Categories

Most Viewed

30 जानेवारी 1944 भाषण

समता सैनिक दलाच्या शाखा सर्वत्र स्थापून आपली शक्ती वाढवा.

अखिल भारतीय समता सैनिक दलाचे दुसरे अधिवेशन रविवार तारीख 30 जानेवारी 1944 रोजी सकाळी कानपूर येथे झाले अध्यक्षस्थानी श्री. बी. के. गायकवाड हे होते. परिषदेस मुंबई, महाराष्ट्र, मध्यप्रांत, गुजरात, पंजाब, बंगाल, मद्रास, संयुक्तप्रांत. तसेच हैद्राबाद, ग्वाल्हेर, कोल्हापूर, इंदूर, उज्जैन वगैरे संस्थानातून शेकडो प्रतिनिधी आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री. शिवराज, जनरल सेक्रेटरी श्री. पी. एन. राजभोज, प्यारेलाल कुरील तलीब इत्यादी पुढा-यांची भाषणे झाली.

प्रथम श्री. आर. आर. पाटील (नागपूर) यांनी मुंबई व नागपूर येथील समता सैनिक दलांनी गेल्या वर्षात केलेल्या कामगिरीचा अहवाल वाचून दाखविला. नंतर परिषदेचे अध्यक्ष श्री. भाऊराव गायकवाड यांचे भाषण झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.

माझ्या समता सैनिक दलाच्या शूर सैनिकांनो,
आज या संयुक्त प्रांतात दलाचे दुसरे अधिवेशन भरले आहे. गेल्या 17 वर्षापासून या दलाचे कार्य मुंबई व मध्यप्रांत येथे मोठ्या जोराने चालले आहे. या दोन्ही प्रांतात दहा हजारांवर समता सैनिक दलाचे श्रेष्ठ सैनिक उभे आहेत. माझ्या मुंबई प्रांतात काही वर्षापूर्वी आपल्या किंवा इतर पक्षाची जाहीर सभा काँग्रेसचे गुंड उधळून लावीत असत. 1927 साली या दलाची स्थापना माझे हस्ते करण्यात आली. त्या दिवसापासून आमच्या सभेत काँग्रेसचा गुंड अथवा एखादा मवाली शिरण्याची ताकद नाही. एकदा माझ्या ऑफिस समोर विरोधी पक्षाची मोठी जाहीर सभा भरली होती. त्या सभेत आपले सैनिक गेले. त्यांनी ती सभा व सभेतील दिवाबत्ती, टेबल, खूर्ची वगैरे काबीज करून माझ्या ऑफिसमध्ये आणून टाकली. ते सामान अद्याप माझ्याकडे तसेच आहे. या वस्तू म्हणजे आपल्या या सैनिकांच्या कार्याचे द्योतक आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच की आपले सैनिक इतके तडफदार आहेत. ते मनात आणतील तर त्यांच्यावर सोपविलेले कार्य चुटकीसरशी करून दाखवितील इतका मला त्यांच्याविषयी विश्वास वाटत आहे. म्हणून या ध्येयवादी दलाच्या शाखा प्रांतोप्राती शहरोशहरी, खेडोपाडी स्थापून शक्ती वाढविली पाहिजे.

यानंतर श्री. प्यारेलाल कुरील तलीब, एम्. एल्. ए. (सेंट्रल असेंब्ली) यांचे भाषण झाले. ते म्हणाले, “आताच डॉ. बाबासाहेब यांनी जे भाषण केले त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो व मी माझ्या संयुक्त प्रांतात येत्या अधिवेशनापूर्वी दहा हजारावर सैनिक तयार करून ठेवितो.” श्री. पी. एन्. राजभोज व इतर वक्त्यांच्या भाषणानंतर या परिषदेत पुढील ठराव पास करण्यात आले.

ठराव नं. 1 – देशाच्या निरनिराळ्या भागात अस्तित्वात असलेल्या अस्पृश्य वर्गाच्या सर्व स्वयंसेवक संघांना एकजूट करण्याबद्दल व समता सैनिक दल या अखिल भारतीय सैनिक दलात सामील होण्याबद्दल या परिषदेची विनंती आहे.

ठराव नं. 2 – अखिल भारतीय दलित वर्ग फेडरेशनच्या निरनिराळ्या घटकांनी आपापल्या हद्दीत समता सैनिक दलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वयंसेवक पथके स्थापन करून त्यांची संघटना करावी, असे आपले पूर्ण विचारांती निश्चित मत झाले आहे. असे ही परिषद जाहीर करते.

ठराव नं. 3. अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या सर्व घटकांनी आपापल्या स्वयंसेवकांना जरूर ते शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक केंद्रे व छावण्या उघडाव्या अशी या परिषदेची विनंती आहे.

ठराव नं. 4.–भारत संरक्षण कायद्यान्वये स्वयंसेवक संस्थांवर लादण्यात आलेले निर्बंध अनिष्ट व असमर्थनीय आहेत. असे या परिषदेचे निश्चित मत आहे. “समता सैनिक दल’ या सारख्या फॅसिस्ट विरोधी स्वयंसेवक संस्थेच्या वाढीला या निर्बंधामुळे निष्कारण व्यत्यय येतो. म्हणून हे निर्बंध ताबडतोब रद्द करण्यात यावेत, अशी या परिषदेची मागणी आहे.

ठराव नं. 5 अखिल भारतीय दलित फेडरेशनने नुकत्याच भरलेल्या अधिवेशनात जे ठराव संमत केले त्या सर्व ठरावांना या परिषदेची मान्यता आहे.

ठराव नं. 6. (अ) दलाची घटना तयार करण्यासाठी ही परिषद पुढील गृहस्थांची एक समिती नेमीत आहे. (1) श्री. बी. के. गायकवाड (अध्यक्ष), सभासद (2) श्री. एम. एम. ससाळेकर, (3) श्री. एस. बी. जाधव, (4) श्री. आर. आर. पाटील, (5) श्री. के. एन. वाल्मिकी, (6) श्री. ए. एल. कोसारे (7) श्री. पी. एल. लळिंगकर..

(ब) येत्या वर्षाकरता (1944-45) पुढील गृहस्थांची वर्किंग कमिटी ही परिषद नेमीत आहे. (1) श्री. बी. के गायकवाड (अध्यक्ष, महाराष्ट्र), (2) श्री. एम. एम. ससाळेकर (जनरल सेक्रेटरी, मुंबई). (3) श्री. आर. आर. पाटील (असिस्टंट सेक्रेटरी, मध्यप्रांत). सभासद: – (4) श्री. के. एम. वाल्मिकी (संयुक्त प्रात). (5) श्री. ए. एल. कोसारे (मध्यप्रांत). (6) श्री. पी. परमार (गुजरात), (7) श्री. एस. बी. जाधव (मुंबई) ज्या प्रांतांना प्रतिनिधित्व मिळाले नसेल, त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी जरूर ते सभासद नेमण्याचा अधिकार ही परिषद चर्किंग कमिटीला देत आहे. वरील ठरावावर वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींची भाषणे झाल्यावर दुपारी दोन वाजता परिषदेचे अधिवेशन समाप्त झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password