राज्यसत्तेची विभागणी सारखी झाल्याशिवाय स्वराज्याला काय अर्थ ?
अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे दुसरे अधिवेशन कानपूर येथे तारीख 30 जानेवारी 1944 रोजी रा. ब. एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.
भगिनींनो व बंधुनो,
आजची ही आपली परिषद प्रातिनिधीक स्वरूपाची आहे. हिंदुस्थानातील बहुतेक प्रांतातून प्रतिनिधी आलेले आहेत. बंगाल व आसामचे प्रतिनिधी जपानबरोबर चाललेल्या युद्धात आणीबाणीचे व महत्त्वाचे कार्य करीत असल्यामुळे परिषदेस येऊ शकले नाहीत. परिषदेस एवढा मोठा जनसमुदाय पाहून मला फार समाधान वाटते. पण ह्या समुदायामध्ये स्त्रिया कमी आहेत. आमच्या महाराष्ट्रात व सी. पी. मध्ये कोणत्याही सभेला हजारांनी स्त्रिया हजर राहातात. आमच्याकडे स्त्रिया गोषा किंवा पडदा ठेवीत नाहीत. पती व पत्नी दोघेही सारख्याच प्रमाणात सामाजिक कार्यात भाग घेतात. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा भाग घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्या समाजाचा उद्धार होणार नाही.
आज जी आपण चळवळ सुरू केलेली आहे ती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्या चळवळीचे मूलतत्त्व काय आहे. हे आपण समजावून घेतले पाहिजे. अस्पृश्यांची स्थिती आपण सगळे जाणता. दोन हजार वर्षापासून आपली विच्छिन्न परिस्थिती होण्याचे कारण काय ? आपली अवनती केव्हापासून आहे व ती कधी मिटेल ? आपल्या हलाखीच्या स्थितीचे मोठे कारण हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मात शिवाशिवीला धर्म मानतात. त्यालाच हिंदू धर्माचा मूळपाया समजला जातो. हिंदू धर्मात अस्पृश्यांना शिक्षणाची मनाई आहे. शिक्षण घेणे प्रत्येकाला मोठे मुश्कीलीचे आहे. या देशाचा शिपाई बनले पाहिजे. स्वच्छ कपडे अंगावर घालता आले पाहिजे. सर्व धार्मिक विषमता नष्ट झाली पाहिजे. तशी स्थिती अस्पृश्यांची झालेली नाही, अस्पृश्यांनी स्वच्छ कपड़े वापरणे धर्मात वाईट मानले जाते. पायात चप्पल घालून अस्पृश्यांना गावातून जाता येत नाही. गेल्यास अस्पृश्यांवर जुलूम केल्याची अनेक उदाहरण माझ्याजवळ आहेत. शिवाशिव हे आपल्या अवनतीचे कारण आहे. ज्या धर्मात अवनती आहे त्या धर्माला फक्त मूर्ख लोक मानतात. अस्पृश्यांनी कानांनी वेद ऐकले तर त्याच्या कानात लोखंडाचा रस ओतावा. वाचेने उच्चार केला तर त्यांची जीभ कापावी. असे हिंदू धर्म ग्रंथात लिहिले आहे. शम्बूक अस्पृश्य होता म्हणून रामाने त्याला ठार मारले. त्याच रामाला हिंदू धर्म देव मानतो! आश्चर्य हे की ज्या धर्माने आपली एवढी अवहेलना केली. ज्या धर्माने आपल्याला माणुसकीपासून कायमचे उठवले त्याच धर्माला आमच्यातील काही लोक चिकटून आहेत. आपण घरादाराला पारखे होऊन गंगा स्नान करीत बसलो आहोत. आपली दुर्दशा जर नष्ट करावयाची असेल तर आपण हिंदू धर्माचा त्याग केला पाहिजे. हिंदू धर्म सोडल्याशिवाय आपले दुःख कधीही नष्ट होणार नाही.
या व्यावहारिक आयुष्यात आपल्याला कसे जीवन जगता येईल, याचा आपण विचार केला पाहिजे. भावी स्वराज्यात शासनकर्ती जमात बनणे हे आमचे ध्येय आहे की जे स्वराज्य सर्वाचे व आमचेही होईल. सर्वांना शिक्षण व नोकऱ्या मिळतील. आज कामगाराला सुख नाही. अंगावर कपडे नाहीत. अर्धपोटी जगावे लागते व राहावयास चांगली घरे नाहीत. ही आजच्या कामगारांची परिस्थिती नष्ट झाली पाहिजे. राजकीय सत्ता आमच्या हातात आली तर प्रत्येक कामगाराला आम्ही कमीतकमी 30 रुपये पगार करू. आपल्या राज्यात चांगली घरे मिळतील व कामगाराला पेन्शन मिळेल. आमच्या राज्यात आजारीपणाचा भत्ता मिळेल व कोणी बेकार राहणार नाही. पण ब्राह्मण लोक आपल्या हातात सत्ता येऊ देत नाहीत. मुसलमानी राज्य असताना ब्राह्मण लोकांनी अल्ला हो अकबर म्हणून दिवस काढले. आज ते इंग्रजांची सेवा करीत आहेत. इंग्रजांचा उदोउदो करून सर्व महत्त्वाच्या नोकऱ्या ब्राह्मणांनी पटकावल्या आहेत. ही परिस्थिती आपण नष्ट करून राजसत्ता आपल्या हातात घेतली पाहिजे. त्याकरिता आपण आपले सामर्थ्य उभे केले पाहिजे.
काँग्रेस-लीगसारखी धनदौलत आपल्या पक्षाजवळ नाही. स्वराज्यात दुसऱ्याचे राज्य आपल्यावर होईल. त्याकरिता आपण सर्व मनुष्यबल एकत्रित करून सामर्थ्य वाढविले पाहिजे. हिंदू लोकांचा एक वेगळा गट आहे. मुसलमानांचा एक वेगळा गट आहे. आपला एक गट वेगळा आहे. असे या देशात प्रमुख तीन वेगवेगळे गट आहेत. या देशाची राजसत्ता या तिन्ही गटातून सारखी वाटली गेली पाहिजे. राजसत्तेची विभागणी सारखी झाल्याशिवाय या देशाला स्वराज्य मिळणार नाही. इंग्रज मुसलमानांना मोठे मानतात व सवलतीही त्यांना सरकारकडून मिळतात. आज मुसलमानांची पाकिस्तान किंवा 50 टक्के ही मागणी आहे. काँग्रेसचे लोक बाहेर येतील आणि 50 टक्के मुसलमानांना देतील. पण आपल्या मागण्या आपल्या सामर्थ्याशिवाय मिळणार नाहीत. काँग्रेस व मुसलमानांना अस्पृश्यांच्या मागण्या मिळाव्यात असे वाटत नाही. म्हणून मी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना केली आहे. आता हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्य लोकांनी एकत्रित येऊन संग्रामास तयार झाले पाहिजे.
आपल्या मानाकरिता व पुढारी होण्याकरिता फार हपापलेले लोक आहेत. फाईलीत किंवा कागदात पुढारीपण नसते. वर्तमानपत्रात नाव आल्याने माणूस पुढारी होत नसतो. सी. आय. डी. ऑफिस फार मोठे आहे. त्यात प्रत्येक पुढाऱ्याच्या कार्याची डायरी ठेवली जाते. तुमची तशी डायरी तयार झाली पाहिजे, खरे काम करा. आपल्या हक्कांकरिता बलिदान करा. गव्हर्नरला पुढाऱ्याची भीती वाटली पाहिजे. पुढाऱ्याचे ऐकले नाही तर ज्या समाजाचा तो पुढारी आहे तो समाज आपल्या डोक्यावर जोड़े मारील ही धास्ती गव्हर्नरला वाटली पाहिजे. याला म्हणतात सच्चा पुढारी.
अस्पृश्य समाजामध्ये संघटन नाही. अस्पृश्य लोक अद्याप आपल्यामध्ये शिवाशिवी मानतात. ब्राह्मणापेक्षाही मोठा प्लेग आपल्यात आहे. जातीधर्म आपल्यामधून नष्ट झाला पाहिजे, मी जातपात मानीत नाही. जात मानणारा पुढारी होऊ शकत नाही. हा माझा 25 वर्षांचा अनुभव आहे.
समता सैनिक दल हे आपल्या राजकीय पार्टीचे सामर्थ्य आहे. लढणाऱ्या सैनिकांशिवाय कोणतीही पार्टी सामर्थ्यवान होणार नाही. आपल्याला तर मोठमोठ्या संस्थांशी टक्कर द्यावयाची आहे. म्हणून आपण समता सैनिक दल वाढविले पाहिजे. समता सैनिक दल वाढविणे हे प्रत्येक पुढा-याचे कर्तव्य आहे. कानपुरात आणि इतर सर्व ठिकाणी दलाची स्थापना करा. दर महिन्याला दलाच्या सभासदाकडून एक आणा वर्गणी घ्या. आमच्या मुंबईत समता सैनिक दलाचे कार्य जोरात चालू आहे. परिषदेनंतर आपले कार्य थंड पडत असते. ते पडू देऊ नका, लोकांना जागृत करा, आपले कार्य अव्याहतपणे चालू असले पाहिजे. तरुणांना संघटित करा.
मला जी अनेक संस्थाकडून मानपत्रे देण्यात आली आहेत. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण मला ते नकोत. मला फक्त काम करावयाचे आहे. मी जर मानाकरिता काम करीत असतो. तर मी काँग्रेसचा अध्यक्ष झालो असतो. मला तुम्हाला सांगावेसे वाटते ते हे की काम करा, म्हणजे मान तुमच्या पाठीमागे धावत येईल.
मी अस्पृश्य समाजाला राजकीय अधिकार मिळवून देण्याचे कार्य करीत आहे. मला पुष्कळ लोक विचारतात की मी सगळ्या देशाच्या स्वातंत्र्याचे कार्य का करीत नाही ? पंडित जवाहरलाल नेहरूला देशाकरिता हजारो कॉलेज विद्यार्थी मिळू शकतात. पण अस्पृश्यांच्या कार्याकरता पंडित नेहरूंचे कोणताही कॉलेज विद्यार्थी ऐकणार नाही. मग हे कार्य कोण करणार? हे काम आपले आहे ते आपणच केले पाहिजे. देशाकरिता पुष्कळ लोक आहेत. अस्पृश्यांकरिता आमच्याशिवाय कोणी नाही. मी तर हेच काम करीत राहीन. ज्या कार्यात आठ कोटी पददलित, पिळल्या गेलेल्या लोकांचा उद्धार आहे. ते खरेखुरे स्वराज्य मिळविण्याचे कार्य आहे.
विद्यार्थ्यांनी जे मला मानपत्र दिले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला अस्पृश्य विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही डिग्री घेऊन नोकरी पत्करल्यावर आपल्या समाजाकरिता काय कराल ? तुम्ही आपल्या संसारातच गुरफटून न जाता ज्या समाजातून आपण आलो त्या समाजाची परिस्थिती काय आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्या समाजाकरिता आपल्या नोकरीतला शक्य तेवढा पैसा दिला पाहिजे. मी हिंदुस्थान सरकारकडून दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता तीन लाख रुपये मंजूर करविले आहे. त्याचा भरपूर उपयोग करा आणि माऱ्याच्या जागा पटकवा. याचा उपयोग तुम्ही केला नाही आणि मा-याच्या जागा जर पटकावल्या नाही तर शेवटी तुम्हाला पश्चाताप होईल. दुसरी एक गोष्ट, शिकलेल्या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मला जी दिसते ती ही की, ते आपल्यातील मुलींबरोबर लग्न करीत नाहीत. मग दुसरे कोण करणार ? याचा आपण विचार केला पाहिजे.
आता मला आपणा सर्वांना सांगावेसे वाटते की आपण जो लढा सुरू केलेला आहे तो फार मोठा आहे. पवित्र आहे. आपल्या समाजाच्या उन्नतीशिवाय तो आपण सोडता कामा नये.