“जिल्हावारी चळवळींमुळे संघटनशक्ती कमकुवत बनेल”.
चेंबूर, मुंबई येथील अस्पृश्य समाज संघटन या संस्थेच्या विद्यमाने तारीख 26 फेब्रुवारी 1939 रोजी चेंबूर येथे सायंकाळी स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरी भाई डी. व्ही. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरविण्यात आली होती. यावेळी स्वतंत्र मजूर पक्षाचे मुंबई प्रांतिक असेंब्लीचे आमदार, मुंबई म्युनिसीपालिटीमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी याशिवाय विविध वृत्ताचे संपादक, रामभाऊ तटणीस हजर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उठले.
प्रथम त्यांनी चेंबूर येथील कामगारांनी मोठ्या प्रेमाने, आस्थेने, इमारत फंडाकरिता पैसे जमविल्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन केले. नंतर ते पुढे म्हणाले,
या इमारत फंडाचे महत्त्व किती आहे. हे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलेले आहे. या फंडाकरिता निदान दोन लाखांचा तरी निधी जमविणे आवश्यक आहे. आतापर्यंत यासाठी जमा झालेली रक्कम पासंगालाही पुरणार नाही. या फंडाची मला कल्पना जेव्हा सुचली तेव्हा शेवटच्या बाजीरावाच्या दानशूरपणाची मला प्रथम आठवण झाली. त्याने एका भिक्षुकाला त्याचे समाधान होईपर्यंत त्याच्या डोक्यावर रुपये ओतून केलेल्या दानधर्माची गोष्ट वाचून मीही मला कुणी या फंडाकरिता असे दान द्यावयास तयार असल्यास तितके कष्ट सोसून माझ्या डोक्यावर रुपये ओतून घेत राहीन. भिक्षुकवृत्ती स्वीकारल्याशिवाय या इमारत फंडाची पूर्तता लवकर होणार नाही. नंतर त्यांनी चेंबूर येथील अस्पृश्य कामगारांच्या 1926 ते 1939 पर्यंतच्या काळातील जीवनाचे भयानक दृश्य निवेदन केले. पूर्वीची घाणेरडी वस्ती व त्यामध्ये माणसे व कचरा यांच्यामध्ये कधीच भेदभाव दिसत नव्हता. त्यामानाने आज दहा वर्षात बरेच समाधानकारक असे स्थित्यंतर घडून आलेले आहे. आज शिक्षण, सुधारणा वगैरे बाबींमुळे आपल्या समाजात झालेली सुधारणा अभिनंदनीय आहे. मुलांना आजच्यापेक्षा अधिक शिक्षण मिळवून देण्यासाठी झटणे आवश्यक आहे. 10 वर्षापूर्वी तुमची स्थिती सुधारण्यासाठी कामगारांचा संघ नव्हता. म्युनिसीपालिटीमध्ये आपले स्वतःचे प्रतिनिधी नव्हते. परंतु गेल्याच निवडणुकीत म्युनिसीपालिटीमध्ये आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे पाच सहा प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. या निवडणुकीसाठी मी श्री. गणपतबुवा जाधव यांना उभे केले होते. दुर्दैवाने ते निवडून आले नाहीत. परंतु माझी खात्री आहे की, त्यांनी आपल्या कामगार बांधवांसाठी अपूर्व अशी कामगिरी केली असती. केवळ आपल्याच काही मंडळीच्या विश्वासघाताने त्यांना अपयश आले आहे. ही गोष्टही मी कधीच विसरणार नाही. श्री. गणपतबुवा यांना गेल्या निवडणुकीत झालेल्या खर्चाबद्दल येथील कामगारांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीची जाणीव ओळखून त्यांना शंभर रुपये मदत म्हणून देण्याचे कबूल केले आहे. याबद्दल मी या सर्व मंडळींचे आभार मानतो.
आपली चळवळ संघटित करण्यासाठी जिल्हावार चळवळ सुरू आहे ती बंद केली पाहिजे. अशा जिल्हावार भावनेने कार्य केल्यामुळे संघटनशक्ती कमकुवत बनते. एकमेकांच्या चढाओढीच्या कार्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यात हेवा, मत्सर वगैरे उत्पन्न होण्याची भिती अधिक असते. आपण सर्वांनी एक होवून आपला स्वतंत्र मजूर पक्षाचा लढा यशस्वी करा. जिल्ह्याजिल्ह्याच्या भावना सोडून द्या. हाच माझा तुम्हाला खरा संदेश आहे.
यानंतर श्री. डी. व्ही. प्रधान यांचे वेळेच्या अभावी थोडेसे भाषण झाल्यावर सर्व पाहुणे मंडळीना हारतुरे अर्पण करण्यात आले. या सभेची सर्व उत्तम व्यवस्था जी. ओ. सी. श्री. धयाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली समता सैनिक दलाने ठेवली होती.