Categories

Most Viewed

18 जानेवारी 1928 भाषण

स्पृश्यांनी अस्पृश्यांऐवजी स्पृश्यांचे प्रबोधन करणे श्रेयस्कर.

निवृत्तिनाथाच्या यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अस्पृश्य लोकांचा बराच मोठा समुदाय जमत असतो. त्याचा फायदा घेऊन लोकजागृती करण्याच्या हेतूने तेथेच एक सभा इराद्याने जाहिराती काढण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे यात्रेच्या दिवशी म्हणजे बुधवार तारीख 18 जानेवारी 1928 रोजी सभा भरविण्यात आली होती. सभेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले होते. सभेस स्त्रीपुरूषांचा अफाट समुदाय हजर होता. त्यात स्त्रियांचा भरणा तर विशेषच होता. सभेत मुख्यतः त्र्यंबकेश्वर येथे श्री. चोखोबाचे देवालय बांधावे की नाही, हा एकच जरी महत्त्वाचा प्रश्न होता. तरी डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात अस्पृश्य वर्गाच्या सर्व प्रश्नांचे सांगोपांग विवेचन केले. श्री. चोखोबाचे देवालय बांधण्याऐवजी चोखोबाने आरंभिलेल्या अस्पृश्यता निवारणाचे कार्य शेवटास नेण्यासाठी सतत उद्योग करणे हेच श्री. चोखोबारायाचे खरे स्मारक आहे असे सांगितले. ते जर तुम्हास करणे असेल तर बहिष्कृत भारत पत्रास धोका न येईल अशासाठी आपण उभारलेल्या बहिष्कृत भारताच्या फंडासाठी सर्वांनी मदत करावी असे सुचविले. त्यानंतर श्रीयुत भाऊराव गायकवाड, रा. भालेराव, पुंजाजी, नवसाजी जाधव वगैरे सद्गृहस्थांची भाषणे झाली. त्या सर्वांचा परिणाम इतका झाला की, प्रेस फंडाच्या मदतीसाठी जागच्याजागी 203 रुपयांची मदत झाली. त्यातल्या त्यात सार्वजनिक कामाची ज्यांना कधी वासपूस नव्हती अशा गरीब बिचाऱ्या स्त्रियांनी व साधूंनीही अल्पस्वल्प देणग्या दिल्या. सभा साडेचार वाजता संपविलीच पाहिजे, कारण त्यानंतर सर्व लोक पालखीच्या मिरवणुकीस जाणार असे अगोदरच सुचविण्यात आले असल्यामुळे, सभेस मुद्दाम दोन वाजता सुरुवात करण्यात आली होती. सभा पाच वाजता संपली असती परंतु त्या सुमारास नाशिकचे दातार शास्त्री व स्वराज्य पत्राचे संपादक रा. मराठे आले. लोकांचेही पालखीच्या मिरवणुकीपेक्षा सभेकडेच विशेष लक्ष आहे असे दिसून आल्यामुळे सभा बंद करण्याच्याऐवजी ती चालू ठेवावी असे ठरले. नंतर दातार शास्त्री व मराठे यांची अस्पृश्यांच्या चळवळीसंबंधी सहानुभूती दर्शविणारी भाषणेही झाली. भाषणे चालू असतानाच रा. थोरात, वडेकर, जळगावचे चौधरी वगैरे गृहस्थ आले. त्यांचीही भाषणे झाली. त्यात रा. थोरात यांनी स्पष्ट सांगितले की, अस्पृश्यांना तुम्ही आपल्या पायावर उभे राहा असे सांगणे हा मूर्खपणा आहे. त्यांची अस्पृश्यता घालविण्याचा प्रयत्न आम्ही स्पृश्य लोकांनी केला पाहिजे. त्यानंतर रा. भाऊराव गायकवाड यांनी भाषण करून स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांविरूध्द जे जे मुद्दे मांडले होते त्याचे खंडन केले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी समारोपादाखल असे सांगितले की,

तुम्ही जर आमच्या लोकांची सहानुभूती बाळगता, तर तुम्ही आमच्या लोकांच्या सभेत येऊन भाषणे करण्याऐवजी स्पृश्य लोकांची सभा भरवून त्यांच्यात आमच्याविषयी सहानुभूती उत्पन्न करण्याचा प्रयत्न कराल तर अधिक बरे होईल. मराठे लोकांनाही त्यांनी सांगितले की, तुम्ही शहरात सभा भरविण्याऐवजी खेडेगावात भरविली पाहिजे. कारण तेथील मराठे लोकांची स्थिती जी आपण कुलाबा जिल्ह्यात पाहिली त्यावरून ती अगदी टोणग्यासारखी आहे. त्यांना शहाणे करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. अशाप्रकारचे भाषण झाल्यानंतर सभेचा कार्यक्रम संपविण्यात आला व सभा मोठ्या आनंदाने पार पडली. असे असताना स्वराज्य पत्राच्या संपादकांनी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा विपरीत अर्थ करून, त्यावर जी टीका केली आहे ती वाचून सभेस हजर असलेल्या कोणाही माणसास स्वराज्याचा संपादक हा एक नीच वृत्तीचा माणूस आहे याची खात्री झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा त्याविषयी जास्त लिहिण्याचे कारण नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password