Categories

Most Viewed

18 जानेवारी 1938 भाषण

राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेसाठी हिंदू-मुस्लिम विभक्तीकरण विनाशक.

मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या बैठकीला मंगळवार तारीख 18 जानेवारी 1938 पासून सुरुवात झाली. ना. पाटील यांनी लोकल बोर्ड कायदा दुरूस्ती बिल असेंब्लीपुढे मांडले. या बिलात विशेषतः नॉमिनेशन पद्धत रद्द केली असून त्याऐवजी अस्पृश्य व स्त्री वर्गास संयुक्त मतदारसंघात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

या ठरावाची बाजू मांडताना सांगण्यात आले की, आजपर्यंत सरकार नियुक्त सभासद निवडल्यामुळे, लोकशाहीच्या तत्त्वावर गदा आणली गेली होती. अशी राष्ट्रीय वृत्तीला अडथळा करणारी पद्धतच नष्ट करण्यात सरकारने पुढाकार घेतला आहे. ही अनिष्ट पद्धत नवीन कायदेमंडळातून नाहीशी केली आहे. तसेच तिचे स्थानिक स्वराज्यातून उच्चाटन झाले पाहिजे. सर अल्ली महंमद देहलवी यांनी आपल्या मुसलमान समाजासाठी स्वतंत्र मजूर संघाची का आवश्यकता आहे याचे महत्त्व प्रतिपादन केल्यानंतर स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दणदणीत भाषण झाले. डॉ. साहेबांच्या भाषणाच्यावेळी सभागृहात गांभीर्य प्राप्त झाले होते. तरीपण कॉंग्रेसचे बेळगावचे प्रतिनिधी श्री. गोखले यांनी मध्यंतरी काहीतरी वेडगळपणा केलाच. त्यांना एक सणसणीत टोला देऊन डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

या दुरूस्ती बिलात थोड्या, अगदी अल्प प्रमाणातल्या प्रगतीशिवाय विशेष राम आहे असे मला वाटत नाही. या बिलातील संयुक्त मतदान पद्धतीविषयी मला बोलायचे नाही. कारण मी पुणे कराराने संयुक्त मतदान पद्धतीला बांधला गेलो आहे. तरीपण या पद्धतीविषयी माझा दृष्टिकोन कोणता आहे हे मी स्पष्टपणे निवेदन करीत आहे. ही संयुक्त मतदान पद्धत मान्य केल्यावर विशेष काय घडून आले. इकडे दृष्टी देताना असे दिसून येईल की, फक्त निवडणुकीच्या दिवशी हिंदू व मुसलमान जाती एकत्र मतदानासाठी येऊ शकतील, मते देतील. पण त्यामुळे उभय समाजाच्या मनोवृत्तीत कोणता बदल होईल ? ज्या भावनेसाठी, ज्या राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेसाठी ही संयुक्त मतदान पद्धत अमलात आणली जात आहे त्यादृष्टीने याने कोणता बदल घडून येणार ? निवडणुकीच्या दिवसानंतर या उभय समाजाचे विभक्तीकरण कायमच राहणार ! व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर हे दोघे भिन्न धर्मांचे समाज बंधु एकाच चाळीत एकत्र कधीही राहू शकणार नाहीत. एकत्र सहभोजन करणार नाहीत. बेटी व्यवहार तर अशक्य कोटीतली गोष्ट. मग नुसत्या संयुक्त मतदारसंघाने या उभय समाजात एकी कशी होणार ? यासाठी आजची सारी सामाजिक बंधने ताडकन तोडून टाकली पाहिजेत. यासाठी प्रथम हिंदू समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. याशिवाय असल्या बिलात असल्या राष्ट्रभावना जागृत करण्याच्या योजना योजून मुळीच कार्यभाग होणार नाही. या सर्वसाधारण दुरूस्ती बिलाविषयी स्पष्टपणे बोलायचे म्हणजे माझी निराशा झालेली आहे. या बिलात समाधान होण्यासारखे काय आहे असे शोधू लागल्यास दर्यामे खसखस अशीच अवस्था व्हायची.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password