Categories

Most Viewed

13 फेब्रुवारी 1938 भाषण

स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर आधारलेली नवी पद्धती हे कामगार संघटनांचे ध्येय असावे.

मनमाड येथे अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद आयोजित करण्याविषयक भूमिका विशद करणारे रेल्वे अस्पृश्य कामगारांना उद्देशून पत्रक काढण्यात आले होते. ते येणेप्रमाणे

अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद मुक्काम मनमाड येथे या महिन्याच्या अखेरीस भरणार आहे. ही परिषद भरण्याचे ठरविण्यापूर्वी परिषदेच्या चालक मंडळींपैकी काही प्रमुख मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गेल्या महिन्यात भेटून गेली. ही परिषद भरविण्याचे खरे कारण आजकाल जिकडे तिकडे बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हलाखीची अवस्था निर्माण झाली आहे. गोरगरीब कामगारांना या अवस्थेची तीव्र जाणीव भासत असून त्यात अस्पृश्य कामगारांच्या हालअपेष्टांना सीमाच राहिलेली नाही. कामगारांपासून होणारा थोडाफार त्रास होतोच. शिवाय अधिकारी वर्गाकडून स्पृश्य वर्गीय होणाऱ्या त्रासाचे गाऱ्हाणे ऐकून घ्यावयास कुणी जबाबदार मंडळी नाही किंवा त्यांचे गाऱ्हाणे योग्य रीतीने अधिकारी वर्गापुढे मांडणारा खरा प्रतिनिधीही नाही. अंतःकरणाच्या खऱ्या जिव्हाळ्याशिवाय कार्य होत नसते ही सत्य गोष्ट अस्पृश्य वर्गीय कामगार बांधवांना आजपर्यंतच्या कटु अनुभवाने पूर्णपणे कळून आलेली आहे. रेल्वेचे राक्षसी काम रात्रंदिवस जिवापाड मेहनत करून करावयाचे आणि याचा मोबदला काय, तर एकवेळ पोटभर भाकरी मिळेल किंवा नाही इतके अल्प वेतन मिळावयाचे! ही कामगिरी करताना स्वतःच्या कौटुंबिक प्रपंचाकरिता कर्जबाजारी होण्याची वेळ येते ती गोष्ट निराळीच. अशी बिकट परिस्थिती अस्पृश्यतेच्या कलंकाबरोबर अनुभवीत राहाणे दिवसेंदिवस कठिण होत आहे. या सर्व गोष्टींचा साधकबाधकरित्या विचार करून सर्व अस्पृश्य कामगारांना एकत्रित करून आपल्या यापुढील कार्याची रूपरेषा आखण्याकरिता काही प्रमुख मंडळींनी ही अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद भरविण्याचे ठरविले आहे.

मनमाड येथे भरणाऱ्या या उपनिर्दिष्ट परिषदेचे अध्यक्षस्थान अस्पृश्य वर्गाचे सन्माननीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारण्याचे कबूल केले आहे. अस्पृश्य वर्गाची सर्वांगीण उन्नती करून त्यांना राजकीय हक्क मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी केलेला आजपर्यंतचा स्वार्थत्याग जनतेच्या डोळ्यांसमोर आहे. हिंदुस्थानातील जी. आय. पी. रेल्वेवर अस्पृश्य वर्गीय कामगार पुष्कळ आहेत. यांची योग्य संघटना केल्यावर भांडवलदार व कारखानदार वर्गाविरूद्ध होत असलेल्या लढ्यासंबंधी योग्य चर्चा होऊन या परिषदेच्या अधिवेशनाने अखिल रेल्वे कामगारांच्या बऱ्याच हिताच्या गोष्टी घडल्याशिवाय रहाणार नाहीत. कामगारांचे जीवन किती कष्टमय असते याची कल्पना नुसत्या पुस्तकी विद्येने होणार नाही. त्या प्रत्यक्ष बिकट अशा जीवनकलहात समरस झाल्याशिवाय त्यांच्या असह्य परिस्थितीची कल्पना येणे कठीण आहे. रेल्वेसारख्या श्रीमान आणि बलाढ्य अशा व्यापारी संस्थेने आपल्या कामगारांविषयी योग्य काळजी घेणे किती आवश्यक आहे ही गोष्ट दुसऱ्याने सांगून उपयोगी नाही. त्याची जाणीव या धनिक लोकांना प्रथम होणे जरूरीचे आहे. ज्यांच्या श्रमावर आपण श्रीमंत होऊन ऐषारामामध्ये लोळत आहोत त्या कामगारांना निदान दोनवेळ पोटभर अन्न मिळण्याइतके वेतन देणे प्रत्येक कारखानदाराचे धनिकाचे आणि भांडवलवाल्याचे पहिले असे कर्तव्यकर्म आहे. कामगारांचा लढा म्हणजे पोटाच्या प्रश्नाचा आहे. आपणास आणि आपल्या मुलांबाळांस दोनवेळ कशी मिठभाकर मिळेल याची विवंचना या कामगार बांधवांना लागलेली असते. अशा वेळी थोडीशी विश्रांती आणि ऐषाराम करण्याकडे त्यांची प्रवृत्ती होण्याइतकी मनःस्थिती स्थीर नसते. या सर्व परिस्थितीचा विचार करुन ही परिषद भरविण्याचे ठरले आहे.

ही परिषद यशस्वी करण्याकरिता मनमाड, भुसावळ, कल्याण, इगतपुरी, नांदगाव, दौंड, सोलापूर, ठाणे व मुंबई वगैरे ठिकाणच्या प्रमुख कार्यकर्त्या मंडळींनी डॉ. बाबासाहेबांबरोबर आगाऊ विचार विनिमय केलेला आहे. परिषदेची ही कल्पना प्रसिद्ध होताच मुंबई पासून दिल्ली, अलाहाबाद, लखनौ, कानपूर, जबलपूर, रायपूर वगैरे बँच लाईन विभागातून ही परिषद यशस्वी करण्याबद्दल प्रत्यक्ष सहानुभूतीचा पाठिंबा मिळत आहे. अशा तऱ्हेने ही प्रत्येक प्रांतातील प्रतिनिधींची प्राथमिक स्वरूपाची खरी कॉन्फरन्स यशस्वी करण्याकरिता सर्व अस्पृश्य रेल्वे कामगारांनी परिषदेच्या चालक मंडळीला आपुलकीच्या प्रेमाने, कार्याच्या कळकळीने मदत करणे आवश्यक आहे. या परिषदेचे जनरल सेक्रेटरी श्री. आर. आर. पवार हे आहेत. यांच्या कार्याविषयी अस्पृश्य रेल्वे कामगारांना पूर्ण जाणीव आहे. तसेच परिषदेची इतर चालक मंडळीविषयी आमच्या अस्पृश्य रेल्वे कामगारांना माहिती आहे. शिवाय ही परिषद आपले परमपूज्य पुढारी व स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास अध्यक्षतेखाली भरणार आहे. परिषदेची विनंती पत्रके व वर्गणीसाठी पावत्या पुस्तके ठिकठिकाणच्या परिषदेच्या कार्यकर्त्यांकडे पाठविल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक अस्पृश्य रेल्वे कामगाराने परिषदेचे प्रतिनिधी झालेच पाहिजे. आपली संघटना स्वावलंबनाच्या मार्गाने केल्याशिवाय आपल्या कार्यास खरे यश प्राप्त होणार नाही. हा डॉ. बाबासाहेबांचा संदेश प्रत्येक अस्पृश्य रेल्वे कामगारांनी आपल्या अंतःकरणात जागृत ठेवावा.

मनमाड येथे अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषद यशस्वी करण्यात आपल्या कामगार चळवळीच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे ही गोष्ट प्रत्येकाने पूर्णपणे लक्षात ठेवून ही परिषद तनमनधनाने विजयी करण्याचा आजच निर्धार करावा.

वरील परिषद याच वर्षी मुक्काम मनमाड येथे भरविण्याचे नक्की ठरले होते. परंतु परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्वी ठरलेल्या तारखांना इतर कामामुळे हजर राहाणे अशक्य झाले होते. आता ही परिषद मुक्काम मनमाड येथे तारीख 29 व 30 जानेवारी 1938 रोजी नक्की भरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या तारखांना परिषद भरविण्यास परिषदेच्या चालकांना कळविताच ते परिषदेच्या तयारीस मोठ्या जोमाने लागले आहेत. रेल्वे किंवा गिरण्या अथवा मोठमोठ्या कारखान्यांत अस्पृश्य मानलेल्या कामगारांना किती त्रास होतो. त्यांना या अंगमेहनतीच्या कामात सुद्धा केवळ अस्पृश्यतेमुळे किती मानहानी सोसावी लागते, तसेच आर्थिकदृष्ट्याही अस्पृश्य कामगारांना अतोनात नुकसान सोसावे लागते. ही प्रत्यक्ष परिस्थिती एकदा जगाच्या निदर्शनास आणून आजच्या सुधारणेच्या काळातही अस्पृश्यतेचा कलंक अस्पृश्य कामगारांना कसा नडतो याची सहज खात्री पटविता येईल. अस्पृश्य कामगारांवर होणाऱ्या या अन्यायाचे निर्मूलन होण्याकरिता ही रेल्वे कामगारांची निराळी व स्वतंत्र अशी परिषद भरविणे परिस्थितीने भाग पाडले आहे. अस्पृश्य कामगारांना इतर कामगारांपासून कधीही विभक्त व्हावयाचे नाही. सर्व कामगारांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्यात अस्पृश्य कामगार त्यांच्याशी सहकार्य करीलच. परंतु आज अस्पृश्य कामगाराला अस्पृश्यतेमुळे जी बिकट परिस्थिती प्राप्त झाली आहे, त्याचा विचारविनिमय करण्याकरिता व इतर कामगारांच्या हितसंबंधाच्या प्रश्नांसंबंधी नक्की धोरण ठरविण्याकरिता ही जी. आय. पी. रेल्वे कामगार परिषद भरविण्यात येत आहे.

या परिषदेचा वरीलप्रमाणे थोडक्यात खुलासा केलेला आहे. तरी अस्पृश्य रेल्वे कामगारांनी आपली संघटना करून ही मनमाडची परिषद यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा. या परिषदेचे तरूण व उत्साही जनरल सेक्रेटरी श्री. आर. आर. पवार यांनी परिषद अपूर्व व यशस्वी करण्याचा संकल्प केला असून ते आपल्या सहकारी व कार्यकारी मित्र मंडळीच्या मदतीने हे कार्य करावयास लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षपदावरून रेल्वे कामगारांना मार्गदर्शक होईल अशा धोरणाचे भाषण करणार आहेत. ही परिषद अखिल भारतीय स्वरूपाची आहे. तिचे यश म्हणजे भारतीय रेल्वे अस्पृश्य कामगारांचे खरे हित होय. म्हणून सर्व कामगारांनी आपल्या प्रचंड शक्तीने ही परिषद जोमाने आणि अपूर्व विजयाने पार पाडण्यासाठी परिषदेच्या चालकमंडळीशी प्रत्यक्ष सहकार्याने मदत करावी. अस्पृश्य कामगार प्रसंग पडल्यास आपली चळवळ स्वावलंबनाच्या मार्गाने कशी यशस्वी करू शकतात हेही जगाला कळेल. आमचे जागृत झालेले रेल्वे अस्पृश्य कामगार आपल्या कर्तव्यकर्मास जागून या परिषदेची अलौकिक शक्ती सर्वांना दाखविल्याशिवाय राहाणार नाहीत अशी आम्हास खात्री वाटते.

सदरहू परिषदेला हजर राहाण्याविषयीचे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनरल सेक्रेटरी यांना पाठविले. त्याप्रमाणे जनरल सेक्रेटरी यांनी बाबासाहेबांना पत्र पाठविले आणि जाहीर खुलासा प्रसिद्ध केला. सदरहू दोन्ही पत्र व खुलासा येणे प्रमाणे :-

“राजगृह, हिंदू कॉलनी,
दादर- मुंबई तारीख 14-1-1938.

श्रीयुत रामचंद्रराव पवार,
जनरल सेक्रेटरी,
रेल्वे दलित कामगार मंडळ व कामगार लोक यासी :

मनमाड येथे भरणारी रेल्वे दलित कामगार परिषद ही सर्व दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी परिषद होणार आहे. या परिषदेस तारीख 29 व 30 जानेवारी 1938 रोजी मी हजर राहीन असे कबूल केले होते. परंतु अपरिहार्य कारणामुळे वरील तारखांना मला हजर राहाता येत नाही याबद्दल वाईट वाटते. सदरची तारीख फक्त 15 दिवसांनी पुढे वाढविल्यास सदर वेळी परिषदेस हजर राहण्यास मला भरपूर अवधी मिळेल. साठी सदर परिषद तारीख 12 व 13 फेब्रुवारी 1938 शनिवार व रविवार रोजी घेतल्यास ठीक होईल. तसेच अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील सटाणे व काझीसांगवी या गावांना मी भेट देण्याविषयी तिकडील लोकांची असलेली इच्छाही तृप्त करता येईल. साठी सदर परिषद वरील तारखेस घेण्याची कृपा करावी. आपल्यापैकी अनेकांना तारीख 29 व 30 जानेवारी 1938 रोजीची रजा व पास मिळविण्याबाबत बराच त्रास झाला असेल हे मला कबूल आहे. त्याबद्दल आपण मला माफ करावे अशी विनंती आहे. कळावे लोभ असावा ही विनंती.

आपला कृपाभिलाषी,
भिमराव रा. आंबेडकर.

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणी शीर साष्टांग दंडवत वि. वि. आपले आज्ञेप्रमाणे रेल्वे दलित कामगार परिषद तारीख 12 व 13 फेब्रुवारी 1938 शनिवार व रविवार रोजी स्वागत मंडळाच्या विचारे ठेविली आहे. चरणी श्रुत होय.

आपला नम्र सेवक
आर. आर. पवार,

: जाहीर खुलासा :

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज्ञेनुसार रेल्वे दलित कामगार परिषद तारीख 12 व 13 फेब्रुवारी 1938 शनिवार व रविवार रोजी घेण्याचे निश्चित ठरले असून लवकरच कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येईल.

आपला नम्र सेवक,
आर. आर. पवार,
जनरल सेक्रेटरी,
मनमाड रेल्वे दलित कामगार परिषद,

: मनमाड येथील त्रिवेणी संगम :

शनिवार व रविवार तारीख 12 व 13 फेब्रुवारी 1938 रोजी मुक्कम मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेसाठी एक भव्य मंडप मनमाड स्टेशनजवळच मि. इब्राहिम ताजभाई शेठ यांच्या जागेत उभारून त्याला दलित कामगार नगर असे नाव देण्यात आले आहे. आजपर्यंत रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या अस्पृश्य कामगारांवर जो अन्याय होत आहे. त्यांची चहूबाजूंनी जी एकप्रकारची कुचंबणा होत आहे. या सर्व हृदयद्रावक गोष्टींचा विचारविनिमय या परिषदेमध्ये प्रामुख्याने होईल. कामगार म्हटला की त्याला जात नाही. धर्म नाही वगैरे उच्च तत्त्वे मान्य करूनही अस्पृश्य कामगारावर केवळ अस्पृश्यतेमुळे कसा अन्याय होतो हे या परिषदेच्या अधिवेशनामध्ये नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगणार आहेत. तसेच कामगारांच्या खऱ्या लढाऊ लढ्याची दिशा कोणती याचेही योग्य रीतीने विवेचन करणार आहेत. तरी अशा महत्त्वाच्या परिषदेच्या अधिवेशनाला प्रत्येक अस्पृश्य मानलेल्या रेल्वे कामगाराने प्रतिनिधी होऊन अवश्य हजर रहावे.

: परिषदेचा कार्यक्रम :

शनिवार तारीख 12 फेब्रुवारी 1938 रोजी सकाळी 8 ते 11 विषयक नियामक कमिटीची बैठक, दुपारी 3 वाजता स्वागताध्यक्ष श्री. पी. एन. बनकर यांचे भाषण, अध्यक्षांची सूचना स्वागतपर पदे व पोवाडे संदेश वाचन, रात्रौ भोजनानंतर जलसे.

रविवार तारीख 13 फेब्रुवारी 1938 रोजी सकाळी 9 वाजता अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व इतर कार्यक्रम.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनमाड येथे शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी मुक्काम आहे. शनिवारी रेल्वे परिषदेच्या कामकाजापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व काही निमंत्रित मंडळीकरिता मुक्काम सटाणे व काझीसांगवी येथे जाहीर पानसुपारी निमित्त छोटे कार्यक्रम उरकून घेण्यात येतील.

: मुंबई इलाखा अस्पृश्य युवक परिषद :

शनिवार तारीख 12 रोजी रात्री 8 वाजता वरील युवक परिषदेचे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे. या युवक परिषदेमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचा कार्यक्रम सर्व इलाख्यामध्ये जोमाने अंमलात आणण्याविषयी विचारविनिमय होऊन पुढील कार्यक्रमाची दिशा आखली जाईल. आपल्या पक्षाचा कार्यक्रम युवकांच्याच मदतीने यशस्वी होणार असल्यामुळे या युवक परिषदेचे महत्व जाणुन सर्व तरुणांनी या परिषदेस अगत्यपूर्वक हजर रहावे.

: महाराष्ट्रीय अस्पृश्य महिला परिषद :

तरूणांच्या परिषदेप्रमाणेच ही अस्पृश्य महिलांची परिषद दलित कामगार नगरात रविवार तारीख 13 फेब्रुवारी रोजी रोजी दुपारी तीन पुण्याच्या प्रमुख कार्यकर्त्या सौ. मैनाबाई शामराव भोळे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे. या परिषदेच्या स्वागताध्यक्षाच्या जागी वेणूबाई रविकांत जाधव यांची निवड केली आहे. या महिला परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांना आपल्या चळवळीच्या कामगिरी संबंधी संदेशात्मक भाषण होईल. याशिवाय इतर भाषणे, ठराव वगैरे कार्यक्रम होईल.

या दोन दिवसात मनमाड येथे हे होणारे प्रचंड कार्यक्रमाचे कार्य निर्विघ्नपणे यशस्वी करण्याची सारी व्यवस्था रेल्वे परिषदेच्या कार्यकारी मंडळाकडून ठेवण्यात येईल.

: करमणुकीचे कार्यक्रम :

या दोन्ही दिवशी प्रमुख पाहुणे मंडळी, प्रतिनिधी व प्रेक्षक मंडळींची करमणूक करण्याकरिता निरनिराळे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. या प्रसंगी नाशिक जिल्हा युवक संघाचा जलसा, मनमाड येथील जुनी रूढीविध्वंसक जलसा मंडळ, नाशिकरोड येथील सत्यवादी सामाजिक जलसा, याशिवाय चांदवड, जोपूळ इत्यादिकांचे जलसे शाहीर घेगडे यांचे पोवाडे, गायन, कातरगावकर व वडाळा येथील श्री. एस. आर. साळवे यांच्या मुलामुलींचा संगीत मेळा असे विविध कार्यक्रम होतील.

अशारितीने मनमाड येथे होणाऱ्या परिषदांचे कार्यक्रम वर नमूद केले आहेत. यामुळे या महत्त्वाच्या तीन परिषदांचा त्रिवेणी संगमाचा आलेला अपूर्व योगायोग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या स्वावलंबनाच्या व स्वातंत्र्याच्या चळवळीला विशेष पोषक होईल यात मुळीच शंका नाही. ही सारी जबाबदारीची कार्ये पार पाडण्याच्या कामी मे. आर. आर. पवार, बनकर, अहिरे, खरे, संसारे, पाटील, सरोदे, मोरे, पगारे व तेलुरे वगैरे मंडळी झटत आहेत हे त्यांना खरोखरच भूषणावह आहे.

या तिन्ही महत्त्वाच्या परिषदा यशस्वी करण्याच्या बाबतीत मुंबई इलाख्यातीलच अस्पृश्य बंधुभगिनींनी सहाय्य करून भागणार नाही, तर इतर प्रांतातील मंडळींनीही सहकार्य करावे, या तिन्ही परिषदांसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नाशिकरोड, इगतपुरी, धानोरी, नागपूर वऱ्हाड प्रांतातून प्रतिनिधी हजर राहाणार आहेत.

: नागपूरच्या पाहुणेमंडळीशी विचारविनिमय :

रविवार तारीख 13 फेब्रुवारी 1938 रोजी दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान नागपूर वऱ्हाड प्रांतातून आलेल्या प्रतिनिधींबरोबर येथील चळवळी संबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारविनिमय करणार आहेत. परिषदेमधील करमणुकीच्या कार्यक्रमात वेळेनुसार फरक करण्यात येईल. या परिषदांसाठी चाळीसगाव येथून बैंड येणार असून परिषदांच्या जाहीर कामकाजासाठी मंडपात लाऊड स्पीकरची योजना दोन्ही दिवसांकरिता केली आहे.

जनता पत्र व स्वतंत्र मजूर पक्ष यांच्यासाठी दोन स्वतंत्र ऑफिसे ठेवण्यात आली आहेत. जनता पत्राचे वर्गणीदार होणारांनी आपली वार्षिक वर्गणी येथे भरावी. तसेच स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होणारांनी या ऑफिसात आपली वर्गणी भरावी, याशिवाय या दोन्ही ऑफिसात आपल्या चळवळी संबंधी माहिती देण्याची व्यवस्था केली आहे.

इतके दिवस गाजत असलेले अखिल जी. आय. पी. रेल्वे अस्पृश्य कामगारांच्या परिषदेचे अधिवेशन गेल्या शनिवार व रविवार तारीख 12 व 13 फेब्रुवारी 1938 रोजी यशस्वीरीतीने पार पडले. या परिषदेसाठी दलित-कामगार नगराची केलेली सजावट उत्कृष्ट होती. निदान 20 हजार लोकसमुदाय बसेल अशी व्यवस्था परिषदेच्या चालकांनी केली होती. तसेच परिषदेतील भाषणे सर्वांना ऐकायला मिळावीत म्हणून खास ‘लाऊड स्पीकर’ ची योजना केली होती. अध्यक्ष व कर्मचारी मंडळासाठी एक छोटेसे व्यासपीठ तयार केले होते. त्यावर कित्येक प्रमुख कार्यकर्त्यांचे फोटो व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य फोटो पुष्पहाराने मंडित केलेला होता. व्यासपीठाच्या उजव्या बाजूस स्त्रियांकरिता खास निराळी व्यवस्था केली होती. व्यासपीठाच्या आजुबाजूला स्वागत मंडळाचे प्रतिनिधी व निमंत्रित पाहुणे मंडळींची व्यवस्था ठेवण्यात आली होती.

शनिवारी सायंकाळी परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या मित्रमंडळींसह दलित कामगार नगरात प्रवेश करताच त्यांचे बँडच्या सुस्वर वादनाने व त्यांच्या नावाच्या गगनभेदी जयजयकाराने मोठ्या उत्साहाने, प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत करण्यात आले. ते व्यासपीठावर चढून बसेपर्यंत डॉ. आंबेडकरांचा जयजयकार असो, डॉ. आंबेडकर झिंदाबाद. कामगारांचा विजय असो वगैरे प्रकारच्या जयजयकाराने ते सारे वातावरण कित्येक मिनिटे दुमदुमून गेले होते. यानंतर स्वागत पदे व अभिनंदनाची गाणी लहान मुलामुलींच्या मेळ्याने सुस्वर आवाजात गाऊन दाखविली. याबाबतीत श्री. शंकरराव साळवे यांनी बरीच मेहनत घेतली होती. परिषदेच्या कामकाजास सुरुवात होण्यापूर्वीच सारे दलित कामगार नगर स्त्री-पुरुषांच्या प्रचंड जमावाने फुलून गेले होते. त्यात नगराची लतापताकांनी आणि दिव्यांच्या प्रकाशाने केलेली रोशनाई विशेष मनोवेधक दिसत होती. कामगार नगरात पुन्हा शांतता उत्पन्न होताच स्वागताध्यक्ष श्री. पी. एन. बनकर यांनी आपले भाषण वाचून दाखविले. त्यांच्या भाषणानंतर परिषदेचे उत्साही जनरल सेक्रेटरी श्री. रामचंद्रराव पवार यांनी परिषदेच्या कामकाजाचे आमंत्रित मंडळींचे प्रतिनिधींचे स्वागत केले आणि परिषदेसाठी आलेले संदेश वाचून दाखविले. संदेशांपैकी अस्पृश्य समाजाचे एक प्रमुख पुढारी मे सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर यांचा संदेश विशेष महत्त्वाचा व अस्पृश्य कामगारांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा असा होता. याशिवाय रत्नागिरी उत्तर विभाग स्वतंत्र मजूर पक्षाच्या शाखेचे अध्यक्ष व श्रमजिवी वर्गाचे पुढारी भाई अनंतराव चित्रे यांचा महाडहून एक संदेश आला होता. त्यांनी आपल्या संदेशात रत्नागिरी उत्तर भागातील शेतकरी वर्गातर्फे परिषदेचे यश चिंतले होते. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या चळवळीला नवीन दिवस दाखविण्यासाठी या परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारल्याबद्दल अत्यानंद व्यक्त केला आहे. त्यांच्या अतुल पराक्रमाच्या आणि योग्य अशा नेतृत्वाखाली मजुरांच्या चळवळीचा खात्रीने भाग्योदय होईल. त्यासाठी आपण सर्वांनी आपली जोमदार संघटना करून प्रत्यक्ष कार्याला लागण्याचा आजच संकल्प करावा वगैरे, अशी कळकळीची विनंती केली आहे. याशिवाय इतर शुभ संदेश वाचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षपदी रीतसर निवड करण्यात आली. त्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात अध्यक्षस्थान स्वीकारताच त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

डॉ. बाबासाहेबांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर छोटेसे प्रास्ताविक भाषण केले. त्यात त्यांनी आपल्यावर या परिषदेच्या कार्याची मोठीच जबाबदारी परिषदेच्या चालक मंडळीने टाकली असून त्यातून पार पाडण्यास आपण सर्वांनी साहाय्य करावे असे निवेदन केले. तसेच आज येथे जमलेले हजारो कामगार बांधव आपली दु:खे वेशीवर टांगण्यासाठी इतक्या निर्भयपणे एकत्र जमलेले पाहून मला आनंद होत आहे. आपल्या सुख दुःखाचा विचार करून आपल्या असहाय अवस्थेतून आपणास कशारीतीने मार्ग काढता येईल यासंबंधी दुसरे दिवशी अध्यक्ष या नात्याने आपल्या भाषणात आपले विचार मांडण्याचे आश्वासन दिले. या परिषदेसाठी जी प्रमुख आमंत्रित मंडळी हजर राहिली होती त्यात श्री. देवराव नाईक, कमलाकांत चित्रे, द. वि. प्रधान, आर. डी. कवळी, भा. र. कद्रेकर, नागपूरचे मि. हरदास, एम. एल. ए.. डॉ. एस. सी. जोशी, भाऊराव कृष्णराव गायकवाड, भंगी समाजाचे पुढारी श्री. रामा शिवा पाला, ठाण्याचे शिवराम गो. जाधव, विठ्ठलराव रणखांबे, गणपतराव निळे, युवक परिषदेचे स्वागताध्यक्ष, मुरलीधर पगारे, मनमाडचे माजी कौन्सिलर रामभाऊ जमघाडे, याशिवाय इतर प्रांतातील प्रमुख मंडळी हजर होती. आमदार मंडळींपैकी श्री. राजाराम भोळे के. एस. सावंत, प्र. ज. रोहम, डी. जी. जाधव, वगैरे मंडळीही हजर होती.

रविवारी सकाळी विषयनियामक कमिटीचे कामकाज संपल्यावर परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. आज परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण होणार होते. परिषदेच्या कामाला थोडावेळ उशीराने सुरवात झाली होती. दलित कामगार नगरात ऊन पडू लागले होते तरी प्रचंड लोकसमुदाय डॉक्टर साहेबांचे भाषण ऐकण्यासाठी हजर होता. प्रथम काही मामुली कार्यक्रम झाल्यावर डॉ. आंबेडकरसाहेब टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उभे राहिले.

ते आपल्या भाषणात म्हणाले,
मित्रांनो, जी. आय. पी. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही परिषद आहे. यापूर्वी या प्रदेशात व इतर ठिकाणीही दलित वर्गाच्या अनेक परिषदा झालेल्या असून त्या विशिष्ट अर्थाने ही पहिली परिषद नव्हे. परंतु दुसऱ्या अर्थाने पाहिले तर अशा प्रकारची ही पहिलीच परिषद आहे. यापूर्वी दलित वर्गाने सामाजिक अन्यायाचे निवारण करण्यासाठी तत्त्वशः लढा दिलेला आहे. त्यांच्या आर्थिक तक्रारीसंबंधी दलित वर्ग प्रथमतःच या परिषदेच्याद्वारा एकत्र येत आहे. आजपर्यंत परियांची परिषद म्हणून ते एकत्र येत होते. परंतु आज तुम्ही कामगार या नात्याने एकत्र येत आहात. सामाजिक तक्रारी दूर करण्यावर आपण आजपर्यंत आपले प्रयास केन्द्रित केले यात आपली काही चूक झाली, असे मला म्हणावयाचे नाही. इतर लोक काहीही म्हणोत परंतु हे सामाजिक अन्याय आपली माणुसकी चुरगळून टाकणारे वरवंटे आहेत. आपल्या संघर्षाला कसलीच फळे आली नाहीत, असेही म्हणता येण्यासारखे नाही. आपण अस्पृश्यतेचा नायनाट करण्यात अजून यशस्वी होऊ शकलो नाही, हे खरे आहे. प्रत्येक मानवाला मिळालेच पाहिजेत अशा स्वरूपाचे काही अत्यंत मूलभूत स्वरूपाचे हक्क आपणाला अजूनही मिळाले नाहीत, हेही खरे आहे. परंतु राजकीय सत्ता मिळविण्यात आपण यश मिळविले आहे, हेही तितकेच खरे आहे. ज्यांच्याजवळ सत्ता असते त्यालाच स्वातंत्र्य असते, हा सिद्धान्त कोणीही नाकारू शकत नाही. स्वातंत्र्य मिळविण्याचे व सर्व अडचणीतून मुक्त होण्याचे एकमेव साधन सत्ता हेच असून धार्मिक व आर्थिक शक्ती इतकी नसली तरी राजकीय शक्तीही खरीखुरी शक्ती असून बरीच परिणामकारीही आहे. सांगण्यास दुःख वाटत आहे की, दलित वर्गाला नवीन घटनेप्रमाणे जे राजकीय हक्क मिळालेले आहेत ते आपल्या शत्रुंनी आपल्या यंत्रणेद्वारे आणि आपल्यातील स्वार्थी, गरजू आणि दुराचारी लोकांच्या साहाय्याने कुचकामी करून टाकले आहेत. ज्या सत्तेमागे संघटनेची शक्ती नसते, ज्या सत्तेमागे सुजाणपणा नाही, ती सत्ताच नव्हे. एक दिवस-फार दुरच्या काळात नव्हे-दलित वर्ग संघटित होईल व त्यांना मिळालेल्या राजकीय सत्तेचे त्यांना महत्त्व कळून येईल. आपल्या सामाजिक मुक्तीसाठी त्याचा परिणामकारकपणे उपयोग करून घेतील, अशी मला आशा वाटते.

आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने झाले असे जरी मला म्हणावयाचे नसले तरी आम्ही फारच लांब काळपर्यंत आपल्या सामाजिक समस्येइतक्याच तीव्र असलेल्या आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून आज आपण अस्पृश्य म्हणून नव्हे तर कामगार म्हणून एकत्र जमत आहोत याबद्दल मला आनंद होत आहे. हा नवीन मार्ग असून त्याची चर्चा करण्याची ज्यांनी ज्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली त्यांचे मी अभिनंदन करतो.

तथापि, असेही काही लोक आहेत की या आपल्या पावलाबद्दल अशुभ भावना बाळगून असून या परिषदेत भाग घेण्याबद्दल त्यांनी मला दोष दिलेला आहे. कामगार पुढाऱ्यांकडून ही टीका झाली नसती तर त्याची मी पर्वा केली नसती. ही दलित वर्ग कामगारांची वेगळी परिषद भरवून मी कामगारांमध्ये फूट पाडीत आहे, असे त्यांच्या तक्रारीचे सार दिसते. माझ्या मते या देशातील कामगारांना दोन शत्रूशी तोंड द्यावे लागेल. हे दोन शत्रू म्हणजे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे होत. कामगारांना ज्यांच्याशी दोन हात करणे प्राप्त आहे अशा ब्राह्मणशाहीला शत्रू म्हणून ओळखण्यात अपयश आल्यामुळे ही टीका काही प्रमाणात उद्भवली आहे. ब्राह्मणशाहीशी शत्रुच्या नात्याने दोन हात करावे लागतील, असे मी जे म्हणतो त्याचा चुकीचा अर्थ कोणी घेऊ नये, असे मला वाटते. ब्राह्मणशाही या शब्दाने ब्राह्मण जातीची सत्ता, हक्क व तिचे हितसंबंध मला सूचवायचे नाहीत. त्या अर्थाने हा शब्द मी वापरीत नाही. ब्राह्मणशाही या शब्दाचा स्वातंत्र्य, समता व बंधूभाव या तत्त्वांचा अभाव, असा अर्थ मला अभिप्रेत आहे. या अर्थाने त्याने सर्व बाबींमध्ये कहर माजविलेला असून ब्राह्मण तिचे जनक असले तरी आता हा अभाव केवळ ब्राह्मणांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. या ब्राह्मणशाहीचा सर्वत्र संचार झालेला असून तिने सर्व वर्गाचे विचार व आचार नियंत्रित केले आहेत. ही निर्विवाद गोष्ट आहे. याशिवाय ही ब्राह्मणशाही काही विशिष्ट वर्गांना खास अधिकार देते ही सुद्धा दुमत न होणारी बाब आहे. ती काही इतर वर्गांना संधीची समानता सुद्धा नाकारते. ब्राह्मणशाहीचे दुष्परिणाम केवळ सहभोजन व आंतरजातीय विवाह या सारख्या सामाजिक हक्कापर्यंतच मर्यादित नाहीत.

जर इतकेच असते तर तिच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसती. परंतु केवळ इतकेच नाही. हक्कांपेक्षा वेगळ्या असलेल्या नागरी हक्का पर्यंतही तिचा व्याप पसरलेला आहे. सार्वजनिक शाळांचा, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक वाहने, सार्वजनिक विश्रामस्थाने यांचा उपयोग करणे हे नागरी हक्कांचे विषय आहेत. सार्वजनिक फंडाद्वारे उभारण्यात आलेली किंवा सार्वजनिक फंडाद्वारे चालविण्यात आलेली प्रत्येक बाब प्रत्येक नागरिकाच्या उपयोगासाठी खुली असली पाहिजे. परंतु असे कोट्यावधी लोक आहेत की त्यांना हे नागरी हक्क नाकारण्यात आले आहेत. या देशात हजारो वर्षांपासून मोकाट सुटलेल्या व विजेच्या जिवंत प्रवाहाप्रमाणे अजूनही कार्यशील असलेल्या या ब्राह्मणशाहीचा हा परिणाम आहे. याबद्दल कोणाला शंका आहे काय ? ब्राह्मणशाही इतकी सर्वव्यापी आहे की आर्थिक संधीच्या प्रदेशावरही तिचा अंमल चालतो. दलितवर्ग कामगाराचे उदाहरण घ्या आणि इतर वर्गांच्या कामगारांबरोबर त्याची तुलना करून पाहा. रोजगार मिळविण्या त्याला कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ? नोकरीची सुरक्षितता व तिच्यातील प्रगतीच्या दृष्टीने त्याचे भवितव्य काय आहे ? तो अस्पृश्य असण्यामुळे अनेक उद्योगांचे दरवाजे त्याच्यासाठी बंद आहेत, ही कुप्रसिद्ध गोष्ट आहे. या मुद्याशी संबंधित कापड कारखान्यात घडलेला प्रसंग कुप्रसिद्धच आहे. भारताच्या इतर भागात काय घडते, याची मला कल्पना नाही. परंतु मुंबई इलाख्यातील मुंबई व अहमदाबाद येथील कापड गिरण्यातील विणाई विभागाचे दरवाजे दलित वर्गासाठी बंद आहेत, एवढे मला निश्चितपणे माहीत आहे. ते फक्त सूतकताई विभागातच काम करू शकतात. या सूतकताई विभागात सर्वात कमी पगार आहेत. त्यांना विणाई विभागातून वगळण्यात आले याचे कारण म्हणजे ते अस्पृश्य आहेत! आणि इतर हिंदू कामगार मुसलमान कामगारांसोबत काम करण्यास तयार असले तरी अस्पृश्य कामगारांसोबत काम करण्यास तयार नाहीत!

रेल्वेचे उदाहरण घ्या. रेल्वेतील दलित वर्गाच्या कामगारांची स्थिती कशी आहे ? त्यांच्या नशिबात गँगमन म्हणूनच काम करणे आहे, हे कोणीही नाकबूल करू शकत नाही. दिवसेन्दिवस तो जन्मभर गँगमन म्हणून काम करीत राहातो आणि बढती होण्याची त्याला काही आशा नसते. त्याच्यासाठी वरच्या दर्जाची कोणतीच जागा खुली नाही. क्वचितप्रसंगीच त्याला पोर्टर नेमण्यात येते. त्याचे कारण असे की पोर्टर असल्यामुळे त्याला स्टेशन मास्तरच्या घरची घरकामेही आपल्या नोकरीचा एक भाग म्हणूनच करावयाची असतात. स्टेशनमास्तर हा बहुधा उच्च वर्गाचा हिंदू असतो व पोर्टर अस्पृश्य असल्यास या उच्चवर्णाच्या स्टेशनमास्तरच्या घरची घरेलू कामे करण्यास तो चालू शकत नसल्यामुळे दलित वर्गापैकी असलेला पोर्टर निरुपयोगी ठरतो, हे त्याचे कारण आहे. म्हणून हा स्टेशनमास्तर दलित वर्गातील माणसाला पोर्टर नेमण्याचे टाळतो. रेल्वेमध्ये कारकुनाची पात्रता ठरविणारी एखादी परीक्षा घेण्यात येत नसून मॅट्रिक परीक्षा पास नसलेलेच बहुधा या जागी नेमण्यात येतात. भारतातील ख्रिश्चन, अँग्लो-इंडियन आणि उच्च वर्णाच्या हिंदूपैकी शेकडो नॉनमॅट्रिक कारकून रेल्वेमध्ये नेमण्यात आलेले आहेत. परंतु दलित वर्गापैकी शेकडो मुलांना या जागेसाठी पद्धतशीरपणे डावलण्यात आले असून कोणाला क्वचितच तशी संधी मिळते. अशीच स्थिती रेल्वे वर्कशॉपमध्येही आहे. मेकॅनिकच्या जागी दलित वर्गाच्या माणसाला क्वचितच नेमण्यात येते. मिस्त्रीची जागा दलित वर्गाच्या माणसाला देण्यात आली, असे उदाहरण मुश्किलीने आढळेल, त्याला वर्कशॉपमध्ये फोरमन किंवा चार्जमन क्वचितच करण्यात येते. तो फक्त हमाल आहे आणि हमालच राहतो. दलित वर्गाची रेल्वेतील अवस्था अशी आहे. ज्या उद्योगात त्याच्या पात्रतेनुसार काम मिळण्याची आशा असते तेथे त्याला खालच्या जागेवर नेमण्यात तर येतेच परंतु तो रिटायर होईपर्यंत त्याला तेथेच ठेवण्यात येते. त्याच्यासाठी उत्कर्ष नाही, त्याला प्रगतीची आशा नाही आणि बहुधा त्याच्यासाठी बढतीही नाही ! कामगारांची मागणी घटली नसली म्हणजे त्याच्याबाबतीत हे असे घडते, परंतु कामगारांची मागणी जर कमी झाली असेल तर सर्वप्रथम त्याला खडसावण्यात येते की नोकरी मिळण्यासाठी त्याचा आखरी क्रमांक आहे.

ज्या टीकाकारांनी तुमच्यावर व माझ्यावर दुष्ट हेतू असल्याबद्दल टीका केली त्यांना मी दोन अगदी साधे प्रश्न विचारू इच्छितो. हे आमचे गा-हाणे खरे आहे. की खोटे आहे ? दुसरा प्रश्न असा की, हे गा-हाणे खरे असेल तर त्यापासून ज्यांना यातना भोगाव्या लागत आहेत त्यांनी त्यापासून मुक्त होण्यासाठी संघटित होऊ नये काय ? या दोन प्रश्नांचे उत्तर जर होकारार्थी असेल कोणीही प्रामाणिक माणूस याला दुसरे उत्तर देऊ शकेल असे मला वाटत नाही तर आमचा हा प्रयत्न पुरेसा न्याय्य आहे. आम्हाला दोष देणाऱ्या कामगार पुढाऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा भ्रम झालेला आहे. कार्ल मार्क्स वाचल्यामुळे त्यांना एवढेच माहीत आहे की समाजात फक्त कामगार आणि मालक असे दोनच वर्ग असतात. मार्क्स वाचून ते असे गृहीत धरतात की भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम सुरू करतात. या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे तिला वास्तविक समजण्याची पहिली चूक ते करतात. कोणत्याही समाजात नोकर आणि मालक असे केवळ दोनच स्पष्ट वर्ग असतात, असे मार्क्सने कोठेही म्हटलेले नाही. सर्व समाजातील माणसे अर्थप्रवृत्तीचे किंवा बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय असतात हे म्हणणे जसे खोटे आहे. तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. मानवाची अर्थप्रवृती ही मूलभूत बाब समजून निष्कर्ष काढताना अर्थशास्त्रज्ञ नेहमीच एक शहाणपणाची सूचना देत असतात. ती ही की, जर इतर सर्व परिस्थिती समान राहिली तर माणसाची अर्थप्रवृत्ती स्पष्टपणे अस्तित्वात असते. कामगार पुढारी ही मूलभूत बाब विसरून गेले. मार्क्सने जे सांगितले ते युरोपच्या बाबतीत बरोबर होते, असे समजणेही चूक आहे. “जर्मनीमध्ये गरीब व पिळवणूक झालेला माणूस आहे काय ? ते एकाच वंशाचे एकाच देशातले समान भूतकाळ व वर्तमानकाळ असलेले आहेत व त्यांचे भवितव्यही सारखेच राहाणार आहे. तर त्यांनी संघटित व्हावे” हा उपदेश मार्क्सच्या काळापासून भाषणातून देण्यात येत आहे. जर्मनीतील गरीब नाडलेला माणूस आणि फ्रान्समधील लुबाडलेला शेतकरी मग संघटित झाला काय ? 100 वर्षे लोटून गेली तरी ते संघटित होण्याचे शिकले नाहीत आणि मागील महायुद्धात ते उघडपणे परस्पराशी निर्दय शत्रुप्रमाणे लढले. भारताच्या बाबतीत तर हा विचार स्पष्टपणे चुकीचा आहे. भारतामध्ये असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत. सर्व कामगार एक असून त्यांचा एक वर्ग आहे. ही घोषणा आदर्शरूप असून ती प्रत्यक्षात उतरावयाची आहे म्हणून ती वस्तुस्थिती आहे असे समजून चालणे, ही एक फार मोठी चूक आहे. कामगारांचे सैन्य अधिक मजबूत कसे करू शकू ? कामगारांमध्ये आपण ऐक्य कसे प्रस्थापित करणार आहोत ? कामगारांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर अन्याय करून निश्चितच नव्हे अन्याय झालेल्या गटाला संघटित होण्यास अडथळा करूनही नव्हे किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी त्या अन्यायाविरुद्ध चळवळ उभारण्यास आडकाठी करूनही नव्हे! वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुसऱ्याचा शत्रु बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्यामध्ये आड येणारी ही कारणे नष्ट करणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय. एक कामगार दुसऱ्या कामगाराला हक्क देऊ शकत नाही. ते स्वतःसाठी मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे त्यांना सांगणे हाच खरा कामगारांच्या एकीचा उपाय होय. सामाजिक दृष्टीने उच्च नीच भेदभाव मानणे व पाळणे हे तत्त्वतः चूक असून कामगारांच्या संघटनेला ते फार घातक आहे. हे कामगारांना सांगणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे आपण ब्राह्मणशाही-असमानतेची कल्पना कामगारातून समूळ नष्ट केली पाहिजे. परंतु कामगारांमध्ये अशाप्रकारची स्फूर्ती निर्माण करणारे कामगार पुढारी कोठे आहेत ? भांडवलशाही विरुद्ध जोरजोराने भाषण देताना कामगार पुढाऱ्यांना मी ऐकले आहे. परंतु कामगारांमध्ये असलेल्या ब्राह्मणशाहीविरुद्ध बोलताना मी कोणत्याही कामगार पुढा-याला ऐकलेले नाही. या उलट या मुद्यावरील त्यांचे मौन स्पष्टपणे दिसून येत आहे. ब्राह्मणशाहीवर श्रद्धा असल्यामुळे व कामगारांच्या ऐक्याशी त्यांचे काही कर्तव्य असो की नसो, ब्राह्मणशाहीचा कामगारांच्या बेकीशी काही संबंध आहे असे त्यांना वाटत नसल्यामुळे त्यांचे हे मौन असो की नसो किंवा केवळ कामगारांचे पुढारीपण मिरविण्याची हौस असल्यामुळे कामगारांच्या भावना दुखविल्या जाऊ नये म्हणून त्यांचे हे मौन असो की नसो, याची चौकशी करण्यासाठी मी खोळंबून राहात नाही. तथापि, मला हे सांगितलेच पाहिजे की ब्राह्मणशाही ही कामगारातील टीकेचे जर मूलभूत कारण असेल तर ती कामगारांमधून काढून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न झाला पाहिजे. हा साथीचा रोग केवळ दुर्लक्ष केल्यामुळे जाणार नाही किंवा त्याबद्दल मौन राहिल्यानेही जाणार नाही. त्याचा पाठपुरावा केला पाहिजे व त्याची मुळे खोदून काढली पाहिजेत. तरच कामगारांच्या ऐक्याचा मार्ग मोकळा होईल.

जोपर्यंत ब्राह्मणशाही ही एक प्रचलित जिवंत शक्ती आहे आणि जोपर्यंत लोक तिला आपापल्या अधिकाराच्या स्वार्थामुळे चिकटून आहेत व इतरांवर बंधने लादत आहेत तोपर्यंत यापासून ज्यांना यातना होतात त्यांना याविरुद्ध संघटित होणे भाग आहे अशी मला भीती वाटते. ते जर अशाप्रकारे संघटित झाले तर त्याने काय नुकसान होणार आहे ? या संघटनेवर जर मालक लोकांचे नियंत्रण असते तर या संघटनेविरुद्धच्या कांगाव्याला काही अर्थ आहे, असे मला वाटू शकले असते. आम्ही मालक लोकांच्या हातातील बाहुले आहोत किंवा आम्ही त्यांच्या कलाने वागत आहोत किंवा कामगारात फूट पाडण्यासाठी आम्ही मुद्दाम हे संघटन उभारीत आहोत. असे जर सिद्ध करण्यात आले असते तर या परिषदेची निंदा बरीचशी न्याय्य ठरली असती. निश्चितच अशाप्रकारचे वर्तन म्हणजे विश्वासघातच ठरला असता. परंतु आमच्या या चळवळीवर मालक लोकांचे नियंत्रण असून ती मालकांना मदत करण्यासाठी आहे किंवा कामगारांच्या हिताचा नाश करण्यासाठी ती आहे. असे कोणीतरी म्हणू शकेल काय ? आमच्या कोणत्याही टीकाकाराला हे सिद्ध करण्याचे मी आव्हान देत आहे.

त्यामुळे ही परिषद भरविल्याबद्दल खजील होण्याचे किंवा कोणाची माफी मागण्याचे काही कारण नाही. आपला हेतू व त्यामागील कारणे पुरेशी न्याय्य आहेत. ही परिषद ज्यांना पसंत नाही अशा दलित वर्गापैकीही एक-दोन व्यक्ती आहेत. परंतु त्यात नवीन असे काहीही नाही. त्यांच्यापैकी काही दुसऱ्याच्या हातातील बाहुले असून पैसे चारून विरोधासाठी मुद्दाम तयार केलेले आहेत. तर काहींना पथभ्रष्ट करण्यात आले आहे. दलित वर्ग हा स्वतः इतका दुर्बल आहे आणि कामगारांचे ऐक्य हा शब्दच इतका आकर्षक आहे की आणि त्यातही एखाद्या प्रभावकारी प्रचारकाच्या तोंडून तो ऐकण्यात आल्यामुळे आपल्या लोकांना त्याची भुरळ पडल्यास नवल नाही. परंतु असे लोक हे विसरतात की ज्या गटांमध्ये इतक्या परस्परविरोधी भावना व वृत्ती प्रत्येक बाबतीत आहेत. त्यातील एक गट दुसऱ्याच्या हिताविरोधी होईल अशा हक्कांचा व अधिकारांचा स्वतःसाठी जेथे दावा करीत आहेत तेथे कामगारांचे खरेखुरे ऐक्य राहूच शकत नाही. यातील ऐक्य म्हणजे दुर्बल व पिळलेल्या लोकांना फसविण्यासाठी केलेले केवळ एक ढोंग देखावा आहे. त्याची या भोंदू लोकांकडून फूटपाड्या म्हणून निंदा करण्यात येते. फूट खरेच! ती फूट असेलही, परंतु ती अशी फूट आहे की जेथे खराखुरा विरोध व मतभेद अस्तित्वात आहे. हा विरोध निर्माण होण्याचे साधे कारण असे की, कामगारांचा एक गट दुसऱ्या कामगारांच्या म्हणजे दलितवर्ग कामगारांच्या विरोधात आपणाला खास हक्क आहेत, असा दावा करतो. कोणालाही केवळ मतभेदासाठी मतभेद निर्माण करण्याची खुशी नसते. आम्ही केवळ आधीच असलेली फूट नजरेस आणून देण्याचा प्रयत्न करीत असून आमच्यावर सुरू असलेल्या अन्यायाला आळा घालून या फुटीला पायबंध घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.

जर तुम्हाला तुमच्यावरील अन्यायांचे परिमार्जन करावयाचे असेल तर त्यासाठी तुम्ही संघटन उभारू नये हा प्रश्नच उद्भवत नाही. पुढील प्रश्न असा की तुमच्या संघटनेला कोणते ध्येय साध्य करून घ्यावयाचे आहे ? तुमच्या उद्योगविषयक हेतूसाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे हे न सांगताही कळण्यासारखे आहे. परंतु प्रश्न असा की या हेतुसाठी तुम्ही वेगळे संघटन उभारावे की आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या संघटनेत सहभागी व्हावे ? कार्यवाहीला प्रत्यक्ष सुरवात करण्यापूर्वीच तुम्ही या प्रश्नाचा गंभीरपणे विचार करावयास हवा.

भारतातील कामगार संघटन हा एक खेदाचा विषय आहे. कामगार संघटनेचा मुख्य उद्देश पूर्णतः दृष्टिआड झालेला आहे. कामगार वर्गाच्या जीवनस्तराचे कमी होण्यापासून संरक्षण करणे हा कामगार संघटनांचा मुख्य उद्देश आहे. जन्मापासून व प्रशिक्षणामुळे जाणीव झाल्यामुळे युरोपातील प्रत्येक माणूस आपला जीवनस्तर समाधानकारकपणे योग्य स्थितीत ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत असलेला दिसतो. तो कमी करण्याचा कितीही भयानक प्रयत्न झाला तरी त्याला तो प्रतिकार करतो. भारतीय कामगारात हा दृढनिश्चय आढळून येत नाही, ही एक सुप्रसिद्ध बाब आहे. केवळ जिवंत राहण्यासाठीच तो धडपडत असतो आणि मिलने दर्शविल्याप्रमाणे “जेथे कोठे या निकृष्टतेकडे नेण्याच्या प्रयत्नांना निग्रही प्रतिकार करण्याची व समाधानकारक जीवनस्तर सांभाळण्याची लोकांची वृत्ती नाही तेथे मोठमोठ्या प्रगतीकारक राष्ट्रातही गरीब लोकांची अवस्था केवळ जीव धारण करण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचते” माझ्या मते, जर कामगार संघटनांची नितांत आवश्यकता असणारा कोणता एखादा देश असेल तर तो भारत हाच होय. परंतु मी म्हटल्याप्रमाणे, भारतातील आजचे कामगार संघटन हे एक दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे डबके झालेले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कामगारांचे नेतृत्व एक तर भित्रे, स्वार्थी किंवा पथभ्रष्ट आहे. त्यात काही असेही नेते आहेत की जे केवळ आरामखुर्चीवरचे तत्त्वज्ञानी आहेत किंवा केवळ वर्तमानपत्रात आपले वक्तव्य प्रसिद्ध करण्यातच खूष असणारे राजकारणी आहेत. कामगारांना संघटित करणे, त्यांना शिक्षित करणे आणि संघर्षांमध्ये त्यांना मदत करणे हा त्यांच्या कर्तव्याचा भागच नाही. ते केवळ कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी व त्यांच्यावतीने बोलण्यासाठी चिंतातूर तर आहेत, परंतु कामगारांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवण्याचे मात्र ते टाळतात.

कामगार नेत्यांचा दुसरा प्रकार असा की, ते केवळ स्वतःला सेक्रेटरी, अध्यक्ष किंवा असेच एखादे पद मिळविण्याच्या हेतुने कामगारांच्या संस्था उभारण्यात दंग राहातात. त्यांची ही पदे सांभाळण्यासाठी ते आपल्या संस्था नेहमी वेगळ्या व परस्परविरोधी ठेवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी तर असेही लज्जास्पद व थक्क करून सोडणारे प्रसंग पाहण्यास मिळतात की, या विभिन्न संस्थातील लढाई, कामगार आणि मालक जर तसे असेल तर यांच्यातील लढाईपेक्षा फारच दुर्धर असते आणि हे सर्व कशासाठी, तर काही लोकांना कामगारांचा पुढारी म्हणून मिरवून घेण्याची व त्यावर सत्ता गाजविण्याची केवळ हौस असते एवढ्याचसाठी!

तिसऱ्या प्रकारचे नेतृत्त्व कम्युनिझमच्या तत्त्वावर विश्वास असणाऱ्यांचे आहे. त्यांचा हेतू कदाचित चांगलाही असेल परंतु ते भलत्याच मार्गाला लागलेले आहेत. त्यांच्यापेक्षा कामगारांचा अधिक नाश दुसऱ्या कोणीही केला नाही, असे म्हणण्यास मी मुळीच कचरणार नाही. आज जर कोणत्या कारणाने कामगार संघटनेच्या पाठीचा कणा पूर्णतः तुटला असेल, जर आज मालक कोणत्या कारणाने वरचढ झाले असतील. जर आज कामगार संघटन ही एक शापित वास्तू होऊन बसली असेल तर त्याचे एकमेव कारण म्हणजे एकेकाळी कामगार संघटनेवर कम्युनिस्टांचा पूर्णतः कब्जा झाला होता व याचा त्यांनी दुरुपयोग करून घेतला हेच होय. कामगारांमध्ये कोणत्याच प्रकारचे असमाधान नाही, असे समजून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करणे, हे त्यांचे ध्येय असावे, असे दिसते. कारण असंतुष्ट कामगार वर्गाच्या संघटनेद्वारे क्रांती घडवून आणता येईल व कामगारांचे राज्य स्थापन करता येईल, असा त्यांना विश्वास वाटतो. म्हणून कामगारात असंतोष निर्माण करण्याची व त्याद्वारे कामगारात संघटन बांधण्याची त्यांनी मोहीम उघडली आहे. क्रांती यशस्वी होण्यासाठी केवळ असंतोष पुरेसा नसतो. त्यासाठी कशाची आवश्यकता असेल तर न्याय्यतेची, गरजेची आणि सामाजिक व राजकीय हक्कांची गंभीर व परिपूर्ण जाणीवेची क्रांतिकारक मार्किसस्टही जितकी रानटीपूजा संपाची करीत नाहीत इतकी रानटीपूजा सिडिक्यॉलिस्ट (केवळ कार्यकारी मंडळ असलेले) कम्युनिस्टांनी मागील काळात केलेली आहे. क्रांतिवादी
मार्किसस्टांनी संपांना कधीही क्रांतीचा पहिला पाठ मानलेला नसून सर्व उपाय थकल्यानंतर वापरावयाचे एक गंभीर व अंतिम साधन म्हणूनच मानले आहे. परंतु कम्युनिस्टांनी हे सर्व यायावर भिरकावून देऊन कामगारांमध्ये असंतोष निर्माण करण्याचे एक दैवी साधन या दृष्टीने संपाकडे पाहिले. त्यांनी अधिक जास्त असंतोष निर्माण केला असो की नसो परंतु त्यांच्या शक्तीचा व सत्तेचा मुख्य स्त्रोत असलेल्या कामगार संघटनेचा मात्र निश्चितच सर्वनाश केला. सध्या ते भांडवलशाही संघटनांचा आश्रय शोधण्याच्या मार्गास लागलेले आहेत. अशाप्रकारच्या निरर्थक चळवळीपासून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करता येण्यासारखी आहे. आगीचा भडका उडवून देण्याच्या प्रयत्नात आपल्या स्वतःच्या घराचीही काळजी न घेणाऱ्या आगलाव्या सारखाच कम्युनिस्ट माणूस सिद्ध झालेला आहे.

याचा परिणाम असा झाला की कामगारांनी जिच्यावर विसंबून राहावे अशी एकही संघटना अस्तित्वात राहिली नाही. मुंबईच्या कापड गिरण्यात जी अस्वस्थता पसरली आहे तिच्याबद्दल मी बोलत नाही. त्यासंबंधी जितके कमी बोलले जाईल तितके बरे. परंतु जी. आय. पी. रेल्वे कामगारांचे संघटन 1920 साली उभारण्यात आले. ते 1922 ते 1924 पर्यंत मृतप्रायच होते. त्याचे पुनरुज्जीवन 1925 साली करण्यात आले. 1927 मध्ये दुसरे एक संघटन ‘जी. आय. पी. रेल्वेमेन्स युनियन’ या नावाने काढण्यात आले. या दोन्ही संघटनांमध्ये ऐक्य करून रेल्वे वर्कर्स युनियन ही संस्था काढण्यात 1931 साली 1932 मध्ये या संस्थेत पुन्हा फूट पडली. रेल्वे लेबर युनियन या नावाने दुसरी एक संस्था काढण्यात आली. 1935 मध्ये जुन्या जी. आय. पी. स्टॉफ युनियन चे पुनरुज्जीवन करण्यात आले आणि नवीन संस्था म्हणून सुरू करण्यात आली. ती आता मान्यता पावलेली संस्था असून रेल्वे कामगारांच्या हितासाठी जपणा-या या संघटनांमध्ये जोरदार विरोध व शत्रुत्त्व आहे. कम्युनिस्ट पुढारी व कम्युनिस्ट नसलेल्या रेल्वे कामगार पुढा-यांमध्ये नेतेपदासाठी चाललेल्या चढाओढीचा हा सारा परिणाम आहे. अशाच शत्रुत्त्वामुळे केन्द्रीय संघटनेमध्येही फूट पडलेली आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ ही कामगारांची केन्द्रीय संघटना 1919 साली स्थापन करण्यात आली. कामगारांच्या सर्व संघटना या काँग्रेसला 1929 पर्यंत जोडून देण्यात आल्या होत्या. 1929 साली नागपूरला फूट पडली आणि कम्युनिस्ट पुढाऱ्यांचे नेतृत्त्व नाकारणारे फूटून बाहेर पडले व त्यांनी नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन या नावाची नवीन संस्था स्थापन केली. या दोन संस्थांमध्ये तीव्र स्वरूपाचा शत्रुभाव कार्यरत आहे. 1931 व 1932 साली या दोन विरोधी संस्थांमध्ये एकी घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो अयशस्वी झाला. त्याबाबत आताही प्रयत्न होत आहेत. त्यातून काय निष्पन्न होणार आहे कोणास ठाऊक. अशा परिस्थितीत तुम्हाला काही उपदेश करणे माझ्यासाठी मोठे कठीण काम आहे. जर तुमच्याजवळ अशी संस्था सांभाळण्यासाठी माणसे असतील तर तुम्ही तुमचे स्वतःचे वेगळे संघटन उभारले असते तरीसुद्धा त्यात काहीही वाईट झाले नसते. अर्थात ही एक मोठी अट आहे. एखाद्या भरभराट व्हावयाची असल्यास तिने कार्य केले पाहिजे. कोणतीही संघटना जर समर्थ व्यक्तींची सेवा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरली तर ती कार्य करू शकत नाही. तुमचे संघटन चालविण्यासाठी अशी माणसे तुम्ही मिळवू शकाल काय ? तयार करा. जर तुम्हाला हे शक्य असेल तर तुम्ही स्वतःचे संघटन वस्तुतः तुम्ही जर असे केले तर अधिक चांगले होईल. कारण विभिन्न संघटनांचा परिणाम विभक्ततेच्या भावनेत किंवा दुर्बलतेत होतोच असे नाही. ही तुमची संघटना एखाद्या कामगारांच्या समान उद्देशांच्या व समान कार्याच्या केन्द्रीय संघटनेशी तुम्ही जोडूनही देऊ शकता. जर तुमची स्वतंत्र संघटना तुम्ही उभारू शकत नसाल तर सध्या अस्तित्वात असलेल्या एखाद्या संघटनेत तुम्ही सहभागी होऊ शकाल. परंतु अशी संघटना आपल्या स्वतःच्या कार्यासाठी तुमचा दुरुपयोग करून घेणार नाही, याची काळजी घ्या. असे घडण्याचा धोका फारच मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईच्या कापड गिरण्यात असेच घडले होते. तेथे विणकरांच्या हितासाठी लागोपाठ संप पुकारण्यात येत असे आणि त्या संपाला कताईवाले पाठिंबा देत राहिले. हे टाळण्यासाठी तुम्ही दोन शर्तीसाठी आग्रह धरला पाहिजे. प्रथमतः तुम्ही कार्यकारी मंडळामध्ये खास प्रतिनिधित्वाचा आग्रह धरावा. म्हणजे तुमच्या संबंधित खास प्रश्नांकडे संघटनेचे लक्ष तुम्हाला वेधून घेता येईल व पाठिंबाही मिळेल. दुसरी अट अशी की तुमच्या वर्गणीपैकी काही भाग आवश्यकता पडल्यास केवळ तुमच्या तक्रारी निवारण करण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा, असा आग्रह तुम्ही धरला पाहिजे. जर तुम्ही तुमची स्वतःची संघटना उभारण्याचा निर्णय घेतला नाही व दुसऱ्या एखाद्या संघटनेत सामील होण्याचे ठरविले तर या दोन अटी तुम्ही मान्य करून घेतल्या पाहिजेत.

कामगारांच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे यात काही किन्तु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही राजकीय उद्दिष्टांसाठीही संघटित झाले पाहिजे. केवळ कामगार संघटनेच्या बळावर मालकांच्या विरोधात कामगार विजयी होऊ शकत नाहीत, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. कामगार संघटनांनी राजकारणात शिरावे की शिरू नये याबद्दल आज दुमत असू शकत नाही. कामगार संघटनांनी राजकारणात शिरलेच पाहिजे. कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हितांचे रक्षण करणे अशक्य आहे. इतकेच नव्हे तर कमीतकमी मजुरीचे दर, कामाच्या वेळा, अन्य नियम इत्यादी सामान्य स्वरूपाच्या सुधारणा केवळ संघटनेच्याद्वारे घडवून आणणे अशक्य आहे. संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.

केवळ कामगार संघटनेच्या उद्दिष्टांचे रक्षण करणे हा एकच राजकारणामध्ये शिरण्याचा हेतू नसावा, तुम्ही आपला हेतू केवळ कामगार संघटनेच्या उद्दिष्टांपुरताच मर्यादित ठेवणे म्हणजे प्राप्त कर्तव्यालाच ध्येय समजण्यासारखे आहे. गुलामगिरी हा नशिबाचा खेळ असून कामगार वर्ग त्यातून सुटू शकत नाही. हे गृहीत धरून चालण्यासारखेच हे आहे. याउलट ही मजूरपद्धती बदलून तिच्या जागी स्वातंत्र्य, समता व बंधूभाव या तत्त्वांवर आधारलेली नवी पद्धती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ समाजाची पुनर्रचना आणि अशाप्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करू शकेल ? राजकीय शक्तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास याबाबतीत ते निश्चितच एक शक्तीशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे. कामगार संघटनेने राजकारणापासून अलिप्त राहणे याचा अर्थ कामगारांनी व्यक्तिश: राजकारणात भाग घेऊ नये, असा नव्हे. याउलट त्यांच्यापैकी अनेक राजकीय सभांना हजर राहतील. एखाद्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करतील. कोणी नेहमी एखाद्या राजकीय पक्षात सहभागी राहील. कामगार संघटनांना राजकारण नको याचा अर्थ त्या संघटनेच्या कामगार सदस्यांना राजकारण नको असा नाही. राजकारण नको ही धोक्याची सूचना फक्त पक्षबद्ध राजकारणासाठी आहे. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आवडीप्रमाणे स्वतंत्ररीत्या राजकारणात भाग घेऊ शकते. जर त्याच्या कामगार बांधवांच्या सहकार्याने त्यांचे स्वतःचे संघटन उभारण्यात आले असेल तर त्याच क्षणी त्याला राजकारणातून बाहेर पडावे लागेल. अशाप्रकारे स्वतःच्या वर्गाच्या उद्दिष्टांसाठी त्याच्या व्यक्तिगत शक्तीला नियंत्रित करून राजकारणातून बाहेर पडावे लागेल. यामुळे ही कामगारांची संघटना निश्चितपणे भांडवलशाहीवादी राजकीय पक्षाचे कुरण ठरल्यावाचून राहणार नाही. तुम्हाला बहुत करून माहीत असेलच की, कामगारांच्या नावाने बोलण्याचा अधिकार सांगणाऱ्या ट्रेड युनियन काँग्रेस आणि ट्रेड युनियन फेडरेशन या दोन्ही संघटना आता एका संघटनेत विलीन होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येकीने आपल्या अर्ध्या धोरणाचा त्याग करून ऐक्य घडविण्याचे ठरविले आहे. ट्रेड युनियन काँग्रेसने, ट्रेड युनियन फेडरेशनची घटना स्वीकारली असून ट्रेड युनियन फेडरेशनने आपल्या नावाचा त्याग करण्याचे ठरविले आहे. मला असे कळले की, या ऐक्यामधील एक अट ही संघटना विशुद्धपणे कामगार संघटनेच्या स्वरूपाची असावी अशी आहे. तिला राजकारणाशी कर्तव्य राहाणार नाही. जेव्हा मी हे ऐकले तेव्हा या सद्गृहस्थांना त्यांच्या म्हणण्याचा अर्थ खरोखर समजला की नाही याबद्दल मला नवल वाटले. स्वतःच्या हातातील राजकीय शक्तीचा उपयोग आपल्यावरील अन्यायाच्या निवारणासाठी वापरण्यावर बंधने घालण्याचा हा साधा प्रकार असून हा मोठा खेदजनक प्रकार आहे. जर या एकत्रित झालेल्या कामगार संघटनेला आपली एकत्रित राजकीय शक्ती वापरावयाची नाही तर ती कशासाठी एकत्रित आली, हेच मला कळत नाही. क्षुल्लक स्वरूपाचे मतभेद असले आणि ते जर दुस-या एखाद्या मोठ्या उद्देशासाठी मिटविले तर ‘तडजोड’ या शब्दाला काही अर्थ प्राप्त होतो. परंतु जर एखाद्या मोठ्या प्रश्नाबद्दल लोकांमध्ये मतभेद असले तर त्यांचा त्याग करून केवळ क्षुल्लक बाबींच्या स्वीकारासाठी एक होण्यात ‘ऐक्य’ या शब्दाला काही अर्थच उरत नाही. इतरांचा याबाबत कोणताही दृष्टिकोन असो परंतु मी असेच म्हणेन की, कामगारांनी राजकारणापासून अलिप्त राहाण्याची जर संघटितपणे शपथ घेतली तर त्यांना तो एक अभिशापच ठरेल.

आपण मात्र यापुढे आपले प्रयत्न सामाजिक सुधारणेच्या एकाच दिशेने ठेवणे आवश्यक आहे. हे ओळखले पाहिजे आणि आजपर्यंत आपण आर्थिक सुधारणेसाठी प्रयत्न केला पाहिजे हे विसरून गेलो होतो किंवा फारच अल्प प्रयत्न केले. आपणाला जे अन्याय सहन करावे लागतात त्याचे मूळ एकच आहे व ते म्हणजे ज्यांच्या हातात सामाजिक व आर्थिक शक्ती आहे त्यांनी कामगारांचे राजकीय हक्कही हिरावून घेतलेले आहेत हेच होय.

राजकारणात शिरणे याचा अर्थ आपला पक्ष स्थापन करणे असा होतो. पक्षाचा पाठिंबा नसलेले राजकारण ही एक कल्पनेतील वस्तू होय. स्वतंत्रपणे राजकारण चालविण्याचा व आपली पोळी आपणच पकविण्याचा प्रयत्न करणारे अनेक राजकारणी पुरुष आहेत. जो राजकारणी असा स्वतंत्र राहाण्याचा प्रयत्न करतो त्याच्याबद्दल मी नेहमीच सतर्क असतो. जर एखादा राजकारणी माणूस कोणातही सहभागी न होण्याइतका स्वतंत्र असेल तर कोणत्याही राजकीय उद्दिष्टासाठी तो निरर्थक आहे. तो काहीच साध्य करू शकत नाही. त्याच्या एकाकी प्रयत्नाने गवताचेही पीक तो काढू शकत नाही. परंतु स्वतंत्रतेची हाव धरणारे राजकारणी पुरुष त्यांच्या बौद्धिक प्रामाणिकतेमुळे स्वतंत्र राहात नाहीत, तर जास्तीत जास्त मागण्या मागण्यासाठी ते तसे स्वतंत्रपणे राहातात. यामुळेच त्यांना पक्षशिस्तीच्या जाळ्यातून मुक्त राहावयाचे असते. ते काहीही असो, परंतु राजकारणात स्वतंत्र राहणाऱ्या अनेक राजकीय मुत्सद्यांबद्दलचा माझा अनुभव तरी असाच आहे. पक्षाशिवाय खरेखुरे आणि परिणामकारी राजकारण असूच शकत नाही.

प्रश्न असा की कोणत्या पक्षात तुम्ही सामील व्हावे ? अनेक पर्यायी पक्ष आहेत. काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही सामील व्हावे काय ? कामगारांच्या उद्दिष्टांना ती मदत करील काय ? काँग्रेसपासून स्वतंत्र असा स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही. या माझ्या मताला कामगार पुढाऱ्यांचा विरोध आहे, हे मला माहीत आहे. काँग्रेस सोशिऑलिस्टांचे प्रतिनिधित्व करणारा एक गट असून समाजवादाच्या पूर्तीसाठी त्यांना कामगार संघटन हवे आहे. परंतु ही संघटना काँग्रेसच्या अंतर्गतच राहिली पाहिजे, असे त्यांना वाटते. श्री. रॉय यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला व स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेणारा एक गट आहे. त्यांचा कामगारांच्या दुसऱ्या कोणत्याही संघटनेला जोरदार विरोध आहे. मग ती संघटना काँग्रेसच्या अंतर्गत असो की बाह्यगत असो. या दोन्ही गटांशी मी पूर्णतः असहमत आहे. श्री. रॉय हे मला जसे एक कोडे वाटते तसे पुष्कळांना वाटत असले पाहिजे. एक कम्युनिस्ट आणि स्वतंत्र कामगार संघटनेला विरोधी ! भयानकपणे विरोधी शब्द आहेत हे ! हा असा दृष्टिकोन आहे की, आपल्या थडग्यामध्ये लेनिननेही तडफडाट करावा. या विलक्षण दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण एकच होऊ शकते. ते हे की, भारतीय राजकारणाचे सर्वात महत्त्वाचे ध्येय साम्राज्यशाहीचा नाश करणे हे आहे असे रॉय यांना वाटत असले पाहिजे. श्री. रॉय यांनी जे मत स्वीकारले आहे त्याचा दुसरा कोणताही अर्थ निघत नाही. जर साम्राज्यशाही नष्ट झाल्याबरोबर भारतातील सर्व भांडवलदारांचे हितसंबंध नष्ट होणार असतील तरच हे मत बरोबर ठरू शकेल. परंतु इंग्रज या देशातून निघून गेले तरी या देशात जमीनदार, मिल मालक व सावकार कायम राहून लोकांची पिळवणूक चालूच राहाणार आहे आणि साम्राज्यशाही नष्ट झाल्यावरही आजच्याप्रमाणेच कामगारांना या भांडवलदारांशी संघर्ष करावा लागणारच आहे, हे समजण्यास फार मोठ्या बौद्धिक चातुर्याची गरज आहे असे नाही. असे असल्यामुळे कामगारांनी आतापासूनच संघटित का होऊ नये ? संघटनेची वाढ करण्यामध्ये त्यांनी खोळंबून का राहावे ? मला तर याचे कोणतेच उत्तर दिसत नाही. कॉंग्रेस समाजवाद्यांना हे पूर्णपणे माहीत आहे की, कामगारांना साम्राज्यशाहीप्रमाणेच भांडवलशाहीशीही संघर्ष करावा लागणार आहे व म्हणून कामगारांनी संघटित झाले पाहिजे हे त्यांना मान्य आहे. परंतु त्यांची अशी अट आहे की कोणतीही कामगार संघटना काँग्रेसच्या अंतर्गतच असली पाहिजे. काँग्रेस आणि कामगार यांच्या या जबरदस्तीच्या समझोत्याची आवश्यकता किंवा मूल्य मला तरी काहीच दिसत नाही. काँग्रेस सोशिऑलिस्ट लोकांच्या म्हणण्याप्रमाणे देशात समाजवाद जाणणे हे त्यांचे ध्येय आहे. ते समाजवाद कसा आणणार आहेत ? काँग्रेसचा उजवा हात होऊन ! काँग्रेसच्या बाहेर न पडण्याचे ते हे कारण देतात. त्यांचे मानवी स्वभावाविषयीचे ज्ञान ही इतकी कीव करण्यासारखी बाब आहे की, त्याची कल्पनाही करणे कठीण आहे. जर त्यांचे उद्दिष्ट समाजवाद आणणे हे असेल तर त्याचा उपदेश लोकांना करून अपेक्षित कार्यासाठी त्यांना संघटित करणे गरजेचे आहे. उच्च वर्णियांची मनधरणी करून समाजवाद येणार नाही. काँग्रेसची उजवी बाजू समजणाऱ्या लोकांना समाजवादाची लहानशी मात्राही सहन होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती असून दिवसेंदिवस ती अधिकाधिक स्पष्ट होत आहे. पंडित नेहरूंनी मागीलवर्षी समाजवादाचे वादळी आंदोलन उभारले होते. परंतु या गरीब बिचाऱ्या इसमाला लवकरच ताळ्यावर आणण्यात येऊन एखाद्या उनाड मुलाला लड्डूपेढ्यावर ताव मारण्यास घरी परत पाठवावे त्याप्रमाणे केवळ यापुढे चांगले वागण्याच्या करारावर घरात घेण्यात आले. आता हा पंडित पूर्णपणे पालटलेला असून आता इतका गरीब झाला आहे की, त्याने एकदा घुमविलेल्या व सध्या काँग्रेसचा उजवा हात म्हणून शापित असलेल्या लाल निशानालाही तो विरोध करतो. बिहारमधील या उजव्या बाजूने आपले खरे दात दाखविले आहेत. किसान पुढारी स्वामी सहजानंदानी कॉंग्रेस सोडलेली असून त्याचा सहकारी जयप्रकाश नारायण हाही तिचा त्याग करण्याच्या मार्गावर आहे. मला असे कळले की, ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई येथील सभेत काँग्रेसच्या या उजव्या बाजूकडील लोकांनी सोशिऑलिस्टांच्या गैरशिस्त वर्तनाबद्दल निंदा केली. काँग्रेसच्या व्यासपीठावरून समाजवादाचा प्रचार करण्याचा आरोप लादून इंडियन पिनल कोडप्रमाणे प्रथम गुन्हा करणा-याला जशी ताकीद देण्यात येते त्याप्रमाणे ताकीद देण्यात आली. काँग्रेसमधील समाजवाद्याची अशी पोकळ दशा आहे.

साम्राज्यवादाच्या प्रतिक्रियेमुळे भारतीय राजकारण झाकाळून गेले आहे. कामगारांना त्यांच्या खऱ्या शत्रूचा म्हणजे अधिकार बळकावून बसणाऱ्यांचा विसर पाडण्यात आला. रॉयवादी व काँग्रेसवादी हे दोन्ही प्रकारचे समाजवादी लोक विचारातील गोंधळामुळे दलदलीत रुतून बसलेले आहेत. एक सामान्य शत्रू म्हणून या साम्राज्यशाहीविरुद्ध संघर्ष करावयाचा असेल तरी सर्व वर्गांनी आपापल्या वर्गाच्या हिताकडे दुर्लक्ष केले पाहिजे व एका संघटनेत विलीन झाले पाहिजे, असा त्याचा अर्थ होत नाही. वेगवेगळ्या वर्गाच्या संघटनांची एक फळी उभारूनही या साम्राज्यशाहीशी लढाई करता आली असती. या हेतूसाठी सर्व संघटना बरखास्त करण्याची काहीच गरज नाही. सर्व संघटनांचा समावेश करून घेणाऱ्या संस्थेचीही काही आवश्यकता नाही. त्यासाठी सर्वांची मिळून एकच एक फळी उभारली म्हणजे पुरे झाले. काँग्रेसची ही उजवी बाजू साम्राज्यवादाच्या नावाने कोणतीही स्वतंत्र व वेगळी संघटना उभारण्याच्या आड येत आहे. हे पुष्कळांनी अजून ओळखलेले नाही, याची जाणीव करून देताना मला खेद वाटतो आणि ही चूक तुम्हीही कराल, अशी मी तुम्हास धोक्याची सूचना देत आहे. राजकारण हे वर्गहिताच्या जाणिवेवर उभारल्या जावयास पाहिजे. जे राजकारण वर्गहिताच्या पायावर उभे नसेल ते एक ढोंग आहे.

म्हणून जो पक्ष वर्गहिताच्या वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल अशा म्हणून पक्षामध्ये तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्या विरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष हा होय. स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगारांच्या हिताला तो सर्वोच्च स्थान देतो. त्याचे धोरण सुनिश्चित आहे. तो सामान्य परिस्थितीत कधीही असनदशीर मार्गाचा अवलंब करणार नाही परंतु तशी पाळी आणल्यास मागेपुढेही पाहाणार नाही. वर्गयुद्ध टाळण्याची त्याची इच्छा असली तरी वर्ग संघटनेच्या तत्त्वाचा त्याग करावयास तो तयार नाही. आज हा स्वतंत्र मजूर पक्ष (इन्डिपेन्डन्ट लेबर पार्टी) बालवयात आहे आणि तो केवळ मुंबई इलाख्यापुरताच मर्यादित आहे, हे खरे; परंतु हा काही त्याच्याविरोधी युक्तिवाद नव्हे प्रत्येक पक्ष एकेकाळी बालवयात असतोच. एखादा पक्ष किती वयाचा आहे. हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर त्याची तत्त्वे काय आहेत. तो काय साध्य करू इच्छितो आणि त्याची सूप्त शक्ती काय आहे, या बाबीच महत्त्वाच्या आहेत. स्वतंत्र मजूर पक्षाचे घोषणापत्र वाचून पाहण्याची जो तसदी घेईल त्याला त्याची तत्त्वे काय आहेत व तो काय साध्य करू इच्छितो हे कळून येईल. या पक्षात फार मोठी सूप्त शक्ती आहे, हे स्पष्ट आहे. हा पक्ष मर्यादित नाही. जात आणि पंथ याचा विचार न करता सर्वांना तो खुला आहे. त्याचा कार्यक्रम काहीसा दलित वर्गाच्या गरजांवर भर देत असला तरी संपूर्ण कामगार वर्गाच्या गरजांचा समावेश होण्याइतका तो विस्तृत आहे. या स्वतंत्र मजूर पक्षाच्या भरभराटीच्या आड येणारी एक अडचण राजकीय नव्हे तर सामाजिक आहे. या पक्षाच्या केन्द्रस्थानी दलित वर्गाचे लोक सध्या आहेत. ही वस्तुस्थिती मुख्यतः या पक्षाच्या भरभराटीच्या व विस्ताराच्या आड येत आहे. दलित वर्गासारख्या कमी दर्जाच्या लोकांबरोबर सहकार्य करावयाचे नाही, अशी सर्वसाधारण भावना आहे. तिने उच्च वर्गाच्या हिंदुंना मजूर पक्षामध्ये भाग घेण्यापासून वंचित केले आहे. जे लोक या पक्षाच्या उण्यावर आहेत ते या भावनेचा दुरुपयोग करून घेऊन अडाणी व धर्मभोळ्या लोकांना या पक्षात सामील होण्यापासून परावृत्त करीत आहेत. परंतु स्वतंत्र मजूर पक्षाचे स्वच्छ व प्रामाणिक राजकारण सर्व कामगार वर्गाला आपल्या ध्वजाखाली खेचून आणण्यास लोहचुंबकाप्रमाणे उपयुक्त ठरेल. हिंदू समाज रचनेमुळे निर्माण झालेल्या विरोधी शक्तीला प्रतिकारक शक्ती ठरेल, अशी माझी खात्री आहे. आतापर्यंत ठाणा, कुलाबा आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यामध्ये या पक्षाची पूर्णतः स्थापना झाली असून शेतकरी व कामगारात आपला पाया तिने रचलेला आहे. या प्रांताच्या अन्य भागातही त्याचा जोरदार प्रसार सुरू आहे. मध्यप्रांत आणि वऱ्हाडातही हा पक्ष कार्यरत असून भारताच्या अन्य प्रांतातही तो आपली जागा पटकावील, अशी मला आशा वाटते. म्हणून कामगार वर्गाचा न्याय्य पाठिंबा मिळण्यास स्वतंत्र मजूर पक्ष हाच एकमेव पक्ष पात्र आहे.

कामगारांच्या संघटनांमधील दलित वर्गाचे लोक भारतातील संपूर्ण कामगार वर्गाला फार मोठी चालना देऊ शकतात. इंग्लंडमधील चार्टिस्ट चळवळीचा अभ्यास करणाऱ्या गॅमेज याने म्हटले आहे, “सामाजिक प्रश्नावर आधारित असण्यावाचून एखादी राजकीय चळवळ आजतागायत कधी झाली असेल की नाही याबद्दल शंकाच आहे. मानव जातीचा मुख्य हेतू सामाजिक सुखोपभोगाची साधने हस्तगत करणे हाच आहे. या साधनांची मालकी त्यांना मिळाल्यास राजकीय भानगडीमध्ये रस घेण्याची त्यांची वृत्ती अगदीच कमी होते. सामान्य जनतेला राजकीय हक्कांचे महत्त्व तत्त्वशः पटवून देण्याचे कार्य जर कोणी करीत असतील तर ते समाजामध्ये अस्तित्त्वात असलेले दोषच होय.” तुमचे सामाजिक दोष मोठेही आहेत आणि वास्तवही आहेत. त्यामुळे तुमचे राजकारणही अस्सल व वास्तव राहू शकते. हे जर तुम्ही समजून घेतले तर अस्सल राजकीय पक्षाच्या बाबतीत तुम्ही भारतातील संपूर्ण कामगार वर्गाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठराल. संपूर्ण कामगारांची दुसरीही एक सेवा तुम्ही करू शकता. विधानसभेत तुम्हाला प्रतिनिधीचा एक निश्चित वाटा मिळालेला आहे. या सुनिश्चित जागांचा उपयोग कामगार वर्गाला किती महत्त्वाचा आहे. याची जाणीव काही कामगार नेत्यांना असल्याचे दिसत नाही. निवडणूक हा एक प्रकारचा जुगार आहे. कोणत्याही पार्टीला विधानसभेत अमुक इतक्या जागा मिळतीलच अशी कोणत्याही निवडणुकीच्या पद्धतीने खात्री देता येण्यासारखी नसते. इतकेच नव्हे तर मतदारांच्या एखाद्या गटाला कोणत्याही निवडणूक पद्धतीने त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळतील असेही नाही. निवडणुकीचे निकाल काही पक्षांना कधी कधी किती आश्यर्चकारक व विनाशकारी ठरले, हे इंग्लंडमधील निवडणुकीच्या इतिहासावरून दिसून येईल. बऱ्याचदा अल्पसंख्यांक मतदारांनाच बहुसंख्य जागा मिळतात. आपल्या येथे निश्चित जागा ठरलेल्या असल्यामुळे तशी भीती बाळगण्याचे कारण नाही. दलित वर्गाच्या राखीव जागांचा विचार करता त्या केवळ दलित वर्गाच्याच उपयोगाच्या आहेत, असे नसून त्या सर्व कामगार दर्गाला उपकारक आहेत. दलित वर्गाला निश्चित प्रतिनिधीत्व मिळण्याची खात्री असल्यामुळे अन्य कामगार वर्गाला मदतीची आवश्यकता वाटल्यास त्यांच्या संघटनांच्या उभारणीमध्ये तो फार मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत होऊ शकतो. कामगार वर्गाला राजकीय प्रतिनिधीत्व मिळविण्यासाठी दलित वर्गाचा किती उपयोग होऊ शकतो हे मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेले आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकिटावर उभे राहणाऱ्या तीन हिंदूंना दलित वर्ग मुंबई विधानसभेसाठी निवडून आणू शकला आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकिटावर उभे नसलेल्या परंतु दलित वर्गाचा पाठिंबा असलेल्या अनेक उमेदवारांना त्याने निवडून येण्यास मदत केली. ज्यांना आमच्या प्रयत्नांपासून हित साधून घ्यावयाचे असेल त्यांनी करून घ्यावे परंतु या देशाच्या राजकारणात दलित वर्ग महत्त्वाची भूमिका वठवू शकतो, ही वस्तुस्थिती शिल्लक राहतेच आणि ही भूमिका त्यांच्या स्वतःसाठी व कामगार वर्गासाठीही अत्यंत सहायक आहे.

तथापि, तुम्ही किती लवकर व किती उत्तमतऱ्हेने संघटित व्हाल यावर हे सर्व अवलंबून आहे. तुम्ही संघटित का व्हावे आणि संघटनेद्वारे तुम्ही काय करू शकाल हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. आता तुम्हाला एवढेच सांगून मी भाषण संपवितो की, तुमची स्वतःची संघटना उभारण्याच्या कार्यात तुम्ही आता मुळीच विलंब लावता कामा नये. या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे निमंत्रण देऊन तुम्ही माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी तुम्हाला सुयश चिंतितो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password