खोटे दस्तऐवज करणारे गरीब, शेतकरी, कामकरी लोकांचे कल्याण करतील काय ?
अहमदनगर येथे तारीख 25 जानेवारी 1937 रोजी आगाऊ जाहीर केल्याप्रमाणे कॅम्प सदर येथे शनीच्या देवळामागील भव्य मंडपात अस्पृश्य समाजाची अहमदनगर जिल्हा परिषद, अखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे एकमेव पुढारी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती. या परिषदेला लोकसमुदाय सरासरी 5-6 हजारावर जमला होता. जिकडे तिकडे लोकात उत्साह व आनंद दिसत होता. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाची लोक आतुरतेने वाट पहात होते. काही स्पृश्य व अधिकारीवर्गही हजर होता. मंडपामध्ये पुण्याचे अर्जुनराव नलावडे, पारगावकर भानुदास, नेवासकर कवराम व पंढरीनाथबुवा हे सामाजिक पदे वीरश्रीयुक्त म्हणून लोकांची करमणूक करीत होते. तसेच म्हपाजी भिमाजी चाबुकस्वार, जखणगावकर कवी यांनी बाबासाहेबांचे गुणवर्णनपर वीरश्रीयुक्त, लोकात शौर्य उत्पन्न होईल असे पोवाडे गाईले. बाबासाहेबांची येण्याची वेळ 8 वाजण्याची होती, परंतु दुपारचे बारा वाजून गेले तरी बाबासाहेब येईनात म्हणून काही स्पृश्य वर्गात निराशा भासू लागली. तरीपण अस्पृश्य वर्गात सारखा उत्साह व आनंद दिसत होता. वरच्यावर लोकांचे थवेच्या थवे जमून बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता लोक सारखे तिष्ठत बसले होते. बाबासाहेबांच्या येण्याच्या वाटेवर त्यांचे स्वागत करण्याकरिता फर्स्ट लॉयन स्काउट बॅन्ड व स्काउट, राधीचा मळा येथील बलभीम स्काउट, मातंग प्रभृति मंडळ स्काउट, माळीवाडा, दरेवाडी येथील स्काउट पेवशव लाईन कॅम्प येथील मातंग स्काउट, बाकोडी येथील स्काउट मिळून तिनशे स्काउट लाठी व बैंडसह हजर होते. तसेच राहरीकर महार मंडळीच्या बॅड. शिंग, तुताऱ्या वाद्यांच्या आवाजाने सर्व वातावरण दुमदुमून गेले होते. जिकडे तिकडे वीरश्री उत्पन्न होऊन बाबासाहेबांच्या नावाचा सारखा जयजयकार होत होता. बरोबर दुपारी 2 वाजता बाबासाहेबांची मोटार येताच वाद्यांचा घनघनाट व डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणांचा सारखा गजर होत होता. बाबासाहेबांबरोबर मोटारीत श्री. प्रभाकर रोहमसाहेब, बी. एस. कदम, कर्जत, एस. आर. साळवे, नगर, विठ्ठलराव गायकवाड, नगरकर ही प्रमुख मंडळी होती. बाबासाहेबांना सर्व स्काउटने बँडसह सलामी दिली. त्यावेळचा देखावा अत्यंत शौर्याचा व वीरश्रीचा दिसत होता. बाबासाहेबांची मोटार मध्ये घेऊन आजुबाजूस सर्व लाठीबंद स्काउट रांगेने चालत असून मध्ये बैंड, शिंग, तुताऱ्या अशा वाद्यांच्या गजरात अफाट जनसमुदायासह मोठ्या थाटाने ही जंगी मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी स्त्रियांचा जमाव जमलेला असून बाबासाहेबांना हार अर्पण करीत व फुले उधळत होता. मिरवणुकीनंतर बाबासाहेब सभेत स्टेजवर स्थानापन्न झाले व सभेस रीतसर सुरवात झाली. परिषदेचे सेक्रेटरी रंगनाथ मारुतीराव सूर्यवंशी यांनी जमलेल्या लोकांचे अभिनंदन करून डॉ. बाबासाहेबांनी नगर जिल्ह्याला भेट दिली याबद्दल आम्ही बाबासाहेबांचे अत्यंत ऋणी आहोत असे सांगून आभार मानले. तसेच स्वागताध्यक्ष सखाराम बाळाजी भिंगारदिवे यांनी बाबासाहेबांचे स्वागतपर भाषण करून जमलेल्या लोकांना बाबासाहेबांची ओळख करून दिली, मे. रामचंद्र मकाजी नलवडे (ढोर) व श्री. सोनवणे (ढोर) नगर येथील मातंग समाजाचे पुढारी शंकरराव साठे (माळीवाडा). महार समाजातील श्री. भाऊराव यशवंत कदम, मारुतीराव गायकवाड देहरेकर, यशवंत श्रावण पाटोळे, वगैरे मंडळीनी नगर जिल्ह्यातर्फे श्री. प्रभाकर जनार्दन रोहम यांनाच निवडून देणे किती जरूरीचे आहे असे भाषण करून प्रचंड मताने त्यास आम्ही निवडून देऊ असे बाबासाहेबांना आश्वासन दिले. नंतर स्काउट मास्तर शंकरनाथ कुशाबा कांबळे यांनी बाबासाहेबांची कर्तबगारी, चांभार समाजाचे समाजद्रोही व घातक वर्तन, कॉंग्रेसचे कृतघ्न धोरण यावर परिणामकारक भाषण करून श्री. प्रभाकर जनार्दन रोहम यांनाच आपल्या नगर जिल्ह्यातर्फे निवडून देण्याबद्दल लोकांना विनंती केली. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करण्यास उठताच सर्वत्र बाबासाहेबांच्या जयजयकाराच्या घोषणा व टाळ्या एकसारख्या होत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, बंधु-भगिनींनो,
आजच्या सभेतील लोकांचा हा अलोट समुदाय आणि एकंदरीत नगर जिल्ह्यातील सर्व लोकांचा उत्साह पाहून मला आनंद वाटतो. आजची ही परिषद रा. रोहम यांचे निवडणुकीचे बाबतीत भरली आहे हे आपणास माहीत आहे. तरीपण ज्याअर्थी मी माझ्या पार्टीतून जे जे उमेदवार उभे केले आहेत त्याअर्थी त्या त्या उमेदवाराला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे.
रा रोहम यांना ह्या नगर जिल्ह्यात महार लोकांचा विरोध नाही ही आनंदाची गोष्ट होय. फक्त चांभार विरोध आहे पण त्याची तुम्ही पर्वा करू नका. त्यांच्या उमेदवारांना मुळीच मते देऊ नका हे मी उघड सांगतो. अस्पृश्य वर्गासाठी मिळविलेले हक्क सर्व अस्पृश्य लोकात विभागले जावेत ही गोष्ट खरी. परंतु ह्या चांभार लोकांनी आरंभापासून माझ्या कोणत्याही कार्यात भाग घेतलेला नाही. इतकेच नाही पण मी राउंड टेबल परिषदेमध्ये स्पृश्य हिंदुशी व सरकारशी झगडत असता आंबेडकर आमचे पुढारी नाहीत, त्यांचे म्हणणे आपण कबूल करू नये, अशा तारा पार्लमेंटला ह्या लोकांनी केल्या असून नाशिक सत्याग्रह चालू असता आपल्या लोकांवर स्पृश्य लोकांकडून जो दगडा-विटांचा वर्षाव झाला त्यात चांभार सामील होते. (धिक्कार धिक्कार, शेम शेम) हे मला पक्के माहीत आहे. तेव्हा आपण विचार करा. जे लोक माझ्या कार्याच्या आड येतात किंवा काँग्रेसच्या बगलेत घुसून माझ्या कार्याच्या मार्गात काटे पेरतात त्या लोकांना आम्ही आमचे का म्हणावे ? आणि त्यांनी तरी आमच्याकडे याचना का करावी ? हल्लीदेखील प्रत्येक ठिकाणी हे चांभार लोक काँग्रेस तिकीटावर उभे राहून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला उघड-उघड विरोध करीत आहेत. तुमच्या जिल्ह्यात रा. रोहम यांना विरोध करण्याकरिता सोनवणे नावाचे गृहस्थ उभे आहेत. काही स्पृश्य लोक म्हणतात की सोनवणे हा बी. ए. एलएल. बी. झालेला असून रा. रोहम फक्त मॅट्रिक आहेत. पण अशा लाखो बी. ए. ला पुरून उरणारा मी रोहमच्या पाठीमागे आहे ना. ( प्रचंड टाळ्यांचा कडकडाट व बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार ) श्री. सोनवणे कोणत्याच पक्षातर्फे उभे राहिले नसल्यामुळे त्याने जर तुमच्यासाठी काहीच केले नाही तर तुम्ही कोणाला जबाबदार धराल ? रा. रोहम हे माझ्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे उभे असल्यामुळे त्यांच्या कार्याची जबाबदारी माझ्यावर आहे. (टाळ्या) म्हणून मी सांगतो की तुम्ही आपल्या मतांच्या तिन्ही फुल्या श्री. रोहमच्या घोड्यापुढे करा (‘ होय होय बाबासाहेब ‘ लोक ओरडतात) श्री. सोनवणे यांना एकही मत देऊ नका (नाही नाही मुळीच नाही).
ह्या देशामध्ये सुशिक्षित व श्रीमंत लोकांचे बरेचसे प्रबळ पक्ष आहेत तसा माझाही हा एक लहानसा स्वतंत्र मजूर पक्ष आहे. यापेक्षा काही पक्ष असे आहेत की, त्यांच्या आणि माझ्यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे. काही पक्ष असे आहेत की, त्यांच्या आणि माझ्यामध्ये थोडे अंतर आहे. काँग्रेस आणि माझा पक्ष यांच्यामध्ये जो फरक आहे तो म्हणजे काँग्रेसने श्रीमंत उमेदवार उभे केले आहेत. मी माझ्या पक्षातर्फे गरीब उमेदवार उभे केले आहेत. तत्त्वाला बाध येऊ नये म्हणून मी माझ्या समाजातील काही श्रीमंत लोक वगळले आहेत. त्यामुळे त्यांचा माझ्यावर रोष झालेला आहे. तरी पण तत्त्वाकरिता त्यांची मला कदर वाटत नाही. काँग्रेस गरिबांची कैदारी म्हणवते व फिरोदीया सारखा श्रीमंत मारवाडी उभा करते. परंतु तुम्ही विचार करा, जे मारवाडी खोटेनाटे दस्तऐवज करून व खोटे आंगठे लाऊन तुमच्या जमीनी, घरेदारे जप्त करतात, ते मारवाडी गरीब, शेतकरी, कामकरी लोकाचे कल्याण करतील असे तुम्हाला वाटते काय ? (नाही नाही) काँग्रेसला आपली भांडवलशाही टिकवावयाची आहे व तुमचे नुकसान करावयाचे आहे. म्हणून तुम्ही त्यांच्या कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका. तुम्ही आपल्या विरुद्ध पक्षांचा विचार करा आणि स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार श्री. रोहम यांनाच आपली सर्व मते द्या अशी मी तुम्हास विनंती करतो.
आता जाता जाता मला अहमदनगर कॅम्पमधील स्काउट मंडळाचे अभिनंदन केल्यावाचून राहवत नाही. तुमच्या अंगी शूरत्व बनण्यास स्काऊट हे एक साधन आहे. प्रत्येक खेडेगावच्या लोकांनी सुद्धा आपल्या 11 वर्षांच्या पुढील मुलास स्काउटचा ड्रेस केला पाहिजे. आता धोतरे नकोत या धोतरांनी आपली फार नासाडी केली आहे. आजची ही शेकडो स्काउट मंडळी पाहून मला फार आनंद वाटतो. मी पुन्हा या स्काउट मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे म्हणून त्यांनी आपले भाषण पुरे केले.
त्या वेळेस टाळ्यांचा कडकडाट व त्यांच्या नावाचा जयजयकार व बँड, शिंगे, तुताऱ्या वगैरे वाद्यांनी तो भव्य मंडप दुमदुमून गेला. त्यांनी अहमदनगर कैंप फर्स्ट लाईन स्काउट ग्रूप, रायीचा मळा बलभीम स्काउट, प्रगती मातंग मंडळ, माळीवाडा स्काउट, दरेवाडी स्काउट बाकोडी स्काउट सदर कँप मातंग स्काउट वगैरे स्काउटला यश चिंतनपर लेखी शेरे दिले. नंतर श्री. प्रभाकर जनार्दन रोहम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नगर जिल्ह्याला भेट दिल्याबद्दल बाबासाहेबांचे आभार मानले. जमलेल्या सर्व लोकांनी व मतदारांनी माझ्या विषयी जी निष्ठा व प्रेम व्यक्त केले त्याबद्दल मी सर्व समाजाचा अत्यंत ऋणी असून आपल्या नगर जिल्ह्याने इलेक्शनच्या बाबतीत जी धडाडी दाखविली ती अत्यंत वाखाणण्यासारखी असून अभिनंदनास पात्र आहे असे स्फूतिदायक भाषण केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते फर्स्ट लॉयन स्काउटचे (जुने) कॅप्टन ल. बनसोडे, बलभीम स्काउटचे कॅप्टन श्रीपतराव बा. गायकवाड, दरेवाडी स्काउटचे कॅप्टन कुंडलिक भिंगारदिवे, बाकोडी स्काउटचे कॅ. किसनराव मातंग प्रगती मंडळ स्काउटचे कॅ. किसनराव पारधे यांना व व्यायाम मंडळाचे वस्ताद यशवंत श्रावण पाटोळे, राहुरीचे बैंड मास्तर नामदेव साळवे यांना रौप्य पदक अर्पण करण्यात आले. शेवटी सर्व संस्थेतर्फे बाबासाहेबांना हार अर्पण करण्यात आले. नंतर बाबासाहेब यांच्या जयजयकारात ही जंगी सभा बरखास्त झाली.