Categories

Most Viewed

29 जानेवारी 1932 भाषण

देशाच्या ऐक्यासाठी संघटना आवश्यक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपली विलायतेमधील कामगिरी तात्पुरती संपवून परत येणार ही आनंदाची बातमी खालील पत्रकाद्वारे देण्यात आली.

शुक्रवार तारीख 29 जानेवारी 1932 रोजी सकाळी 6 वाजता (स्टॅ. टा.) बॅलार्ड पियर बंदरावर सर्वांनी हजर रहावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर स्वागत समारंभामध्ये ज्या ज्या व्यक्तींना संस्थांना भाग घ्यावयाचा आहे त्यांनी ‘डॉ. आंबेडकर स्वागत कमिटीकडे गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपली 6 नावे नोंदवून पास घ्यावेत. नाव नोंदविण्याची फी संस्था, मंडळे अगर पंच यांना प्रत्येकी पाच रुपये व स्वतंत्र व्यक्तीला प्रत्येकी एक रुपया पडेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोटीमधून उतरल्यानंतर सुमारे आठ वाजता बैलाई पियर स्टेशनवरील हॉलमध्ये सर्वांच्या तर्फे स्वागत समारंभ साजरा करण्यात येईल. प्रत्येकानी आपापले हारतुरे यावेळी डॉक्टरसाहेबांना अर्पण करावेत.

दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत परळ येथील डॉक्टरसाहेबांच्या लायब्ररी हॉलमध्ये निरनिराळ्या प्रांतातून आलेल्या पुढाऱ्यांचा विचारविनिमय होईल.

रात्रौ 7 ते 10 वाजेपर्यंत राऊंड टेबल परिषदेसंबंधी डॉ. आंबेडकरांचे जाहीर भाषण होईल. याशिवाय इतर पुढाऱ्याची भाषणे होतील.

शनिवारी तारीख 30 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईतील प्रमुख पुढाऱ्यांबरोबर विचारविनिमय नंतर दुपारी 2.15 च्या पंजाब मेलने राऊंड टेबल परिषदेच्या वर्किंग कमिटीच्या कार्यासाठी दिल्लीला जातील.

स्वागत कमिटीच्या विनंतीप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीने स्वागत समारंभाचे पास विकत घेतले असतील त्यांचा स्वागत कमिटीत समावेश करण्यात येईल.

आपला नम्र,
सीताराम नामदेव शिवतरकर,
सेक्रेटरी, डॉ. आंबेडकर स्वागत कमिटी, मुंबई.

त्यानुसार अस्पृश्य समाज त्यांच्या जंगी स्वागताच्या तयारीतच होता. अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्य बांधवांच्या भावी राज्यघटनेविषयी राऊंड टेबल परिषदेमध्ये डॉ. आंबेडकरांनी जी अमोलिक कामगिरी केली त्याबद्दल अस्पृश्य समाज त्यांच्याविषयी धन्यवाद गातच होता. परंतु प्रत्यक्ष दर्शन व भेटीशिवाय त्यांच्या घडाडीच्या कार्याविषयी आपल्या अंतःकरणातील जाणीव व्यक्त होणार नाही असे प्रत्येकाला वाटत होते. तारीख 29 जानेवारी 1932 रोजी एस. एस. मुलतान बोटीने मुंबईस येतो अशा आशयाची तार येथे येताच अस्पृश्य समाजात आनंदाचे वातावरण दुमदुमून गेले. 29 तारखेची प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पहात होता. शेवटी तो त्यांच्या आगमनाचा दिवस गेल्या शुक्रवारी उगवला.

डॉ. आंबेडकर सकाळी सहा वाजता बैलार्ड पियरवरील मोल स्टेशनवर विलायतच्या बोटीने उतरणार होते. तरी अस्पृश्य बंधुभगिनीचा असंख्य जमाव पहाटे साडेचार-पाच वाजल्यापासून मोल स्टेशनावर जमू लागला होता. प्रत्येकाच्या मुखावर आनंदाच्या एक प्रकारच्या समाधानाच्या आणि संतोषाच्या भावना स्पष्टपणे दिसत होत्या, डॉ. आंबेडकर की जय च्या जयघोषणेने अंतःकरणातील प्रेमाचा डॉ. आंबेडकरांविषयीच्या भक्तीच्या भावनेचा असा उमाळा मुखातून आनंदातिशयाने उमटत होता. डॉ. आंबेडकरांचा जयजयकार असो, अशी भगिनीवर्गानी केलेली जयघोषणा मधूनमधून उमटत होती. डॉ. आंबेडकरांचे दर्शन कधी व कसे होते याची आतुरता त्यांना लागून राहिली होती. एकदाचे सहा वाजले. डॉ. आंबेडकर आता आपणास दिसणार व भेटणार ह्या उत्सुकतेने सर्वांचे डोळे मुलतान बोटीकडे लागले होते. इतक्यात डॉ. आंबेडकरांनी बोटीच्या डेकवर येऊन ओझरते दर्शन दिले. त्यांच्या जयजयकाराने ते सारे वातावरण अगदी गजबजून गेले.

डॉ आंबेडकरांचे स्वागत मोल स्टेशनवरील एका भव्य हॉलमध्ये करण्याचे आगाऊच ठरले होते. तो हॉल असाधारणपणे सुशोभित करून एक उच्च आसन मुद्दाम उभारले होते. डॉ. आंबेडकर येणार त्याच चोटीने मौ. शौकत अलीही येणार होते. त्यांचेही स्वागत करण्याकरता मुसलमान बंधू व खिलापत स्वयंसेवकांनी तयारी केली होती. याच हॉलची अर्धी बाजू मुसलमान बंधुना दिलेली होती. एका बाजूला मुसलमान समाज व दुसऱ्या बाजूला अस्पृश्य समाज अशी त्या हॉलची विभागणी केलेली होती. डॉ. आंबेडकरांच्या स्वागतासाठी जसे अस्पृश्य लोक आतुर झालेले होते तसेच मौ. शौकत अलीच्या स्वागतासाठी मुसलमान बंधूही आतुर झाले होते. उभयतांच्या स्वागताची वेळ सात वाजताची ठरली होती. तोपर्यंत बोटीवर त्यांच्या सामोरे अस्पृश्य व मुसलमान समाजातील पुढारी गेले होते. स्वागताच्या पूर्वी बोटीच्या अगदी वरच्या डेकवर डॉ. आंबेडकर व श्री. देवराव नाईक, भाई प्रधान, डॉ. प्रधान, श्री. असईकर, कदेकर गुप्ते प्रधान, खांडके, शिवतरकर, रणखांबे वगैरे मंडळी बरोबर राऊंड टेबल परिषदेसंबंधी थोडासा विचारविनिमय झाला. नंतर डॉ. आंबेडकर यांनी बोटीवरील आपले काही मामुली काम केल्यावर ते व मौ. शौकत अली स्वागतासाठी तयार केलेल्या हॉलमध्ये आले. त्यावेळी त्यांच्या जयजयकाराने तेथले वातावरण पुन्हा दुमदुमून गेले. डॉ. आंबेडकर व मौ. शौकत अली यांचे उभयपक्षाकडून स्वागत झाले असे म्हणावयास काहीच हरकत नाही. तशीच विलायतेमधील राऊंड टेबल परिषदेच्या कार्यात मुसलमानांनी डॉ. आंबेडकर यांना जी एक प्रकारची मदत केली होती त्यामुळे मौ. शौकत अलीचेही स्वागत त्यांनी केले. मुसलमान समाजानेही डॉ. आंबेडकरांचे स्वागत केले. हा अस्पृश्य (हिंदू) व मुसलमानांचा संयुक्त स्वागताचा समारंभ मोठा अपूर्व असा होता असे म्हणावयास मुळीच हरकत नाही.

आपल्या स्वागताला उत्तर देताना मौ शौकत अली यांनी डॉ. आंबेडकर हे माझे धाकटे भाऊ आहेत. हिंदी स्वराज्यात प्रत्येक धर्माच्या जातीच्या व पंथाच्या व्यक्तीने आपण एकमेकाचे भाऊ-भाऊ आहोत अशी जिवाभावाची जाणीव करून घेतल्याशिवाय आपणास खरे स्वराज्य मिळणार नाही. मनुष्याला आपल्या कार्यात हिम्मत अगोदर पाहिजे. त्या दृष्टिने पाहाता डॉ. आंबेडकरांनी राऊंड टेबल परिषदेमध्ये दाखविलेली अस्पृश्य समाजाविषयीची हिम्मत खरोखर कौतुकास्पद आहे. मुसलमान समाज आपल्या हिंमतीने हिंदवी मदत करीत आहे व यासाठी सर्वांनी एकमेकांशी सहकार्य हे केलेच पाहिजे, असे उद्गार काढले.

मौ. शौकत अलीच्या भाषणानंतर डॉ. आंबेडकर बोलावयास उठले. तेव्हा त्यांच्या जयघोषाच्या व स्वागतपर टाळ्यांच्या गजराचा सारखा वर्षाव होत होता. तसेच त्यांच्या गळ्यात सारखे पुष्पहार पडत होते. कित्येक वेळा पुष्पहारांमध्ये डॉक्टर आंबेडकर साहेब दडपून गेलेले दिसत होते. काही वेळाने हा गगनभेदी जयघोष एकदाचा थांबला. डॉ. आंबेडकरांनी बोलावयास सुरवात केली. प्रथमतः त्यांनी आपल्या स्वागताबद्दल सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले आणि ते म्हणाले,

आज हा येथील जमाव एका दृष्टिने अद्भूत असा आहे. आजपर्यंत हिंदूंच्या व मुसलमानांच्या स्वागताच्या अशा सभा बहुधा निरनिराळ्या होत असत. यामुळे निरनिराळ्या समाजातील एकप्रकारची भिन्नता दृष्टोत्पत्तीस येण्याचा संभव येत असे. आज येथे आपण एक प्रकारच्या हिंदी ह्या भावनेने जमलो आहोत. राऊंड टेबल परिषदेसंबंधी येथे काही बोलावयाचे नाही. तरी पण मुसलमान प्रतिनिधींनी मला राऊंड टेबल परिषदेमध्ये अगदी आपलेपणाच्या भावनेने मदत केलेली आहे. त्यांची मदत न मिळती तर मला कित्येक वेळा सगळ्या प्रतिनिधींशी झगडणे अशक्य झाले असते. राऊंड टेबल मधील इतर हिंदू प्रतिनिधीमध्ये अस्पृश्यांबाबत खरे व स्पष्ट बोलावयाचे जे धैर्य नव्हते, ते मला मुसलमान प्रतिनिधीमध्ये दिसून आले. त्यांच्या सहकार्याविषयी मला केव्हाही आदरच बाळगला पाहिजे. हिंदुस्थानच्या ऐक्यासाठी आपण सर्वांनी संघटनेच्या बळावर आपल्या कार्याची रूपरेषा आखली पाहिजे.

हा स्वागताचा समारंभ होण्यापूर्वी चर्मकार समाजातील मि. पी. बाळू राजभोज, काजरोळकर, वगैरे मंडळी डॉ. आंबेडकरांना बोटीवर जाऊन पवार भेटली. त्यांनी डॉ. आंबेडकराना हारतुरे घालून त्यांचा सन्मान केला. मि पी. बाळू त्याचे स्वागत करताना म्हणाले की, डॉक्टर साहेब, आपण आपल्या अस्पृश्य समाजाचे खरे हितचिंतक पुढारी आहात. आपल्या राऊंड टेबल परिषदेमधील धडाडीच्या व अपूर्व कामगिरीबद्दल आम्हाला धन्यता वाटत आहे. डॉ. आंबेडकरांना ह्या स्वागताबद्दल एक प्रकारचा आनंद झाला. त्यांनी त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले. याशिवाय शेठ शंकरराव परशा, रा. ब. सी. के. बोले, शेठ मनियार वगैरे इतर समाजातील पुढाऱ्यांनीही डॉक्टर साहेबांचे स्वागत केले. तसेच अस्पृश्य समाजातील डॉ. सोळंकी, एन. टी. जाधव. श्री. वनमाळी. श्री संभाजी गायकवाड, गुडेकर, चांदोरकर, श्री शिवराम जाधव, श्री. नेवरीकर, दिवाकर पगारे बंधु जाधव, श्री. गणपतबुवा, श्री. वराळे, पुण्याचे सुभेदार घाडगे, नाशिकचे श्री. रणखांबे, गायकवाड, काळे, रोहम, बापूसाहेब दाणी, श्री. पतीतपावनदास वगैरे मंडळी हजर होती.

बॅलर्ड पियरच्या सकाळच्या स्वागत समारंभामध्ये समता सैनिक दलाने विशेष कामगिरी केली आहे. दलाचे सर्वाधिकारी श्री. वडवळकर व सेक्रेटरी आणि उपाध्यक्ष श्री साळवे व लोटेकर यांनी या कामी सैनिक दलासह बरीच मेहनत घेतली होती. डॉ. आंबेडकरांनी मौ. शौकत अलीबरोबर मिरवणुकीने जाण्याचा कार्यक्रम जरी आयत्यावेळी ठरला होता तरी हा मिरवणुकीचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. उभय पुढा-याचे व मिरवणुकीचे फोटो घेण्यासाठी मोल स्टेशनवर फोटोग्राफर्सची बरीच गर्दी जमली होती. ही अस्पृश्य व मुसलमान समाजाची संयुक्त मिरवणूक बैलार्ड पियरवरून जी. पी. ओ. मार्गाने मार्केट, अब्दुल रहिमान स्ट्रीट पायधुणी मार्गाने भायखळा रोड येथील खिलापत ऑफीसपर्यंत आली. खिलापत ऑफिसात डॉ. आंबेडकरांचे सन्मानाने स्वागत केल्यावर डॉ. आंबेडकर शौकत अलींचा निरोप घेऊन परळला निघाले. परळपर्यंत त्यांची मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली. डॉ. आंबेडकर परळ येथील आपल्या ऑफिसात सुमारे 10.30 वाजता येऊन पोहचले.

परळ येथे अगोदरच इतर अस्पृश्य समाजातील मंडळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेली होती. त्यांच्या स्वागताचा स्वीकार केल्यानंतर सायंकाळी सात वाजे पर्यंत त्यांनी निरनिराळ्या संस्थांच्या प्रतिनिधीच्या व पुढा-याच्या भेटी घेतल्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password