Categories

Most Viewed

23 फेब्रुवारी 1941

मी म्हणतो अस्पृश्य गव्हर्नर का नसावा ?

तारीख 23 फेब्रुवारी 1941 रोजी तडवळे (ढोकी) येथे आयोजित सोलापूर जिल्हा व मोगलाई मराठवाडा भागातील महार-मांग वतनदार परिषदेच्या कामासाठी अखिल भारतीय अस्पृश्यांचे वंदनीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तारीख 22 फेब्रुवारी 1941 रोजी सकाळी 10 वाजता तडवळे स्टेशनवर उतरले. बार्शीपासून पुढील प्रत्येक स्टेशनवर त्यांचा अस्पृश्य समाजाकडून सत्कार झाल्यामुळे गाडी आज अर्धा तास तडवळ्याला उशीरा आली. तेथून लतापल्लवांनी शृंगारलेल्या पन्नास बैलांच्या गाडीतून लतापल्लवानी शृंगारलेल्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक निघाली! शिंगे, हालग्या, नगारे, तुतारे, सनया, बँड, वाजंत्री, तडवळे, येडशी, उस्मानाबाद वगैरे ठिकाणच्या आत्मयज्ञ दलाचे शेकडो सैनिक आणि हजारो अस्पृश्यांच्या मुखातून निघणाऱ्या आंबेडकर कौन है, दलितोंका राजा है वगैरे जयजयकाराने तडवळ्याचे वातावरण दणाणून गेले. अशा आनंदाने मिरवणूक परिषदेच्या मंडपात येताच शेकडो स्त्रियांनी बाबासाहेबांच्यापुढे पाण्याच्या घागरी ओतून त्यांच्यावरून नारळ ओवाळून टाकून, ‘इडापिडा टळो बाबासाहेब सुखी राहोत’, म्हणून पंचारतीने ओवाळले. कित्येक बायांनी आमची ही अल्पशी देणगी इमारत फंडाला घ्या म्हणून काही पैसेही दिले! शेकडो हार बाबासाहेबांना अर्पण झाल्यानंतर ते विश्रांतीसाठी निवासस्थानी गेले व सायंकाळी विषयनियामक कमेटी आणि इतर चर्चा झाली.

दुसऱ्या दिवशी तारीख 23 फेब्रुवारी 1941 रोजी सकाळी 9.45 वाजता दहा हजार श्रोतृसमुदायाने भरलेल्या मंडपात ईशस्तवनाने परिषदेच्या कार्याला सुरूवात झाली. नंतर ए. एच. भालेराव यांनी अध्यक्षाची सूचना मांडली. तिला हरिभाऊ तोरणे यांनी अनुमोदन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. देवीचंद मारूती कदम यांचे भाषण झाले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले.

ते आपल्या भाषणात म्हणाले,
बंधु भगिनींनो,
आपणापैकी कोणी निजामाच्या संस्थानातून आला आहात तर कोणी खालसा भागातून आला आहात. म्हणून मला आज माझ्या भाषणाचे दोन भाग करावे लागतील, एक खालसातील बांधवांसाठी व दुसरा निजाम प्रांतीय बांधवांसाठी. सोलापूर जिल्ह्यातील बांधवांना आमदार ऐदाळे यांनी बरीच सरकारी पंडित जमीन मिळवून दिली आहे. त्यांची दैन्यावस्था शक्य तितकी कमी करण्यासाठी आणि काही गावच्या अस्पृश्यावर झालेले अन्याय निवारण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत व त्यात त्यांना यशही आलेले आहे. पुढेही काही सुधारणा होणार तोच राज्यकारभाराचा गाडा मधेच रस्त्यावर टाकून काँग्रेसचे बुजके बैल रानोरान पळाले. हे बैल गांधींना बुजतात. गांधीनी कसलीतरी हूल उठवावी आणि त्यांच्या भाटानी डोळे झाकून टिमकी वाजवावी अशी आज काँग्रेसची स्थिती आहे.

हिंदी लोकांचा कैवार घेऊन त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस 1885 साली जन्माला आली. सुरवातीच्या पाच पंचवीस वर्षात ती कोणाच्या फारशी ओळखीची नव्हती. मुंबई पुण्याच्या कोणीतरी पुढा-यांनी व्यापा-यांनी उठावे कुठेतरी जमावे आणि काही ठराव करावे अशी तिची कामगिरी होती. पण गेल्या वीस वर्षापासून तिच्या नावाचा डांगोरा जोराने पिटण्यात येऊ लागला आहे. जरी इंग्रज लोक मि. चैबरलेन यांना प्रधानपद देतात, साम्राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती देतात पण त्याच्या सार्वजनिक वागणुकीमुळे आपणाला गुलामगिरीच्या खोड्यात पडावे लागेल अशी शंका येताच त्यांना प्रधान पदावरून खाली ओढतात! अशी स्थिती काँग्रेसची नाही. तिला व्यवहार ज्ञान नाही. 1940 साल म्हणजे 1911 साल असा तिला भ्रम झाला आहे. पण तिच्यात आता दम राहिला नाही. काँग्रेसच्या गंगेतून फुटून हिंदूसभेची यमुना निराळ्या प्रवाहाने वाहू लागली आहे.

मुसलमान मुस्लिम लीगचे झेंड्याखाली आहेत. मुस्लिम लीगचा प्रवाह निराळ्याच मार्गाने वहात आहे. मुसलमानांचा दरारा वाढला आहे. इंग्रज सरकारला शरण आणण्याची ताकद काँग्रेसमध्ये किंवा हिंदू सभेमध्ये नाही. ती फक्त एकट्या मुस्लिम लीगमध्येच आहे. हिंदुस्थानचे व्हाईसरॉय लॉर्ड लीनलिथगो यांनी कायदे कौन्सिलाच्या पुनर्घटनेची योजना पुढे मांडली. तेथे दुराग्रहाने सगळी सत्ता काँग्रेसच्या हाती द्या आणि मग मुस्लिम लीगच्या लोकांना किंवा अस्पृश्यांना अथवा अल्पसंख्यांकांना त्यात घ्यावयाचे किंवा नाही. घेतले तर किती प्रमाणात आणि कोणत्या व्यक्तिला घ्यावयाचे ते कॉग्रेस ठरवील अशी अहंकाराची आणि उद्दामपणाची भूमिका काँग्रेसने घेतली. व्यक्तिमात्राने अहंकार केला तर त्याची चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्यांचे कर्म तो भोगील. पण जेव्हा व्यक्तिचा अहंकार त्या व्यक्तिला प्राप्त झालेल्या स्थानामुळे बाधक होतो तेव्हा सर्वानीच त्याचा विचार करावयास पाहिजे. राष्ट्राच्या हितासाठी खोट्या, दांभिक व अहंकारी वृत्तीला आळा घातला पाहिजे आणि राष्ट्रकार्याचा गाडा योग्य त्या मार्गाने नेला पाहिजे. पण गांधींच्या बुजर बैलांनी तो रस्त्यावरच टाकून हिंदी राजकारणाचा विचका केला आहे. गांधींच्या तंत्राने चाललेल्या हरिजन सेवक संघाचीही तीच रडकथा ! ते अस्पृश्यांना साक्षर करण्यासाठी कुठे एखादी रोडकी शाळा काढतील आणि वापरण्यासाठी वेगळी विहीर बांधतील. पण ती जबाबदारी सरकार यथाशक्ती पार पाडीतच आहे. हरिजन सेवक संघवाल्यांना मी सूचना करतो की बाबांनो, अस्पृश्यांना पाणी पाजावयाचे असेल तर समतेने पाजा. आम्हाला विषमता नष्ट करावयाची आहे. अशा थातुर मातुर उपायांनी ती नष्ट होणार नाही. शरीराच्या नाजूक भागावर उठलेला ढळढळीत फोड नाहीसा करण्यासाठी तेल पाणी लावून नवारीचा हात फिरविल्याने काम भागेल का ? हरिजन सेवक संघ कॉंग्रेस आणि गांधी हे मुसलमानांची मनधरणी करतील. राजेरजवाड्यांची मनधरणी करतील. पण अस्पृश्यांच्या बाबतीत ? अंहं !

गांधींना हिंदू गव्हर्नर पाहिजे. हिंदू कलेक्टर पाहिजे. मी म्हणतो अस्पृश्य गव्हर्नर का नसावा ? अस्पृश्य कलेक्टर का नसावा ? पण गांधींना नेमके तेच नको ! मध्यप्रांतात डॉ. खऱ्यांनी एका अस्पृश्याला दिवाणाची जागा देताच गांधींचे पित्त भडकले ! ते डॉ. खऱ्यांवर चवताळले. योग्यवेळी तो पत्र व्यवहार मी उघडकीस आणणार आहे! थोडक्यात सांगावयाचे म्हणजे गांधींची चळवळ, त्यांचा सार्वजनिक संसार अस्पृश्यांच्या बाबतीत असा हा पक्षपातीपणाचा आहे. संसाराला मीठ, मिरची, लाकूडसुद्धा लागते. गांधींच्या या संसाराला शेठ सावकारांकडून चंदी मिळते. काँग्रेसचा आज जो बोलबाला ऐकू येतो त्यात गांधींची कर्तबगारी नाही! ती एक कोटी रुपयांच्या फंडाची करामत आहे. बंधुनो, आपला संसार आपणच केला पाहिजे, पण त्याला सामग्री नाही. फंड नाही, पैसा नाही. म्हणून हताश होऊन बसल्याने सध्याच्या धकाधकीच्या मामल्यात आपला निभाव लागणार नाही. आपल्याला तर मानाने जगावयाचे आहे. तसे जगण्यासाठी राजकीय हक्काची सत्ता आपल्या हाती पाहिजे. महारकीचा लोभ आणखी किती दिवस कवटाळून धरावयाचा ? मीही आठ आण्याचा वतनदार आहे. वतनदारीचा लोभ मी सोडला. अजूनही माझ्या घराच्या आढ्याला बांधलेले देव स्पृश्य गावकरी लग्नकार्याच्या वेळी मोठ्या मिरवणुकीने नेतात. एकदा त्या गोष्टीला खंड पडला आणि गावात वाखा झाला. आपल्या सार्वजनिक कार्याचा तसा वाखा होऊ देऊ नका. आपल्या चळवळीचे कार्य अखंड चालावे म्हणून मुंबईत मी अडीच लाखाची इमारत बांधण्याचे ठरविले. तिच्या काही भागात जनता पत्राचे ऑफिस, प्रेस वगैरे ठेवून बाकीच्या भागातून भाडे घेता येईल वर्षाकाठी आठ नऊ हजाराचे उत्पन्न येईल. त्यातून आपला खर्च भागेल. त्यासाठी देशावरच्या अस्पृश्यः लोकांकडून, प्रत्येक घराकडून एक रुपया तरी मिळवा. हे पैसे घेण्यासाठी या जिल्ह्यात मी दोनच माणसे निवडली आहेत. एक आमदार ऐदाळे व दुसरे हरिभाऊ तोरणे. याजकडे पैसे द्यावेत. हा पैसा आपला आपणच जमविला पाहिजे, दुसऱ्याकडून पैसा घेतला तर आपण त्यांचे होऊ.

महाभारतातील कौरव पांडवाची कथा तुम्हाला माहीत असेलच पांडवाच्या बाजूला न्याय आहे. त्यांच्याच बाजूला सत्य आहे याची पूर्ण खात्री असून भीष्म, द्रोणासारखे योद्धे कौरवांच्या बाजूला राहिले कारण त्यांनी कौरवाचे अन्न खाल्ले होते. आपण आपल्या शक्तीनुसार मदत करा, मी इमारत बांधून काढीन असा मला आत्मविश्वास आहे.

आज निजाम सरकारच्या राज्यातील बांधवासबंधाने बोलावयाचे खरे पाहिले तर खालसा मुलुखात काय आणि निजाम हद्दीत काय, महारांची स्थिती जवळ जवळ सारखीच. हिंदुस्थानात जी पाच सहाशे संस्थाने आहेत त्यात निजामचे राज्य पहिल्या दर्जाचे आहे. त्यामानाने बडोदा स्टेट किती लहान ? पण त्या संस्थानाने अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. म्हैसूर संस्थानामध्ये तसेच तिकडे अस्पृश्यांना जमीनी मिळाल्या. सुरतीच्या सा-याची सूटही मिळाली. त्या संस्थानातून अस्पृश्यांच्या हितसंबंधांकडे सरकारने लक्ष दिल्याचे दिसून येते. तसे हैद्राबाद संस्थानात काय आहे ? वतनदार महारांच्या पोटापाण्याचा प्रश्न समाधानकारकपणे अजून सुटलेला नाही. अस्पृश्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय नाही. लाखो एकर सरकारी जमीन पडली असून अस्पृश्य लोक उपास काढीत आहेत. संस्थानाची आर्थिक स्थिती चांगली असताना असे का व्हावे ? मला समजत नाही.

आपली दुःखे सरकारच्या नजरेस आणण्यासाठी अस्पृश्यांनी संघटना करावी. हैद्राबादच्या नवीन होणाऱ्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य ते प्रतिनिधित्व मिळवण्याचा प्रयत्न करावा. आज जे काही पैसे निजाम प्रांतीय अस्पृश्यांनी मला देण्यासाठी आणले होते ते त्यांना त्यांच्या कार्याला पाहिजे असतील तर घेऊन जावेत. आपली गा-हाणी योग्य त्या सनदशीर मार्गाने सरकारच्या नजरेस आणण्याचा प्रयत्न करावा. त्यात जरूर त्या प्रसंगी मी साह्य करू शकेन.

डॉ. आंबेडकर यांचे भाषण झाल्यावर पुढील तीन ठराव पास झाले.

ठराव 1 ला. — निजाम सरकारच्या हद्दीतील वतनदार महार, मांग लोकांना करावी लागणारी कामे लक्षात घेता त्यांना सरकारकडून योग्य तो मोबदला मिळत नाही. तरी सरकारी फॉरेस्ट जमीनी देवून वतनदार महार, मांग लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटवावा अशी ही सभा निजाम सरकारास विनंती करते.

ठराव 2 रा. – निजाम हद्दीत राहणाऱ्या अस्पृश्य लोकांची अत्यंत हेळसांड होत आहे. तरी सरकारतर्फे त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय त्वरित करण्यात यावी अशी या सभेची विनंती आहे.

ठराव 3 रा. — नवीन होणाऱ्या राज्यघटनेत निजाम हद्दीतील अस्पृश्य जनतेला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळावे अशी या सभेची निजाम सरकारास विनंती आहे.

बार्शी म्युनिसीपालिटीचे प्रेसिडेंट व ब्राह्मणेतरांचे पुढारी श्री. भातनकर यांनी आज सकाळीच बाबासाहेबांना भेटून बार्शी म्युनिसीपालिटीचा कार्यक्रम मुक्रर केल्यामुळे दुपारी तीन वाजता ते बार्शीकडे मोटारने गेले. तेथे म्युनिसीपालिटीच्या बागेत बाबासाहेबांना अँटहोम पार्टी झाली. तेव्हा श्री. भातनकर यांनी बार्शी म्युनिसीपालिटीने अस्पृश्य नोकरांना, अस्पृश्य विद्यार्थ्यांना व त्यांच्या बोडिंगाला मदत केली व पुढे करणार आहे असे सांगितले.

उत्तरादाखल बोलताना बाबासाहेबांनी म्युनिसीपालिटीचे आभार मानले. आपल्या गंगाजळीचा अदमास पाहून म्युनिसीपालिटी असेच धोरण ठेविल अशी आशा व्यक्त केली. तसेच जरूरीच्या कामाच्या गर्दीमुळे आपणाला मानपत्र स्वीकारता आले नसले तरी अँटहोम पार्टीला हजर झालो आहे असे सांगून श्री. मातनकर आणि त्यांचे सहकारी यांचे आभार मानले.

यानंतर वतनदार महारवाड्यात श्री. सखाराम बोकेफोडे, राजाराम बोकेफोडे वगैरे मंडळींनी महारवाड्यात मंडपात स्त्रियांची ओवाळणी आणि इमारत फंडाला देगणी देण्याचा कार्यक्रम झाल्यावर बाबासाहेबानी तेथील अस्पृश्य वस्तीला भेट दिली. तेथून ते कुर्डुवाडीला निघाले. तिथे किसन सोनवणे वगैरे बी. एल. रेल्वेस्टाफच्या मंडळींनी हारतुरे व चहापार्टी करून इमारत फंडाला 101 रुपये देणगी दिली. त्याशिवाय कित्येक अस्पृश्य भगिनींनी स्टेशनामध्ये येऊन बाबासाहेबांना पंचारतीने ओवाळून इमारत फंडाला देणगी दिली.

कुर्डूवाडीच्या कार्यक्रमानंतर अत्यंत जरूरीच्या कामासाठी बाबासाहेबांना मुंबईस जाणे भाग पडल्यामुळे पंढरपूर, अकलूज, नातेपुते, माळसिरस येथील कार्यक्रम नाइलाजाने रहित झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password