Categories

Most Viewed

01 मार्च 1931 भाषण

“स्वराज्यात अस्पृश्य जनतेला समान हक्काने राहता आले पाहिजे”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीर स्वागत व सन्मान करण्याचे मुंबई इलाख्यातील अस्पृश्य समाजातील लोकांनी ठरविले. तो स्वागताचा समारंभ रविवार, तारीख 1 मार्च 1931 रोजी मुक्रर करण्यात आला. या जाहीर स्वागताच्या सभेला प्रवेश फी दाखल दोन आण्याचे तिकीट ठेवून या तिकीट विक्रीचे सर्व उत्पन्न नाशिक मंदीर प्रवेश सत्याग्रह फंडाला देण्याचे ठरविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हितसंबंधाची केलेली अपूर्व कामगिरी ऐकण्यासाठी या जाहीर सभेला जवळ जवळ दहा हजार अस्पृश्य जनसमूह हजर होता. परळ दामोदर हॉलमागील भव्य पटांगण माणसांनी फुलून गेले होते. या जाहीर सभेचे अध्यक्षस्थान डॉ. पी. जी. सोळंकी यांनी स्वीकारले होते. सभेकरिता मुंबई इलाख्यातील निरनिराळ्या शहरातून तालुक्यातून अस्पृश्यांचे प्रतिनिधी हजर होते. सायंकाळी सात वाजता सभेला सुरवात समाज समता संघाचे उपाध्यक्ष श्री. देवराव नाईक यांनी आपल्या स्वागतपर भाषणाने केली. त्यांनी डॉक्टर साहेबांच्या विलायतेमधील कामगिरीविषयी उल्लेख करून सांगितले की, डॉक्टरसाहेब हे आपल्या कामगिरीने नुसते अस्पृश्य जनतेचेच पुढारी ठरत नसून त्यांना सामान्य जनतेचा व मुसलमान समाजाचाही भरपूर पाठिंबा आहे. भावी काळात ते बहुजन समाजाचे जिव्हाळ्याचे पुरस्कर्ते पुढारी ठरल्याशिवाय राहणार नाहीत. सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या त्यांच्याकडून उत्क्रांतीकारक सेवा घडल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. तुम्हा सर्वातर्फे जनतेच्या या खऱ्या पुढाऱ्यांचे स्वागत करण्यात मला मोठी धन्यता वाटत आहे.

सभेचे अध्यक्ष डॉ. सोळंकी यांनी थोडक्यात स्वागताचे भाषण करून डॉ. आंबेडकर यांच्या भाषणास उत्सुक झालेल्या जनतेच्या आतुरतेकडे लक्ष देऊन डॉक्टर साहेबांना आपले भाषण करण्यास विनंती केल्यानंतर डॉ. आंबेडकर भाषणास उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

आज जवळ जवळ पाच महिन्यांच्या अवधीनंतर आपणा सर्वांची भेट होण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मला अत्यानंद होत आहे. आपण सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवून सहकार्य करता याबद्दल मला धन्यता वाटते पण तितकीच जोखीम व जबाबदारी वाटते. माणसाच्या मागे असलेल्या प्रपंचातून मार्ग काढणे निराळे आणि माझ्यावर तुम्हा सर्वाच्या हितसंबंधाच्या प्रश्नांच्या परिस्थितीतून मार्ग काढणे अगदी कठीण असे काम आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लागणारा मार्ग मलाच शोधून काढणे भाग आहे. येथून परिषदेला गेलेल्या मुसलमान, शिख, मवाळ वगैरे प्रतिनिधींना त्यांच्या पक्षातील लोकांनी अमुक तऱ्हेची कामगिरी बजावण्यासाठी निरोपादाखल सागितले होते. परंतु तुम्ही मला निरोप देताना परिषदेपुढे कोणती कामगिरी बजावावयाची याची सर्वस्वी जोखमीची जबाबदारी मजवरच लादून टाकिली, आपल्या उन्नतीचा मार्ग शोधून काढण्याचे माझ्यावरच सोपविलेत, हा परिषदेला गेलेल्या इतर प्रतिनिधी व माझ्यामध्ये मोठा फरक होता. मी परिषदेच्या वाटाघाटीत शोधून काढणारा मार्ग तुम्हाला व मला सारखाच आवडेल याबद्दल मला शंका वाटत होती; परंतु महत्प्रयासाने व प्रयत्नाने शोधून काढलेला मार्ग व तिची योजना आपणास अमान्य नसल्यामुळे त्यांचे थोडक्यात विवरण करतो. मी. रा. ब. श्रीनिवासन यांच्या सहकार्याने जी योजना परिषदेपुढे सादर केली त्यात एकंदर आठ अटींचे मागणे मागितले आहे. ते असे, समान हक्काचे नागरिकत्व हिंदुस्थानला स्वराज्य मिळावे की नाही ? स्वराज्य मिळाल्यास कशा प्रकारचे असावे ? स्वराज्य कोणत्याही प्रकारचे असो. त्या स्वराज्यात अस्पृश्य जनतेला समान हक्काने राहता आले पाहिजे. आम्हाला जर त्या स्वराज्यात थारा नसेल तर ते स्वराज्य शंभर नंबरी असले तरी आम्हाला नको. तसेच हिंदुस्थानात स्वराज्य स्थापन होणार असेल व त्यात जी एखादी निश्चित गोष्ट होणार असेल ती राजकीय सत्ता वरिष्ठ समाजात जाणार आहे आणि ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे. म्हणून स्पृश्य लोकांच्या हाती राजकीय सत्ता जाण्यापूर्वी आपली अस्पृश्यता कायद्याने दूर केली तरच आम्ही ते तत्त्व मान्य करू.

कायद्याने अस्पृश्यता नष्ट करणारे कलम आणले गेले तरी सर्व दर्जाचे लोक समान हक्काने राहतील असे ठरविणेच भाग होते. अस्पृश्यांना कोणी पायाखाली तुडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला राजकीय गुन्हेगार ठरवावा. या बाबतीत मात्र फक्त मुख्य प्रधान मि. रॅम्से मॅकडोनाल्ड याचे आश्वासन मिळाले आहे. पुढे होणा-या कमिटीच्या चर्चेत याबद्दल अजून निर्णय होणार आहे.

काहीही झाले आणि आपल्याला कितीही राजकीय हक्क मिळाले तरी पुढील योजनेत आपल्या बाबतीत कायद्याने अगर कार्यकारी मंडळाच्या हुकूमाने भेदभाव दाखविला जाईल, अशी अस्पृश्य वर्गाला भीती वाटते. म्हणून असल्या प्रकारचा द्वेषजनक कसलाही भेदभाव कायदे मंडळांना व कार्यकारी मंडळांना करता येणे अशक्य करून सोडल्याशिवाय बहुसख्यांक लोकांच्या अमलाखाली राहाण्याचे कबूल करणे अस्पृश्य समाजाला शक्य नाही. पुढील कायदेमंडळात आपण अल्पसंख्याकच राहणार आहोत. शंभरामध्ये 10-15 प्रतिनिधी हे अगदी थोडे प्रमाणात आहे. यासाठी कायदे मंडळांना जाती जातीमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतारणा करून कायदे करण्याची संधी नसावी. फक्त माणुसकीचे हक्क प्राप्त होतील असेच धोरण स्वीकारले जावे. ही मागणी परिषदेने कबूल केली आहे.

मतदानासंबंधी आजची परिस्थिती समाधानकारक नाही. याबाबतीत फक्त श्रीमंतांना व मध्यम वर्गांना आपला मतदानाचा हक्क प्रस्थापित करता येतो. गरीब, श्रमजिवी लोकांना आपला लायक प्रतिनिधी निवडून देता येत नाही. देशात गरिबांची संख्या शेकडा 90 आहे. त्यांना आपल्या हितसंबंधाच्या प्रश्नांबाबत सरकारच्या तोंडाकडे पाहावे लागते व त्यामुळे परावलंबी राहावे लागते. म्हणून भावी स्वराज्यात ही अपमानास्पद परिस्थिती नष्ट व्हावी म्हणून सार्वत्रिक मतदान पद्धतीच्या योजनेची मी मागणी केली. या प्रश्नावर बरीच हमरी तुमरी झाली. आम्ही चौघा प्रतिनिधींनीच ह्या प्रश्नावर जोर दिला पण त्यात विशेष उपयोग झाला नाही. अस्पृश्यांना स्वतंत्र की संयुक्त मतदान पद्धती पाहिजे, हा प्रश्न विचारता मी एकतर सार्वत्रिक मतदान पद्धतीने व पहिली दहा वर्षे स्वतंत्र मतदान पद्धतीने व नंतर संयुक्त मतदान पद्धतीने आणि राखीव जागांच्या व्यवस्थेनुसार व्यवस्था असावी असे सुचविले. याबाबतीत काही दिवस स्वतंत्र मतदान पद्धत मान्य केली आहे.

सरकारी नोकरीत प्रवेशाच्या बाबतीत कोणाची निवड करावयाची हे सरकारी अधिकाऱ्याने ठरवावयाचे नसून ते कमिशनच्या निवडणुकीवर अवलंबून राहील. पण त्यापेक्षा फायद्याची गोष्ट म्हटली म्हणजे सरकारी नोकरीत अमुक प्रमाणात अल्पसंख्यांक व अस्पृश्य समाजासाठी जागा राखून ठेविण्यात येतील. याबाबतीतले सर्व जबाबदारीचे हक्क फक्त गव्हर्नरच्याच हाती राहतील.

अल्पसंख्यांकांची जर बहुसंख्यांकांनी कायदे कौन्सिलात हेळसांड केली, बजेटात आमच्या मागण्यांचा काहीच विचार केला नाही तर आम्ही काय करावे ? याबाबतीत अपील करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आपल्या न्याय्य मागण्यांचा अनादर झाल्यास गव्हर्नरकडे अपील करणे आणि गव्हर्नरनेही ऐकले नाही तर व्हाईसरॉयकडे अपील करण्याचा हक्क दिलेला आहे. याशिवाय अस्पृश्यतेचा प्रश्न अखिल भारतीय स्वरूपाचा आहे. त्यांच्याकरिता एकसूत्रीपणा पाहिजे होता. यासाठी मध्यवर्ती कायदेमंडळात अस्पृश्यातर्फे एक दिवाण नेमून सर्व प्रकारची गा-हाणी त्यांच्याकडून ऐकली जावीत. परंतु याबाबतीत समाधानकारक निकाल लागलेला नाही. पोलीस व लष्करी खात्यात आपल्या लोकांना सर्व दर्जाच्या नोकऱ्या मिळण्याची मोकळीक ठेविलेली आहे. यापुढे या दोन्ही खात्यात नोकरीसाठी प्रवेश मिळविताना जात, धर्म वगैरे बाबतीत आडकाठी घेण्यात येणार नाही. याबाबतीत सर्व प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला आहे.

शेवटी वरील सर्व गोष्टींचा विचार करता हिंदुस्थानला मिळणाऱ्या भावी स्वराज्यात अल्पसंख्याकांच्या अटी निश्चित झाल्याशिवाय कसल्याही प्रकारची नवी राज्यघटना फोल ठरणार आहे. यासाठी आपणास बहुजन समाजाचे समतेचे असे स्वराज्य प्राप्त व्हावे अशी इच्छा असेल तर वयात आलेल्या दरएक माणसाला मतदानाचा हक्क मिळण्याची खटपट करणे, हे होय! हा सार्वत्रिक मतदानाचा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. यासाठी माझी अशी प्रामाणिक समजूत आहे की, गरिबांचे जीवित सुरक्षित नाही ते स्वराज्य धोक्याचे होय.

यानंतर चालू महिन्यात नाशिक काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला तनमनधने सहाय्य करण्याची कळकळीची विनंती करतो. आपल्या पाठीमागे येथील एकंदर परिस्थिती चिंताजनक असताही माझ्या सहकारी मित्रमंडळीनी, अखिल भारतीय बहिष्कृत समाज सेवा संघ व डॉ. आंबेडकर सेवा दलाने जी जबाबदारीची कामगिरी बजाविली त्याबद्दल आभार प्रदर्शित केल्याशिवाय राहवत नाही.

डॉक्टर आंबेडकर यांच्या भाषणानंतर अध्यक्ष डॉ. सोळंकी यांचे भाषण झाले. त्यांनी डॉक्टर साहेबांनी विलायतेमध्ये भरलेल्या परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या वतीने किती जबाबदारीची कामगिरी केली याचे विवेचन केले. राऊंड टेबल परिषदेला गेलेल्या इतर प्रतिनिधींच्या गाठीभेटी घेतल्या. त्यात त्यांनी डॉक्टरांच्या कामगिरीबद्दल व्यक्त केलेले धन्यतेचे व समाधानाचे उद्गार जाहीर केले. मध्यंतरी गुरुवर्य श्री कृष्णराव केळुस्कर यांचे छोटेसे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात आपले उज्वल स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकर हे आपले तेज युरोपात प्रकाशित करून तेथील मुत्सद्यांना चकित करूनच आले. त्यांनी केलेली कामगिरी फक्त अस्पृश्यवर्गातर्फेची नसून अखिल हिंदुस्थानतर्फेची आहे. ईश्वर त्यांना दीर्घायुषी करो.

शेवटी श्री शिवतरकर यांनी अध्यक्ष, सभेस हजर असलेले पाहुणे, अस्पृश्य बंधुभगिनी व निरनिराळ्या सेवादलाचे जाहीररित्या आभार मानले. नाशिक मंदिर प्रवेश फंडाला मुसलमान बंधुतर्फे मि. मनियार यांनी एकशेएक रुपयांची देणगी दिल्याचे जाहीर केले. नंतर डॉ. आंबेडकर सेवादलाचे सर्वाधिकारी श्री शंकर वडवळकर यांचे स्फूर्तिदायक असे भाषण झाल्यावर डॉ. आंबेडकर यांना निरनिराळ्या संस्थाकडून हारतुरे अर्पण केल्यानंतर जाहीर सन्मानाचा हा समारंभ समाप्त करण्यात आला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password