Categories

Most Viewed

12 फेब्रुवारी 1938

चातुर्वर्ण्यामुळे हिंदुस्थानचा -हास व अधःपात झाला.

तारीख 12 फेब्रुवारी 1938 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मनमाडहून निघून परिषदेसाठी सटाण्यास जात असता वाटेत चांदवड वगैरे ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. दुपारी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री. देवराव नाईक, प्रधान, कवळी, गणपतराव निळे, रोकडे, भोळे, भाऊराव गायकवाड व नाशिक जिल्हा युवकसंघाच्या 20 स्वयंसेवकांची एक मोटार या समवेत सटाण्यास पोचले. सटाण्याचे श्री. अभिमान पाटील, धर्मा तानाजी पाटील व प्रमुख मंडळी दोन मैल सामोरे आली होती. डॉ. बाबासाहेबांची मिरवणूक सटाण्याच्या प्रमुख रस्त्यानी काढण्यात आली होती. सर्व गावभर डॉ. बाबासाहेबांच्या स्वागतार्थ पताका वगैरे लावण्यात आल्या होत्या. गावाच्या वरच्या भागात यशवंतराव महाराजांच्या मंदिराच्या मागे नदीपात्रात मुद्दाम तयार केलेल्या भव्य मंडपात परिषदेची तयारी केली होती. परिषदेचे स्वागताध्यक्ष महंत नानकदास यांनी बाबासाहेबांचे व जमलेल्या पाहुणे मंडळींचे स्वागत केल्यानंतर परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेबांनी स्वीकारावे म्हणून ठराव मांडण्यात आल्यानंतर व त्यास रीतसर मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. परिषदेत श्री. भोळे, देवराव नाईक, भाऊराव गायकवाड वगैरेंची भाषणे झाल्यावर डॉ. बाबासाहेब प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात व जनतेच्या जयघोषात बोलण्यास उभे राहिले. डॉ. बाबासाहेब म्हणाले.

बंधु आणि भगिनींनो,
मी रेल्वे कामगारांच्या मनमाडास भरणाऱ्या परिषदेसाठी या भागात आलो असता आपल्या भागात येण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मला आनंद होत आहे. माझ्या या दौऱ्यातील मुख्य हेतू आपले राजकारण लढविण्यासाठी निर्माण केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रचार करणे असा आहे. आजच्या प्रसंगी स्वतंत्र मजूर पक्षाच्या महतीपेक्षा दुसरे काही सांगण्याचे प्रयोजन मला दिसत नाही. आजच्या सभेत बरेच मानीव स्पृश्य बंधु हजर आहेत हे पाहून मला आनंद होत आहे. मागे आम्ही ज्या सभा भरवीत असू त्याही सभांना मानीव स्पृश्यांची काही मंडळी हजर राहत असत. परंतु ती मंडळी आमच्या त्या सभेत काय तमाशा चालला आहे हे पाहण्यासाठी जमत असत. आजची स्थिती तशी नसल्याने मीही या सभेत जुजबी भाषण न करता जरा वेगळे करणार आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाचे सिंहावलोकन केल्यास हिंदुस्थानात आजपर्यंत प्रजासत्ताक राज्यपद्धती अंमलात आली नव्हती. अनेक ग्रंथांच्या वाचनाने मला जी माहिती मिळाली आहे. त्यावरून स्पष्ट असे दिसून येते की, हिंदू राष्ट्राचा -हास व अधःपात हिंदुंना मान्य असलेल्या चातुर्वर्ण्यामुळेच झाला आहे. चातुर्वर्ण्याची प्रथा सुरू होऊन आज जरी अनेक शतके झाली असली तरी त्या प्रथेची पाळेमुळे हिंदू संस्कृतीत खोलवर जाऊन भिडली असल्याने तिचे अनेक दुष्परिणाम हिंदुस्थानास भोगावे लागले आहेत.

चातुर्वर्ण्याची शिकवणूक म्हणजे ब्राह्मणांनी विद्या शिकावी व शिकवावी. क्षत्रियांनी लढण्याचे काम करावे, वैश्यांनी व्यापार उदीम करावा व शूद्रांनी सेवा करावी. या पद्धतीमुळे आपल्या राष्ट्राचे कसे व किती नुकसान झाले हे चांगल्या शिकल्यासवरलेल्यांनाही अजून नीट उमगत नाही. या देशातील बहुसंख्यांक असा वर्ग अजिबात बाजूला टाकून देण्यात आला. त्यामुळे राष्ट्राच्या स्वातंत्र्याला पोषक असा असलेला बहुसंख्यांक वर्ग निकामी ठरला तर हा देश नेहमीच परक्यांच्या पारतंत्र्यात लोळत राहिला असल्याचे दृश्य दिसेल. काही दिवस स्वातंत्र्य भोगल्यानंतर ग्रिकच्या अलेक्झांडर राजाने हिंदुस्थानावर स्वारी करून हिंदुस्थानात आपली राज्ये स्थापली. तद्नंतरच्या अल्प काळात थोडे स्वातंत्र्य मिळून मराठेशाही स्थापन होते न होते. पेशवे सर्व कारभार आपल्या हातात घेतात न घेतात तोच शेवटी सर्व देश इंग्रजांच्या गुलामगिरीत पुन्हा ढकलतात. आजच्या प्रसंगी जमलेल्या तुम्हा सर्वांना मी असे विचारतो की, या देशाला भाग्याचे दिवस सतत का लाभले नाहीत ? इतर देशाचे इतिहास आपण पाहिल्यास तेथे अशी स्थिती आपणास आढळणार नाही याचे कारण काय ? या गोष्टीचा आपण बारकाईने विचार केल्यास हिंदुंच्या धर्मगुरूंनी अर्थात ब्राह्मणांनी हिंदुस्थानावर लादलेल्या चातुर्वर्ण्याच्या चौकटीमुळेच हा अनर्थ ओढवून घेतला आहे.

तुम्हा सर्वांना एक गोष्ट सहज पटण्यासारखी आहे. कल्पना करा की, एखाद्या गावावर पठाणांचा हल्ला आल्यास सर्व जातीचे लोक हातात शस्त्र धारण करून संघटनेने हा हल्ला परतवू लागले तर हल्ला परतविता येईल. ज्याच्या हातात तलवार आहे असे लोक आपल्यावरील जुलूमाचे हल्ले परतवितात. परंतु त्याऐवजी जर फक्त चार लोक तलवार हातात घेतील व इतरांना खुरप्यालाही हात लावण्यास धैर्याने मनाई करतील तर त्यामुळे राष्ट्राचे संरक्षण कसे करता येईल ?

हिंदुस्थानावर चढाई करून अलेक्झांडर आला अगर महंमद तघलक आला तरी मूठभर क्षत्रियांखेरीज दुसऱ्या कोणीच लढण्यास अगर राष्ट्राच्या संरक्षणास जाऊ नये ही चातुर्वर्ण्याची शिकवणूक, मूठभर ब्राह्मण त्यांना शस्त्र द्यावयाचे नाही. वैश्यांनी शस्त्र घ्यावयाचे नाही. शुद्रांनी हाती शस्त्र धरावयाचे नाही. या शिकवणुकीनेच हिंदुस्थानचा -हास व अधःपात झाला आहे. ज्याच्या मनगटात जोर आहे अशांना हातात शस्त्र धरण्याची जर मोकळीक असती तर झाला तसा विपरीत प्रकार झाला नसता. या सर्व क्लुप्त्या धर्मगुरू म्हणून मिरविणाऱ्या भटांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जरी प्रथम केल्या असल्या तरी परिणामी त्या राष्ट्रविघातक झाल्या आहेत यात वाद नाही. अस्पृश्य मानलेल्या समाजाला आजवर जो अनन्वीत जुलूम व छळ सोसावा लागला आहे त्याचे मर्म यात आहे. जर अस्पृश्य मानलेल्या समाजाच्या पूर्वजांच्या हातात शस्त्र असते तर त्याच्या बापजाद्यांनी दोन हजार वर्षे अस्पृश्यतेचा व इतर अन्य तऱ्हेचा जुलूम गोडीगुलाबीने सोसला असता का? चातुर्वर्ण्याच्या दुष्ट शिकवणूकीने बहुजन समाजाला शस्त्र व विद्या ही मुळी दिली नाहीत. त्यामुळे या देशाची काय स्थिती झाली आहे ? या प्रांतात एके काळी क्षत्रियांचे राज्य होते. क्षत्रियांच्या -हासानंतर पेशवाई उदयास आली. पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रज अंमल सुरू झाला. एकेकाळी राज्य करणारे क्षत्रिय आज कोठे आहेत ? जर पहाल तर राज्यकारभार ज्या क्षत्रियांनी हाकावा ते क्षत्रिय डोक्यावर तांबडी पगडी गळ्यात पट्टा अशी चपराशांची कामे करताना बरेच दिसतील.

ब्राह्मणांनी वेदाध्ययन करून शिकावे व शिकवावे, क्षत्रियांनी लढावे, वैश्यांनी व्यापार उदीम करावा, शूद्रांनी सेवाधर्म आचरावा, हा मनू पालटत आहे. हिंदुस्थानात प्रजासत्ताक राज्य आज प्रथमच सुरू आहे. अशा प्रसंगी राष्ट्रहीत साधून हिंदुस्थानला संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडा सुरू करणाऱ्या काँग्रेसने आम्ही बहुसंख्यांक गोरगरीब शेतकऱ्यांचे, मजुराचे पाठीराखे व कल्याणकर्ते आहोत असा कितीही टाहो फोडला तरी त्यामुळे भुलून जाण्याइतकी ही प्रजा दुधखूळी नाही. ज्या प्रजेच्या हितासाठी काँग्रेसने सात प्रांतात अधिकार ग्रहण केले त्याचे निरीक्षण केल्यास तुम्हास काय दिसते ? मुंबई कायदे मंडळात 11 अधिकाऱ्यांच्या जागांपैकी 6 जागा ब्राह्मणांनी बळकावल्या आहेत. मद्रास प्रांताकडे अगर बिहार प्रांतातील मंत्रिमंडळाकडे पाहिल्यास त्यात अर्धे ब्राह्मण आहेत. तीच स्थिती इतरही प्रांतात काँग्रेसने केली आहे. तेव्हा थोडक्यात सांगावयाचे म्हणजे बहुसंख्यांक असलेल्या गोरगरीब शेतकरी व मजूर पक्षाच्या नावावर कॉंग्रेस ब्राह्मणांचे भूत आमच्या मानगुटीवर लादणार असल्यास आपण सर्वांनी वेळीच सावध होणे अत्यंत जरूर आहे.

ब्राह्मणेतरातील सुशिक्षितांनी काही दिवस सत्यशोधक नावाचा पंथ स्थापन केला. तो पंथ नावारूपास येण्यापूर्वीच त्यातील कार्यकर्ते आपला नाडामुडा गुंडाळून कॉंग्रेसच्या मागे लागले आहेत. त्यांना त्यांची शुद्ध राहिलेली दिसत नाही. महात्मा गांधींच्या राजकारणाने त्यांच्या काळात जर सर्व राजकीय सत्ता ब्राह्मणांच्या हाती जाणार असली तर अशा राजकारणास आग लावली पाहिजे. महात्मा गांधी राजकारणाच्या गाड्याच्या नाड्या जर शेठजी भटजींच्या हाती देणार असेल व ब्राह्मणांचे पिशाच्च पुन्हा जिवंत करणार असेल तर त्या ब्राह्मणांचा नायनाट आपणच सर्वांनी करावयास हवा आहे. हे कार्य नुसते माझे नसून बहुसंख्यांक असलेल्या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांचे मजुरांचे व मराठ्यांचे आहे. या सर्वांना संघटित करून राजकारण लढविल्यास कायदेमंडळात जबाबदारीच्या 11 च्या 11 ही जागा ते काबीज करू शकतील. परंतु यथेच्छ जेवण झाल्यानंतर उरलेल्या खरकट्यांच्या पत्रावळी उकिरड्यावर फेकून दिल्या असता त्या चाटण्यात आनंद मानणाऱ्या कुत्र्यासारखी त्यांची स्थिती झाली आहे. जे काही थोडे मिळेल त्यातच ते समाधान मानीत आहेत मला ते नको आहे. राजकारणात समानता उत्पन्न झाली पाहिजे. इतकेच नव्हे तर एखादा लायक भिल्ल असल्यास तो या प्रसंगी मुख्य प्रधान झाला पाहिजे. समाजात असलेला उच्च-नीच भेद कमी झाला पाहिजे. ही गोष्ट काँग्रेसच्या हातून होणे शक्य नाही व म्हणून मी कॉंग्रेसमध्ये सामील होत नाही.

अनेक वेळा असे सांगण्यात येते की, महात्मा गांधींच्या पुढे गेलेले विरोधक आपला विरोध विसरून विलग होत असतात. त्यांची बोबडी वळते असे सांगण्यात येते. परंतु माझा अनुभव त्यांच्या अगदी विरुद्ध आहे. मी दहा वेळा महात्मा गांधींना भेटलो आहे. पण म्हणतात त्याप्रमाणे कोणतीच भूत-बाधा मला झालेली नाही.

गोरगरीब, शेतकरी व मजूर वर्गाच्या हितरक्षणार्थ आम्ही “स्वतंत्र मजूर पक्ष” नावाचा पक्ष काढला आहे. या पक्षाबाबत फार पाल्हाळीक न सांगता या पक्षाच्या ज्ञानाची किल्ली सांगेन. एकाच बोली या साधुक्तीनुसार थोडक्यात सांगतो. राजकीय लढा लढविण्यासाठी काँग्रेस आज अस्तित्वात असताना दुसरा पक्ष काढण्याचे कारण काय ? म्हणून अनेकजण मला प्रश्न विचारतात. मला त्यांना इतकेच सांगावयाचे आहे की, काँग्रेस ही भांडवलवाल्यांची बटीक आहे. कारण काँग्रेसचे आजचे सर्व थेर काँग्रेसमधील भांडवलवालेच लागेल तो पैसा पुरवून माजवित आले आहेत. अर्थात भांडवलवाल्यांचा त्याच्या बुडाशी एकच हेतू आहे की या काँग्रेसमार्फत आपले जितके हीत साधता येईल तितके साधावे. हे जरी खरे असले तरी काँग्रेसवाले बाहेरून आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी व मजुरांसाठीच स्वराज्याचा लढा लढवीत आहोत, हे त्यांचे म्हणणे मानभावीपणाचे दिसते. कारण श्रीमंत भांडवलवाले व गोरगरीब, शेतकरी व मजूर यांचे हितसंबंध परस्पर विरोधी असे आहेत. तेव्हा गोरगरिबांसाठी श्रीमंत भांडवलवाले पदरमोड करून आपले स्वतःचे नुकसान करून घेतील, हे संभवनीय दिसत नाही. जसे व्यवहारात आपण नेहमी पहातो की, मांजर आणि उंदीर, साप आणि मुंगूस, लांडगा आणि शेळी यांचे निर्सगतःच वाकडे असते तसेच श्रीमंत भांडवलवाले व गरीब शेतकरी व मजूर यांचे आहे. व्यवहारात जसे मुंगूस सापास चाटताना अगर उंदीर मांजरीस पिताना अगर शेळी लांडग्याच्या मांडीवर निर्विघ्नपणे झोप घेताना आढळावयाची नाही. तद्वतच श्रीमंत भांडवलवाल्यांच्या मोहबतीवर गोरगरीब, शेतकरी व मजूर यांचे हित होईल या म्हणण्यावर कोणीही विश्वास ठेवून फसू नये. ही गांधींची माया आहे म्हणून शेतकरी व मजूर यांनी भांडवलवाल्यांच्या कॉंग्रेस या संस्थेपासून जरा सावध राहावे इतकेच सांगावयाचे आहे. कारण जो मारवाडी गोरगरीब शेतक-यास व मजूरास लुटून त्यावरच गब्बर होतो तो काय वर्षास चार आणे देऊन काँग्रेसचा सभासद झाल्याने आपला स्वभावधर्म एकदम बदलिल हे म्हणणे हास्यास्पद आहे. आज हरिपुरा येथे कॉंग्रेसचे 51 वे अधिवेशन भरत आहे. त्यासाठी काही लाखांनी खर्च होणार असे म्हणतात. हा सर्व खर्च होणारा पैसा कोठून आला ? हा सर्व पैसा श्रीमंत शेठांनी दिला आहे.

याबाबत एक अनुभवाची गोष्ट सांगतो. आमच्या कोकणात श्रीमंत मुसलमान लोक गोरगरीब लोकांच्या मुलांची लग्ने 10 वर्षे त्यांच्या येथे काम करण्याच्या कराराने करून देतात. परंतु हे एकच लग्न नसून असल्या अनेक गरजू लोकांची लग्ने एकाच मुहूर्तावर करतात. शेवटी मुदतीनंतर आणखी एक वर्ष लोभाचे. या सर्व लोकांना सावकाराकडे काम करावे लागते. त्याचप्रमाणे काँग्रेस अधिवेशनासाठी लागणाऱ्या लाखो रुपयांच्या श्रीमंतांच्या कर्जापायी या हिंदुस्थानास आणखी किती दिवस श्रीमंतांच्या गुलामगिरीत काढावे लागतील ? तेव्हा हा लढा गोरगरीब मजूर व शेतकरी यांनी संघटित होऊनच लढविला पाहिजे. स्वतंत्र मजूर पक्षाचा आज मी जरी अध्यक्ष असलो तरी मला त्याचा मोठा हव्यास नाही. दुसरा कोणी अध्यक्ष होऊन ही जबाबदारी घेण्यास तयार असल्यास मला त्यात फार समाधान वाटेल. मला असा काय लाभ आहे ? मी जर यापासून दूर असतो तर आज काही लाखांचा धनी खास झालो असतो. हिंगाला जसा वास आहे तसा आम्हास अस्पृश्यतेमुळे लागला आहे. तेव्हा अस्पृश्येतर जरी त्यामुळे बिचकून या स्वतंत्र मजूर पक्षापासून दूर राहू लागले तर त्यांची मर्जी. परंतु आपल्यातील दरेक वयात आलेल्या स्त्री-पुरुषांनी या स्वतंत्र मजूर पक्षाचे वर्षाकाठी चार आणे भरून सभासद व्हावे व स्वतंत्र मजूर पक्षाची शक्ती वाढवावी अशी विनंती करून आपली रजा घेतो. पुष्पहार अर्पण झाल्यानंतर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ च्या जयघोषात सभा विसर्जन पावली.

दुपारी 3 वाजता सटाण्याहून निघून वाटेत काझीसांगवी, तालुका चांदवड येथे डॉ. बाबासाहेबांचे अभिनंदन करण्यात आले. सदर प्रसंगी सदर गावचे मराठा जातीचे प्रमुख पुढारी श्री. कारभारी बगाजी पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांचे गुणवर्णनपर भाषण केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password