Categories

Most Viewed

11 फेब्रुवारी 1936

सर्वांनी दृढनिश्चयाने आणि संघटितपणे कूच करावयाचे आहे.

मंगळवार तारीख 11 फेब्रुवारी 1936 रोजी अहमदनगर मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. सभा डॉ. बाबासाहेबांच्या स्वागतार्थ बोलाविली होती. सभेस 5000 वर जनसमूह जमला होता. शहरातील काही प्रमुख मंडळीही हजर होती. आरंभी स्थानिक अस्पृश्य पुढाऱ्यांची भाषणे झाली. त्यात सर्वांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुढारीपणावरील आपला पूर्ण विश्वास प्रगट करून त्यांची धर्मातराची घोषणा आपल्याला सर्वतोपरी मान्य असल्याचे जाहीर केले.

बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,
धर्मांतराच्या प्रश्नाबद्दल बोलण्यास आज मी आलो नव्हतो. कारण जाहीर केल्याप्रमाणे अस्पृश्यांच्या एका युवक संघाचे उद्घाटन करावयाचे एवढेच माझे काम होते. परंतु आज आपण इतके लोक येथे मोठ्या उत्कंठेने जमला आहात. तुम्हा सर्वांची निराशा करणे शक्य नाही. प्रथमतः मी निक्षून सांगतो की, धर्म बदलणे ही बाब थट्टेची नाही किंवा तो तमाशा नाही. ढोलके बडवून नुसता गाजावाजा करण्यासारखी ती गोष्ट नाही. धर्मांतर हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा विषय आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण चार महिन्यापूर्वी धर्मांतराची भाषा मी जाहीररीतीने बोलल्यापासून मला त्या गोष्टीचा एकसारखा सांगोपांग विचार करावा लागत आहे व तिचे मनन करावे लागत आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की, मी जो निश्चय जाहीर केला आहे त्याबद्दल पश्चात्ताप करण्याचे मला बिलकूल कारण वाटत नाही. तुम्ही देखील या प्रश्नाचा अत्यंत खोल विचार करावयास पाहिजे. रोज पाच मिनिटे तरी तुम्ही त्याचे मनन करा. आता साहजिक असा प्रश्न उभा राहतो की, हा निश्चय कृतीत आणण्यास विलंब का ? तुम्हाला मी एक लहानसा दृष्टान्त देतो. त्यावरून आपल्याला कळेल की, हा प्रश्न किती धिमेपणाने सोडविणे प्राप्त आहे. सेनापतीला ज्यावेळेस सैन्याचा तळ हलवून कूच करण्याचा हुकूम द्यावयाचा असतो त्यावेळेस धडधाकट व जवान शिपायांचाच विचार करून भागत नाही तर अपंग, जखमी किंवा आजारी शिपायांची देखील त्यास काळजी वाहून सर्वांना बरोबर नेणे त्यास जरूर असते. कृतनिश्चयाने पुढे पाऊल टाकण्याची वेळ येईल त्या वेळेस आपल्यातील अज्ञ, अशिक्षित किंवा भेकड माणसे पाठीमागे रेंगाळता कामा नयेत. म्हणून सर्वांनी दृढ निश्चयाने एकाच वेळी कूच करावयास लागावयाचे आहे.

आता आजच्या मुख्य कार्यासंबंधी बोलावयाचे म्हणजे तुम्ही तरुणांनी सेवा धर्माचे ध्येय पुढे ठेऊन ही जी संस्था काढली आहे त्या तुमच्या अनुकरणीय कार्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्यामध्ये असे पुष्कळ लोक आहेत की, दुसऱ्यांनी हातभार लावल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही. या कार्यात तुम्ही एक गोष्ट कधीही विसरता कामा नये आणि ती ही, शील आणि शिक्षण ही जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही. दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळविण्याकरिता लढा चालविला आहे. त्यात तुम्हास यशस्वी व्हावयाचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसाच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे. हे तुम्ही जर करणार नाही तर, ध्यानात ठेवा, तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्तेत पडाल. ज्या स्पृश्य हिंदुंनी आजपर्यंत तुम्हाला दास्यत्वात खितपत ठेवले ते तुम्हाला आमिष दाखवून मदत करण्याकरिता एका पायावर तयार देखील होतील. पण जर तुम्ही या मोहाला बळी पडलात तर त्याच्या पायातील तुम्ही घुंगरू बनाल व तुमच्या नशिबाची गुलामगिरी टळणार नाही.

महाभारतातील गोष्टी तुम्ही ऐकल्या असतीलच. त्यातील एक कथा या प्रसंगी अत्यंत बोधप्रद होईल. मी ती शेकडो वेळा वाचली आहे. तुम्ही देखील ती वाचली असेल. कदाचित यापुढे तुम्हाला ती वाचावयास मिळणार नाही. कौरव-पांडवांच्या युद्धात तुम्हाला माहीत आहे की, भीष्म व द्रोण हे कौरवांच्या बाजूने लढले. न्याय व सत्य ही पांडवांच्या बाजूला आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव असताही त्यांना कौरवांचा पक्ष सोडता येईना. ते का तर त्यांनी कौरवांचे नमक खाल्ले होते. म्हणून तुम्ही कोणाचेही ओशाळे होऊ नका.

शेवटी तुम्हाला एकच गोष्ट सांगावयाची आहे. निरनिराळ्या अनेक संस्था काढू नका. माझा असा अनुभव आहे की, निरनिराळ्या संस्था केवळ आपसात दुही माजविण्यास कारणीभूत होतात आणि शेवटी सर्वच विलयाला जातात. सबंध जिल्ह्याची मिळून एकच संघटित संस्था असू द्या. तिच्यामार्फत आपला योग्य मार्ग चोखाळून आपली सुधारणा घडवून आणा.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password