परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने आणि प्रभावी संघटनेने राहा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब सवितादेवी आंबेडकर यांचा सत्कार समारंभ मनमाड मुक्कामी अत्यंत थाटाने साजरा झाल्यानंतर त्यांनी पूर्वनियोजित हैद्राबाद संस्थानातील दौ-यास तारीख 16 जानेवारी 1949 च्या मध्यरात्रीस सुरूवात केली. मनमाड स्टेशन रात्रौ दीड वाजता त्यांनी सोडले. दौऱ्याचे पहिले ठिकाण औरंगाबाद येथे तारीख 17 जानेवारी 1949 च्या पहाटेस ते पोहचले. रस्त्यात ज्या ज्या ठिकाणी गाडी थांबली त्या त्या सर्व स्टेशनवर त्यांचे हार्दिक सत्कार समारंभ सोज्वळतेने साजरे झाले.
प्रत्येक स्टेशनवर दलित जनता अफाट समुदायाने जमली होती. गॅसच्या बत्त्या व रंगीबेरंगी कागदी पताका यांच्या सुंदर सजावटीने जवळ जवळ सारी स्टेशने सजविली होती.
औरंगाबाद स्टेशन जनतेच्या अभूतपूर्व गर्दीने जणू फुलूनच निघाले होते. सर्व मतांचे सर्व पक्षांचे लोक डॉक्टर साहेबांच्या स्वागतासाठी हजर होते.
शेकडो हारतुरे डॉ. बाबासाहेबांना व सौ. सविताबाई आंबेडकरांना अर्पण करण्यात आले, त्यावेळी क्षणोक्षणी “भीम भगवान की जय” चा जयघोष होत होता.
जुनी आठवण :
औरंगाबादचे सिव्हील अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री. राजवाडे, डी. एस. पी. श्री. अष्टेकर व इतर पोलीस अधिकारीही आपल्या जाम्यानिम्यासह हजर होते. शिरस्त्याप्रमाणे पोलिसांचा “गार्ड ऑफ ऑनर” (मानाची सलामी) घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व मित्रमंडळीसह श्री. अष्टेकरांच्या मोटारीतून औरंगाबादेस स्थापल्या जाणाऱ्या सिध्दार्थ कॉलेजच्या जागेची पाहाणी करण्यासाठी गेले. मुक्रर केलेली जागा पाहिल्यानंतर औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळेही त्यांनी पाहिली. त्यापैकी “पाणचक्की” बघत असताना डॉ. बाबासाहेबांना 10 ते 11 वर्षापूर्वीची एक जुनी आठवण झाली. ते अगदी मनमोकळेपणाने हसले. लागलीच श्री. भाऊराव गायकवाड यांना हाक मारून 10 ते 11 वर्षापूर्वी ह्याच औरंगाबादेतील मुसलमानांनी दौलताबादेचा किल्ला बघत असताना तुम्ही हलक्या जातीचे आहात अशी निर्भत्सना केली होती, तिची आठवण करून दिली. पुनः एकदा हास्य करून डॉक्टरसाहेब म्हणाले, “तेच मुसलमान मला माझ्या पायातील जोड्यासह आज थेट त्यांच्या देवांच्याजवळही नेण्यास तयार आहेत.” पाणचक्कीच्या शेजारी जी मशीद आहे तेथे ठेवलेले अडीचशे तीनशे वर्षापूर्वीचे कुणातरी एका साईबाबांचे (फकिराचे) कपडे अगदी जसेच्या तसेच व नीटनेटक्या स्थितीत असलेले पाहून व त्यावरील त्या काळाची वीणकर बघून पूर्वीच्या कलावैभवाचे बाबासाहेबांनी कौतुक केले. नंतर तेथेच थोडीशी विश्रांती घेऊन ते थोडे थंडगार पाणी प्याले. त्यावेळी एका मुसलमान फोटोग्राफरने त्यांचे पुष्कळसे फोटो घेतले. विश्रांतीनंतर बाबासाहेब परत औरंगाबादच्या स्टेट गेस्ट हाऊस येथे दुपारच्या जेवणास परतले.
हैद्राबादेस प्रयाण :
त्याच दिवशी संध्याकाळच्या गाडीने ते हैद्राबादेस निघाले. औरंगाबादेस वाटेत जसा सत्कार झाला अगदी तसाच सत्कार औरंगाबाद ते सिकंदराबाद पर्यंतही झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हैद्राबादेस येत आहेत असे हैद्राबाद दलित फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी 4 ते 6 दिवस आगाऊ दलित जनतेस कळविले होते. तेव्हापासून बाबासाहेबांच्या आगमनाची मार्गप्रतिक्षा सर्व अस्पृश्य जनता ठिकठिकाणच्या स्टेशनवर करीत बसली होती. नांदेड स्टेशनवर तारीख 18 जानेवारी 1949 च्या पहाटेस गाडी पोहोचली. त्यावेळी बाबासाहेब झोपलेले होते. त्यांना जागे करून त्रास देऊ नये म्हणून हैद्राबाद संस्थान दलित फेडरेशनचे चिटणीस श्री. मनोहर यांनी सर्व लोकास विनंती करून, परत येतेवेळेस बाबासाहेबांच्या दर्शनाचा अलभ्य लाभ आम्ही तुम्हास करवून देऊ असे आश्वासन दिले. तारीख 20 जानेवारी 1949 रोजी औरंगाबादेस परत येताना गाडी त्याच नांदेड स्टेशनवर पुनः रात्रीच्यावेळी आली. तेथे अस्पृश्य जनता तारीख 18 जानेवारी 1949 पासून 21 जानेवारी 1949 पर्यंत स्टेशन सोडून मुळी घरी गेलीच नाही. सर्व काळ तेथे तळ ठोकून सर्वजण बसले होते. अक्षरशः उपाशीपोटी, थंडीवाऱ्यात, अगदी उघड्यावर हे सर्व लोक बाबासाहेबांच्या नुसत्या दर्शनासाठी चार दिवस थांबले होते.
तारीख 21 जानेवारी 1949 रोजी पहाटेसच गाडी औरंगाबाद स्टेशनच्या आवारात शिरली. पुन्हा जयघोष व हारतुरे आले. गार्ड ऑफ ऑनर झाला.
हैद्राबादेहून श्री. प्रधान, सिव्हील अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हैद्राबाद, श्री. राजवाडे, सि. अँ. ऑ. औरंगाबाद, श्री. अष्टेकर, डी. एस. पी. यांचेसह डॉ. बाबासाहेब औरंगाबाद स्टेट गेस्ट हाऊसमध्ये गेले. तेथे एक पार्टी झाली. त्या पार्टीमध्ये स्टेट कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना हारतुरे अर्पण करून, “आम्ही अस्पृश्य जनतेच्या सेवेसाठी काय करावे ?” असा प्रश्न विचारला. त्यावर बाबासाहेबांनी या सर्व मंडळींना एकच उत्तर दिले : “तुम्ही सर्वजण आज संध्याकाळी सभेच्या ठिकाणी यावे म्हणजे सर्व आम जनतेसमोर सभामंडपी मी तुम्हाला अस्पृश्योद्धाराचा मार्ग सांगेन व दाखवीन “
सांयकाळी 5.30 वाजता त्यांनी मराठा विद्यालयास भेट दिली. याचप्रमाणे ठिकठिकाणच्या संस्थांना भेटी देऊन डॉ. बाबासाहेब सभास्थानी वेळेवर उपस्थित झाले.
एक लाखाची विराट सभा :
सभामंडपाची सजावट शब्दांनी सजविता येणार नाही. इतकी सजविली होती. या सभेस एकूण 18 लाऊडस्पिकर्स लावण्यात आले होते. यावरून जनसमुदाय किती प्रचंड होता, याची कल्पना ज्यांनी सभा, परिषदा पाहिल्या असतील त्यांना होईल. लाखाचेवर लोक जमले होते.
प्रथमतः श्री. बी. एस. मोरे, औरंगाबाद स्टेट दलित फेडरेशनचे चिटणीस यांनी सुरवातीचे प्रास्ताविक भाषण करून हैद्राबाद संस्थानात अस्पृश्य जनतेवर झालेल्या घोर अत्याचाराचे कथन केले. नंतर अखिल भारतीय दलित फेडरेशनचे सरचिटणीस श्री. पां. ना. राजभोज यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक सवयीप्रमाणे फेडरेशनचे धोरणाविषयी व संघटनेविषयी माहिती सांगितली. नंतर श्री. गायकवाड यांनी 5 ते 10 मिनिटांच्या भाषणात तमाम लोकसमुदायास आपल्या महान नेत्याचे भाषण अत्यंत शांत चित्ताने, कसलाही आवाज न करता ऐकण्याची विनंती केली.
मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मातंग ज्ञातीला फेडरेशनमध्ये सामील व्हा व उत्कर्ष साधून घ्या असा आदेश स्वबांधवांना दिला. “आम्हा सर्व पतित जनतेचे खरे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर हे एकटेच आहेत.” असे श्री. मोरे यांनी सांगितले.
नंतर डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाले. ते म्हणाले,
जोपर्यंत तुम्ही तुमच्या मजबूत संघटनेच्या बळावर आपली ताकद इतर जगाला समाजाला दाखविणार नाही तोपर्यंत तुमच्यावर हे असले जाच नेहमी चालूच राहाणार. या जुलूमाबाबत तुम्हाला वेदातील एक गोष्ट मला सांगाविशी वाटते. एकदा देवाकडे मेंढराने आपली फिर्याद नेली की “देवा, तू सर्व पृथ्वी निर्माण केलीस, पशु-पक्षी, झाडे-झुडपे, मनुष्यप्राणी इत्यादी अवघे चराचर तू निर्माण केलेस म्हणून तू आमचा पिता व आम्ही तुझी लेकरे. पर्यायाने आम्ही सर्व भावंडे झालो. तूच निर्माण केलेल्या वाघ-सिंहानी डोळ्यादेखत आम्हा मेंढराला अगदी सहज, कसलीही पर्वा व चाड न ठेवता गट्टगीळ करावे काय ? देवाने उत्तर दिले “हे बघ. तू म्हणतोस तशी वस्तुस्थिती आहे खरी पण त्याचबरोबर हेही खरे आहे की तुझं बाह्य स्वरूपच इतकं नेभळट दिसते की, जरी मी तुझा निर्माता असलो तरीसुध्दा यावेळी तुझी ही दुबळी चर्या पाहून तुला खाऊन टाकावे, असे मला वाटत आहे. तर तुझी ही सदोदित खाली असलेली मान जरा ताठ करून ऐटीत राहा. तरतरीत दिसण्याचा प्रयत्न कर, रूबाबदार राहा. चाल करून आलेल्याचा प्रतिकार करण्याचा न्यायबुध्दी प्रयत्न कर. दुसऱ्यावर विसंबू नकोस, ठोशास ठोसा या न्यायाने वाग. मग पाहू बरे कोण तुला त्रास देतो ? कोण तुला खातो ते ?” या कथेप्रमाणे तुम्ही आपली परावलंबी वृत्ती टाकून एकजुटीने अत्यंत प्रभावी अशा संघटनेने राहा.
“मी कॉंग्रेसमध्ये गेलो” असे म्हणून तुम्हाला थापेबाजी मारून काही कॉंग्रेसवाले फसवतील. तरी त्यांच्या थापेबाजीला भुलू नका. मी कॉंग्रेसमध्ये गेलो नव्हतो व जात नाही. जर कदाचित प्रसंग आला तर मला मिळालेल्या या सर्व मानापानाला लाथ मारून मी माझे इच्छित ध्येय पुरे करीन.
माझा स्पृश्य वर्गीयांकडून व मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडून हा जो गौरव केला जातो. सध्या यांना जी माझी भीती वाटते, या सर्व गोष्टीची मुख्य गोम जर कशात असेल तर या सर्व लोकांना माझ्या पाठिशी अत्यंत प्रभावी व राजकारण धुरंधर शक्ती आहे. याची पूर्ण खात्री पटलेली आहे. म्हणूनच मी म्हणतो की हा गौरव हा मानपान माझा नसून तुम्हा पीडलेल्या, रंजलेल्यांचा आहे; मी निमित्तमात्र आहे. तुम्हावर झालेल्या होत असलेल्या अन्यायाबद्दलची गाऱ्हाणी मी मांडीन. त्यातून काय काय मिळवावयाचे ते मिळविण्याचा प्रयत्न जरूर करीन. फक्त तुम्ही आपली संस्था एक राखून संघटित राहा.