Categories

Most Viewed

17 फेब्रुवारी 1946 भाषण

मरणाच्या तयारीनेच आम्ही समरांगणात उतरलो आहोत.

मुंबईतील अस्पृश्य जनतेने केलेल्या संकल्पानुसार थैली अर्पण समारंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाषण आयोजित केले होते. त्याकरिता खालील पत्रक काढण्यात आले होते.

आपले परमपूज्य पुढारी नेक नामदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईतील अस्पृश्य समाजाकडून थैली अर्पण करणाचा समारंभ रविवार तारीख 17 फेब्रुवारी 1946 रोजी सायंकाळी 5 वाजता जी. आय. पी. रेल्वे परळ वर्कशॉप समोर साध्वी रमाबाई आंबेडकर नगर (नरेपार्क) येथे होणार आहे. या समारंभानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे भाषण होणार आहे. या समारंभास अस्पृश्य जनतेने हजर राहावे अशी विनंती आहे.

या समारंभास हजर राहाणाऱ्या लोकांना आठ आण्याची तिकिटे विकत घेतलीच पाहिजे. तिकिटाशिवाय सभेचे ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. तरी ज्यांनी आठ आण्याची तिकिटे आतापर्यंत घेतली नसतील त्यांनी तारीख 15 फेब्रुवारीचे आत आपापल्या वार्ड कमिटीकडून किंवा पोयबावडी येथील मुंबई शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे ऑफिसातून ताबडतोब विकत घ्यावीत. सभेचे ठिकाणी तिकिटे विकली जाणार नाहीत व तिकिटाशिवाय कोणासही प्रवेश मिळणार नाही.

तिकिट विक्रीपासून जमा होणारी सर्व रक्कम आपले परमपूज्य पुढारी नेक नामदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करण्यात येईल. थैलीची रक्कम कमीतकमी पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असता कामा नये अशी मुंबईच्या जनतेची इच्छा असल्यामुळे थैलीची रक्कम करण्याकरिता एक रुपया, दोन रुपये किंवा पाच रुपये किंवा याहीपेक्षा जास्त पैसे घेण्याची योजना आखण्यात आली आहे. तरी अशा देणग्या दिल्यास त्यांचा साभार स्वीकार केला जाईल. देणग्या देणाऱ्या स्त्री पुरुषांच्या नावाची यादी छापून प्रसिद्ध केली जाईल. तरी याचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी ताबडतोब देणगीची रक्कम वार्ड कमिटीकडे किंवा मुंबई शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे ऑफिसात 15 फेब्रुवारीचे आत देण्याची कृपा करावी.

हे पत्रक जी. एम. जाधव, अध्यक्ष व एस. बी. जाधव, जनरल सेक्रेटरी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन, मुंबई (शहर व उपनगर) शाखा यांनी काढले होते.

मुंबईतील तारीख 3 जानेवारी 1946 रोजी झालेल्या प्राथमिक निवडणुकीच्या दिवशी हुतात्मा चोखाजी सावळाराम गांगुर्डे यांचा काँग्रेस गुंडांनी केलेला अमानुष खून. या हुतात्म्याच्या प्रेतयात्रेवर तारीख 4 जानेवारी 1946 रोजी पोलिसांनी केलेला क्रूर लाठीहल्ला. त्यात बळी पडलेला वीर रामचंद्र गुंडू कांबळे आणि तदनंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी अस्पृश्यांच्या वस्तीवर करण्यात आलेले आक्रमक हल्ले वगैरे घटनांच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात ? हे ऐकण्यासाठी मुंबईतील अस्पृश्य जनता आतूर झालेली होती. डॉ. बाबासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण भाषणासाठी मुंबई (शहर व उपनगर) शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन शाखेच्या कार्यकर्त्यांनी दोनदा सभेची तारीखही जनतेतून जाहीर केली होती. परंतु दोन्ही वेळा कामाच्या अमर्याद व्यापामुळे डॉ. बाबासाहेबांना येता येणे शक्य नव्हते म्हणूनच दोनदा सभा तहकूब झाली. तिसऱ्यांदा तारीख 17 फेब्रुवारी 1946 रोजी मात्र या गाजलेल्या सभेने मुंबई गाजविली.

अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे तिसरे अधिवेशन ज्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडले त्याच ठिकाणी साध्वी रमाबाई आंबेडकर नगरात (नरेपार्क) ही विराट सभा घेण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब, सन्माननीय निमंत्रित पाहुणे मंडळी, उमेदवार, फेडरेशनच्या निरनिराळ्या वार्डाचे कमिटी सभासद आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्यासाठी खास मंडप उभारण्यात आला होता.

या सभेला आगाऊ जाहीर केल्याप्रमाणे आठ आण्याचे प्रवेश तिकीट असल्यामुळे एक निमंत्रित पाहुण्यांसाठी एक स्त्रियांसाठी व तीन पुरुषांसाठी मिळून पाच प्रवेशद्वारे ठेवण्यात आली होती. सभेची सर्व व्यवस्था समता सैनिक दलाकडे होती. प्रत्येक प्रवेशद्वाराजवळचे सैनिक आपापले कर्तव्य चोखपणे बजावित होते. दुपारी तीन वाजल्यापासूनच लोक येऊ लागलेले होते. मुंबई बाहेरील बऱ्याच ठिकाणचे लोक बाबासाहेबांच्या या भाषणासाठी मुद्दाम आले होते. पाच वाजेपर्यंत सुमारे तीस हजार लोक नगरात दाखल झाले होते. ज्यांच्याजवळ तिकीट नव्हत्या असे बरेचसे लोक बाहेर वावरत असताना दिसत होते. व्यासपिठावर मुंबई प्रांतिक विधिमंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी उभे राहिलेले फेडरेशनचे अधिकृत उमेदवार गुरुवर्य दोंदे व बाबासाहेबांची अस्पृश्यवर्गीय स्नेही मंडळी, त्याचप्रमाणे डाव्या बाजूस वार्ड कमिट्यांचे सभासद, उजव्या बाजूस भगिनीवर्ग, व्यासपिठाला लागूनच समोर वर्तमानपत्रांचे वार्ताहर आणि समोर अफाट जनसमुदाय, असे एकंदरीत दृश्य दिसत होते.

डॉ. बाबासाहेबांच्या आगमनापूर्वी समाजोन्नतिपर स्फूर्तिदायक अशी सुश्राव्य गाणी झाली. त्यात कु. गोदावरी, मा. रोकडे व रामचंद्र यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बरोबर साडेपाच वाजता आले. “डॉ. बाबासाहेब आले” एवढे कळताच टाळ्यांचा कडकडाट व निरनिराळे जयघोष यांचा सारखा ध्वनी ऐकू येऊ लागला, समता सैनिक दलाची पाहणी करण्याचे आगाऊ ठरल्यामुळे आल्याबरोबर बाबासाहेब समता सैनिक दलाच्या रॅलीकडे वळले. समता सैनिक दलातील सैनिकांना या पाहाणीची आगाऊच समज देण्यात आलेली असल्यामुळे प्रत्येक सैनिक अगदी तयारीत होता. सभेला जोडूनच एका विस्तीर्ण जागेत सर्व सैनिक शिस्तीत उभे होते. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या या मिलीटरीची शिस्त पाहून कोणीही तोंडात बोटेच घातली असती. डॉ. बाबासाहेबांच्या बरोबर मुंबई शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन शाखेचे अध्यक्ष श्री. जी. एम. जाधव व मुंबईतील समता सैनिक दलाचे जी. ओ. सी. श्री. एम. एम. ससाळेकर हे होते. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाबरोबर बुगूल वाजविण्यात आला. बैंड वादन करून डॉ. बाबासाहेबांना गार्ड ऑफ ऑनर (सलामी) दिला गेला. तद्नंतर डॉ. बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची पाहाणी केली. ही पहाणी चालू असता डॉ. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज दिसत होते. मधून मधून ते सैनिकांबद्दल चौकशी करीत व काही माहिती विचारीत. त्यांच्या प्रश्नांना जी. ओ. सी. ससाळेकर उत्तर देत होते. अशा प्रकारे समता सैनिक दलाची पाहाणी करून डॉ. बाबासाहेब व्यासपिठावर आले. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाल्यावर जी. ओ. सी. ससाळेकर यांनी समता सैनिक दलाची प्रत्येक सैनिकाला घ्यावी लागणारी शपथ-प्रतिज्ञा वाचून दाखविली.

मुंबई व उपनगर शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन शाखेचे अध्यक्ष श्री. जी. एम. जाधव उर्फ मडकेबुवा यांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केला आणि लोकांनी त्यांना टाळ्यांची प्रचंड साथ दिली. तद्नंतर नायगाव येथील महाराष्ट्र अम्युचुअर्स पार्टी मधील लहान मुलांनी त्यांचे मुंबईतील लोकप्रिय ‘चल चल रे दलित वीरा’ हे गाणे कर्णमधूर सुरात गाऊन दाखविले.

या वेळेपावेतो बाहेर तुफान गर्दी झाली होती. डॉ. बाबासाहेबांनी सर्वाना मंडपात दाखल करण्यासंबंधी आज्ञा फर्माविली. त्याचबरोबर लोकसमुदायाचा प्रचंड प्रवाह आत येऊ लागला. त्यावेळेस नगरात एकच गर्दी झाली. त्या जनसमुदायाचा अंदाज जवळ जवळ पाऊन लाखांवर होता. पुन्हा शांतता प्रस्थापिण्यास जवळ जवळ पाच मिनिटे लागली. नंतर मडकेबुवा यांनी, मुंबई प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन शाखेचे अध्यक्ष व नाशिक जिल्हयातील आपले अधिकृत उमेदवार श्री. भाऊराव कृष्णराव उर्फ दादासाहेब गायकवाड यांना बोलण्यासाठी विनंती केली. दादासाहेब गायकवाड थोड्याच वेळ बोलले पण जे काही बोलले, शत्रूच्या वर्मी घाव घालण्यासारखे असेच होते. त्यांनी त्यांच्या भाषणात. उद्याच्या निवडणुकीत आपले कर्तव्य, आपल्याच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची आवश्यकता, प्राथमिक निवडणुकीच्या निकालाने दिलेला अस्पृश्यांच्या अभेद्य एकजुटीचा कौल, कॉंग्रेसच्या जांघेत गोचीडाप्रमाणे राहाणा-या आपल्या विरोधकांची आहारीजनांची अधोगती वगैरे बाबीसंबंधी अगदी मोजक्या शब्दात सांगून, मद्रासला गेल्या आठवड्यात गांधींनी अस्पृश्यांच्या स्वाभिमानाला डिवचणारे जे अनुदार उदगार काढले त्याबद्दल त्यांनी व्यवस्थित हजेरी घेतली. तद्नंतर थैली अर्पणाचा समारंभ झाला. श्री. मडके बुवा यांनी बाबासाहेबांना सतरा हजार रुपयांची थैली अर्पण केली. त्यावेळेस टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. डॉ. बाबासाहेब बोलावयास उभे राहिले तरी हा गजर सारखा चालूच होता. सगळीकडे शांतता झाल्यावर डॉ. बाबासाहेबांनी बोलावयास सुरुवात केली. ते म्हणाले,

येत्या मार्च महिन्याच्या 11 तारखेस मुंबई असेंब्लीकरिता निवडणूक होणार आहे त्यावेळी हे सांगण्यासाठी आजची ही सभा भरविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात मैलांचा अन्नपाण्यावाचून मला थकवा आलेला आहे. म्हणून मी आपल्यापुढे थोडेच बोलणार आहे. त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.

ही जी आता निवडणूक होणार आहे त्या बाबतीत तुम्ही मुळीच निराश होऊ नका. हा एक संग्राम आहे. हा आपल्या स्वातंत्र्याचा अखेरचा संग्राम आहे. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांच्या झालेल्या संग्रामासारखाच आजचा हा संग्राम आहे.

महाभारतात सांगितले आहे की, कौरव-पांडवांची सैन्ये युद्धाकरिता समोरा समोर आली असता कृष्ण व अर्जुन यांनी लढाई कशी करावी, कोणता डाव करावा, विरुद्ध पक्षावर मारा कसा करावा असा विचार-विनिमय न करता अर्जुन आत्मा म्हणजे काय वगैरे प्रश्न श्रीकृष्णाला विचारीत होता! प्रत्यक्ष रणांगणाचे स्थानी असे प्रश्न विचारणे शुद्ध वेडगळपणा आहे ! हा प्रसंग घडला असेल असे वाटत नाही! संग्राम-प्रसंगीचे म्हणून भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने केलेल्या चर्वितचर्वणा सारखे जर आज कोणी करू म्हणेल तर एखादा त्याची मुर्खातच गणना करील.

मी गेली 20 वर्षे आपले ध्येय आणि त्या ध्येयसिद्धीचे मार्ग आपणास सांगत आलो आहे. आज माझी खात्री आहे की, त्याच आपल्या ध्येयाकरिता आपण सर्वजण पूर्ण संघटितपणे तयार झाला आहात. आज मी मागील धडा न वाचता येत्या 11 तारखेस आपले कर्तव्य काय या विषयीच मुख्यतः बोलणार आहे.

गेल्या निवडणुकीचे वेळी प्रतिपक्षीयांशी आपली हातघाई झालेली नव्हती. त्यावेळी आपण आजच्याइतके संघटीतही झालो नव्हतो. परंतु आज आपली शक्ती प्रचंड वाढली असल्यामुळे शत्रु बेभान झाला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या आपल्या प्राथमिक निवडणुकीचे वेळी काँग्रेसच्या लोकांनी चोखाजी गांगुर्डे या आपल्या एका वीराची हत्या केली. हुतात्मा चोखाजी गांगुर्डे यांच्या शरीरावर शत्रुंनी तीक्ष्ण हत्याराने केलेल्या वाराच्या 21 जखमा होत्या, असे मला समजले आहे. या हुतात्म्याच्या प्रचंड अंतयात्रेच्या वेळी पोलिसांच्या तीव्र लाठीहल्ल्यात रामचंद्र कांबळे हा आपला दुसरा वीर बळी पडला व अनेकांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. नागपूरलाही गजभिये व वासनिक हे आपले वीर बळी गेले. परवा साताऱ्यालाही आपल्या सभेवर काँग्रेसच्या लोकांनी दगडांचा मारा केला. ! पण सुदैवाने आपले कोणी जखमी न होता शत्रुचेच लोक रक्तबंबाळ झाले.

गेल्या निवडणुकीचे वेळी कॉंग्रेस वर्दळीवर आली नाही. आपल्याशी उघड सामना करण्यास धजावली नाही व आजच कॉंग्रेस आपल्याशी का लढते आहे. हे आपण चांगले समजून घेतले पाहिजे.

कॉंग्रेसच्या लोकांचा आपल्या मानी अस्पृश्य वर्गावर जो कटाक्ष आहे तो आपण राजकारणात पडलो आहोत म्हणून किंवा आपण निवडणुकी लढवित आहोत म्हणून नव्हे तर त्यांना आपले फेडरेशन नको आहे. शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा काटा त्यांच्या डोळ्यात सलत आहे. आपल्या फेडरेशनच्या प्रचंड शक्तीमुळे कॉंग्रेसवाले बेभान झाले आहेत.

अस्पृश्य लोकांनी त्याचप्रमाणे मुसलमान लोकांनी निवडणुकीकरिता फुटकळ फुटकळ उभे रहावे, त्यांचा समाज विखुरलेला असावा, असे काँग्रेसला वाटते. अशा प्रकारे फुटकळ झालेल्या समाजातील लोकांना काँग्रेसमध्ये ओढण्याची त्या लोकांची धडपड चाललेली असते. कुत्र्यापुढे हाड टाकले म्हणजे तो जास्त भुंकत नाही. त्याचप्रमाणे फुटकळ रीतीने निवडून आलेल्यास काँग्रेसला सहज वश करता येते. कुणाला जोड्याचे, कुणाला गटाराचे कांट्रॅक्ट देऊन काँग्रेसचे मिंधे बनविता येते. उलट एखाद्या बलवान संस्थेच्या उमेदवारास कसलेही आमिष दाखविले तरी तो वश होणार नाही. म्हणून शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन ही आपली प्रचंड संघटना काँग्रेसला नको आहे.

काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा आजचा राजकीय दृष्टिकोन न्याहाळून पाहिला तर कॉंग्रेस ही एकच संस्था राहावी असे त्यांना वाटते. बाकीच्या लोकांनी निमूटपणे काँग्रेसमध्येच सामील व्हावे अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

काँग्रेस हीच एक संस्था, एक नेता व एक मार्ग असे सामर्थ्य संपादून इतर सर्व समाजावर अनिर्बंध सत्ता गाजवावी अशी काँग्रेसच्या लोकांची जबर धडपड चालली आहे. आपल्याला हाणून पाडण्यासाठी वाटेल त्या अवलंब करीत आहेत. नुकतेच आपल्या लोकांवर जे हल्ले झाले व होत आहेत, आपल्या ज्या शूरवीरांची हत्या झाली, त्याचे कारण म्हणजे काँग्रेसची हिच राक्षसी महत्त्वाकांक्षा !

मला तुम्हाला सांगावयाचे आहे ते हे की विरोधी पक्षाच्या कसल्याही गुंडगिरीला घाबरता कामा नये. तुमच्या ध्येय प्रेमाबद्दल व ध्येयाबद्दल मी निशंक आहे. सर्वांनी येत्या 11 मार्चला आपल्या उमेदवारास प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केलाच पाहिजे. तुम्ही कोणाच्याही धमकावणीला भीक घालता कामा नये, डरता कामा नये.

हुतात्मा गांगुर्डे चांगला कार्यकर्ता होता. दुसरेही आपले वीर हुतात्मे धडाडीचे कार्यकर्ते होते. त्या सर्वांच्या कुटुंबियांना माझे सांगणे आहे की तुम्ही दुःख करू नका. मरण ही आज ना पण निश्चितपणे घडून येणारी गोष्ट आहे. हुतात्मा गांगुर्डे इतरांचे मरण वीरांचे मरण आहे. त्यांच्या मृत्यूमुळे सर्व समाज दुःखी झाला आहे. वीर हुतात्मे मेले नसून अमर झाले आहेत ! त्यांचे मरण हे विलोभनीय मरण आहे.

काँग्रेसवाल्यांना मला हे सांगावयाचे आहे की अशा धमक्यांनी अत्याचारी हल्ल्यानी किंवा त्यांच्या भीतीने आम्ही भिऊन चालणार नाही. आम्ही मरणाच्या तयारीनेच समरांगणात उतरलो आहोत. सामना करण्याची पूर्ण तयारी आहे. जे काही होणार असेल ते होईल. आमच्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व प्रकारचा स्वार्थत्याग करण्याची आमची सिद्धता आहे. आम्ही अपमानास्पद रीतीने शरण जाणार नाही. आमच्या सामर्थ्याबद्दल आम्हास पूर्ण आत्मविश्वास आहे. आम्ही शत्रुला नाक मुठीत धरायला लावूच लावू (प्रचंड टाळ्या) शेवटी विजय आमचाच आहे.

द्रोण जातीने ब्राह्मण होता. तो श्रीमंतांच्या वस्तीत राहत होता. त्याच्या मुलाचे नाव अश्वत्थामा. श्रीमंतांची मुले चांदीच्या पात्रात दूध आणून पीत असत. ते पाहून अश्वत्थामाही आपल्या आईजवळ दूध मागत असे. गरीब असल्यामुळे द्रोणाचे घरी गाय नव्हती. मग चांदीचे भांडे कसचे ? अश्वत्थाम्याची आई मुलाची समजूत काढण्यासाठी पाण्यात पीठ कालवून ते पांढरे पाणी मातीच्या भांड्यात त्यास पिण्यासाठी देत असे. अश्वत्थामाही ते पिठाचे दूध इतर मुलांबरोबर पिऊन समाधान मानीत असे. एके दिवशी द्रोणाने हे दृश्य पाहिले. आपला मुलगा मातीच्या भांड्यातून पिठाचे दूध इतर मुलांबरोबर पिऊन समाधान मानतो. हे पाहून द्रोणाला अत्यंत वाईट वाटले. मी जिवंत असून काय उपयोग ? आपणाला एखादी गाय कशी तरी मिळविली पाहिजे, असा द्रोण विचार करु लागला. त्याला वाटले आपला गुरुबंधू जो द्रुपद राजा त्याच्याकडे आपण गेलो व आपले गुरुबंधुचे नाते त्याला सांगितले तर त्याच्याकडून आपणास गाय नक्की मिळेल. या आशेने गरीब द्रोण द्रुपद राजाच्या नगरीत गेला. राजवाड्याच्या दरवाजाजवळ जाताच द्वारपाळांनी त्याला विचारले, कोण तू ? द्रोण म्हणाला मी राजाचा गुरुबंधु आहे.” अंगावर चिंध्या घातलेला हा राजाचा गुरुबंधु कसा असेल असे वाटून ते द्वारपाळ मोठमोठ्याने हसून द्रोणाची टवाळी करू लागले. शेवटी एका समंजस गृहस्थाने दरबारात राजास निरोप कळविला की, आपला कोणीतरी गुरुबंधु बाहेर उभा आहे तो आपणास भेटू इच्छितो. राजाने त्याला आत आणण्यास सांगितले. द्रोण आत आला. त्याने आपल्या गुरुबंधुत्वाची ओळख करून देण्यासाठी राजाला मागील हकीकत सांगितली व एखादी गाय देण्याची विनंती केली. हा भिकारडा आपल्याशी नाते जोडून आपल्या श्रेष्ठत्त्वात कमीपणा आणीत आहे म्हणून द्रूपदाला फार राग आला. त्याने आपल्या सेवकांकरवी द्रोणाला भर दरबारातून बाहेर हाकूलन लावले. बाहेर पडताना द्रोण मागे वळून राजास म्हणाला “राजा तुला गाय द्यायची नव्हती तर मला तसे सांगावयाचे होते. पण तसे न करता तू भरदरबारात अपमान केलास. या अपमानाचा बदला म्हणून माझ्या शिष्याकरवी हातपाय बांधून तुला माझ्या पायाशी शरण आणीन तरच मी नावाचा द्रोणाचार्य अशी प्रतिज्ञा करतो” असे बोलून द्रोण बाहेर पडला.

पुढे द्रोणाने कौरव-पांडवांना धनुर्विद्या शिकविली. विद्या संपादनानंतर इतर शिष्यांप्रमाणे अर्जुनाने द्रोणाला विचारले आपणास गुरुदक्षिणा काय देऊ ?” द्रोणाने हवी असलेली गुरुदक्षिणा मागितली. अर्जुनाने खरोखरीच द्रुपद राजाला बांधून त्याला द्रोणाचार्याच्या पायावर लोळण घ्यावयास लावले.

बंधु भगिनींनो, आपण अल्पसंख्य असलो, गरीब असलो, तरी आपणाला स्वाभिमान आहे. द्रोणासारखा प्रखर अभिमान बाळगून तुम्ही प्रचंड सामर्थ्यवान शत्रुसही दाती तृण घेऊन तुमच्या पायाशी लोळण घेण्यास भाग पाडाल, असा मला आत्मविश्वास आहे. (टाळ्या) मरणालाही पाठीमागे टाकून आपल्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मविश्वासपूर्वक लढणे हीच आपली प्रतिज्ञा. (प्रचंड टाळ्या)

काँग्रेसला व हिंदुना माझे सांगणे आहे की, दंगाधोपा करून आम्हाला निवडणुका जिंकायच्या नाहीत. सामना करायचाच म्हटले तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाही। (टाळ्या) आम्हाला सामर्थ्य नसले तरी स्वाभिमान आहे. ज्यांनी आमच्यावर हात टाकला त्यांना आम्ही शरण आणूच. (प्रचंड टाळ्या)

हिंदुना माझे एकच सांगणे आहे की, तुमचे राजकारण जसे इंग्रजांच्या सत्तेखालून स्वतंत्र होण्याचे आहे तसे आमचेही राजकारण हिंदुच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होण्याचे आहे. तुम्हाला जसे इंग्रजांचे राज्य नको तसे आम्हाला हिंदुचे राज्य नको आहे. इंग्रज गेले तर हिंदुना स्वराज्य मिळेल. इंग्रज जाऊन त्यांच्या जागी हिंदू लोक येतील. आज मध्यवर्ती मंत्रीमंडळात काही युरोपियन आहेत. त्यांच्या जागी ब्राह्मण, कायस्थ, बनिया जाऊन बसतील. परंतु या लोकांवर आमचा तिळमात्र विश्वास नाही. गेली दोन हजार वर्षे हिंदुंनी आमची गळचेपी करून दुर्दशा केली. हजारो वर्षे हिंदुरूपी अजस्त्र अजगर आमच्या शरीराभोवती विळखा घालून बसला आहे. ज्यावेळी हा विळखा सुटेल तोच आमच्या स्वातंत्र्याचा दिवस ! आमच्या स्वातंत्र्यासाठी हिंदुच्या सत्तेला आमचा कसून विरोध आहे. हजारो वर्षे ज्यांनी आम्हाला दडपले ते सत्ताधारी झाल्यावर त्यांना पाझर फुटेल असे कोण म्हणू शकेल. जे लोक आमच्या स्पर्शाने सचैल स्नान करतात ते आमचा उद्धार करतील असे एखादा वेडाही कबूल करणार नाही. हिंदुनाच जर ही सत्ता मिळाली तर तो आमचा घात आहे. म्हणून या देशाच्या राजसत्तेत आम्हास आमचा वाटा मिळालाच पाहिजे. सत्ता संपादनासाठीच आमचा लढा आहे. हिंदुंनी कितीही कारस्थाने केली तरी या देशाचे सत्ताधारी होण्याची आमची प्रतिज्ञा आम्ही पूर्ण करूच करू ! (प्रचंड टाळ्या)

सध्याचा संभाव्य दुष्काळ कसा टाळावा असा सर्वांच्या पुढे एक प्रश्न उभा आहे. हिंदुना जर विचारले की हा दुष्काळ कसा टळेल ? तर ते सांगतात की राष्ट्रीय सरकार आल्याशिवाय दुष्काळ टळणार नाही. राष्ट्रीय सरकार यावयाचे म्हणजे सध्याच्या युरोपियन मंत्र्याऐवजी हिंदू मंत्री यावयाचे. अशा प्रकारे बनलेल्या या राष्ट्रीय सरकारच्या टाळूवर काय शाळू उगवणार आहे ? म्हणे राष्ट्रीय सरकार आले की दुष्काळ नाहीसा होईल. परंतु हा सर्व फसवाफसवीचा खेळ आहे. लपंडाव आहे. सत्ता संपादनासाठी हिंदुच्या कारवाया चालू आहेत. आजचा प्रसंग अस्पृश्यांच्या भवितव्यतेच्या दृष्टीने फार मोलाचा आहे. हिंदू लोक आमचे हक्क हिरावू पाहतात. पण आमचा मरण्याचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. (टाळ्या) आमचे हक्क जर मिळाले नाही तर आमच्या हक्कासाठी मरण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. गांधींनी कितीही नाक मुरडले, वल्लभभाई कितीही डरकाळले व जवाहरलाल नेहरू कितीही जळफळले तरी त्याची कोणीही पर्वा करणार नाही.

आमच्या मागण्या मुसलमानांप्रमाणे अवास्तव नाहीत. आमच्या हव्यकव्याकरिता आमच्या उन्नतीकरिता त्या मागण्या योग्य अशाच आहेत. त्या गहूभरही जास्त नाहीत. आमच्या मागण्या अवास्तव आहेत. अयोग्य आहेत असे जर काँग्रेसला-हिंदुना वाटत असेल तर त्यांना माझे आव्हान आहे की आमच्या मागण्याचा न्याय-निवाडा करण्याकरिता एक आंतरराष्ट्रीय कोर्ट नेमा, कोर्ट जो निकाल देईल तो मान्य करायला आम्ही तयार आहोत. तुम्हीही त्या कोर्टाचा निर्णय मान्य करायला उदार असले पाहिजे.

आमच्या न्याय्य मागण्या आपखुषीने द्यावयास तुम्ही तयार नाही व लवादही जर मान्य करणार नाही तर मग जे काय होणार असेल ते होईल.

बंधु भगिनींनो, हिंदू लोकांवर आता काडीचाही विश्वास ठेवता कामा नये. काँग्रेस, मागे दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, पुढेही वचनभंगच करील. हिंदू समाजात शहाणपण मुळीच नाही. जे काही आहे त्याला मी नाना फडणविसांची लफंगेगिरी समजतो. आपले न्याय्य हक्क इंग्रज लोक या देशातून जाण्यापूर्वीच आपण मिळविले पाहिजेत. या राष्ट्राच्या राजसत्तेत आपला योग्य वाटा मिळविलाच पाहिजे. हा थोरला भाऊ शत्रुपेक्षाही भयंकर शत्रु आहे. त्यांच्यावर तिळभरही विश्वास ठेवणे धोक्याचे आहे, म्हणून बापाच्या मरणा अगोदरच इस्टेटीचे वाटप झाले पाहिजे. जर थोरला भाऊ सामदामानेनच ऐकेल, आपल्या हिश्याच्या आडच येत राहील तर आपली सर्व शक्ती एकवटून आपला न्याय्य वाटा मिळविण्याची आपली प्रतिज्ञा आपण पार पाडल्याशिवाय कधीही राहाणार नाही. (प्रचंड टाळ्या)

11 मार्च रोजी जी निवडणूक होणार आहे त्यासंबंधी मला सांगणे आवश्यक आहे. या भागात ई व एफ वार्डात आपले 28 हजार मतदार आहेत व हिंदुचे एक लक्ष चौतीस हजार आहेत. जी व सबर्बनमध्ये 32 हजार आपले मतदार आहेत व हिंदुचे एक लक्ष चौदा हजार आहेत. मतदार अल्प आहेत असे दिसेल. याचा तुम्ही हिशेब केला तर आपले हा एक संग्राम आहे. महाभारतात सांगितले आहे की कौरवांचे सैन्य 11 अक्षौहिणी होते व पांडवांचे 9 अक्षौहिणी होते. कौरवांचा जय व्हावयास पाहिजे होता, पण अल्पसंख्यांक पांडव विजयी झाले. तसे आपले मतदार जरी कमी असले तरी प्रत्येकाने त्या दिवशी जाऊन आपले मत दिले पाहिजे. हिंदुंची मते पुष्कळ आहेत. एकेक म्हणता म्हणता 1,34,000 मते काजरोळकरांना मिळाली तर तो स्वर्गाच्याही वर जाईल. तेथे काय आहे हे मला माहीत नाही. (हंशा) आपल्या सर्व लोकांनी त्या दिवशी मते दिली पाहिजेत. श्राद्धाच्या दिवशी जसे पूर्वी आपण एकत्र जमत होतो तसे 11 मार्चला मते देण्यास गेलेच पाहिजे. जानेवारीला मुंबईतील प्राथमिक निवडणुकीत दोन्ही उमेदवारास 11 ते 12 मते मिळाली, काँग्रेसच्या उमेदवारास दोन दोन हजार मिळाली. त्यांनी ही मते पुरभय्यांना महार मांगाची नावे करून द्यावयास लावली. यापासून आपण चांगलाच धडा घेतला पाहिजे, निवडणुकीत खोटेच तुमची मते देऊन जातील. ही गोष्ट होता कामा नये. तुम्ही सकाळीच मते देण्याच्या ठिकाणी राहिले पाहिजे. नाहीतर दुसरेच लोक तुमची मते देऊन जातील. आपणास गाडी घोडा काही मिळणार नाही. काँग्रेसचे लोक त्या दिवशी गाड्यांचा मक्ता घेतील. तुम्ही पायी जाऊन मत दिले पाहिजे. निवडणुकीच्या दिवशी काँग्रेसचे लोक भीती दाखवतील, धाकदपट्या करतील. या बाबतीत समता सैनिक दलातील लोकांनी काळजी घेतली पाहिजे. हिंदुलोक आपल्याविरूद्ध आहेतच. सरकारचे पोलिससुद्धा आपल्याविरुद्ध आहेत. तेव्हा आपल्या लोकांना संरक्षण देण्याची कामगिरी समता सैनिक दलावर आहे. यापूर्वी दलाने चांगली कामगिरी बजावली आहे. आपल्या लोकांना काँग्रेस पोलिस यापासून त्रास होणार याची खबरदारी दलाने घेतली पाहिजे.

यापूर्वी समता सैनिक दलाने अनेक प्रसंगी प्रशंसनीय कामगिरी बजावलेली आहे. दलावर मोठीच कामगिरी आहे. कार्याच्या सुलभतेसाठी निवडणुकीपुरती फेडरेशनचे अध्यक्ष श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दलाने आपली कामगिरी बजावली पाहिजे.

माझा असा विश्वास आहे, आपले गडी नुसतेच विजयी होणार नाहीत ते प्रतिपक्षाला चारी मुंड्या चीत करून विजयी होतील. लोकशाही लोकशाही म्हणून आज काँग्रेसचे लोक टाहो फोडीत आहेत, त्यांना लोकशाही म्हणजे काय, तरी माहीत आहे काय असेल ? त्यांना जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती. ज्यांना 90 टक्के मते पडली ते निवडून आले असे ते समजले असते कोणी संग्राम केला नसता. 11 तारखेला तुम्ही विरोधकाला धूळ चाराल अशी मला फार आशा आहे. तुम्ही मला 17,000 रुपयांचा चेक दिला त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. पैसे निवडणुकीच्या चटणीलाही पुरणारे नाहीत. आपण वर्तमानपत्रात वाचतो की गांधीना लाखाची थैली अर्पण करण्यात आली. नेहरूंना लाखांची थैली अर्पण करण्यात आली. पैसे थोडे मिळाले म्हणून बिलकूल खेद वाटत नाही. आपले राजकारण विक्रीचे राजकारण नाही. ते दिलाचे राजकारण आहे. अंतःकरणाचे राजकारण आहे. गेल्या वीस वर्षात मला 5,000 रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. त्या बाबतीत मला काही वाईट वाटत नाही. आमचे लोक हिंदुंच्या खांद्याला खांदा लावून बसतात. माझ्या लोकात उन्नतीचा आत्मविश्वास जागृत झालेला आहे, याच्यातच मला आनंद वाटतो.

बंधु भगिनींनो, मी आता विशेष काही सांगू इच्छित नाही. तुमच्या ध्येयनिष्ठेबद्दल, कर्तव्यदक्षतेबद्दल मला दृढ विश्वास आहे. मी तुमच्याकडून जास्त काही मागू इच्छित नाही. मी दिल्लीला गेल्यावर एकच अपेक्षा करीत राहीन ती म्हणजे 11 तारखेच्या विजयाच्या तारखेची !

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password