मुलांना शिक्षण देण्यात कसूर करू नका.
शनिवार, तारीख 15 फेब्रुवारी 1941 रोजी रात्री 10 वाजता फलटण रोड, मुंबई येथील म्युनिसीपल चाळीमध्ये प्रि. दोंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली जंगी जाहीर सभा झाली. सभेत अलोट जनसमूह हजर होता. अस्पृश्यांचे एकमेव नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेस हजर राहणार म्हणून फोर्ट भागात व इतर ठिकाणी राहाणाऱ्या लोकांचे थवेच्याथवे 8 वाजल्यापासून सभेच्या ठिकाणी येत होते. डॉ. बाबासाहेब इतर कार्यकर्त्यांसह सुमारे 10 वाजता सभास्थानी येते झाले. त्यावेळी जयघोषाच्या निनादानी सर्व वातावरण दुमदुमून गेले होते.
नंतर थोड्या वेळाने सभेस सुरवात झाली. सभेचे नियोजित अध्यक्ष प्रि. दोंदे यानी अध्यक्षस्थान स्विकारल्यानंतर भाषण केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 230 रुपयाची थैली अर्पण केली. नंतर डॉ. बाबासाहेब भाषण करावयास उभे राहिले, ते आपल्या भाषणात म्हणाले,
सभाधिपती, भगिनीनों व बंधुनो,
बऱ्याच वर्षानंतर आज मी याठिकाणी आलेलो आहे. लहानपणी मी ज्यावेळेस एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये जात होतो त्यावेळेस याच ठिकाणी माझे काही नातलग राहत होते. त्याचे मला जेवण्याचे आमंत्रण होते म्हणून मी आलो होतो. त्या दिवसापासून नाही. तो फक्त आजच मी येथे येत आहे.
एकंदरीत आजपर्यंत जे समाजकार्य होत आले आहे त्याचा वारा येथपर्यंत वहात आला असेल असे मला वाटत नव्हते. त्याचे कारण असे की, याठिकाणी अजून कसलीही चांगली सभा झालेली आहे, असे माझ्या ऐकिवात नव्हते. तथापि, आज येथील लोकांनी ही सभा घडवून आणली त्याबद्दल मला समाधान वाटत आहे.
मी दुसरी सगळी कामे बाजूला ठेवून हे इमारतीचे काम हाती घेतले आहे. या इमारतीची आपल्याला किती जरूरी आहे. याची तुम्हाला चांगली कल्पना असेल, असे मला वाटत नाही. तुम्हापैकी प्रत्येकाला माहीत असेल की, आपल्या समाजाची कारकीर्द महाड सत्याग्रहापासून सुरू झाली. तुम्ही कुलाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राहणारे असल्यामुळे तुम्हाला महाडाविषयी माहिती असणे शक्य आहे. या महाडच्या सत्याग्रहाचा माझ्या मनावर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्या सत्याग्रहापासून मी जर काय शिकलो असेल तर ते हे की, आपण आपल्या उन्नतीचे काम करावयास लागलो तर स्पृश्य लोक आपल्याला भयंकर त्रास देतात. महाडच्या ठिकाणी आपले लोक जेवावयास बसले असताना स्पृश्य लोकांनी त्यांना मारिले. मी त्यावेळेस डाक बंगल्याकडे असताना मला या स्पृश्य लोकानी गराडा घातला. परंतु तेथे पोलीस असल्यामुळे त्यांना मला काही करता आले नाही.
ज्यावेळेस सत्याग्रहास आलेले लोक आपआपल्या गावी परत गेले त्यावेळेस बऱ्याच खेडयातून स्पृश्य लोकांनी आपल्या पुरुषांना तर मारलेच. पण आपल्या स्त्रियांनादेखील भाल्याने मारहाण करण्यास मागेपुढे पाहिले नाही. इतकेच नसून बऱ्याच स्पृश्य लोकांनी आपल्या लोकांनी लावलेल्या जमिनीदेखील काढून घेतल्या आणि बराच जाच केला. हा जाच कुलाबा जिल्ह्यातील आपल्या लोकांनी 1 ते 2 वर्षे काढला. परंतु खेदाची गोष्ट अशी की, आम्ही मुंबईत राहणारे लोक त्याच्याकरिता काहीही करू शकलो नाही. ह्याचे कारण काय ? त्याचे कारण दुसरे तिसरे काही नसून त्या लोकांची दुःखे निवारण करण्यासाठी आपल्याजवळ पैसा नव्हता. याच कारणामुळे माझ्या मनावर असा परिणाम झालेला आहे की, आपल्याला आपला सामाजिक लढा लढविण्यासाठी आपणाजवळ पैसा असणे अत्यावश्यक आहे. तो पैसा आपणाला या इमारतीपासून मिळेल असे वाटते.
आतापर्यंत आपले बरेचशे सामाजिक काम झालेले आहे आणि होत आहे. परंतु जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत हे ठीक आहे. परंतु माझ्यानंतर काय ? आपल्यामध्ये अजूनपर्यंत व्हावी तितकी सुधारणा झालेली नाही. आपल्याला पुढे आपला लढा लढविणे क्रमप्राप्त आहे. त्याकरिता ही इमारत झाल्यावर माझ्यानंतरच्या लोकाना सोयीस्कर होईल यात संशय नाही. त्याच्याकरिता मी जर एखादी योजना करून ठेवली नाही तर ते मला दोष दिल्याशिवाय राहणार नाहीत.
ही इमारत झाल्यावर तिच्यापासून सालाना पाच-सहा हजार रुपये उत्पन्न येईल, असा माझा अंदाज आहे. या उत्पन्नाचा विनियोग आपल्या लोकाना स्पृश्य लोकांकडून होणाऱ्या त्रासाचे हरण करण्यासाठी करण्यात येईल.
ज्याप्रमाणे एखादा शेठ आपल्या मुलाच्यासाठी इमारत किंवा एखादी चाळ बांधून ठेवतो त्याचप्रमाणे ही इमारत बांधण्यात माझा हेतू आहे. माझ्यानंतर ह्या इमारतीपासून तुम्हाला फारच मदत होईल. परंतु तुम्ही सर्वांनी एकोप्याने राहिले पाहिजे. म्हणून सर्वांनी या कामाकरिता मदत करणे अत्यावश्यक आहे.
याप्रसंगी मला आपणास तीन गोष्टी सांगाव्याश्या वाटतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ही की, तुम्ही जो हा कचरापट्टीचा धंदा करिता तो काही इतका मानाचा नाही. तो अत्यंत गलिच्छ असा आहे. आपले लोक पूर्वी पलटणीत होते. हल्ली नाहीत. त्याचे कारण काय ? त्याचे कारण आपले लोक हा धंदा करतात हेच आहे. हल्ली ब्रिटिश सरकारला माणसाची फार जरुरी असताना देखील आपल्याला पलटणीमध्ये घेत नाहीत. पलटणीमध्ये स्पृश्य लोकांचा जास्त भरणा असल्यामुळे ब्रिटिश सरकार आपल्यापेक्षा याबाबतीत त्यांची जास्त पर्वा करीत आहे. म्हणून तुमच्या मुलांना तुमच्यानंतर तुमच्यासारखाच धंदा करण्याची पाळी येऊ नये, म्हणून तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावयास पाहिजे. मुलांना शिक्षण दिले पाहिजे. तुमची मुले क्लर्क, शिक्षक वगैरे झाले पाहिजेत अशी तुम्ही इच्छा धरली पाहिजे. इतर जिल्ह्याचे मानाने जर पाहिले तर कुलाबा, रत्नागिरी या जिल्ह्यात आपले लोक शिक्षणाच्या बाबतीत फार मागासले आहेत. तुमच्यात फार थोडे मॅट्रिक झालेले आहेत. याकरिता तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण देण्यास कसूर करता कामा नये.
दुसरी गोष्ट अशी की, तुम्हाला कपडे वापरण्याच्या बाबतीत फार वाईट सवय लागलेली आहे. तुम्ही कामावर जाताना फिरावयास जाताना किंवा लग्नाला जाताना एकच कपडा घालीत असता हे फार वाईट आहे. कामावर जाण्याकरिता वेगळे व फिरावयास जाण्याकरिता किंवा लग्नकार्यात जाण्याकरिता चांगले कपडे करा. दोन वेळचे खावयास नसले तरी चालेल परंतु चांगले कपडे करा. कारण कपड्यापासून आज जगात मान आहे.
तिसरी गोष्ट अशी की, मुंबईत म्युनिसीपल कामगार युनियन फार जोरात आहे. मागे एकदा मडकेबुवांनी ही युनियन काढण्याचा घाट घातलेला होता. त्यावेळेस त्यांना यश आले नव्हते. परंतु आता त्यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे. म्हणूनच मी तुमचे व मडकेबुवांचे अभिनंदन करतो. संघटनेचे किती महत्त्व आहे याचे तुम्हास एक ताजे उदाहरण देतो. म्युनिसीपालिटी कामगार युनियनतर्फे ड्रेनेज डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांना कामाच्या मानाने फार थोडा पगार मिळत असे. त्यांना जास्त पगार मिळावा म्हणून म्युनिसीपल कमिशनरला कळविले आणि संपाची नोटीस दिली. संप फोडण्याचा फार प्रयत्न करण्यात आला. आमचा परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी मागण्या म्युनिसीपल कमिशनरने मान्य केल्या व ड्रेनेज डिपार्टमेंटमधील लोकांचा पगार वाढविण्यात आला. या मुंबईमध्ये इतर लोकांनी जे संप केले त्यात त्यांना यश आले नाही. मग हाच संप कसा यशस्वी झाला ? त्याचे कारण दुसरे तिसरे नसून संघटना हेच होते.
तुम्ही जो हा धंदा करता तो करण्याकरिता स्पृश्य लोकांना दरमहा 100 रुपये दिले तरी कोणीही तो करणार नाही. तुम्ही जर संप केला तर मुंबईत राहाणाऱ्या लोकांना तडफडून मरून जावे लागेल. म्हणून तुम्ही एकी ठेवल्यावर या मुंबईमध्ये राहाणाऱ्या लोकांची नांगी तुमच्या हातात राहील.
हल्ली तुम्हाला महागाई भत्ता मिळावा म्हणून म्युनिसीपालिटीमध्ये ठराव आणलेला आहे. म्हणून तुम्ही म्युनिसीपल कामगार युनियनचे सभासद होऊन युनियनच्या लढ्याला सहाय्य करा इतके सांगून मी माझी जागा घेतो.