Categories

Most Viewed

24 जानेवारी 1937 भाषण

ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊ नका.

अखिल भारतीय अस्पृश्यांचे एकमेव वंदनीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विलायतेहून परत आल्याबरोबर स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौऱ्याचा कार्यक्रम आखला गेला. तारीख 24 जानेवारी 1937 हा सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाला. ही बातमी समजताच सोलापूरचे वयोवृद्ध सरपंच श्री. विश्वनाथबुवा बंदसोडे, धाकट्या महारवाड्याचे कारभारी संभाजीराव तळभंडारे तसेच केशवराव सोवे, शंकरराव सातपुते, श्रीपतराव पक्षाळे, विठ्ठलराव साबळे, मारुतीराव बंदसोडे, मारुतीराव गायकवाड, जनतेचे एजंट रा. बल्लाळ, रामकृष्ण पुजारी वगैरे भागातील पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या आगमनाची बातमी जिल्ह्यात तातडीने पोचविली. त्याबरोबर ताबडतोब करसाळे, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, मंद्रूप, घळसंग वगैरे भागातील पुढाऱ्यांनी बाबासाहेबांच्या दौऱ्यातील कार्यक्रम सभेला येणाऱ्या मंडळींच्या जेवणासह पार पाडण्याची तयारी केली. अस्पृश्यांचा उद्धारक, अखिल भारतीय दलितांचा राजा बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध जनता जिल्ह्यात सर्वत्र त्यांची मार्गप्रतिक्षा करीत राहिली. 23 जानेवारीची रात्र सोलापूर येथे जमलेल्या अस्पृश्य समाजाने बाबासाहेबांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यासाठी जागून काढली. कॅप्टन यादवराव लोंढे व शहरातील निरनिराळ्या तालमीतील भीमसेनेचे स्वयंसेवक यांनी पहाटे 3 वाजताच सोलापूर स्टेशनवर आपला तळ दिला. 4 वाजल्यापासून लोकांची सारखी रीघ स्टेशनकडे सुरू झाली. 6 वाजण्याच्या आत 5-6 हजार लोकांच्या समुदायाने स्टेशनचे पटांगण आणि बाहेरची जागा चिक्कार भरून गेली. 7 नंतर बाबासाहेबांच्या गाडीने स्टेशनात प्रवेश करताच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय आंबेडकर झिंदाबाद’ वगैरे वगैरे जयजयकाराने वातावरण दणाणून गेले. त्या जयजयकारात मातंग समाजातर्फे केरू रामचंद्र जाधव व आपाराव दणाणे, सत्यप्रसारक भीमसेनेचे कॅप्टन यादवराव लोंढे, थोरला महारवाडा पंचाच्या तालमीतर्फे नारायण बाबरे, धाकटा महारवाडा आंबेडकर तालमीतर्फे संभाजी तळभंडारे, फॉरेस्ट दीनबंधु आंबेडकर तालमीतर्फे हरिबा खलीफा, श्री. तात्याबा पांडुरंग सावंत, चेअरमन, माळशिरस ग्रामपंचायत निवृत्तीराव माने व अकुबा लोंढे आणि शहरातील सर्व मोहल्ल्यांतर्फे बाबासाहेबांना हार घालण्यात आले. पुष्पवृष्टी करीत करीत आनंदोत्साहाने जयजयकार गाजविणाऱ्या त्या प्रचंड जनसमुदायातून स्वयंसेवकांनी साखळी करून मोटारीपर्यंत बाबासाहेबांना मोठ्या प्रयासाने पोचविले. पुढे बाबासाहेब मेसर्स जी. आर. देशपांडे वकील यांच्या बंगल्यावर मुक्कामास गेले व मंडळी आंबेडकर झिंदाबाद’ च्या ललकाऱ्या मारीत थोरल्या महारवाड्यातील मंडपात गेली. चहापानानंतर बरोबर 8 वाजता बाबासाहेब मंडपात दाखल झाल्याबरोबर (झिंदाबादची घनगर्जना, टाळ्यांचा कडकडाट व एकदम शांतता) मातंग समाजातर्फे केरू रामचंद्र जाधव यांनी पुन्हा हार घालून “अखिल भारतीय अस्पृश्य समाजाला शिक्षण, समता, सन्मान आणि भाकर मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करिता अत्यंत निर्भयतेने, समतेने आणि व्यापकतेने बाबासाहेबांनी चालविलेली सनदशीर चळवळ ही खास आमचा उद्धार करील, बाबासाहेब हेच आमचे पुढारी, हेच आमचे धर्माधिकारी व हेच आमचे पूज्य दैवत आहेत. मातंग समाज त्यांचा एकनिष्ठ अनुयायी आहे ही गोष्ट मुंबईत झालेल्या इलाखा मातंग परिषदेने सिद्ध केलेली आहे.” वगैरे भाषण केल्यावर बाबासाहेब बोलावयास उभे राहिले (झिंदाबादची गर्जना, प्रचंड टाळ्या व एकदम शांतता). डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

बंधुनो व भगिनींनो,
मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या आगामी निवडणुकीत कोणाला मते देऊन निवडून आणावे याचा विचार करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. या देशात अनेक राजे होऊन गेले. इंग्रजांना येथे येऊन उणीपुरी 150 वर्षे झाली. इंग्रजांच्या या 150 वर्षांच्या कारकीर्दीत सुमारे 60 वर्षापासून ही कौन्सिले अंमलात आली असून त्यांच्याद्वारे जनतेचे प्रतिनिधी आपल्या लोकांची गा-हाणी सरकारकडे मांडीत आहेत. परंतु अस्पृश्य मानिलेल्या 8 कोट प्रजेतर्फे त्यांचे गाऱ्हाणे मांडणारा त्यांचा प्रतिनिधी कौन्सिलात असावा ही गोष्ट आतापर्यंत जगाच्या इतिहासात घडून आली नव्हती. ती गोष्ट आता आपल्या प्रयत्नाने झाली आहे. येत्या एप्रिल 1937 पासून सुरू होणाऱ्या कायदे मंडळासाठी सोलापूर जिल्ह्यातील आपल्या लोकास एक प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार मिळाला आहे. आता जे कौन्सिल भरणार आहे ते आपल्या समाजाच्या बचावाचे साधन आहे. तेथेच आपल्या सुखदुःखाची दाद लागणार आहे. तेथेच महारांच्या वतनासंबंधी, पडित जमिनी मिळण्यासंबंधी शिक्षण संपादनासाठी, स्कॉलरशिपा मिळविण्यासंबंधी, अस्पृश्यतेमुळे आलेली दैन्यावस्था टाळण्यासंबंधी, सरकारी नोकरीत योग्य त्या प्रमाणात शिरकाव होण्यासंबंधी अशा एक ना दोन शेकडो गोष्टी या कायदे मंडळाच्याद्वारे झगडा करून आपणास मिळवावयाच्या आहेत. अर्थात तेथे जाणारा तुमचा प्रतिनिधी मानासाठी जाणारा नसून आपल्या समाजाच्या हिताच्या बाजूने लढण्यासाठी जाणारा आहे हे लक्षात घ्या. तसेच नेहमीच्या व्यवहारात आपण पाहतो की, घर बांधताना दगडकामासाठी गवंडी व लाकूड कामासाठी सुतार आपण लावतो. कुठे एकदा रेल्वेचा पूल बांधावयाचा असल्यास इंजिनीयरची जरुरी असते, शाळा मास्तरला ते काम करता येत नाही. पण तुमच्या येथील उद्धव शिवशरण मास्तरने या जबाबदारीच्या जागेसाठी आपली निवड करावी म्हणून मला पत्र लिहिले. इंग्रजी न जाणणाऱ्या या मास्तराबद्दल मी मुग्ध राहिलो. तब्बल दोन महिने विचार केला आणि नंतर श्री. जिवाप्पा ऐदाळे यांचे नाव जाहीर केले. इतके होईपर्यंत श्री. मागाढे यांचे नाव मला कळविले नाही. मागाहून कळविले. पण याच्या बुडाशी काँग्रेसचा हात आहे व याबद्दल माझ्याकडे पुरावा आहे. बंधूंनो, काँग्रेसला स्वराज्य पाहिजे आहे. आम्हालाही स्वराज्य पाहिजे. पण ते मिळविण्याचा काँग्रेसचा मार्ग जो कायदेभंग तो आम्हाला मान्य नाही. कायदेभंगाने स्वराज्याचा खुंटा हालवून बळकट केला आहे. काँग्रेसवाले तुम्हाला सांगतील की आपल्या सर्वांच्या एकजुटीने इंग्रज सरकारला आपल्या देशातून हाकून लावू या आणि स्वातंत्र्य मिळवू या. पण ढेकूण मारण्याची ज्यांना छाती नाही. ते सर्वतोपरी सुदृढ, सुसज्ज अशा इंग्रज सरकारला कसे हाकून लावणार. अथवा समजा उद्या इंग्रज सरकार इंग्लडला निघून गेले. तर आम्हाला धार्मिक, आर्थिक, सामाजिक अवनतीच्या खड्ड्यात कुजत ठेवणारे खोत, जमीनदार हे कुठे परदेशी जाणार आहेत काय ? काँग्रेस तर शेठ सावकार, जमीनदार, भांडवलदार लोकांची संस्था. म्हणून अशा लोकांच्या कसल्याच भूलथापा तुम्ही ऐकू नका.

बंधुंनो, तुमच्या मतांची किंमत मीठ मिरची सारखी समजू नका. तुमच्या प्राणाइतकीच किंबहुना जास्तच तुमच्या मतांची किंमत आहे हे विसरू नका. भलत्याच उमेदवाराला मत द्याल तर खाटक्याच्या हातात बकऱ्याने सुरी दिल्यासारखे होईल. श्री. जिवाप्पा ऐदाळे हे माझ्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना ध्येय आहे. त्यांना तत्त्व आहे. त्यांची आणि तुमच्या भावी हितानहिताची सर्व जबाबदारी माझ्या शिरावर आहे. म्हणून श्री. जिवाप्पा ऐदाळे यांनाच आपली तिन्ही मते देऊन निवडून आणा. दुसरे उमेदवार कोणी माझे शत्रू नाहीत. पण ज्यांना पक्ष नाही. ध्येय नाही, तत्त्व नाही. अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या लोकांची जबाबदारी मी घेणार नाही. आजपर्यंत तुम्हाला कोणी तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा नात्या-गोत्याचा अभिमान धरा, म्हणून सांगितले असेल किंवा पुढे सांगतील. पण असा अभिमान धरावयाचा झाल्यास शेवटी तुम्हाला आपल्या गावचा व घराचासुद्धा अभिमान धरावा लागेल. असे घरोघरी उमेदवार उभे राहतील तर तुमच्या भावी कल्याणाचा सत्यानाश होईल याचा विचार करा.

शेवटी तुम्हाला सांगावयाची गोष्ट ही की, या शहरातील मजुरांच्या तर्फे तुम्हाला एक मत देण्याचा अधिकार आहे. त्या जागेसाठी मजुरांच्या तर्फे श्री. रघुनाथराव बखले हे उभे राहिले आहेत. आतापर्यंत त्यांनी कौन्सिलात केलेली गोरगरीब, मजूर, शेतकरी, अस्पृश्य यांची सेवा मला मान्य आहे. त्यांनाच सोलापूरच्या मजूरांनी मते द्यावी. शेठ सावकार, गिरणीवाले यांच्या हस्तकांना मते देऊन तुमचे कल्याण होणार नाही. तरी श्री. बखले यांनाच आपली मते द्या.

इतके बोलून बाबासाहेबांनी आपले भाषण पुरे केल्यावर तुळजापुरचे कदम ब्रदर्स यांनी व इतर अनेकांनी हार घातल्यावर जयजयकारात सभा बरखास्त होऊन बाबासाहेब मंदूपकडे रवाना झाले.

मंदूपची सभा :

सोलापूरचा कार्यक्रम संपवून बाबासाहेब येथे येणार म्हणून मंदूप परगणा व मंगळवेढे संस्थानातून जमलेला दोन हजारांवर लोकांचा समुदाय वाद्य वाजंत्र्यासह आतुरतेने गावाबाहेर उभा होता. 10 च्या सुमारास बाबासाहेबांची मोटार येऊन थडकली व आंबेडकर झिंदाबादची दंगल उडाली. बाबासाहेब मिरवणुकीने मंडपाजवळ येताक्षणी सुवासिनी बायांनी त्यांच्या चरणाजवळ पाण्याच्या घागरी ओतल्या. कापूर लावून नारळ फोडले. पंचारत्या घेऊन इडा पिडा जावो. ‘बाबासाहेब यशस्वी होवो’ म्हणून ओवाळणी केल्यावर सभेच्या कामास सुरवात झाली. प्रथम मंदूप परगण्याचे देशमेहत्रे गंगापा रणखांबे यांनी स्वागतपर भाषण केले. बाबासाहेबांनी थोड्या-बहुत फरकाने सोलापूरच्या सभेप्रमाणे भाषण केले. श्री. ऐदाळे यास मते देण्यास सांगितले. नंतर भीमाप्पा रणखांबे यांनी श्रीमंत देशमुख, श्री. पांढरे आणि सभाजन यांचे आभार मानले. बाबासाहेबांच्या जयजयकारात सभा खलास झाली. नंतर बाबासाहेब सोलापूरकडे परतले. तेथे धाकटा महारवाडा आंबेडकर तालमीची पानसुपारी उभ्या उभी स्वीकारून लागलेच ते वळसंगकडे रवाना झाले.

वळसंगची सभा :

वाटेत कुंभारीकर योगीबुवा आणि समस्त मंडळी यांनी आपल्या चावडीसमोर मुद्दाम उभारलेल्या मंडपात केलेली पानसुपारी हारतुरे घेऊन 11.25 च्या सुमारास बाबासाहेब वळसंगला पोचले. तेथेही वळसंग कुंभारी, सलगर, मंगळूर भागातून व अक्कलकोट संस्थानातून तीन हजारावर लोकसमुदाय जमला होता. नंतर तेथील कारभारी श्री. ॐकारप्पा वळसंगकर यांनी स्वागत केल्यावर बाबासाहेबांनी थोड्याबहुत फरकाने सोलापूर प्रमाणेच भाषण करून ऐदाळे यास मते देण्यास सांगितले. नंतर सोलापूर जिल्हा लोकलबोर्डाने बांधून दिलेल्या विहीरीतून पाणी काढण्याबद्दल लोकांनी विनंती केल्यावरून चांदीच्या गडव्याला बांधलेला दोर ओढून बाबासाहेबांनी विहिरीतून पाणी काढले. लोकांनी प्रसाद म्हणून पाणी मागताच बाबासाहेब विनोदाने ‘दक्षिणा काढा’ असे म्हणाले व सर्वत्र हशा पिकला. अखेर बाबासाहेबांना लोकांना पाण्याचा प्रसाद द्यावा लागला. लोकांनी सदर विहीरीचे नाव आंबेडकर बावडी असे ठेविले व बाबासाहेब सोलापुरास रवाना झाले.

सोलापुरास श्री. देशपांडे वकील यांचे बंगल्यावर जेवण झाल्यानंतर बाबासाहेब बार्शीकडे गेले. वाटेत बैराग, पानगाव वगैरे ठिकाणी हारतुरे स्वीकारून तीनच्या सुमारास बार्शी येथील श्री. भगवंत मीलजवळ पोचले.

बार्शीची सभा :

येथे 8-9 हजार लोकांचा समुदाय व सरमाळेकर, रा. नामदेवराव वासकर, माणकेश्वर, कासारवाडीकर यांच्या बँडच्या ताफ्यासह सामोरा आला होता. तेथून मिरवणुकीने बाबासाहेब पोस्ट ऑफिस, पोलिस चौकी, काझी मशीद, जैन मंदीर, भाजी मार्केट या रस्त्याने म्युनिसिपल दवाखान्याजवळ उभारलेल्या भव्य मंडपात येऊन पोचले.

प्रथम बार्शीचे तरूण-सुशिक्षित महार पुढारी श्री. मनोहर दादा बोकेफोडे यांनी स्वागतपर सुंदर विचारपरिप्लुत असे भाषण केले. नंतर बाबासाहेबांनी थोड्याफार फरकाने सोलापूर प्रमाणेच अर्धा तास भाषण केले. श्री. ऐदाळे यास मते देण्यास सांगितले. यानंतर निरनिराळ्या संस्थांतर्फे हारतुरे होऊन सभा विसर्जित झाली व बाबासाहेब कुर्डुवाडीकडे रवाना झाले.

कुर्डुवाडीची सभा :

येथे जिल्हा बोर्डाचे मेंबर श्री. शंकरराव रिकीबे, कोंडीराम कांबळे, निंगापा कुमार ऐदाळे, सांगोळकर, बंदसोडे, खंडेराव मिस्त्री, भाऊसाहेब कांबळे, केसकर वगैरे मंडळीनी श्री. हिरालाल थिएटर शृंगारून सर्व प्रकारची जय्यत तयारी ठेविली होती. श्री. बाळकृष्ण ऐदाळे यांचे स्वागतपर विस्तृत भाषण झाल्यावर बाबासाहेबांनी सोलापूर प्रमाणे अर्धा तास भाषण केले. ऐदाळे यासच मते देण्याची कबुली लोकांनी दिल्यानंतर हारतुरे होऊन बाबासाहेब टेंभुर्णीकडे रवाना झाले.

टेंभुर्णीची सभा :

येथे महार आणि मातंग समाजांनी आपापल्या चावडी समोर शोभिवंत मंडप उभारुन पान-सुपारीची तयारी केली होती. तेथे 10-10 मिनिटे बाबासाहेबांनी इलेक्शन संबंधी मागील प्रमाणेच भाषण करून पान-सुपारी व हारतुरे स्वीकारून ते करमाळ्यास रवाना झाले.

करमाळ्याची सभा :

करमाळे येथील पुढारी श्री. खंडेराव कांबळे आणि त्यांच्या साह्यकारी बांधवांनी भव्य आणि शोभिवंत अशा उभारलेल्या मंडपात पाच हजार लोकांचा समुदाय आतुरतेने मार्गप्रतीक्षा करीत बसला होता. बाबासाहेब येताच आंबेडकर झिंदाबाद, आंबेडकर की जय वगैरे घोषणांनी आकाश दुमदुमले. प्रथम तेथील सुशिक्षित महार पुढारी श्री जनार्दनराव कांबळे यांनी बाबासाहेबांचे गुणगौरवपर सुंदर आणि मुद्देसूद असे भाषण केले. बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे श्री. ऐदाळे यास मते देण्यास इकडील समाज आनंदाने तयार असल्याचे सांगितले. नंतर बाबासाहेबांनी सोलापूर प्रमाणेच अर्धा तासपर्यंत भाषण केले. नंतर नगरचे उमेदवार श्री. प्रभाकरराव रोहम यांनीही त्यास दुजोरा देणारे उत्तम भाषण केले. नंतर तेथील ख्रिश्चन मिशनकडील उपदेशक यांनी श्री. ऐदाळे यास दुजोरा देणारे भाषण केले. स्थानिक पुढारी श्री. खंडेराव कांबळे यांनी बाबासाहेबांचे व सभाजनांचे आभार मानून ऐदाळे यास निवडून आणण्याबद्दल करमाळे तालुका अगोदरच तयार असल्याचे सांगितले. शेवटी हारतुरे होऊन बाबासाहेबांच्या जयजयकारात सभा बरखास्त झाली. श्री. रोहम आणि नगरकडील इतर पुढारी मंडळी यांच्या समवेत बाबासाहेब कर्जतकडे रवाना झाले.

सोलापूर जिल्ह्यातील बाबासाहेब आंबेडकर यांचा दौरा सर्वपरी यशस्वी होण्याच्या कामी ज्या कित्येक सद्गृहस्थांनी मदत केली त्यात सोलापूरचे अस्पृश्यांचे हितचिंतक रा. डॉ. मुळे यांची मदत फारच झालेली आहे. तसेच कुर्डुवाडीचे त्यांचे मित्र श्री. हिरालाल शेठ परदेशी व बार्शी येथील स्पृश्य मंडळी यांचीही मदत झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या महार बांधवांनी झटून मदत केली. तसेच सोलापूरचे तरूण मातंग पुढारी केरू रामचंद्र जाधव, अंबाजी पिलाजी जाधव, परशुराम केशव लोंढे, शंकर मन्याप्पा जाधव, यमाजी धोंडी चव्हाण, भागणा परशुराम हेगडे, अप्पाजी सुभाना वाघमारे, टेंभुर्णीचे जगताप ब्रदर्स आणि बार्शीचे मनोहर गोमाजी कांबळे व प्रेमाजी आपा कांबळे या मातंग बांधवांनीही अतिशय मेहनत घेतली आहे. बार्शी भागातील मत प्रचार मिरवणुकीची आणि मंडपातील सर्व प्रकारची व्यवस्था बार्शीकर कांबळे ब्रदर्स या मातंग बांधवांच्या साहाय्यामुळेच उत्तम अशी झाली हे त्यास भूषणावह आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password