दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे करावयाचे ते मनगटाच्या जोरावर करा.
शनिवार, तारीख 18 फेब्रुवारी 1933 रोजी कसारा मुक्कामी ठाणे जिल्हा परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. डॉ. आंबेडकर साहेब हे मुंबईहून मोटारीने रात्री 8 वाजता कसारा मुक्कामी आले. त्यांच्याबरोबर श्रीयुत शिवतरकर, दिवाकर पगारे व गणपतबुवा जाधव उर्फ मडकेबुवा आले होते. कसारा येथे बाबासाहेबांचे स्वागत करण्याकरिता कल्याण येथील समता सैनिक दलाचे व्हॉलंटीयर व आसपासच्या खेड्यातून आलेले प्रतिनिधी हजर होते. नासिकहून मेसर्स भाऊराव गायकवाड, के. बी. जाधव व लिंबाजीराव भालेराव व रोकडे उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांची मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सभा मंडपात आल्यावर परिषदेच्या कामास सुरवात करण्यात आली. आरंभी परिषदेचे स्वागताध्यक्ष शंकरनाथ बर्वे यांनी आलेल्या सर्व मंडळीचे स्वागत केल्यावर डॉ. आंबेडकर साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना मांडली. तीस रा. रोकडे यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे टाळ्यांच्या प्रचंड गजरात अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाले. डॉ. आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
ठाणे जिल्ह्यात यापूर्वी मला येता आले नाही. त्यामुळे माझा आपल्याशी फारसा परिचय झालेला नाही. तो महंत शंकरदास बुवा यांनी घडवून आणला याबद्दल मी त्यांचा व ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींचा हा योग जुळवून आणल्याबद्दल फार आभारी आहे. मी याप्रसंगी फार थोडेच परंतु महत्त्वाच्या प्रश्नावर सूचनात्मक बोलणार आहे. ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकाल अशी आशा आहे.
आज तुम्ही जे काही मिळविले आहे त्याचा विचार कराल तर प्रकार निराळाच दिसेल. महात्मा गांधी व सनातनी लोक यांच्याशी अस्पृश्यता नष्ट करण्याचे बाबतीत गेले आठ-दहा दिवस मी वाटाघाट करीत आहे. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारण करण्याकरिता मंदिरे खुली करण्याची व अस्पृश्यता धुवून काढण्याची चळवळ चालविली आहे. मंदीर प्रवेशाबाबत मी एक जाहीर पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात मी स्पष्ट सांगितले आहे की, आमची अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता मंदीर प्रवेशाची जरूरच आहे असे नाही. आम्हाला हिंदू धर्मात समानता पाहिजे व चातुर्वर्ण्य नष्ट झाले पाहिजे तरच हिंदू धर्म आम्हास मानीत आहे असे आम्ही समजू व तरच हिंदू धर्म आम्हास मान्य आहे. हा महात्मा गांधी व माझ्यामध्ये मतभेद आहे. सनातनी चातुर्वर्ण्य काढण्यास तयार नाहीत, देवळे उघडण्यास तयार नाहीत. त्याबरोबर दुसरी बाजू अशी आहे की, या लोकांची सावली घेण्यास ते अद्याप तयार नाहीत. त्यांच्याबरोबर समानतेने वागणे व त्यांची हुकूमत चालवून घेणे त्यांना भाग पडेल. आपल्या उर्जितावस्थेस नुकतीच कोठे सुरुवात झालेली आहे.
पूर्वी आपले लोक पोलीसमध्ये नसत पण आज अस्पृश्य माणसे पोलीसमध्ये नोकरीस आहेत. मॅट्रीक झालेली अस्पृश्याची मुले पोलीस ट्रेनिंगमध्ये शिकत आहेत. त्यांच्या हुकूमतीखाली इतर स्पृश्य लोक नोकऱ्या करू लागतील. याकरता आपल्यात अधिकारी वर्ग अधिकाधिक तयार झाला पाहिजे व सर्व समाजाचा दर्जा वाढला पाहिजे. तरच आपल्यावर कोठे अन्याय घडणार नाही. आज कोणी एकादा डेप्युटी कलेक्टर, कोणी मामलेदार, पोलीस इन्स्पेक्टर झालेले विरळ विरळ दिसत आहेत व पुढे ही संख्या जास्त वाढणार आहे. अशारीतीने आपले लोक अधिकारी झाल्यावर वरच्या वर्गाच्या लोकांचा आपल्यावरचा जुलूम कमी होईल. पण हे सर्व साधावयाचे म्हणजे तुम्ही अत्यंत जागृत राहिलेच पाहिजे. अशी एक म्हण आहे की “हिरा पड़ा है बाट मे कोई अंधा निकाल जाय” आंधळ्याला हि-यांची जाणीव नसते. तेव्हा ही आलेली संधी तुम्ही फुकट घालवू नका. या देशाच्या राजकारणात कधीही घडलेली नाही अशी गोष्ट घडून येत आहे. या देशात खालच्याने दळावे व वरच्याने भाकरी खावी. वरच्याची चैन तर खालच्याची दैना अशी परिस्थिती आहे. इंग्रजी राज्य आले तरी त्यांनी क्रांती घडवून आणली नाही व आपली स्थिती बदलली नाही, ते परके लोक होते. त्यांना आपला राज्यकारभार चालविण्याकरिता या उच्चवर्णीयांची मदत घ्यावी लागत असे. म्हणून त्यांच्या अनुमतीने ते राज्यकारभार चालवीत आणि म्हणूनच आमची परिस्थिती काही बदलली नाही, पण यापुढे नवीन राज्यघटनेत आपलीही सत्ता चालेल. वरचा आणि खालचा असा भेद राहाणार नाही.
आपण कायदे घडवून आणू आपणाला कायदे कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधी मिळाले आहेत. त्यांचे अधिष्ठान कौन्सिलमध्ये होईल आणि मग त्यांच्या सल्ल्याप्रमाणे सर्व देशाचा राज्यकारभार चालेल. गावात महाराला चावडीत घेत नाही. पण तोच महार लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये जाईल तेव्हा गावच्या लोकांना अस्पृश्य लोकांबरोबर समानतेने वागणे भागच पडेल.
परंतु मला मोठा संशय वाटतो की, या मिळालेल्या शक्तीचा तुम्ही योग्य उपयोग कराल किंवा नाही. तुम्ही या गोष्टीची नीट जाणीव ठेवा व तुमच्या हाती आलेल्या शक्तीचा विचार करा. तुमच्यामध्ये अंतरपालट होईल असे करू नका व ऐक्य वाढवा. दुही मोडून टाका. पण मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे की, आपल्यामध्ये दुहीचे व्यसन वाढत आहे. सर्वत्र झगडे चालले आहेत. यामुळे कार्यांचा नाश होत आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण नाशिक जिल्हा व कोकण होय. हे दोन भाग एकमेकाला लागून आहेत. कोकण व नाशिक येथे मोठमोठे सत्याग्रह झाले. ते झाले नसते तर आपल्याला जी राजकीय सत्ता प्राप्त झाली ती झाली नसती. नाशिक सत्याग्रहाने तर इतकी प्रचंड खळबळ उडवून दिली की मी इंग्लडमध्ये असताना तेथे लंडन टाइम्समध्ये त्याची खबर रोज येत असे. ती वाचून इंग्रज लोक देखील आश्चर्य प्रगट करीत असत. इतकी नाशिक जिल्ह्यातील लोकांनी एकीच्या बळावर कामगिरी बजावली होती. पण मला सांगण्यास फार वाईट वाटते की, तोच नाशिक जिल्हा आज मागे पाय घेत आहे. तेथील लोकांनी जणू काय सार्वजनिक कामाचा संन्यास घेतला आहे. हे कशामुळे होत आहे असे विचाराल तर ते केवळ व्यक्ती द्वेषामुळे.
याचे एकच उदाहरण इगतपुरी येथे घडलेले देता येईल. त्या ठिकाणी एकदा अस्पृश्यांची सभा भरली होती. तेथे अध्यक्ष कोणी व्हावे यावरच वाद झाला. शेवटी एका खांबाला अध्यक्ष करून सभा पार पाडावी लागली. अध्यक्ष कोणी व्हावे, सेक्रेटरी कोणी व्हावे, खजिनदार कोणी व्हावे याबद्दलच एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. हीच परिस्थिती जर कायम राहिली तर आपण जो हा एवढा खटाटोप करून अधिकार मिळविले ते सर्व फुकट जातील. समजा उद्या नाशिकला एक प्रतिनिधी मिळाला तर जो स्वार्थत्यागपूर्वक काम करतो त्यालाच तुम्ही निवडून द्या. शहाणा कोण व वेडा कोण याचा विचार करा. पण मानाला हपापलेल्या मूर्खाच्या नादी लागू नका. कोणाच्याही हातून दिवा लागो. पण आपआपसातील दुही मोडा आणि तुमच्या अडचणी नाहीशा करण्याचे ज्ञान प्राप्त करून घ्या. सभातून ठराव पास होतात तिकडे दुर्लक्ष करू नका. अडचणी नाहीशा करण्याचे उपाय शोधून काढा. नारू झाला म्हणून बडबड न करता तो बरा करण्याचे प्रयत्न करा. परिस्थितीचे ज्ञान करून घ्या. ती परिस्थिती तुमच्या घरी येऊन कोणी सांगणार नाही. त्याकरिता जनता वर्तमान पत्र घेत जा.
दुसरी गोष्ट तुम्हाला बजावतो की, पुणे करार झाला तो हिंदूना मनापासून नापसंत आहे. खरे पाहिले तर हिंदू धर्माचे आपण रक्षण करू. पण हिंदू लोक असे आहेत की, पुणे कराराचा फायदा आपल्या पदरी पडू न देता हिंदू व मुसलमान उद्या कौन्सिलमध्ये एक होऊन आपणाला खड्यासारखे एका बाजूला निवडून काढतील. आपले भांडण सत्तेच्या वाटणी बद्दल होईल आणि त्या भांडणात आमचा हिस्सा आम्हाला मिळाला पाहिजे. महाभारतात कौरवपांडव युद्ध झाले पण त्यात भिष्माचार्याला पांडवांची खरी बाजू माहीत असून तो कौरवांचे अन्न खात असल्यामुळे त्यांच्याच बाजूला राहणे भाग पडले. अर्थात ‘अर्थस्य पुरुषो दासः’ अशी स्थिती तुमची होऊ देऊ नका. लोकांचे डाव ओळखा व त्याप्रमाणे वर्तन ठेवा. जी गोष्ट वाईट होते ती ईश्वर करतो. ईश्वरानेच आपणाला अस्पृश्यांच्या जन्माला घातले आहे. ही देवाची इच्छा आहे. ही भावना काढून टाका. तुम्ही सध्या ईश्वरासंबंधी विचारच करू नका. आपले वाईट झाले ते इतर लोकांनी आपला स्वार्थ साधला व आपले नुकसान केले म्हणून, गेल्या जन्मातील पातकामुळे नव्हे. महाराला जमीन नाही याचे कारण त्या इतर लोकांनी घेतल्या म्हणून. अस्पृश्यांना नोकऱ्या नाहीत. याचे कारण इतर लोकांनी लुबाडल्या म्हणून. हे जे बरेवाईट होते ते सुधारणे आपल्या शक्तीबाहेरचे नाही.
रेल्वेचेच उदाहरण घेऊ. रेल्वेचा कारभार याला व्हाइसरॉयच्या कायदे कौन्सिलामार्फत चालतो. रेल्वेतून कामगार कमी करावयाचे असले तर पहिली गदा अस्पृश्य वर्गाच्या कामगारावर येते. इतर वर्गाच्या कामगारांवर येत नाही. याचे कारण इतर वर्गाच्या कामगारांचे जातीचे व धर्माचे प्रतिनिधी त्यांच्या कौन्सिलमध्ये असतात. ते त्यांच्यावतीने तिथे भांडतात. आपल्या वर्गाचे प्रतिनिधी तेथे नाहीत. आपला एक प्रतिनिधी आहे पण तो बिचारा आपल्या वर्गासंबंधी तेथे काही बोलतच नाही. पण यापुढे शेकडा 18 प्रतिनिधी व्हाईसरॉयच्या कायदे कौन्सिलमध्ये आपल्या वर्गातर्फे निवडले जाणार आहेत. त्यावेळी आपण सर्वांनी सावध राहून कायदे कौन्सिलमध्ये योग्य काम करणारीच माणसे निवडून पाठविली पाहिजेत. शेवटची गोष्ट तुम्हास सांगतो की, ‘दैवावर भरवसा ठेवून वागू नका.’ जे काय करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा. आपण माझे भाषण इतका वेळ शांतपणे ऐकून घेतलेत व हा सभेचा योगायोग जुळवून आणलात याबद्दल मी सर्वांचे आभार मानून आपली रजा घेतो.