Categories

Most Viewed

27 जानेवारी 1950 भाषण

प्रामाणिकपणा, कर्तव्याची जाणीव व राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा.

दिल्लीतील सर्व महाराष्ट्रीय संस्थामार्फत तारीख 27 जानेवारी 1950 च्या दुपारी 1.00 वाजल्यापासून बृहन् महाराष्ट्र भवनामध्ये लोकराज्य दिन मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. शहरातील निरनिराळे कार्यक्रम यांची गर्दी लक्षात घेऊन अगदी आटोपशीर व सुटसुटीत असा हा कार्यक्रम आखण्यात आला. होता. ठरल्याप्रमाणे बरोबर दीड वाजता श्री. दिगंबरपत पलुसकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. नंतर बिस्मिल्ला पार्टीचे सनईवादन झाले.

घटनेची कर्तबगारी महाराष्ट्रीयाची :

यानंतर नियोजित अध्यक्ष ना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षपदाची सूचना ना. काकासाहेब गाडगीळ यांनी केली. ही सूचना करताना ना. गाडगीळ म्हणाले “गेल्या कित्येक वर्षापासून हिंदुस्थानची जनता ज्या एका अत्यंत महत्त्वाच्या दिवसाची वाट पाहात होती तो दिवस काल उगवला. पारतंत्र्याचे आणि राजशाहीचे सर्व पाश तोडून हिंदुस्थानच्या लोकराज्यावर शिक्कामोर्तब झाले. अशा या राज्यघटनेचे प्रमुख कर्ते आज आपल्यामध्ये हजर आहेत. इतक्या महत्त्वाची कामगिरी आपल्यापैकीच एका महाराष्ट्रीयाने अत्यंत चोखपणे पार पाडावी याबद्दल आपल्या सर्वांना अभिमान वाटणे साहजिक आहे. या प्रसंगाने दिल्लीतील सर्व महाराष्ट्रीयांतर्फे मी त्यांचे स्वागत करतो.” ना. गाडगीळ यांनी नंतर नामदार व सौ. आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केले.

समारंभाची आवड नाही :

नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छोटेसे भाषण झाले. ते म्हणाले, दिल्लीतील महाराष्ट्रीय संस्थामार्फत मला बरेच वेळा निरनिराळ्या प्रसंगी हजर राहून बोलण्याविषयी विनंती करण्यात आली होती. परंतु गेल्या तीन वर्षात मी घटनासमितीच्या कामात मग्न असल्याने त्या आमंत्रणाचा स्वीकार करू शकलो नाही. अर्थात मी महाराष्ट्रीय समारंभास हजर राहिलो नाही त्याप्रमाणेच दुसऱ्या कोणत्याच कार्यक्रमांना गेलो नाही. लोकांनी असा गैरसमज करून घेऊ नये की, माझा आज येथे गौरव होणार आहे म्हणून मी आलो आहे. एक तर माझा स्वभाव थोडा एकलकोंडा आहे व अशा समारंभाची मला आवड नाही. साधारणपणे पुस्तक वाचन व माझे काम यापलिकडे माझे मन दुसऱ्या कशात रमत नसल्यामुळेही मी फारसा कोणत्याच कार्यक्रमात भाग घेत नाही. आज आपणा सर्वांनी मला याठिकाणी बोलावून माझे अभिनंदन केले याबद्दल मी आभारी आहे.

घटनासमिती वरील माझी कामगिरी फार मोठी आहे, असे मी मानावयास तयार नाही. कारण ही घटना बनविताना बऱ्याच देशांमधील निरनिराळ्या घटनांचा अभ्यास करून त्यामधील आपल्या देशास रुचतील व पचतील अशी कलमे निवडून ती एकत्रित करणे एवढेच आमचे कार्य होते. त्याप्रमाणे आम्ही ते केले. सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही जी करू शकलो ती म्हणजे अखिल भारताची राजभाषा आम्ही एक निश्चित करून टाकली. त्याचप्रमाणे एक लिपी करू शकलो असतो तर तीही फार महत्त्वाची गोष्ट झाली असती. परंतु ती गोष्ट गडबडीमध्ये होऊ शकली नाही. आपल्या देशात शेकडो भाषा बोलल्या जातात. अशी अफाट देशाची राजभाषा आपण एक कायम करू शकलो, ही खरोखरच महत्त्वाची गोष्ट आहे. निरनिराळ्या प्रांतीय भाषा त्या त्या प्रांतात रूढ राहतील असे अद्यापही म्हणतात; परंतु राजभाषा एक ठरल्यानंतर हिंदच्या प्रत्येक नागरिकास ती भाषा बोलणे प्राप्त होईलच व त्यायोगे आपोआप संघटना होईल. राष्ट्र बलिष्ठ करणे असल्यास अशा संघटनांची आवश्यकता किती आहे हे मी निराळे सांगावयास पाहिजे असे नाही.

महाराष्ट्रीयांविषयी बोलणे झाल्यास सध्या आपल्यामध्ये अशी एक वृत्ती निर्माण होऊ पाहत आहे की प्रत्येक क्षेत्रात आपले पाय मागे आहेत. मी ही गोष्ट कबूल करणार नाही. माझी आपणा सर्वांना अशी विनंती आहे की आपणही अशी समजूत करून घेऊ नका. गणसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्रीयन हे अल्पसंख्यांक आहेत. असे असूनसुद्धा मध्यवर्ती सरकारमध्ये आम्ही दोन महाराष्ट्रीय मंत्री आहोत. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरशिपचा मानही आपल्यापैकीच एका गृहस्थास मिळाला. त्याचप्रमाणे राजकारण, विद्वता, स्वार्थत्याग वगैरे सर्व गुणात आपला प्रांत मागे आहे, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. मी तर असे म्हणेन की दुसऱ्या कोठल्याही प्रांतातील प्रजाजनांपेक्षा महाराष्ट्रीय माणूस हा आपल्या कर्तव्याची जास्त चाड राखतो. तो जास्त प्रामाणिक आहे. राष्ट्राकरिता जास्तीत जास्त त्याग करण्याची त्याची तयारी आहे.

महाराष्ट्राची उज्ज्वल अशी परंपरा आहे व ती राखण्यात विद्याव्यासंग ठेवणे आवश्यक आहे. हा वर्ग अत्यंत अभिमानीही आहे. अभिमानी असणे वाईट नाही. परंतु फाजील अभिमानी असणे बरे नसते व खरा अभिमान पूर्ण विद्येनेच येतो. माझे तुम्हा सर्वांना असे सांगणे आहे की, महाराष्ट्राची परंपरा राखावयाची असल्यास आपला विद्याव्यासंग सोडता कामा नये. ज्या गुणांमुळे आपण आपली परंपरा टिकवू शकू त्यांचे संगोपन व पालन केले पाहिजे. ते प्रामाणिकपणा, कर्तव्याची जाणीव व ती पार पाडताना राष्ट्रीय हिताची दृष्टी, हे गुण म्हणजे होत. एक गोष्ट आपल्यामध्ये कमी आहे व ती म्हणजे उत्तम वक्तृत्व ! प्रत्येक तरुणाने ही कला उत्तमपणे आत्मसात न केल्यास यापुढील प्रजातंत्र राज्यपद्धतीत त्यांचा टिकाव लागणार नाही. आपण मला येथे बोलावून माझा जो सन्मान केलात त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password