भूलथापास बळी न पडता सावधगिरीने वागले पाहिजे. अखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे एकमेव पुढारी व स्वतंत्र मजूर पक्षाचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. ए. पीएच. डी., बार-ॲट-लॉ हे दिनांक 25 जानेवारी 1937 रोजी सोलापूर व नगर जिल्ह्यातील दौरा संपवून रात्री साडे तीन वाजता जळगाव स्टेशनवर आले. त्यांचे बरोबर पूर्व खानदेशातील स्वतंत्र मजूर पक्षाचे उमेदवार श्री. दौलतराव गुलाजी जाधव, बी. ए. हे होते. जामनेरला पोचल्यावर जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीचे सभेत रुपांतर झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेला संबोधित करताना म्हणाले. आज मी दौऱ्यावर का निघालो आपणास कळले आहे. येत्या सुधारणा कायद्यानुसार आपणास मुंबई कायदे कौन्सिलमध्ये 15 उमेदवार निवडून देण्याचा अधिकार मिळाला आहे. राज्यघटनेनुसार स्थापन होणाऱ्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये एकूण 175 सभासद असतात. त्यांच्या मानाने आपले थोडे आणि तेही जर एकजुटीने राहिले नाहीत तर आपले काहीच हित साधणार नाही. सर्व लोक एकजुटीने राहाण्यास ते कोणत्यातरी पक्षास निगडित झाले पाहिजेत. जिल्ह्यातर्फे मी माझ्या पक्षातर्फे श्री. जाधव ह्यांची निवड केली आहे. तुमच्या त्यांना विरोध करणारे श्री. मेढे, बि-हाडे किती लायकीचे आहेत ते आपणास माहीत आहे. जाधव जर पुढे तुमच्या इच्छेप्रमाणे वागणार नाही तर त्याला जबाबदार मी आहे. पण श्री. मेढेच्या बाबतीत तुम्ही कोणास जबाबदार धरणार ? दुसरी गोष्ट म्हणजे कायदे कौन्सिलमध्ये सर्व कामे इंग्रजीतून चालत असल्यामुळे तुमची गा-हाणी मांडण्यास चांगला इंग्रजी जाणणारा मनुष्य पाहिजे. त्या गोष्टीस लायक इसम फक्त श्री. जाधव आहे. श्री. जाधव काही माझा नातलग नाही व इतर उमेदवार माझे शत्रू नाहीत. पण ज्या त्या कामास जो तो मनुष्य नेमणे माझे कर्तव्य आहे. तुम्हास हा हक्क मिळू नये म्हणून महात्मा गांधी सारख्या लोकांनी प्राणांतिक उपवास आरंभिला होता. परंतु त्यास न जुमानता हा हक्क आम्ही मिळविला आहे. त्याचा उपयोग करणे आता तुमच्या स्वाधीन आहे. तुम्हास बळी पाडण्याकरिता काही लोक तुमच्या करिता बोर्डिगे काढतात. चहादारी करतात पण ते सर्व अगदी थोडावेळ टिकणारे आहे. तेवढ्याने आपला उद्धार होणार नाही. आपणास अजून पुष्कळ मिळवावयाचे आहे व ते मिळविण्याकरिता तुम्ही आता अगदी सावधगिरीने वागले पाहिजे. श्री. मेढे यांना मदत करणारे काही मास्तर लोक आहेत असे ऐकतो. पण ते त्याला का मदत करतात त्याचे कारण समजत नाही. पण त्यात एक कारण दिसते ते हे की मेढे हा स्कूलबोर्ड मेंबर आहे व त्याची पार्टी सोडल्यावर आपली बदली करेल. पण त्या मास्तर लोकांना मला हे सांगावयाचे की, मेढे काही कायमचा सिंहासनावर बसला नाही. तो या वर्षी आहे तर पुढे नाही. समजा पुढील वेळी श्री. जाधव स्कूलबोर्डात निवडून आले तर मग हे मास्तर लोक कोणाच्या तोंडाकडे पहातील ? मला तुम्हाला हे सांगावयाचे की माझे कर्तव्य मी पार पाडले आहे. आता तुमचे कर्तव्य राहिले आहे. कोणाच्या भुलथापास बळी न पडता तुम्ही अगदी सावधगिरीने वागले पाहिजे. श्री. जाधवांजवळ काही मोटार गाड्या नाहीत किंवा पैसा नाही. तुम्ही घरची भाकरी पाठिशी बांधून पोलीस स्टेशनवर गेले पाहिजे. या देशात मत देणे म्हणजे उमेदवारावर उपकार करणे असा समज झाला आहे पण तो खरा नाही. उमेदवार जाणार तो कोणाकरिता जातो हे समजाऊन घेतले पाहिजे. उमेदवार हा तुमची गाऱ्हाणी सांगण्याकरिता व त्याचे निवारण कसे करावयाचे याचे कायदे करण्याकरिता जात असतो. आपणास जे काही मिळवावयाचे ते कायद्याने मिळणार आहे. अशी स्थिती लक्षात घेऊन तुम्ही श्री. जाधव यांनाच आपली सर्व मते देऊन निवडून आणावे, अशी विनंती करून त्यांनी भाषण संपविले. भाषण झाल्यावर सर्वांनी जाधवांनाच मते देण्याची जाहीर घोषणा केली.
