उस्मानाबादच्या तडवळे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य वतनदारांची एक परिषद आयोजित केली होती. या वेळी गावकऱ्यांनी याच एका बैलगाडीतून बाबासाहेबांची भव्य मिरवणूक काढली होती. तब्बल 77 वर्षे उलटून गेली. परंतु आजही ही बैलगाडी गावकऱ्यांनी जपून ठेवली आहे. आजही 14 एप्रिलला बाबासाहेबांचे छायाचित्र ठेवून या बैलगाडीची भव्य मिरवणूक काढली जाते. अशी ही एतिहासिक ओळख सांगणारा हा ‘दिव्य मराठी’ च्या वाचकांसाठी खास रिपोर्ट.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तडवळे कसबे. बार्शी लातूर रस्त्यावरचे गाव. या गावात मी एका ऐतिहासिक गोष्टीच्या शोधात आलेलो आहे. माझ्या एका दोस्ताने संकेत पडवळ याने मला काही दिवसांपूर्वी एक गोष्ट सांगितली होती. “तडवळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवास केलेली एक बैलगाडी आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी ती जपून ठेवलीय.” ते ऐकून मला त्या गोष्टीचं खूपच कौतुक वाटलं. अधूनमधून मला ती गाडी कशी असेल ? बाबासाहेबांच्या त्या खेडेगावातील प्रवासाची हकीकत काय असेल ? ती बैलगाडी जपून ठेवणारा तो शेतकरी कोण आहे? हे समजून घ्यावं असं वाटत होते.
मी त्याच ओढीतून तडवळ्यात आलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाने प्रवास केलेली, त्यांचा स्पर्श झालेली गाडी बघायला पोहोचलो. माझ्यासोबत महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते भाई उद्धवराव पाटील यांचे नातू आदित्य पाटील. त्यांच्या आजोबांचा बाबासाहेबांशी खूपच जिव्हाळा होता. त्यांनाही या गाडीबद्दल कळल्यावर तेही माझ्यासोबत गाडी बघायला आले आहेत. गावाच्या मुख्य चौकातच आम्ही त्या बैलगाडीबद्दल चौकशी केली. तर एकाच वेळी दोघे जण बोलायला लागले. मग एक जण थांबला आणि ज्याचा आवाज मोठा होता तो तरुण उत्साहाने सांगायला लागला.
‘कारखान्याजवळ जावा. तिथं बापू माळीच्या वस्तीवर गाडी आहे.’ आमचं बोलणं सुरू असतानाच एक वयस्कर गृहस्थ आले.
‘कोणाचं घर विचारताय?’
‘घर नको त्यांना. ते बाबासाहेबांची गाडी बघायला आल्याती.’
‘ती गाडी रानात हाय. मला कळत नव्हतं तवापस्नं ती गाडी हाय. लांबनं लोक बघायला येत्याती.’
ती गाडी गावातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचं दिसून येत होतं. बापू माळीच्या वस्तीवर गेलो. बापू होतेच. वस्ती साधी. लाकडाच्या मेढी रोवून पत्र्याचे शेड उभारलेले. तिथंच एका बाजूला गाडी होती. त्यांनी त्यावर ताडपत्री झाकलेली. आम्ही गाडी बघायला आलोय म्हटल्यावर ते ताडपत्री उघडायला लागले.
“अहो, आमचं भाग्य आहे म्हणूनच ही गाडी आमच्याकडं हाय. दुरून लोक बघायला येतात. महिन्यातून चार-पाच नवीन माणसं गाडी शोधत येतात. गाडीचं दर्शन घेतात”.
त्यांनी गाडी बाहेर काढली. निळा रंग दिलेली गाडी. एवढी वर्षे झाली तरी ती जुनी वाटत नव्हती.
माळी म्हणाले, “आमच्या वडिलांनी ही गाडी गणेशलाल यांच्याकडून विकत घेतली आहे.” आमचे बोलणे सुरू असतानाच स्थानिक पत्रकार भागवत शिंदे आले. त्यांनी आमचे बोलणे ऐकून चर्चेत भाग घेतला. ते म्हणाले, “गणेशलाल डाळे नावाचे आमच्या गावातील प्रगतीशील शेतकरी होते. त्यांनी रानातून घरापर्यंत प्रवास करण्यासाठी ही गाडी बनवून घेतली होती. 1942 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजातील वतनदारांची परिषद आमच्या गावात घेतली होती. या परिषदेसाठी बाबासाहेब जेव्हा गावात आले तेव्हा कळंब रोड रेल्वे स्टेशनपासून त्यांची मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीसाठी हीच गाडी होती. याच गाडीतून बाबासाहेब कार्यक्रम स्थळी आले होते”.
माळी म्हणाले, “आम्ही या गाडीचा वापर आमच्या शेतीच्या कामासाठी करत नाही. मला माझ्या वडिलांनी मला तशी ताकीद दिली होती. आम्ही ही गाडी चौदा एप्रिलला मिरवणुकीसाठी गावात नेतो. बाबासाहेबांच्या फोटोची मिरवणूक या गाडीतून काढली जाते. अनेक वेळा इतर गावांतील लोकांनी मिरवणुकीसाठी गाडी नेलेली आहे. अगदी परळी, पुण्यापर्यंत ही गाडी मोठ्या ट्रकमध्ये घालून आपापल्या गावी नेली आहे. मराठवाड्यात तर अनेक गावांत ही गाडी नेलेली आहे. प्रत्येकाला इथं येऊन गाडी बघणं शक्य नाही म्हणून लोक गाडीच गावी घेऊन जातात. तिची पूजा करतात. मलाही सोबत नेऊन कपडे देऊन सत्कार करतात. मी गाडी जपली म्हणून अनेकांनी माझं कौतुक केलंय.”
दिनांक 22, 23 फेब्रुवारी 1942 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तडवळे (कसबा) या गावात वतनदार अस्पृश्य लोकांची परिषद घेतली होती. या परिषदेसाठी बाबासाहेब बार्शी लाइट रेल्वेने कळंब रोड स्टेशनपर्यंत आले होते. तिथून गावकऱ्यांनी त्यांना बैलगाडीतून वाजत गाजत गावात नेले होते. या बैलगाडीला 51 बैल जुंपले होते. या वेळी एक शिवाळ (बैल ज्याला जुंपतात ते) कमी पडत होते. ते माझ्या वडिलांनी बनवून दिले. अशी आठवण या गावातील आंबेडकरी जलसाकार अच्युत भालेराव यांनी सांगितली.
भालेराव म्हणाले, “आमच्या गावात सांगली-मिरज भागातील एक तोरणे मास्तर शाळेत शिकवायला होते. त्यांचा आणि बाबासाहेबांचा नेहमी पत्रव्यवहार व्हायचा. हिथं परिषद घेण्याबाबतचा पत्रव्यवहार त्यांच्यासोबत झाला होता. आमचं गाव हे हैदराबाद राजवट आणि इंग्रजी राजवट यांच्या हद्दीवरचं गाव. बाबासाहेब निझामाच्या राज्यात जाऊन परिषद घेऊ शकत नव्हते. मग तिकडच्या लोकांनाही या परिषदेत सहभागी होता यावं म्हणून हैदराबाद राज्यातील लोकांना जवळ असलेल्या तडवळ्याला परिषद झाली.”
भालेराव सांगतात, “माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, बाबासाहेब ज्या रस्त्याने आले तिथे जे लोक उभे होते, त्यांना बाबासाहेबांना पाहून एवढा आनंद झाल्याला की त्यांना बोलायलाही शब्द फुटत नव्हते. अशी त्यांची अवस्था झालेली. अत्यानंदाने लोक फक्त हात उंचावत होते. बाबासाहेबांना नमस्कार करत होते. आपल्या मुक्तिदात्या महापुरुषाला एवढ्या जवळून डोळे भरून पाहत होते. साक्षात बाबासाहेब आपल्या गावात आलेत ही गोष्टच त्यांना पटत नव्हती. अनेकांना आपण स्वप्नात तर नाही ना? असंच वाटत होतं, कारण एक अविस्मरणीय गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडत होती.”
“त्या दिवशी हजर असलेलं आज कोणी आहे का?” मी विचारलं.
“कोणीही नाही.”
भालेराव यांच्या वडिलांनी त्यांना जे ऐकवलं होतं ते अगदी हुबेहूब आम्हाला सांगत होते. त्यांच्या बोलण्यातून सगळा प्रसंग उभा करत होते. त्या दिवशीचा एक फोटो भालेराव यांच्या संग्रही मिळाला. तो फोटो पाहून आम्हाला खूपच आनंद झाला. त्या वेळच्या सरकारी शाळेच्या आवारात हा फोटो काढला असल्याचं भालेराव यांनी सांगितलं. त्यांनी या फोटोचीही एक गोष्ट आम्हाला ऐकवली.
ते म्हणाले, “या कार्यक्रमासाठी बार्शीहून पराते नावाचे फोटोग्राफर बोलावले होते. त्यांच्यामुळे हा फोटो निघू शकला. या फोटोत तोरणे गुरुजी, माझे चुलते अर्जुन भालेराव आणि गावातील मंडळी आहेत. हा फोटो म्हणजे आमच्यासाठी लाखमोलाचा ठेवा आहे. आमचे प्रेरणास्थान आहे.”
भालेराव सांगू लागले, “बाबासाहेब आमच्या गावात येऊन गेले, त्यांचं भाषण ऐकून लोकांना प्रेरणा मिळाली. आमच्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळलं. पोरांना शाळा शिकवली पाहिजे, असं आईबापाला वाटलं. त्यांनी हालअपेष्टा सहन केल्या, पण मुलांना शिक्षण दिलं. मोठ्या प्रमाणावर नोकरदार आमच्या गावात आहेत. बाबासाहेबांचा एक दौरा आमचं आयुष्य बदलून गेला.’
त्यानंतर आम्हाला भालेराव यांनी 22 फेब्रुवारीला बाबासाहेबांनी जिथं मुक्काम केला होता ती शाळा आणि रेल्वे स्टेशनजवळचा पिंपळ दाखवला.
जो या सर्व घटनांचा साक्षीदार आहे ज्या पिंपळाने तो ऐतिहासिक प्रसंग पाहिलाय. आणि अच्युत भालेरावांनी अजून एक गोष्ट त्यांच्याच शैलीत सांगितली, “या पिंपळाखाली मिरवणूक आल्यावर वाऱ्याची झुळूक आली. काही पाने बाबासाहेबांच्या अंगावर पडली होती. या योगायोगामुळे लोकांना खूप आनंद झाला.” ही आठवण त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलेली.
: पत्रव्यवहार झाला होता :
“आमच्या गावात सांगली-मिरज भागातील एक तोरणे मास्तर शाळेत शिकवायला होते. त्यांचा आणि बाबासाहेबांचा नेहमी पत्रव्यवहार व्हायचा. हिथं परिषद घेण्याबाबतचा पत्रव्यवहार त्यांच्यासोबत झाला होता. आमचं गाव हे हैदराबाद राजवट आणि इंग्रजी राजवट यांच्या हद्दीवरचं गाव. बाबासाहेब निझामाच्या राज्यात जाऊन परिषद घेऊ शकत नव्हते. मग तिकडच्या लोकांनाही या परिषदेत सहभागी होता यावं म्हणून हैदराबाद राज्यातील लोकांना जवळ असलेल्या तडवळ्याला परिषद झाली.”