Categories

Most Viewed

16 जानेवारी 1937 भाषण

या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत.

अस्पृश्यांचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विलायतेहून आगमन होताच त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौऱ्याचा कार्यक्रम आखला. पहिल्या फेरीत त्यांनी नाशिक जिल्ह्यातून दौरा काढण्याचे ठरविले. सभा वगैरे घेण्यास अवधी थोडा होता. तरीपण नाशिकचे कर्तबगार आणि धीरवंत पुढारी भाऊराव गायकवाड यांनी डॉ बाबासाहेबांच्या दौऱ्याचा कार्यक्रम इतक्या कुशलतेने आखला की हजारो स्त्रीपुरूष व मुले निरनिराळ्या ठिकाणी, रस्त्यात चावडीत, गावच्या वेशीवर डॉ. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी उत्सुकतेने वाट पहात होते.

प्रथम शनिवार तारीख 16 जानेवारी 1937 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूर मेलने इगतपुरीस रात्री 8 वाजता आले असता इगतपुरीकर मंडळीतर्फे व स्वावलंबन मंडळातर्फे स्टेशनवर पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रात्री 9 वाजता पोस्टाचे शेजारच्या पटांगणात जाहीर सभा भरली. सभेस सुमारे दोन हजारांवर जनसमूह हजर होता. दुसरे दिवशी तारीख 17 जानेवारी 1937 रविवार रोजी पॅसेंजर ट्रेनने सकाळी सव्वा सात वाजता कँप देवळालीस येत असता इगतपुरी स्टेशनवर पुष्पहार अर्पण करण्यात येऊन “डॉ. बाबासाहेब आंबेडकरकी जय” च्या जयघोषात इगतपुरी सोडली. डॉ. बाबासाहेबांसमवेत नाशिकचे उमेदवार श्रीयुत भाऊराव कृष्णराव गायकवाड, पूर्व खानदेशचे उमेदवार श्री. दौलतराव जाधव व नगरचे उमेदवार श्री. प्रभाकर जनार्दन रोहम, नाशिक जिल्हा युवक संघाच्या जलशा मंडळापैकी देवराव डांगळे, भीमराव कर्डक, बाळाजी वगैरे मंडळी होती. नाशिकरोड वरील व इगतपुरी येथील स्काउट मंडळाने शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे काम उत्तम तऱ्हेने केले. पुढे वाटेत घोटी, आसवली, लहवीत या स्टेशनांवर लोकांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केले. कॅप देवळालीचे स्टेशनवर लोकांची अलोट गर्दी उसळली होती. अनेक संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन तेलखोरा व नाशिकरोडच्या स्काऊट पथकांचे स्टेशन बाहेर गार्ड ऑफ ऑनर (सलामी) झाले. नंतर स्टेशनवरून त्यांची मिरवणूक कँप देवळालीच्या ज्ञान मंदिरापर्यंत मुख्य मुख्य अशा रस्त्यांनी आली. मातंग मंडळीचा बँड पुढे वाजत होता. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय” आंबेडकरांचा जयजयकार “. आंबेडकर कौन है। दलितोंका राजा है ॥” तरूण पार्टी झिंदाबाद थोडे दिनमें भीमराज ।” स्वतंत्र मजूर पक्षाच्या जयजयकारात मिरवणूक ज्ञान मंदिरात आली. सुमारे हजारावर जनसमूह अत्यंत अल्पावधीत जमला. श्री. भाऊराव गायकवाड यांनाच मते देऊन निवडून देणे किती अगत्याचे आहे. या विषयावर अगदी मार्मिकपणे व थोड्या वेळात प्रास्ताविक झाल्यानंतर ज्ञानमंदिरातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रसंगी तेलखोरा स्काऊट मंडळातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर नाशिकास येत असता वाटेत विदगाव, देवळाली, नाशिक रोडवरील दिनबंधू आंबेडकर वाचनालयातर्फे डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. नाशिक येथे श्री. भाऊराव गायकवाड यांनी डॉ. साहेबांना थाटाची “टी पार्टी” दिली. धुळेकर वामनराव पवार यांनी तसेच भगिनी मंडळातर्फे सौ. गिताबाई गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. तेथून सभेसाठी महारवाड्यात जात असता वाटेत श्रीमती अक्काबाई तेजाळे यांनी पुष्पहार अर्पण केला. सभास्थानी डॉ. बाबासाहेब जाताच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, आंबेडकर कौन है। दलितोंका राजा है।’ तरूण पार्टी झिंदाबाद | थोडे दिनमें भीमराज वगैरे गर्जनानी तेथील वातावरण दुमदुमून गेले. जमलेल्या दीड दोन हजार जनसमुहापुढे डॉ. बाबासाहेबांनी भाऊराव गायकवाड यांच्या उमेदवारीस पाठिंबा देणारे भाषण केले. तेथे दाणी मंडळीतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. पवळाशी नेटावटे यांनी पुष्पहार अर्पण केला. समस्त महार मंडळीतर्फे श्री. सखाराम काळे यांनी पुष्पहार अर्पण केला. नाशिकात श्री. शिवराम पालाजी मोरे यांच्या दुकानी डॉ. बाबासाहेबांचा फोटो मेघवाळ मंडळीने घेतला. थून वरखेड्यास येत असता वाटेत म्हसरूळ, ढकांबे, तळेगाव या गावी पुष्पहार अर्पण करण्यात आले. दिंडोरी येथे गावातून मिरवणूक काढण्यात आली. पुढे सुस्वर वाद्ये वाजत होती. डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराने दिंडोरी गाव गजबजून गेला. महारवाड्यात सुंदरशा मंडपात तयार केलेल्या व्यासपिठावर आरूढ होताच तेथील शेकडो स्त्रियांनी आरती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भक्तीभावाने व भगिनीप्रेमाने ओवाळून ‘इडा पिडा टळो नी भीमराज लवकर येवो ॥’ म्हणाल्या.

सदर प्रसंगी भाषण करताना डॉ. बाबासाहेब म्हणाले, श्री. भाऊराव गायकवाड हे जरी तुमच्या तालुक्याचे असले तरी वृथा तालुकाभिमानाने हुरळून त्यांना मते देण्यापेक्षा खरे लायक व कर्तबगार उमेदवार म्हणून तुम्ही सर्वांनी त्यांना आपली चारही मते देणे जरूरीचे आहे. पुष्पहार अर्पण झाल्यानंतर पुढे आवनखेड येथेही पुष्पहार अर्पण करण्यात आला. आदेवणी येथे श्री. किसनराव शिवराम गांगुर्डे यांनी चहापार्टी दिली. सदर प्रसंगी आंबेवणी येथील महार मंडळीतर्फे व भगिनी मंडळातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आले. तेथून वाजंत्र्यांच्या व जयजयकाराच्या जयघोषात मिरवणूक वरखेडा येथे आली. श्री. शिवराम दादाजी गांगुर्डे याचे घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या बरोबर मंडळीस मेजवाणी देण्यात आली. या सभेस अत्यंत मार्मिक असे त्यांनी अर्धा पाऊण तास भाषण केले. सभेसाठी जमलेल्या सर्व मंडळीस वरखेडकर समस्त मंडळीने सभेनंतर सुग्रास भोजन दिले. तेथून पुढे जाताना वाटेत जऊळके येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला. पिंपळगाव बसवंत येथील चावडीसमोरील पटांगणात श्री. भाऊराव गायकवाड यांच्या उमेदवारीस पाठिंबा देणारे छोटेसे भाषण डॉ. बाबासाहेबांनी केले. तेथील मंडळींनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून फलाहारही दिला. ओझर तांबट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक गावच्या मुख्य मुख्य रस्त्यांनी काढण्यात आली. मिरवणुकीत सुस्वर वाद्ये वाजत होती व जयजयकार चालला होता. महारवाड्यात जमलेल्या मंडळीपुढे थोडे भाषण करून श्री. गायकवाड यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला. तेथून पुढे खेरवाडी, चांदोरी, सायखेडा, चाटोरी, नायगाव वगैरे ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यात आले. रात्रौ 8.30 वाजता सिन्नर येथील मुख्य मुख्य रस्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोटारमधून प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. रात्रौ 9.30 वाजता सभेच्या कामास सुरवात होऊन, सुरवातीस श्री दौलतराव जाधव, पुंजाजी नवसाजी जाधव व रघुनाथराव रिपोटे यांची श्री. भाऊराव गायकवाड यांच्या उमेदवारीस पाठिंबा देणारी भाषणे झाली.

शेवटी डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलावयास उभे राहिले. आगामी निवडणूक किती महत्त्वाची आहे व आपण किती दक्षतेने वागावयास हवे यांचे स्पष्टीकरण करून आपल्या जिल्ह्यातर्फे आपण श्री. भाऊराव गायकवाड यांनाच निवडून देणे अगत्याचे आहे, असे सांगितले. नंतर सिन्नर तालुका संघाचे अध्यक्ष श्री. बापुराव भालेराव यांचेकडे सिन्नर येथे डॉ. बाबासाहेबांना व स्काऊट मंडळास मेजवानी झाली. तेथून नाशिक स्टेशनवर येत असता वाटेत शिंदे येथील मराठे मंडळीने व महार मंडळीने डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केले. तसेच पळसे येथील महार मंडळीने पुष्पहार अर्पण केला.

याप्रमाणे अखिल भारतीय अस्पृश्य मानलेल्या समाजाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंडळाच्या निवडणुकीबाबत नाशिक जिल्ह्यातून दौरा काढला असता इगतपुरी, कँप देवळाली, नाशिक, दिंडोरी, वरखेडा, पिंपळगाव बसवंत, ओझर, तांबट, सिन्नर वगैरे अनेक ठिकाणी केलेल्या भाषणांचा सारांश रूपाने अहवाल खालीलप्रमाणे :

प्रिय बंधु-भगिनींनो,
आजच्या प्रसंगी तुम्हास येथे बोलावण्याचे कारण प्रसिद्ध झालेल्या हस्तपत्राद्वारे तुम्हास कळविले आहेच. मुंबई कायदेमंडळाच्या आगामी निवडणुकीत आपण कोणास मते देऊन निवडून आणावे याचा विचार आपणास करावयाचा आहे. या देशात अनेक राजे होऊन गेले. इंग्रजांनाही येथे येऊन उणीपुरी 150 वर्षे झाली आहेत. या 150 वर्षांच्या इंग्रजांच्या कारकिर्दीपैकी सुमारे 60 वर्षांपासून ही कौन्सिले अंमलात आली आहेत. या कौन्सिलाद्वारे जनतेचे प्रतिनिधी आपल्या लोकांची गा-हाणी सरकारकडे मांडीत आहेत. परंतु आठ कोटी अस्पृश्य मानलेल्या वर्गातर्फे त्यांचे गा-हाणे मांडणारा त्याचा प्रतिनिधी असावा ही गोष्ट जगाच्या इतिहासात आतापर्यंत घडली नाही. ती गोष्ट आपल्या प्रयत्नाने झाली आहे. येत्या एप्रिल 1937 पासून सुरू होणाऱ्या कायदेमंडळासाठी नाशिक जिल्ह्यातील लोकास एक प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार मिळाला आहे. आता जे कौन्सिल भरणार आहे त्यात आपल्या सुखदुःखाची दाद लावण्याची संधी प्राप्त झाली आहे. आतापर्यंतचा शिरस्ता, आपली गा-हाणी सरकारी अधिकाऱ्यांमार्फत मांडण्याचा असे. परंतु यापुढे आपले गा-हाणे कायदेमंडळाकडे करावे लागेल. आपल्या सर्व सुखदुःखांचा जेथे विचार होणार आहे अशा कायदेमंडळाच्या रिंगणात तुमच्यातर्फे जाणारा मनुष्य चांगला मजबूत असला पाहिजे. जागा मानाच्या नसून या माऱ्याच्या आहेत. कायदे-मंडळात जाणारा मनुष्य हा स्वतःसाठी जात नसून आपल्या समाजासाठी जात आहे. समाजहिताच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या प्रश्नांचा साधकबाधक विचार करून कायदे मंडळात आपल्यावतीने लढणारा मनुष्य आपण निवडून द्यावयास हवा आहे. कायदे-मंडळ हे आपल्या बचावाचे साधन आहे.

आपल्या जिल्हयातील पश्चिम भागातर्फे एक प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार तुम्हास मिळाला आहे. या एका जागेसाठी श्री. भाऊराव गायकवाड, व रामचंद्र रोकडे असे दोन उमेदवार उभे आहेत. या दोघांनाही तुम्ही चांगल्या तऱ्हेने ओळखता. तेव्हा याबाबत मी शिफारस करण्याचे प्रयोजन नाही.

या कायदेमंडळाद्वारे महार लोकांच्या वतनाचा विचार होणे जरूर आहे. तुम्हास जमिनी नसल्याने पंडित असलेल्या जमिनी तुम्हास हव्या आहेत. आपला समाज शिक्षणात मागासलेला असल्याने आपल्या मुलाबाळांना योग्य असे शिक्षण मिळाले पाहिजे. गरिबी असल्यास सरकारी स्कॉलरशिपा मिळाल्या पाहिजेत. तुम्हास अस्पृश्य लेखल्यामुळे तुमची झालेली कुचंबणा थांबविण्यासाठी अस्पृश्यता निवारणाविषयी कायदा होणे जरूर आहे. आपल्या लोकांची सरकारी नोकरीत योग्य त्या प्रमाणात भरती होणे जरूर असल्याने त्याबाबत तशी तरतूद झाली पाहिजे, अशा एक ना दोन शेकडो गोष्टी या कायदेमंडळाद्वारे झगडून मिळविल्या पाहिजेत. हे कार्य या दोन उमेदवारांपैकी कोण करील असे तुम्हास वाटते ? ( गायकवाड करतील, असे लोक ओरडतात).

नेहमीच्या व्यवहारात आपण असे पाहतो की, जर एखाद्या इसमास घर बांधावयाचे असल्यास सुताराची गरज लागली तर जो सुताराचे काम जाणतो त्यासच आपण त्या कामी लावतो. गवंड्याचे गवंडी काम जाणणाऱ्यासच नेमतो. तद्वतच कायदेमंडळात व्हावयाची कामे कोण चांगल्याप्रकारे करील हे तुम्ही विचार करून ठरविणे अत्यंत जरूर आहे. तेथे आगाजांघाचा पाहता कामा नये. सोयऱ्या धाय-याचे नाते ओळखता कामा नये, अगर आपसातील द्वेषाने प्रेरित होऊन सूडाच्या भावनेने भांबावता कामा नये. आपली गा-हाणी कायदेमंडळात मांडून जो ती निवारण करील असे तुम्हास वाटते त्यासच आपण मते देऊन निवडून आणणे जरूर आहे. जो मनुष्य कायदेमंडळासाठी लायक असेल त्यासच कायदेमंडळात पाठवा.

आता आपल्यापुढे एका जागेसाठी उभे राहिलेल्या दोन उमेदवारात जास्त लायक कोण हे पाहणे अत्यंत जरूर आहे. श्री. भाऊराव गायकवाड यांनी गेली कित्येक वर्षे केलेली सार्वजनिक सेवा मशहूर आहे. लोकल बोर्ड व नासिक म्युनिसिपालिटी सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थावर गेली कैक वर्षे जबाबदारीची कामे केली आहेत. आपल्या जिल्ह्यातील लोकांची गाऱ्हाणी सरकार दरबारात मांडून ती निवारण करण्याचे प्रयत्न गेल्या सहा-सात वर्षापासून ते करीत आहेत. नाशिक जिल्हा हा अस्पृश्य मानलेल्या समाजाच्या चळवळीचे केंद्र झालेला आहे. गेली पाच-सहा वर्षे या जिल्ह्यात चळवळीचा किती मोठा धुमाकूळ माजला होता, याची जाणीव तुम्हा सर्वांना आहे. त्या सर्व चळवळीत त्यांनी मा-याच्या व जबाबदारीच्या जागी राहून केलेली सेवा तुमच्या नजरेपुढे आहेच. त्या चळवळीत कित्येक प्रसंगी मारहाण तर कित्येक प्रसंगी सरकारकडून दंड तर कित्येक प्रसंगी तुरुंगवासाच्या सक्त मजुरीच्या शिक्षाही त्यांनी भोगल्या आहेत. श्री. भाऊराव गायकवाड यांची ही कामगिरी लक्षात घेऊनच स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मी त्यांचे नाव सुचविले आहे. श्री. गायकवाड यांच्याविरुद्ध श्री. रामचंद्र रोकडे उभे आहेत. ते मंदिर प्रवेश सत्याग्रहाचेवेळी कोठे दडून बसले होते ? सार्वजनिक सेवा म्हणून ज्याला म्हणतात ती काही त्यांच्या पाठीशी आहे काय ? (नाही नाही म्हणून लोक ओरडतात.) 1935 च्या इंडिया अँक्टात स्पष्टपणे म्हटले आहे की, यापुढे मुंबई कायदेमंडळाच्या सभांचे कामकाज इंग्रजीतून चालेल. जर आपले काही गा-हाणे कायदेमंडळापुढे मांडणे असल्यास ते इंग्रजीतूनच मांडले पाहिजे, असा स्पष्ट निर्बंध आहे. असे असता आपले गाऱ्हाणे इंग्रजीतून मांडण्याइतके इंग्रजी श्री. रोकडे यांना येते काय ? (नाही नाही म्हणून लोक ओरडतात.) रोकडे यांनी प्रसिद्ध केलेल्या विनंतीपत्रात ते म्हणतात की मी कोणत्याही पक्षातर्फे अगर संस्थेतर्फे उभा नाही. जर रोकडे कोणत्याही पक्षातर्फे अगर संस्थेतर्फे उभे नसतील तर मग त्यांच्या कार्यात त्यांना कोण मदत करणार ? ना पशू आणि ना पक्षी म्हणणाऱ्या वटवाघुळासारखी स्थिती अशा इसमाची झाल्याशिवाय राहील काय ? त्यापेक्षा सरळ काँग्रेस अगर अशाच इतर संस्थेतर्फे रोकडे उभे राहिले असते तर एकवेळ परवडले असते. परंतु ना ही धड़ ना ती घड़, ‘ही स्थिती बरी नाही.

वरील सर्व गोष्टींचा विचार करता उभे राहिलेल्या उमेदवारात कायदेमंडळासाठी लायक कोण नी नालायक कोण हे शोधून काढणे अत्यंत सोपे काम झाले आहे. कारण श्री. भाऊराव गायकवाड व श्री. रामचंद्र रोकडे यांची सार्वजनिक कार्याच्या दृष्टीने, हुशारीच्या दृष्टीने, कर्तबगारीच्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने सर्वतऱ्हेने तुलना करता

“कहां राजा नि कहां पोतराजा”
कोठे पर्वत तर कोठे खडा
“कोठे सोने तर कोठे कथील”
“कोठे घोडा तर कोठे गाढव”

इतके अंतर उभय उमेदवारात आहे. ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. असे असता तुम्हाला बुचकळ्यात पडण्यासारखे काय आहे ? तरी सर्वांनी आपली चारही मते श्री. भाऊराव गायकवाड यांनाच द्यावीत. अशी मी विनंती करतो.

मला असे कळले आहे की, काही विरोधी प्रचारक आपल्याकडे मते मागण्यासाठी आले असता दोन मते श्री. गायकवाडास द्या व दोन मते श्री. रोकड्यास द्या, अशी मतदारांची विनंती करीत फिरत आहेत. कारण, दोन्ही उमेदवार जातीचीच लेकरे आहेत असेही ते प्रचारक सांगत फिरत असल्याचे समजते. याबाबत मला तुम्हाला स्पष्ट सांगावयाचे आहे की, या जिल्हयातर्फे आपल्याला एकच इसम निवडून द्यावयाचा असल्याने मतांची अशी विभागणी करून भागणार नाही. जर तुम्ही तुम्हास दिलेल्या एका जागेसाठी मिळालेली मते निरर्थक वाटू लागलात तर त्यात तुमचा आत्मघात आहे-मोठे असे नुकसान आहे, हे विसरून चालणार नाही. तसेच तुमच्या या मताकरिता लोक तुम्हास पैशांची लालूच दाखवितील, कामापुरता मामा या न्यायाने गोड थापा मारतील. परंतु तुम्ही कोणत्याही मोहास बळी पडू नका. मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे. मुक्तीचे मिळालेले साधन जर तुम्ही पैशावारी विकाल तर मग तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही व मूर्ख तुम्हीच. यासाठी बंधुंनो आणि भगिनींनो कोणत्याही स्थितीत तुम्हास मिळालेला हा अधिकार पैशावारी विकू नका, अशी नम्र सूचना आहे.

श्री. रोकडे हे फार श्रीमंत आहेत म्हणून त्यांना मते द्यावीत, म्हणून काही लोक म्हणत असल्याचे मी ऐकले. याबाबत मी तुम्हास स्पष्टपणे सांगतो की बाबांनो, कायदेमंडळे ही काही श्रीमंतांची प्रदर्शने मांडण्याची ठिकाणे नाहीत. तेथे गरीब अगर श्रीमंत हा भेद नसून ‘ज्याची तरवार खंबीर तो हंबीर’ या न्यायाने कायदेमंडळात आपल्या पक्षाच्या वतीने भांडणारा. रस्त्यावरचा भिकारी हा श्रीमंतीत आणि ऐषआरामात लोळणाऱ्या नादान, ऐदी व मुक्या श्रीमंतापेक्षा अनेक पटीने श्रेष्ठ आहे. कायदेमंडळात निवडावयाच्या उमेदवाराची लायकी ही श्रीमंतीवर अधिष्ठित झाली नसून ती कर्तबगारीवर, समाजसेवेवर व खडतर तपस्येवर अधिष्ठित झाली आहे. नुसत्या श्रीमंतीवर भुलण्याचे काही कारण नाही. कारण श्रीमंत संभाजी रोकडे याच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा त्यांच्या मुलाकडे गेलेला आहे. श्रीमंत धोंडिबा रणखांब्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसा त्यांच्या मुलाकडेच गेला आहे. माझ्या निधनानंतर माझ्या संपत्तीचा वारसा माझ्या मुलांकडे जाईल. जर असे आहे तर मग श्रीमंतांचे तुम्हा-आम्हाला काय ? कित्येक लोक असे म्हणतात की, कायदेमंडळात अत्यंत हुशार आणि कर्तबगार लोकाचीच जरूरी आहे, असे नाही. मराठा समाजाच्या उमेदवाराकडे व मागे कौन्सिलर असलेल्याकडे पाहिल्यास ही गोष्ट दिसून येईल. यावर माझे असे म्हणणे आहे की मराठ्यांचा एकही वाटोळ्या पगडीचा व अडाणी इसम कायदेमंडळात गेला तरी चालेल. परंतु तुमचा मनुष्य मात्र तसाच पाठवून भागणार नाही. तर तो त्यापेक्षा 15 पट हुशार व कर्तबगार असावयास हवा आहे.

आपल्या या नाशिक जिल्ह्यात गायकवाड व रणखांबे हे दोघेही कार्यकर्ते असताना भाऊराव गायकवाडांचीच निवड मी का केली याबाबत बराच संशय माजला असल्याचे माझ्या ऐकिवात आहे.. आपल्या नाशिक जिल्ह्यातील दोन इसम गायकवाड व रणखांबे कायदेमंडळात जाण्यासाठी लायक आहेत, ही गोष्ट खरी. म्हणूनच चार महिन्यांपूर्वी उभयतांना बोलावून मी स्पष्टपणे सांगितले होते की, तुमच्या जिल्हयातर्फे कायदे मंडळाच्या निवडणुकीसाठी कोणी उभे राहावे हे तुम्ही उभयता आपसात ठरवून मला तसे कळवा. तसेच तुम्हा उभयतात जर हा वाद नाही व निकाल देण्याची पाळी जर मजवर आली तर मात्र मी भाऊराव गायकवाड यांच्यातर्फे निकाल देईन, असे रणखांबे यांनाही सांगितले होते. कारण उभयतात अधिक लायक कोण हे तुम्हापेक्षा मी चांगले जाणतो. आतापर्यंत अमृतराव रणखांबे यांनी अध्यक्ष व स्वागताध्यक्ष म्हणून अनेक सभात जी भाषणे केली ती अमृतरावांची नसून भाऊराव गायकवाडांनी लिहून दिली आहेत, हे मी जाणतो. रणखांब्यांचा बोलविता धनी वेगळाची असल्याची मूळकथा मला पूर्णपणे माहीत आहे. म्हणून अमृतराव रणखांब्यांपेक्षा भाऊराव गायकवाड मला अधिक लायक वाटले.

दुसरे असे की, रणखांबे यांनी राजीखुषीने अंमलपाणी न करता स्वतःच्या सहीने पत्र पाठवून मला स्पष्टपणे कळविले आहे की, कायदेमंडळात नाशिक जिल्ह्याच्या राखीव जागेसाठी श्री. भाऊराव गायकवाड यांनाच द्या. असे असता आज श्री. रणखांबे यांनी श्री. गायकवाड यांच्या उमेदवारीस मदत करावयास हवी आहे. परंतु प्रत्यक्ष मदत न करता अगर तटस्थही न राहता रणखांबे उघड-उघड भाऊराव गायकवाड यांच्या उमेदवारीस विरोध करीत आहेत यास काय म्हणावे ? तसे पाहता रणखांबे घराण्याचा व रोकडे घराण्याचा माझ्या माहितीप्रमाणे गेली सात-आठ वर्ष काही कारणामुळे वाद होता. उभयतात सलोखा अगर प्रेमभाव तर मुळीच नव्हता. असे असता रणखांबे यांचे नाव मी कायदेमंडळासाठी सुचविले नाही. म्हणून गेली कैक वर्षे भावा-भावाप्रमाणे व गुण्यागोविंदाने राहिलेल्या गायकवाडांविरुद्ध रणखांब्यांनी जाऊन विरोधी गटाच्या गळ्यात मिठ्या माराव्यात. ज्याला आजपर्यंत मित्र म्हणवून घेतले त्याला विरोध करावा हे रणखांब्यांचे करणे न्यायाचे नाही. अयोग्य आहे. नाशिक जिल्ह्यात असलेली संघटना दुभंगून जो निरर्थक बेबनाव व बखेडा माजविला आहे त्यास श्री. रणखांबेच जबाबदार आहेत.

माझे भाषण संपविण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना एक आग्रहाची विनंती करावयाची आहे की तारीख 17 फेब्रुवारी 1937 बुधवार रोजी मतदार बंधु भगिनींनी आपल्या स्वतःच्या खर्चाने अगर पायी आपल्या पोलिस स्टेशनवर जाऊन आपली चारही मते, स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मी उभे केलेले उमेदवार भाऊराव गायकवाड यांनाच द्यावीत. त्यांची निशाणी घोडा असून घोड्याच्या चित्राच्या उजव्या बाजूस चार फुल्या कराव्यात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नाशिक जिल्ह्यातील दौरा कल्पनेच्याबाहेर यशस्वी झाला. दोन दिवसांचा मुक्काम नाशिक जिल्ह्यात चांगलाच गाजला. डॉ. बाबासाहेबांना नाशिक येथे श्री. भाऊराव गायकवाड यांनी काही प्रमुख स्पृश्यास्पृश्य पुढारी मंडळीसह चहापार्टी दिली. श्री. भाऊराव गायकवाड हे नाशिक जिल्ह्यात प्रतिस्पर्ध्याला चारीमुंडी चित करून प्रचंड मतांनी निवडून येणार हे खास ! शेवटी डॉ. आंबेडकर साहेबांनी सर्व नाशिककर बंधु भगिनींना संदेशाद्वारे सांगितले की, “आजपर्यंत नाशिककर बांधवांनी दाखविलेला स्वाभिमान, वीरवृत्ती आणि आपल्या ध्येयाविषयीची निष्ठा यापुढे येणाऱ्या प्रत्येक कार्यात अधिक कसास लावून आपल्या पक्षास यशस्वी करा. नाशिक जिल्ह्याने श्री. भाऊराव गायकवाड यांना प्रचंड मतांनी निवडून देणे हेच त्यांचे पवित्र व पहिले कर्तव्यकर्म आहे याची मी तुम्हास जाणीव करून देत आहे. मी तुमच्यावर आज लोटून जात असलेली कामगिरी आपण निर्भयपणे पार पाडाल अशी मला बळकट आशा वाटत आहे.”

शेवटी पहाटेच्या मेलगाडीने डॉ. बाबासाहेब मुंबईस परत गेले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password