Categories

Most Viewed

03 फेब्रुवारी 1921

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतमंत्री माँटेग्युशी झालेल्या चर्चासंबंधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पत्र लिहिले.

“माँटेग्यु हा हिंदी मवाळाच्या सूचनेप्रमाणे वागतो. तथापि आता ब्राह्मणेतर चळवळीसंबंधी तिरस्काराने बोलणार नाही अशी माझी खात्री आहे. खरे म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ समजून घेण्याची इथे कोण पर्वाच करत नाही. ज्यावेळी सुधारणा विधायक तयार होत होते, त्या महत्त्वाच्या वेळी ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्व पटवून देणारा कोणी समर्थ प्रतिपादक येथे नव्हता, ही खेदाची गोष्ट होय. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या शत्रूंना त्या चळवळीला केवळ ब्राह्मण विरोधाचे मोठ्या हिकमतीने स्वरूप द्यावयास मिळाले. त्या चळवळीची लोकशाहीनिष्ठ बाजू दडपून टाकून तिचा विपर्यास करण्यात आला. तेच विपर्यस्त स्वरूप सर्वसाधारण इंग्रजांच्या मनात सध्या वावरत आहे. आता राजकीय सुधारणांचा मसुदा कायम होऊन चुकल्यामुळे हिंदुस्थानात सांप्रत किती भेदाभेद आहेत हे जाणून घेण्याची तसदी कोणी घेत नाही. तरी भावी काळासाठी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. वास्तव संधी सापडेल तेव्हा मी प्रत्येक वजनदार इंग्रज व्यक्तीला हिंदुस्थानातील सामाजिक व राजकीय प्रश्नांचे सबंध परस्परात कसे गुंतलेले आहेत याची योग्य ती कल्पना देतो. घटना घडून गेल्यानंतरचे हे माझे प्रयत्न असल्यामुळे त्यांचे परिणाम त्वरित दिसणे शक्य नाही. तथापि ते निष्फळ झाले की कसे हे काळच ठरवेल. आपल्या मार्गदर्शनानुसार येथे एखादी संस्था स्थापन करता येणे शक्य होईल की काय यासंबंधी मी येथील काही प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा केली. त्यांनी एकमताने माझी ही कल्पना उचलून धरली. परंतु त्यांच्या मते पगारी कार्यवाह असल्याशिवाय असली संस्था टिकू शकणार नाही. याचा अर्थ असा की कमीत कमी पाचशे पौंडाचा वार्षिक खर्च होईल. अशी संस्था अस्पृश्य वर्गाच्या दृष्टीने हितकारक ठरेल. परंतु माझी खात्री आहे की तो खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. भारतमंत्री माँटेग्यू यांनी मला पुन्हा भेटावयास बोलाविले हे ऐकून आपणास आनंद होईल. मुंबई विधिमंडळाचा सभासद म्हणून मी हिंदुस्थानात परत जावे असा त्यांनी आग्रह धरला. हिंदुस्तानचे महाराज्यपाल व मुंबईचे राज्यपाल ह्यांना माझी मुंबई विधिमंडळाचे सभासद म्हणून नियुक्ती करावी अशी त्यांनी माझ्या पहिल्या भेटीनंतर तार केली होती असे दिसते. मी त्यांना म्हटले की, वैयक्तिक गाऱ्हाणे मांडण्यासाठी मी आलेलो नाही. एक प्रश्न मांडण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो. त्यांचे म्हणणे असे की, प्रथम मी अस्पृश्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याबाबत महाराज्यपाल व राज्यपाल यांच्याशी भारतात जाऊन चर्चा करावी. मी तशी चर्चा केल्याशिवाय तो प्रश्न मिटला आहे असे आपण मानणार नाही असे आश्वासन देण्यास ते सिद्ध होते. अर्थात ही गोष्ट मला भुरळ पडण्यासारखी होती. तथापि विधीमंडळाच्या जागेसाठी आपला विद्याभ्यास अर्धवट टाकून जावे हा विचार मला पटेना. मला वैयक्तिक किर्तीचा सोस नाही. जरी मी माझ्या लोकांची सेवा करण्याची ही संधी सोडली, तरी महाराजांच्या लक्षात येईल की, मला अधिक मोठी सेवा करता यावी म्हणून मी अधिक चांगली सिद्धता करीत आहे. मी लवकरच मजूर पक्षांशी संपर्क साधणार आहे आणि त्यांच्याशी स्पष्टपणे बोलणी करणार आहे. हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असणाऱ्या वेजवूड व स्फुर यांनाही महाराजांनी भेटावे अशी मी सूचना करू का ? काही झाले तरी ते लंडनला परत आल्यावर मी त्यांच्याशी बोलणी करणारच आहे. त्या खटपटीतून काही निष्पन्न झाले तर त्याची हकीकत आपणास कळविन.”

संदर्भ – डॉ बाबासाहेब आंबेडकर, लेखक धनंजय कीर
पान क्रमांक 55

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password