Categories

Most Viewed

09 मार्च 1924 भाषण

“सात कोटी अस्पृश्य हिमालय जमीनदोस्त करतील”

तारीख 9 मार्च 1924 ला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता समाज-सेवकांची बैठक झाली. संस्थेला ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ हे नाव द्यावे असे डॉ. आंबेडकरांनी सुचविले व ते मंजूर करण्यात आले. *Educate, Agitate and Organise’ ( शिकवा, चेतवा संघटित करा ) लोकांना सुशिक्षित करा. त्यांच्यात आपल्या हीन अवस्थेबद्दल चीड उत्पन्न करा आणि त्यांची संघटना निर्माण करा, असे सभेचे ब्रीदवाक्य त्यांनी ठरविले. त्यानंतर ही संस्था दिनांक 20 जुलै 1924 ला स्थापन झाली असे जाहीर केले. बहिष्कृत हितकारणी सभेचे सभासद वाढविण्याचे कार्य जोरात सुरू झाले. त्यासाठी शनिवार-रविवार या दोन दिवसात अनेक ठिकाणी सभा ठरविण्यात येत. सभासदांची संख्या वाढू लागली. सभेचा सर्व कारभार शिवतरकरांच्या हातात होता. ते सभेचे कार्य उत्तम करीत असत. प्रथमतः श्री. नारायणराव स. काजरोळकर, सखारामबुवा ना. काजरोळकर, बाळकृष्ण देवरुखकर, शिरसेकर, चांदोरकर, वनमाळी, बाळू बाबाजी पालवणकर, बोरघरकर इत्यादी सर्व चांभार समाजातील ठळक लोक साहेबांच्या ऑफिसात येऊन बसत. मुंबईतील अस्पृश्यातील जातिभेद नष्ट करावा. मुलामुलींसाठी दोन वसतिगृहे चालू करावीत. लग्नसमारंभ व सभा यांच्यासाठी एक टोलेजंग हॉल बांधावा. छापखाना विकत घेऊन वर्तमानपत्र चालवावे इत्यादी कार्याचे आराखडे साहेब त्यांच्यापुढे ठेवून त्यासंबंधी चर्चा करीत. हे सर्व लोक साहेबांचे कट्टर चाहते असत. त्यांचा घुस्सा होता शिवतरकरांवर, याची काही खाजगी कारणे होती. शिवाय शिवतरकर इतरांशी आढ्यतेने वागत असत. याबद्दल महार समाजातील समाजसेवकांचीही नेहमी धुसफूस चाले. याबद्दल एकदा ऑफिसात चर्चा झाली. तेव्हा साहेब शिवतरकरांच्या विरोधकांना म्हणाले.

शिवतरकर हे नेहमी माझ्या सहवासात राहतात; पडेल ते संस्थेचे काम करतात. तुम्ही त्यांना विरोध का करता? मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणाने काम करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे. मी मिळविलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटूंब व जात याच्यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. ते सर्व मी सोडवू शकणार नाही, याची मला जाणीव आहे. परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन. एवढा मला आत्मविश्वास आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील. हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. आपापसात जर अशी तेढ पिकवीत राहिलात तर मग मलाच काय, पण प्रत्यक्ष परमेश्वरालाही याबाबतीत काहीही करता येणार नाही.

साहेबांच्या या भाषणाचा परिणाम लोकांवर झाला. ते लोक तेव्हापासून शिवतरकरांशी सहकार्याने वागू लागले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password