Categories

Most Viewed

16 जानेवारी 1949 भाषण

दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे मोठा मूर्खपणा, आपली झोपडी शाबूत राखा.

मनमाड (नाशिक) येथे रविवार, तारीख 16 जानेवारी 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. सवितादेवी आंबेडकर यांचे स्वागतार्थ प्रचंड जाहीर सभा झाली.

जरी सभेची तारीख एकाकी निश्चित करण्यात आली. पुष्कळांना ऊशीरा कळली असली तरी औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व मुंबई येथून हजारो लोक सभेस हजर राहिले होते. शनिवार दुपारपासून प्रत्येक आगगाडी चिक्कार भरून येत होती. स्टेशनवर व धर्मशाळेच्या आवारामध्ये तर अफाट अस्पृश्य जनसमुदाय जमा झाला होता. त्यामुळे या मेळाव्याला एका मोठ्या यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. प्रत्येक आगगाडी स्टेशनमध्ये येताच “जयभीम” च्या घोषणेने वातावरण दुमदुमून जात असे. प्रत्येकजण एकमेकांना “जयभीम” ची सलामी देऊन स्वागत करीत होता. डॉ. बाबासाहेबांचे फोटो छातीवर लावून, प्रत्येक स्त्री-पुरुष विजयी सैनिकाच्या आवेशाने संबंध मनमाडभर संचार करीत होता.

रविवारी बरोबर 11 वाजता पंजाबमेल स्टेशनमध्ये येताच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, बोलो बोलो जयभीम’, ‘शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा विजय असो. तरूण पार्टी झिंदाबाद, थोडे दिनमे भीमराज’ वगैरे घोषणांनी सर्व मनमाड हादरून गेले होते. डॉ. बाबासाहेबांचे दर्शन मिळावे म्हणून सलूनच्या डब्याच्या दोन्ही बाजूला स्त्री-पुरुषांच्या झुंडी गोळा होऊ लागल्या. इतकी बेफाम गर्दी झाली की, शेवटी बाबासाहेबांना बाहेर येणे अशक्य झाले. शेवटी सर्वांना दर्शन मिळावे म्हणून थोडा वेळ सलूनच्या दोन्ही बाजूच्या खिडक्या उघडून हजारो अस्पृश्य जनतेला त्यांचे दर्शन मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. नुसत्या दर्शनासाठी भुकेलेले हजारो स्त्री-पुरुष अतृप्त नेत्रांनी जेथून मिळेल तेथून दर्शन घेऊन अक्षरश: आपल्या डोळ्यांची पारणी फेडून घेत होते. अस्पृश्यांचे आपल्या नेत्यावरील हे अलोट प्रेम पाहून स्पृश्यवर्गीय तर थक्कच झाले. एकाने तर मला बोलूनही दाखविले की, अखिल हिंदमध्ये आपल्या नेत्यावरील अलोट प्रेम असलेला अस्पृश्य समाज व त्यांचा नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बरोबरी करणारा दुसरा कोणीच नाही. हिंदचे इतर सर्व पुढारी डॉ. बाबासाहेबांचा या बाबतीत खात्रीने मनातून हेवा करीत असतील.

सभेचा मंडप रंगीबेरंगी पताकांनी सुशोभित केला होता. “सौ. सवितादेवी द्वार” “मातोश्री रमाबाई द्वार” अशी दोन प्रवेशद्वारे उभारण्यात आली होती. मंडपाच्या दर्शनभागी मध्यावर गौतम बुद्धाची प्रतिमा होती. “बुद्धम् शरणं गच्छामि” वगैरे म्हणी असलेल्या पताका लावलेल्या होत्या.

सुरवातीला मुंबई प्रांताध्यक्ष श्री. भाऊराव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. सवितादेवी आंबेडकर यांचे स्वागत करण्याकरिता व मुंबई इमारत फंडासाठी थैली अर्पण करण्याकरिता सभा बोलविण्यात आली आहे असे सांगितले. नंतर निरनिराळ्या संस्थातर्फे बाबासाहेबांना, सौ. सवितादेवींना हार अर्पण करण्याचा समारंभ झाला.

सौ. गिताबाई गायकवाड, मुंबई प्रांतिक दलित फेडरेशनच्या सेक्रेटरी कु. शांताबाई दाणी आणि अखिल भारतीय दलित फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी राजभोज यांची सुरवातीला भाषणे झाली. नंतर डॉ. बाबासाहेबांनी अर्धा तास सुश्राव्य व आश्वासन देणारे भाषण केले. ते म्हणाले.

माझे मित्र भाऊराव गायकवाड यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे मला विचारले की, एखादी सभा जर ठरविली तर त्याला माझी काही हरकत आहे का ? मी सभेस होकार दिला.

मुंबई इमारत फंडासाठी मला चार हजारांची थैली अर्पण करण्यात येईल, असे मला सांगण्यात आले. मला चार हजारांचे आमिष दाखविण्यात आले. (प्रचंड हंशा) त्यामुळेच ही सभा घेण्यात आली. परंतु त्या थैलीचे काय झाले याचा खुलासा आधीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणात केला नाही. रक्कम जमली व ती चोरीला गेली असेही सांगितले नाही. (प्रचंड हंशा) सभेच्या शेवटी तरी याचा खुलासा होईल, अशी मला दाट आशा आहे.

अलिकडे मी बरेच दिवस राजकारणाबाबत बोलत नाही. कारण मी हल्ली राजकीय बंधनात आहे.

अस्पृश्य समाज इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक राजकारण व ज्ञानी समाज आहे याबद्दल मला बिलकूल शंका नाही. (टाळ्यांचा कडकडाट) कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. आपले राजकारण यशस्वी करण्याकरिता आपल्या समाजास मोठ्या अधिकाराच्या जागा, म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे मा-याच्या जागा काबीज केल्या पाहिजेत.

जरी आपल्याला राखीव जागा मिळाल्या नसल्या तरी भिण्याचे कारण नाही. आपण सात कोटी लोक आहोत. आपण जर संघटित राहिलो तरच आपला पक्ष बलवान होईल. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपला जो राजकीय संघ-शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन त्यालाच आपण चिकटून राहिले पाहिजे. (टाळ्यांचा कडकडाट, जयघोष) आपण जरी अल्पसंख्य असलो तरी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर संघर्ष करु. आपणास भिण्याचे कारण नाही. (प्रचंड टाळ्या)

दुसरी गोष्ट अशी की, आपल्याला कधी दुसऱ्या पक्षाशी संगनमतही करावे लागेल. जो पक्ष आपले कल्याण करील तोच आपल्याला जास्त जवळचा. ज्यांचा कार्यक्रम जास्तीत जास्त आमच्या कार्यक्रमाशी जुळेल त्या पक्षाशी आम्हाला संगनमत करायला काही हरकत नाही. मग ती काँग्रेस असो, समाजवादी असो, अगर बहुजन समाजवादी असो..

वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही. मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. संघ फोडून तुटकपणाने दोघाचौघांनी दुसऱ्या संघात सामील होणे म्हणजे आत्मनाश करणे होय. तुम्हाला माहीत आहे की आपण कळपाने राहिले पाहिजे.

आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्खपणा आहे. आपली झोपडी शाबूत राखा. तसे न झाल्यास ब्राह्मणेतर पक्षाप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहाणार नाही. ब्राह्मणेतर पक्षाची काय दुर्दशा झाली ? 1932 सालपर्यंत आम्ही संगनमताने काम करीत होतो. त्यावेळी काही ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेसबाहेर राहून उपयोग नाही. आत शिरून आतून पोखरून काँग्रेसचा किल्ला फोडता येईल, बाहेरून किल्ला फोडता येणार नाही. ह्या समजुतीने ते काँग्रेसमध्ये शिरले. मी त्यांना पुष्कळदा बजावून सांगितले. परंतु त्यांनी माझे ऐकले नाही. आपण आत शिरलो ती भयंकर चूक झाली असे आज ब्राह्मणेतर पक्षाच्या लोकांना वाटत आहे. आज ब्राह्मणेतर पक्ष नामशेष झाला आहे. ते आपली राहुटी कितपत बांधू शकतील याबद्दल मला शंका आहे.

आम्ही झोपडी मोडून समझौता करावयाचा हे मला बिलकूल पसंत नाही. झोपडी मोडून आम्ही काहीही करणार नाही.

मी देशघातकी गोष्टी करतो, असा आरोप पूर्वी माझ्यावर केला जात असे. पण त्या आरोपाचा फोलपणा सर्वांच्या नजरेस आता आला आहे. आमचा पक्ष देशाच्याविरुद्ध कधीच नव्हता. आम्ही देशाचा द्रोह केला नाही. ते एक कुभांड रचले होते. आमचा पक्ष शर्यतीत उतरला तर आमच्यापेक्षा कोणीच वरचढ होऊ शकणार नाही. आम्ही नेहमीच आघाडीला राहू (टाळ्या)

आपणच खरा समाजवाद प्रस्थापित करू शकू. शेतकरी कामकरी राज्य आपणच स्थापणार. कारण आपल्यात श्रीमंत व मध्यमवर्ग नाहीतच. आपण सर्वच कामगार. आपण सर्वच गरीब. आम्हीच लोकशाही निर्माण करू. इतकेच काय कम्युनिस्टांचा कम्युनिझम राजकारणात आमच्या मागेच आहे. आमचा पक्ष तात्त्विक सिद्धीत मागे पडेल, असे कधीच संभवत नाही. पुष्कळ पक्ष निघाले. त्या सर्वांना आमचा हेवा वाटतो. काँग्रेस पक्ष वगळल्यास हिंदमध्ये शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनसारखा दुसरा पक्ष नाही. सर्वांचे डोळे आमच्या पक्षाकडे लागून राहिले आहेत. आपला पक्ष हा गुळाच्या ढेपेप्रमाणे असून इतर पक्ष हे मुंगळ्याप्रमाणे आहेत. आमच्या पक्षाच्या सहकार्यासाठी हे इतर आमच्या पक्षाला मुंगळ्यासारखे चिकटायला पहातात. त्यांच्याविषयी आपण अत्यंत जागरूक असले पाहिजे.

आपल्या लोकांची नीतीमत्ता सोज्वळ असावी. अस्पृश्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. याविषयी खात्री बाळगा. काँग्रेस म्हणते की परकीय सत्तेला हाकलून देऊन आम्ही क्रांती केली. धन्यवाद, परंतु ही अर्धवट क्रांती होय. त्याबद्दल त्यांना खरी लोकशाही निर्माण करावयाची असल्यास आज हजारों वर्षे डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. (टाळ्या) क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. आसासह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांतीच होऊ शकत नाही. ते चक्र आम्हीच फिरवू. (टाळ्या)

सध्या मी राजबंधनात आहे. 1950 साली अगर तत्पूर्वी ते बंधन तुटेल किंवा संपेल. निवडणुका जवळच आल्या आहेत. त्यावेळी मी आपणाजवळ संपूर्ण व सगळ्या गोष्टी सांगेन. मी आपल्या समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागांची तरतूद करून ठेवली आहे. परंतु त्या राखीव जागांसाठी लायक उमेदवार मिळत नाहीत. जे राजकीय हक्क मिळविले आहेत त्यांची अंमलबजावणी खरोखर होत नाही. कारण तेथे अधिकारी वरच्या वर्गाचे असतात. म्हणून त्या माऱ्याच्या जागा आपण काबीज केल्या पाहिजेत.

राजकारणाइतकेच महत्त्व शिक्षण संस्थेला आहे. एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धिमान, होतकरू व उत्साही तरुणांच्या हाती असते. ह्या दिशेने गेली काही वर्षे मी राजकारणाकडे थोडेसे दुर्लक्ष करून शिक्षण संस्थांकडे जास्त लक्ष पुरवीत आहे. मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केले आहे. सिद्धार्थ कॉलेजमध्ये सध्या 2,400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 160 विद्यार्थी आपले आहेत. त्यांचेसाठी मी दरवर्षी 21,000 रुपये खर्च करीत असतो. माझे सर्व लक्ष या गोष्टीकडे वेधले आहे. औरंगाबादला जाऊन तेथे कॉलेज काढण्याबद्दल विचार करीत आहे. हे सगळे “नामदेवाचे लग्न पांडुरंगाने केले” त्याप्रमाणे आहे.

घटना समितीने जो भावी राज्यघटनेचा मसुदा तयार केला आहे त्यात अस्पृश्यांच्या हक्कांची तरतूद करून ठेवली आहे. नवीन घटनेच्या नवव्या कलमान्वये अस्पृश्यतेचा नायनाट करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा जातीभेद, उच्च-नीच भावना रद्द केली आहे. न्हाव्याने तुमचे केस कापले पाहिजे. धोब्याने तुमचे कपडे धुतले पाहिजे. देवळे, खाणावळी व उपहारगृहात आपणास उच्चवर्णीयांप्रमाणे वागविले पाहिजे. इतरांनी आपणास समानतेने वागविले पाहिजे. हा कायदा जो मोडील त्यास शिक्षा करण्यासंबंधी कायदा करण्याचे अधिकार मध्यवर्ती कायदेमंडळाकडे सोपविले आहेत. ह्याच गोष्टीची आपण किती वर्षेपावेतो मागणी करीत आहोत.

आपण तीन प्रकारचे राजकीय हक्क मागत आहे.
(1) आमचे प्रतिनिधी कायदेमंडळात असावेत.
(2) लोकसंख्येच्या मानाने सरकारी नोकऱ्या राखून ठेवल्या पाहिजेत.
(3) स्वतंत्र मतदार संघ मिळावेत.

फक्त एकच गोष्ट प्राप्त झाली नाही. ती म्हणजे निवडणुकीत आपणास स्वतंत्र मतदार संघ मिळाले नाहीत. परंतु यामुळे आपला भाग्योदय थांबणार आहे, असे मी मानणार नाही. जे मिळेल ते पदरात पाडून घ्यावे आणि अधिका करिता मागणी करावी. अशी आपली वृत्ती असावी अशी एक म्हण तुम्हाला माहीत आहे की “नेसेन तर जरीची साडी नाही तर उघडीच बसेन” या म्हणीप्रमाणे वृत्ती असणे चांगले नाही. त्याच्यात काय पुरुषार्थ आहे ?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password