Categories

Most Viewed

24 जानेवारी 1954 भाषण

खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माची पुनःस्थापना करण्याचे बिकट कार्य भावी पिढीवर येऊन पडले आहे.

दिनांक 24 जानेवारी 1954 रोजी अखिल भारतीय साई भक्त संमेलनाचे मुंबई येथील झेवियर कॉलेजच्या मैदानावर उद्घाटन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

आज तर मूर्तिपूजा, साधुसंत आणि चमत्कार करणाऱ्या व्यक्तींची पूजा हाच धर्म होऊन बसला आहे. आपल्या धर्मात आता देव आणि नीतीही राहिली नाही. आजची अवस्था म्हणजे मानवी मनाचा संपूर्ण अधःपात आहे. म्हणूनच खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माची पुनः स्थापना करण्याचे बिकट कार्य भावी पिढीवर येऊन पडले आहे.

साईबाबांना प्रत्यक्ष भेटण्याचे किंवा पहाण्याचे भाग्य मला लाभले नाही. त्यांच्याबद्दल मी थोडे फार ऐकून आहे एवढेच. अशावेळी साईबाबांच्या जीवनाचे अष्टपैलू माहित असलेल्या व्यक्तिला बोलाविले असते तर फार बरे झाले असते. माझे साईबाबांबद्दलचे ज्ञान अगदी शून्य आहे आणि जे आहे त्याचे अधिष्ठान देखील ऐकीव गोष्टीवरच आहे. साईबाबा कालवश होऊन बरेच दिवस लोटले असले तरी त्यांचा भक्तगण मात्र इंदुकलेप्रमाणे सारखा वाढत आहे. साईबाबा हे धर्मगुरू म्हणूनच पुष्कळांना माहीत आहेत. हिंदुस्थानात धर्माची अनेक स्थित्यंतरे झाली. माणसाच्या आत्म्याला मुक्ती मिळण्याचे साधन हीच धर्माची प्राथमिक अवस्था अशी समजूत होती. कालांतराने धार्मिक दृष्टिकोन हेतू आणि साधना यामुळे मूळ कल्पनेत आमूलाग्र बदल झाला. धर्म हा नैतिक मूल्यांनी परस्पराविषयी आदर भाव निर्माण करून विश्वबंधुत्वाची उभारणी करण्याचे साधन आहे असाही अर्थ लावला गेला. धर्माची तिसरी अवस्था म्हणजे मानवी जीवनातील दैनंदिन गरजांची जी व्यक्ती पूर्तता करील तिची देवाप्रमाणे पूजा करणे ही होय. कुणाला मुले हवी होती. कुणाला सोने हवे होते. कुणाला संकटमुक्त व्हायला पाहिजे होते ! ज्या व्यक्तीने या इच्छा पूर्ण केल्या ती व्यक्ति त्या त्या इसमांचा देव होऊन बसली. त्यानंतर तर सामान्य माणसापेक्षा काही तरी चमत्कृती करून दाखविणाऱ्या व्यक्तिचीही पूजा होऊ लागल्याचे सर्व हिंदुस्थानभर आपण पाहात आहोत.

धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहोत. एवढेच नव्हे तर आजकालच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो अनिष्ट बाबींवर खर्च केला जातो. आज जगात दारिद्र्य आणि दुःख असताना अशारितीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राह्मणादी आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे. गौतम बुद्धांनी हा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळला होता. त्यांनी आपल्या नैतिक शास्त्रात पंचशील, अष्टांगमार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना खालील दहा तत्त्वे आत्मसात करण्यास सांगितली आहेत. ती अशी: (1) प्रज्ञा (2) शील, (3) नेखम्म (4) दान, (5) वीर्य, (6) खन्ति (7) सच्च, (8) अधित्थान, (9) मैत्री (10) उपेख्खा.

ज्यामुळे अज्ञानांधकार नाहिसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश. शील म्हणजे नैतिक विचार कोणतीही वाईट गोष्ट करू नये. परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करीत रहावे. नेखम्म म्हणजे ऐहिक सुखापासून अलिप्त राहाणे. दान म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तनमनधन अर्पण करणे. वीर्य म्हणजे धैर्य, कसोटी की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे. खन्ति म्हणजे सहनशीलता द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे. सच्च म्हणजे सत्य. प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये, सत्य बोलावे. जे बोलावे ते सत्यच असावे अधित्थान म्हणजे मनोनिग्रह मैत्री म्हणजे प्रेम, मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो, मानवाविषयी असो किंवा इतर प्राणीमात्राविषयी असो, उपेख्खा म्हणजे उपेक्षा, ज्यामुळे मन सुखदुःखाच्या पलिकडे गेले असून कोणत्याही परिणामाने विचलित न होता कर्तव्यपरायण राहाणे.

वरीलपैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात करावे अशी बुद्धाची अपेक्षा होती. म्हणूनच पाली वाङ्मयात असे म्हटले आहे की, गौतम बुद्धांनी वरीलप्रमाणे “दान पारमिता” जरी शिकविली असली तरी दान हे सतपात्री असण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होताच. दान देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला दान दिले जाते त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नये. पददलितांना एक दिवस स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ति, जिला आपण मदत म्हणतो तेच खरे दान. साधुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल तर त्याचा पारमितामध्ये सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई इतकी आहे की, सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशाचा विनियोग रुग्णालये, शिक्षण, बेकारासाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काही तरी धंदेशिक्षण देणे अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जर जमा केलेल्या पैशाचा विनियोग अशारितीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल. एवढेच नव्हे तर साईबाबाची कीर्ती दाही दिशांना दुमदुमत राहील.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password