माझ्या बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहाणार नाही. आपण सर्व बौद्ध झाल्यानंतर राखीव जागेचे अधिकार राहाणार नाहीत. त्याचबरोबर आपण हेही ध्यानात ठेवले पाहिजे की, विधीमंडळे लोकसभा यातील राखीव जागांची मुदत घटनेप्रमाणे फक्त दहाच वर्षाची आहे. ती मुदत लौकरच संपेल. आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहाणार आहेत. शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहावे लागेल. शेवटी आपल्याला आपल्याच पायावर उभे राहिले पाहिजे. राखीव जागांच्या पांगुळगाडयाच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही.
बौद्ध झाल्याबरोबर मला तुमचे नेतृत्व करता येणार नाही. मला फेडरेशनमध्येही राहाता येणार नाही. यासाठी माझी अशी हार्दिक इच्छा आहे की, दलित वर्गीयांपैकी कोणी अशा व्यक्तिने पुढाकार घ्यावा की, जी व्यक्ती माझ्या ऐवजी आपले नेतृत्व करू शकेल. नाहीतर एक खांबाच्या आधारावर असलेल्या तंबूसारखी ही संघटना कोसळून पडेल.
बौद्ध झाल्यावर राजकारण मात्र सोडणार नाही. फक्त शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या तिकिटावर उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार नाही. मी आपल्या स्वतःच्या हिंमतीवर निवडणूक लढवीन. मग माझा विजय होवो अथवा पराभव होवो. त्याची मला किंचितही पर्वा नाही.
अर्थ मंत्र्यांना तर तेल मीठ विकण्याची अक्कल नाही. ज्यांची साधे बेलदाराचे मातीकाम करण्याची योग्यता नाही ते आज एम. पी. व एम. एल. ए. होऊन मासिक 400 रुपये पगार व 21 रुपये भत्ता खात आहेत.