माऱ्याच्या जागा काबीज करा !
भारतीय अस्पृश्य वर्गांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तारीख 16 फेब्रुवारी 1946 रोजी बेळगाव जिल्ह्यातील काही प्रमुख गावांना धावती भेट दिली. शेडबाळ येथे जमलेल्या लोकांना डॉ. बाबासाहेबांनी निवडणुकीच्या संबंधात थोडासा उपदेश केला. तद्नंतर ते अंगळी या गावी गेले. तेथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाला उद्देशून त्यांनी अस्पृश्य समाजावर पडलेली जबाबदारी किती महत्त्वाची आहे याची स्पष्ट जाणीव करून दिली. पुढे मग सोळी व अथणी या गावांना भेटी देऊन संध्याकाळी 5.30 चे सुमारास निपाणी येथे त्यांचे आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
निपाणी हायस्कूलच्या विस्तीर्ण मैदानात डॉ. आंबेडकरांचे भाषण व्हावयाचे असल्यामुळे, तेथे सभेपूर्वीच चिक्कार गर्दी लोटली होती. सभेच्या बंदोबस्ताचे काम समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी उत्तम प्रकारे सांभाळले होते. सुमारे एक हजार गणवेषधारी समता सैनिक हातात काठ्या व भाले घेऊन आपापल्या नियोजित स्थळी सज्ज होते. त्यांना पाहून प्रतिस्पर्ध्याना धडकी भरणे स्वाभाविक होते. स्वयंसेवकांच्या कडक बंदोबस्तामुळे सभेचे काम निर्विघ्नपणे पार पडले. स्वयंसेवकानी बजावलेल्या या समाज सेवेबद्दल कोणीही त्यांना धन्यवादच देईल हे निःसंशय आहे.
सभेच्या नियोजित स्थळी डॉ. बाबासाहेबांचे आगमन होताच, त्यांच्या नावाचा प्रचंड जयघोष होऊन टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. क्षणार्धात सर्वत्र शांतता पसरली. प्रथम आरंभी स्वागतगीते व प्रास्ताविक भाषण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले,
प्रिय बंधु-भगिनींनो,
मुंबई विधीमंडळाच्या निवडणुकीसंबंधी आज अस्पृश्य वर्गाचे कर्तव्य कोणते हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. या विधीमंडळात प्रतिस्पर्ध्याशी झगडून आम्ही 15 जागा मिळविल्या आहेत. त्या सर्व जागांवर आपण आपलेच लोक निवडून दिले पाहिजेत. तसे न झाले तर आपल्यावर पस्तावण्याची पाळी येईल याची खुणगाठ बांधा. काँग्रेस ही आपली हितशत्रु आहे. काँग्रेस अस्पृश्यांकरिता काही करणार नाही. दोन वर्ष सात महिने काँग्रेसच्या हाती सत्ता असता तिने आपल्याकरता काहीच भरीव कार्य केले नाही. आज वीस वर्षे काँग्रेसचे व आमचे भांडण चालू आहे. आमची स्वातंत्र्याची य स्वावलंबनाची चळवळ हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने भलेबुरे सर्व प्रयत्न केले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी आमच्या राखीव जागेवरसुद्धा तिने आपल्या पदरचे हरिजन उभे केले आहेत.
यावेळी माझा तुम्हाला स्पष्ट इशारा आहे की, तुम्ही ही निवडणूक जिंकून राजकीय सत्तेच्या योग्य त्या मा-याच्या जागा काबीज करा. यातच संबंध अस्पृश्य वर्गाचे कल्याण आहे. महार समाज हा अस्पृश्य वर्गाचा म्होरक्या आहे हे सांगण्यास मला अभिमान वाटतो. आमची संघटना काँग्रेसच्या डोळ्यात सारखी सलत आहे.
मला सांगण्यास खेद वाटतो की, महार समाजातील बॅ. माने हे आपल्या हितशत्रुना सामिल झाले आहेत. आपल्या राखीव जागेसाठी सध्या तीन उमेदवार उभे आहेत. दलित फेडरेशनचे वराळे, फेडरेशनद्रोही माने आणि साम्राणी. पण साम्राणीनी आपली उमेदवारी परत घेतली असे समजते. अर्थातच आता वराळे विरुद्ध माने असाच सामना राहिला.
माझ्या असे ऐकण्यात आले आहे की माने हे स्वतःला स्वतंत्र उमेदवार समजतात आणि तसा प्रचारही करतात. पण त्यात काहीच अर्थ नाही. ते काँग्रेसचे बाहुले बनले आहेत. काँग्रेसचे तिकीट त्यांना मिळाले नाही म्हणून ते स्वतंत्र आहेत असे कोणी मानू नये. जरी काँग्रेसचे कुंकू त्यांना लागले नसले तरी काँग्रेसशी त्यांचा म्होतुर लागला आहे असे म्हणण्यास कोणती हरकत आहे? ज्याअर्थी, लठ्ठे मानेला निवडून आणणेकरिता सर्व तऱ्हेचे प्रयत्न करतात आणि काँग्रेसही आपला अधिकृत दुसरा उमेदवार जाहीर करीत नाही त्याअर्थी माने हेच त्यांचे उमेदवार आहेत ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते.
दिवाणबहादूर नव्हे, नव्हे ! भि. लठ्ठे हे बॅ. मानेला निवडून आणण्यासाठी मोठ-मोठ्या भडक प्रचाराच्या वल्गना करीत सुटले आहेत. मि. लठ्ठेना या जिल्ह्यात कितीसा पाठिंबा आहे कोण जाणे? त्यांना स्वतःला उमेदवारीचे तिकीट मिळविण्याच्या बाबतीत कॉंग्रेस हायकमांडपर्यंत नाकधु-या काढाव्या लागल्या. असे असता मि. लठ्ठेच्या प्रचाराचा काय उपयोग होणार आहे ? त्यांची ही दमबाजी आता सर्वांना कळून चुकली आहे.
काँग्रेसजनांच्या पैशावर बॅ. माने निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत. पण हा पैसा काँग्रेसचा नव्हे हे दाखविण्याकरिता तो महारवर्गानेच थैलीच्या रूपाने दिला असल्याचे भासविण्यात येते. दोन-दोन हजारांच्या थैल्या महारवर्ग देऊ शकेल काय ? येथे आजच्या सभेला 20 ते 25 हजार लोक उपस्थित आहेत. त्यांचा जर झाडा घेतला तर त्यांच्याजवळ शंभर कवड्याही निघणार नाहीत. मग हजाराची गोष्ट कशाला ? काँग्रेसचे हे भेदनीतिचे डावपेच आम्ही पुरतेपणी ओळखून आहोत. म्हणूनच आमचा स्पष्ट सवाल आहे की, हा पैसा तुम्ही अशा रितीने का ओतता ? आमची संघटना फोडण्याचाच उद्देश आहे ना ?
बॅ. माने आमच्यातून फुटू नयेत म्हणून मी पुष्कळ प्रयत्न केले. त्यांचे कल्याण व्हावे म्हणून मी झटलो. त्यांच्या शिक्षणाला करता येईल तेवढी मी मदत केली. त्यांच्या विद्येचा उपयोग व्हावा म्हणून मी काळजी वाहिली पण शेवटी माने यांनी आम्हाला दगा दिला. त्यांनी जज्ज व्हावे, सुप्रसिद्ध कायदे पंडित म्हणून कीर्ती मिळवावी अशी माझी फार इच्छा होती. पण ही माझी इच्छा फलद्रुप झाली नाही. त्यांनी शिकलेली विद्या उपयोगात आणली नाही. विलायतेला जाऊन इलेक्ट्रिसिटीचा कोर्स घेऊन परत येणाऱ्या माणसाने संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग न करता त्याने जसा वहाणाचा कारखाना काढावा तसेच मानेचे झाले आहे. कोल्हापूरसारख्या संस्थानात त्यांना आपली चमक दाखविता आली नाही. ज्या ठिकाणी अधिकारी वर्ग अस्पृश्यांच्या उन्नतीला पोषक आहे त्याठिकाणी त्यांना स्वतःची प्रगती साधता आली नाही त्या मानेना आता ब्रिटिश हिंदुस्थानात काय करता येणार आहे ? मान्यांनी स्वज्ञातीचा द्रोह केला आहे.
माझ्या असे प्रत्ययास आले आहे की, तंबाखुचा व्यापार करणाऱ्या महार लोकांना ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या आपणच मिळवून दिल्या असा माने यांनी प्रचार चालविला आहे. पण तो साफ खोटा आहे. ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या मी मिळविल्या आहेत, मान्यांनी नव्हे ! माने दिल्लीला माझ्याकडे आले आणि ते माझ्या घरीच उतरले. आपल्याला “कोल्हापूरच्या रिजन्सी कौन्सिलात मिनिस्टर करा” ही मागणी करण्याकरिताच ते माझ्याकडे आले. पण ते जमले नाही अशी वस्तुस्थिती आहे.
शेवटी तुम्हाला एवढेच सांगणे आहे की, श्री. वराळे यांनाच प्रचंड मताने निवडून द्या.