आज देशात चारित्र्यच उरलेले नाही, ज्या देशाला नीतीमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे.
मुंबईच्या फेमस स्टुडियोमध्ये रविवार दिनांक 31 जानेवारी 1954 रोजी आचार्य अत्रे ह्यांच्या ‘महात्मा फुले’ ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्तसमारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी स्वीकारले होते. सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील आशिर्वाद देण्यासाठी आचार्य अत्रे ह्यांच्या निमंत्रणावरून मुद्दाम उपस्थित झाले होते.
श्री. आचार्य अत्रे उपस्थित पाहुण्यांचे आभार मानताना म्हणाले, “महात्मा फुले ह्यांचे क्रान्तिकारक जीवन रुपेरी पडद्यावर आणण्याचे माझे अनेक वर्षाचे स्वप्न आज साकार होत आहे. ह्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. पुणे शहराच्या ज्या विभागात फुले ह्यांनी शंभर वर्षापूर्वी काम केले. त्याच क्षेत्रात माझी अनेक वर्षे गेली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि परंपरेचा माझ्या मनावर फार परिणाम झाला आहे. ह्या चित्रपटाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या हस्ते होत आहे. हा सर्वात मोठा सुयोग आहे. कारण महात्मा फुले ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे सर्वात मोठे अनुयायी जर कुणी असतील, तर ते डॉ. आंबेडकर हेच होत. राजकारणातील धर्मकारणातील आणि समाजकारणातील डॉ. आंबेडकरांची भूमिका सर्वस्वी महात्मा फुले ह्यांच्या सारखीच आहे. महात्मा फुले ह्यांच्याबद्दल त्या काळात जो गैरसमज झाला. तोच डॉ. आंबेडकर ह्यांच्या आजही वाट्याला येत आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे ह्या चित्रपटाला आशिर्वाद द्यावयास येथे उपस्थित राहिले हाही दुसरा सुयोग आहे. कारण त्यांनी आपले संबंध आयुष्य महात्मा फुले ह्यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारामध्ये खर्च केले.
इंग्रजी भाषेमध्ये फुले यांचे चरित्र लिहिण्याची डॉ. आंबेडकरांची इच्छा आहे हे मला माहीत आहे. पण साधनांच्या अभावी ते तसेच पडून आहे. माझे काम झाल्यानंतर सर्व सामुग्री त्यांच्या हवाली करण्याची माझी इच्छा आहे. फुले ह्यांच्या जीवनासंबंधी सर्वसामान्य समाजात अज्ञान पसरलेले आहे. ह्या चित्रपटाद्वारे महात्मा फुल्यांच्या जीवनाचे दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
हे काम हाती घेतल्याबद्दल मी श्री. अत्र्यांचे अभिनंदन करतो. कारण जोतीराव फुले हे आद्य समाज सुधारक होत! पूर्वी, सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी हा वाद चाले. आधी समाज सुधारणा झाल्या पाहिजेत असे रानडे, गोखले, आगरकर प्रतिपादन करीत. पण टिळकांचा भर राजकीय सुधारणांवरच होता. टिळक आपल्या विरोधकांवर याबाबतीत विजय मिळवू शकले नाही. पण पुढे महात्मा गांधींनी मात्र समाज सुधारणावाद्यांवर विजय मिळविला. परंतु समाज सुधारणा होण्यापूर्वी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. त्याचे परिणाम फारसे चांगले झालेले नाहीत. आज देशात चारित्र्यच उरलेले नाही. ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य अतिशय खडतर आहे. जवाहरलाल नेहरू, तुमचे मुख्यमंत्री असोत वा मोरारजी देसाई असोत, तुमच्या भविष्यात काळोखच भरला आहे. देशाचे मंत्री देशाचा उद्धार करीत नाहीत, तर धर्म ज्याला उत्तमरीतीने समजला आहे तोच देशाला तारू शकेल. महात्मा फुले अशा धर्मसुधारकांपैकी होते. त्यादृष्टीने ह्या थोर समाजसुधारकाच्या जीवनावर आधारलेला हा बोलपट उपयुक्त ठरेल.