केवळ राजकीय प्रगतीने जीवनातील प्रश्न सुटत नाहीत !
दलितांचे एकमेव पुढारी नेते ना. डॉक्टर भीमराव उर्फ बाबासाहेब आंबेडकर, भारत सरकारचे कायदा मंत्री व कॉस्टिट्यूशन मेकींग बॉडीचे अध्यक्ष यांनी औरंगाबाद येथील मराठा विद्यालयास तारीख 21 जानेवारी 1949 ला सांयकाळी 5.30 वाजता भेट दिली.
मराठा समाज या संस्थेच्या चालकांनी डॉक्टर साहेबांच्या मानमरातबाला साजेशी सजावट व तयारी केली होती.
सुरवातीस हायस्कुलच्या स्वयंसेवकांनी सलामी दिली. नंतर श्री. माणिकराव मोताळे यांनी स्वागतपर पद्ये गायली.
तदनंतर संस्थेचे सभासद, कार्यकारी मंडळ श्री. खुशालराव मोताळे वकील ह्यांनी डॉक्टर साहेबांच्या गुणगौरवपर भाषण करून, त्यांना पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर श्री. राजभोज, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी व श्री. गायकवाड, श्री. सुबय्या इत्यादी दलितांच्या पुढाऱ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
संस्थेचे चिटणीस श्री. पंडितराव गव्हाणे B.A., LLB. वकील यांनी त्यानंतर मानपत्र वाचून दाखवले. नंतर टाळ्यांच्या प्रचंड आवाजात ते डॉक्टर साहेबास अर्पण केले. मानपत्राच्या उत्तरादाखल डॉक्टरसाहेब म्हणाले,
शेतकरी कामकरी समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीकरिता, मराठा हायस्कुलसारख्या संस्थाची अत्यंत गरज आहे. अशा प्रकारची संस्था औरंगाबादेत निघाल्याबद्दल मला समाधान वाटते.
दलितांचे स्थान हिंदू धर्माचे धर्मग्रंथ व उपनिषदे यामुळे पिढ्यानपिढ्या वरिष्ठ वर्गाची सेवा करणे हेच राहिले आहे.
चातुर्वर्ण्य पद्धतीमुळे दलित वर्गावर घोर अन्याय झाले आहेत. ही परिस्थिती बदललीच पाहिजे. दलित समाजाला मानाचे स्थान कायद्याने मिळणे आवश्यक आहे. ते मिळण्याकरिता दलित वर्गात स्वाभिमान उत्पन्न करणारे शिक्षण त्यांना मिळणे अवश्य आहे.
दलित वर्गाने स्वतः विचार करण्यास शिकले पाहिजे. दलित वर्गांची प्रगती, त्यांना शासन यंत्रात माऱ्याच्या जागा (Key Posts) मिळाल्याशिवाय होणार नाही. आतापर्यंत त्या जागा वरिष्ठ वर्गाच्या हातात आहेत.
30 जानेवारीनंतर महाराष्ट्रात झालेले अत्याचार हा वरिष्ठ वर्गाने मा-याच्या जागा आपल्या हाती ठेवून इतर समाजांची पिळवणूक केली ह्याचा परिणाम आहे.
केवळ राजकीय प्रगतीने जीवनातील सर्व प्रश्न सुटत नाहीत. जीवनाच्या प्रगतीकरिता ज्या अनेक गोष्टींची गरज आहे : त्यापैकी राजकीय स्वातंत्र्य ही एक होय.
शिक्षण हीच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरिता महत्त्वाची बाब होय. गेल्या 25 वर्षापासून मी राजकारणात काम करीत आहे; पण माझ्या इतक्या दिवसांच्या अनुभवावरून मला असे वाटते की शिक्षण हीच जीवनातील सर्वात महत्त्वाची बाब आहे.
गेल्या 2 ते 4 वर्षापासून माझे मन दलितजनांच्या शिक्षणाकडे वळले आहे. म्हणूनच मी मुंबईला सिद्धार्थ कॉलेजाची स्थापना केली आहे.
परिस्थिती अनुकूल झाली तर मराठवाड्यातील दलितजनांच्या प्रगतीकरिता औरंगाबादेत सिद्धार्थ कॉलेजची शाखा काढण्याचा मानस आहे.