Categories

Most Viewed

15 फेब्रूवारी 1946

माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे.

स्थळ : [ दहिवडी (सातारा) ता. 15 फेब्रुवारी 1946]

अध्यक्ष महाराज व बंधु भगिनींनो,
आज मी या ठिकाणी दिल्लीहून जवळजवळ एक हजार मैलांचा प्रवास करून आलो आहे. याचे कारण म्हणजे हल्लीचा प्रसंगही तितकाच महत्त्वाचा आहे. जिकडे तिकडे पक्षोपक्षांची निवडणुकीची धामधूम सुरु आहे. पण अलिकडे हिंदुस्थानमधील वर्तमानपत्रामध्ये एका गोष्टीला अगदी ऊत आलेला आहे व ती गोष्ट म्हणजे गांधी व माझेमधील झगडा. हा झगडा 25 वर्षे म्हणजे जवळ जवळ 1920 सालापासून चालू आहे. पण हा झगडा का व कशाकरता चालला आहे याचा तुम्ही सर्वजण विचार करा. गांधींचा टिळकांशी झगडा होता. गांधींचा गोखलेंच्या बरोबरही झगडा होता. गांधींचा सर चिमणलाल सेटलवाड बरोबर सुद्धा झगडा होता. पण हे झगडेमात्र आता नामशेष झालेले आहेत. पण माझा गांधींशी चाललेला झगडा मात्र अजून चालूच आहे.

मी एका दरिद्री कुटुंबात जन्मलो आहे. कष्टाने व चिकाटीने मी शिकलो. पुढे बडोदा सरकारचे मदतीने विलायतेस जावून पदव्या संपादन केल्या. नंतर नोकरी धरली. दोन वर्षांनी नोकरी सोडून परत विलायतेस जावून बॅरिस्टर व डी. एससी झालो. तेव्हापासून समाजकार्य व धंदा प्रामाणिकपणे करीत आलो आहे. मी बॅरिस्टरीस सुरवात केली. त्यावेळी हायकोर्टातील सर्व वकील ब्राह्मण व सर्व सॉलिसिटर्स गुजराती, त्यावेळीच गांधींकडे जाऊन काहीतरी माझेकरिता मला मागता आले असते व मानमरातब केसेस व पैसाही मिळविता आला असता. गांधीना शरण जाऊन इतरांप्रमाणे माझा खाजगी वैयक्तिकवाद असता तर तो सुद्धा मी मिटविला असता. गांधींचा वाद न मिटता राहिलेला आहे. पण माझा व याचे कारण मला गांधींजवळ व्यक्तिशः काहीही मागावयाचे नाही. बुद्धीने, कर्तबगारीने व पुरुषार्थाने मी जीवन आक्रमीत आहे. मी जे गांधींकडे मागत आहे ते तुमच्या वतीने जे न्याय्य तेच मागत आहे. माझा गांधींशी चाललेला हा झगडा आपल्या सर्व समाजाच्या वतीने असून तो सर्व समाजाच्या भवितव्यतेचा आहे.

अलिकडे सगळेजण स्वराज्य मागत आहेत. पण विचार करा की, ते कोणाचे स्वराज्य आहे ? आम्ही स्पृश्यांना विचारतो की, तुमचे राज्य आमचेवरच का ? आम्हालाही आमचे स्वराज्य व न्याय हक्क नकोत का ? हिंदुचे स्वराज्य म्हणजे शुद्ध पेशवाई पेशवाई तरी स्वराज्यच होते ना! मग त्यात आमचा कितीतरी छळ झाला. अस्पृश्य माणसाची थुंकी रस्त्यावर पडून विटाळ होऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात गाडगे बांधले. त्याची पाऊले उठलेल्या धुळीच्या स्पर्शाचा विटाळ होऊ नये म्हणून पाठीशी खराटा लटकाविला व ओळखण्यासाठी गळ्यात काळा दोरा बांधला. ही परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणूनच माझे भांडण आहे.

माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही. पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे. अधिकाराच्या व मा-याच्या जागी आमची माणसे हक्काने आली पाहिजे. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघासाठी मी भांडलो. स्पृश्यांनी निवडलेली माणसे आम्हाला प्रतिनिधी नकोत म्हणून मी आग्रह धरला. अखेर मी विजयी झालो व स्वतंत्र मतदारसंघ मिळविला. पण गांधींना पोटदुखी उठली. अस्पृश्यांना स्वाभिमानाचे हक्क जे मिळाले ते दुष्टपणाने हिरावून घेणेसाठी त्यांनी आमरण अन्नसत्याग्रह केला व आपले हक्क हिरावून घेतले. त्यामुळे आपल्याला फारच कमी हक्क मिळाले. आपल्या बुरुजाला जी भेग पाडली आहे तीत संघटनेचा चुना वगैरे घालून आपण ती भरून काढली पाहिजे. आपले सरकारी अधिकारी पाहिजेत, मंत्री पाहिजेत, मध्यवर्ती सरकारातही मंत्री पाहिजेत. असे असता सात प्रांतात काँग्रेस मंत्रीमंडळे झाली. पण गांधींचा दृष्टिकोन बदलला नाही किंवा त्यांचे हृदयात पालटही झाला नाही. परवा गांधींनी मद्रासचा दौरा काढला. तेथे अस्पृश्यांची व तुमची एवढी तेढ का असा एकाने प्रश्न केला. तेव्हा सरळ व स्पष्ट उत्तर न देता गांधींनी काही तरी उडवाउडवीचे उत्तर दिले. इंग्रजांनी यांना अधिकाराची चट लाविली असे उद्गार काढले. मराठे, मुसलमान, तसेच खिश्चन, अँग्लो इंडियनांना नोकऱ्या देतात त्याबद्दल गांधींचे काही म्हणणे नाही फक्त अस्पृश्यांना दिल्या की त्यांच्या पोटात दुखते असा अनुभव आहे.

हे इलेक्शन अति महत्त्वाचे आहे. इंग्रज आपली सत्ता काढून घेऊन लोकांना सत्ता व घटना बनविण्याचे अधिकार देणार आहे. त्यासाठी एक घटना समिती बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आपले आमदार तेथे जाऊन घटनेचा व्याप ठरविणार आहेत. आपल्याला नोकऱ्या शिक्षण, प्रतिनिधीत्व, सत्ता स्वतंत्र अस्तित्व, वसाहती वगैरे मागण्या निर्भिडपणे मांडणारी माणसे पाहिजेत. स्पृश्याचे ओंजळीने पाणी पिणारे लोक नको आहेत. जर काँग्रेस तिकीटावरची माणसे कोणाचीही भाडमीड न ठेवता आमच्या मागण्या मांडतील तर मी त्यांना पाठिबाच देईल. पण ती माणसे स्पृश्यांचे गुलाम आहेत. अस्पृश्यांचे हिताकडे न बघता स्वार्थाकडे बघणारी आहेत. त्यांना आपण पाडले तर फारच चांगला परिणाम होईल. ज्याप्रमाणे धनी आपल्या कुत्र्याला कोठे दुसरीकडे जाऊ नये म्हणून पट्टा लावून बांधतो त्याप्रमाणे काँग्रेसचे तिकीट म्हणजे पितळेचा पट्टा आहे. काँग्रेसला जवळ उभे करु नका. काँग्रेसचा उमेदवार आपला शत्रू आहे. तो पराधीन आहे. आपली माणसे पराधीन होता कामा नयेत म्हणून तुम्ही दक्ष रहा.

पराधीनतेने नुकसान कसे होते याचे एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण सांगतो. फलटणचे काही महारांना चार चाहूर जमीन होती. पण काही कारणानिमित्त तेथील राजा एका देऊळात दररोज पाचशे ब्राह्मणांना पंचपक्वान्न जेवू घालीत होता. राजवाड्यातून दररोज गाड्या भरुन अन्न येत असे व महार लोक तेथील उष्ट्या अन्नावर दररोज अवलंबून राहिल्यामुळे शेती करीत नव्हते. महारांच्या जमिनीवर जंगल उगवून त्या जमिनी इतर मराठ्यांनी तशाच कब्जात घेतल्या. पुढे 60 ते 70 वर्षांनी राजा शहाणा झाला. त्याने ब्राह्मणांचे जेवण बंद केले. महारांचेही उष्टे बंद झाले. पुढे एक म्हातारा आपली जमीन मिळवून द्या म्हणून माझेकडे कागदपत्र घेऊन आला, पण 1874 चे आधी जमिनी गेल्यामुळे काही करता आले नाही. अशाप्रकारे खरकट्यामुळे महारांच्या जमिनी गेल्या व परावलंबी जीवनामुळे हक्क गेले. तेव्हा तुम्ही सर्वांनी झोप सोडून डोळे उघडा व जागे रहा. वर्ष दोन वर्षातच येथे मोठे परिवर्तन होणार आहे. इंग्रजसत्ता देईल ती सत्ता दुसऱ्याकडे न जाता आपणाकडेही पाहिजे, यासाठी चालू निवडणुका हा एक निर्णयाचा संग्राम आहे. कौरव पांडवांच्या संग्रामासारखा आहे.

आपले ब्राह्मणेतर भिडू आता काँग्रेसकडे झुकत आहेत.. आता काँग्रेस व आपली फेडरेशन यामध्येच झगडा आहे. आपण एकजूट केली, निश्चय व निर्धार केला तर जय आपलाच! मेलो तरी हरकत नाही पण सन्मानाने जगू असा निर्धार केल्याशिवाय कायम स्वरुपाचा सामुदायिक बदल घडवून आणता येणार नाही.

वीस वर्षापूर्वीच्या परिस्थितीत व आताचे परिस्थितीत जमीन अस्मानचे अंतर आहे. त्यावेळी शेकडा 90 लोक “तात्या तुमच्या गोठ्यातच राहतो” असे म्हणत असत. आज तसे म्हणणारा आपल्यातील एकही माणूस नाही ही आनंदाची गोष्ट आहे. महाराला पूर्वी कायदेमंडळाच्या इमारतीत झाडूवाल्यांचेच काम होते. पण आज माझी 15 माणसे कायदेमंडळात सभासद आहेत व इतरांच्या मांडीला मांडी लावून मानसन्मानाने ती तेथे बसत आहेत. आज ना उद्या ती मंत्रीही होतील म्हणून हे इलेक्शन फार महत्वाचे आहे. ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर निवडणुकीस उभे राहतात ते मानासाठी. पण तुम्हा आम्हाला कायदेमंडळात जावयाचे. ते ज्या जात्याखाली आपण भरडले जातो त्या जात्याचा खुंटा आपले हाती आणण्यासाठीच ! जोर जुलूम टाळणे हे आपले तेथे जाऊन करणेचे काम आहे. आपल्या जवळ पैसा नाही. आपण बलवान म्हणून आपल्याला राजकीय सामर्थ्य पाहिजे. आमच्या संमतीने राज्यकारभार चालला पाहिजे. तेव्हा ज्याला मत असेल त्याने त्या मताचा अमोलिक वस्तुसारखा उपयोग केला पाहिजे. मत म्हणजे ईश्वराने दिलेला संजीवनी मंत्र आहे. त्याचा योग्य उपयोग केला तरच आमचे संरक्षण होईल. स्वाभिमानी जीवनाचा तो एक तरणोपाय आहे, त्याची जोपासना करा. या दृष्टीनेच या इलेक्शनचा विचार करा.

आपण कायदेमंडळातही अल्पसंख्यांक आहोत. 175 मध्ये आपण 15 आहोत. या संख्येवर कार्य करणे कठीणच ! तेव्हा या 15 ची आता 20 ते 25 माणसे आपण निवडून आणली पाहिजेत. म्हणूनच आपण जनरलच्या जागाही लढवित आहोत. दक्षिण भागाला में इनामदार यांना उभे केले आहे. सर्वांनी त्यांना चारही मते दिली तरच आपल्याला यश येईल. आपली दहा हजार मते आहेत. दहा हजार जणांनी तरी त्यांना मते दिली पाहिजेत. प्रत्येकाला 4 मते व 4 जागा आहेत. तरी सर्वांनी ही जबाबदारी ओळखली पाहिजे. आपल्या विरोधकाजवळ पैसा आहे. आपल्या विरोधकांनी काळ्या बाजारात मिळविलेला पैसा पापक्षालनार्थ ते कॉंग्रेसला निवडणुकीसाठी देत आहेत. पण पैशावर जर आपण राजकारण खेळू लागलो तर आपणाला राजकारण सोडावे लागेल व राजकारणाचा खेळखंडोबाच होईल. आपले अस्पृश्य लोक कॉंग्रेसच्या मागे नाहीत. इतर लोक पैशास भुलून काँग्रेसच्या मागे लागतात. कारण काँग्रेसला जर लोक मानतात तर मग काँग्रेसचे इलेक्शन कवडीही खर्च न होता झाले पाहिजे. 1937 साली माझ्या विरोधकाने 35,000 रूपये खर्च केले. माझा खर्च फक्त जरुरी पुरता अवघा 900 रुपये इतकाच होऊन जवळजवळ माझा पहिला नंबर आला याबद्दल मला धन्यता वाटते. म्हणून राजकारण कोणाला कळत असेल तर ते अस्पृश्यांना असे म्हणावे लागते. बाकीचे राजकारण स्वतःकरिता करतात. समाजाचे किंवा देशाचे हित त्यांचेपुढे नसते!

मी गेली 20 वर्षे सतत राजकारण करीत आहे व खोलवर त्याचा अभ्यासही करीत आहे. माझे राजकारण कधीच फसलेले नाही. मी राजकारणाचे पाण्यात पूर्ण डुंबलो आहे. म्हणून माझे राजकारण खरे, प्रामाणिक व स्वभावजन्य आहे. इतर लोक पाण्याच्या कडेला उभे राहून नुसत्या उड्या मारुन मजा पहातात. त्यांना अनुभव नाही. आपले तसे नाही. तरी आपण सर्वांनी जागरुक राहून विरोधकांच्या कसल्याही भूलथापांना, धाकदपटशांना भीक न घालता समाजाच्या उद्धाराचे पवित्र कर्तव्य

आपली चारही मते आपल्याच उमेदवारास देऊन बजावावे. मला सांगावयाचे ते सांगून मी माझे कर्तव्य केले आहे. तुम्ही सर्वजण तुमचे कर्तव्य पार पाडाल अशी मला आशा आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password