Categories

Most Viewed

14 जानेवारी 1951 भाषण

बौद्ध धर्म हा पुन्हा या देशाचा धर्म होईल.

वरळी, मुंबई येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या मेळ्यास मध्यवर्ती सरकारचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रविवार तारीख 14 जानेवारी 1951 रोजी सायंकाळी 6 वाजता भेट दिली.

दर्शनोच्छुक समाज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सभामंडपात व भोवताली सापडेल जागेवर गर्दी करून उभा होता. अखेरीस बरोबर 6 वाजता बाबासाहेब सभामंडपात आले. बाबासाहेबांच्या जयजयकाराने भोवतालचा विभाग गरजला. पुष्पमालिकांनी स्वागत केल्यानंतर प्रो. भागवत जमलेल्या 6 हजार जनसमुदायास उद्देशून म्हणाले, बुद्धाबद्दल आणि त्यांनी जगास दिलेल्या अद्वितीय धर्माबद्दल एकंदर जनतेस माहिती व्हावी या हेतूने हा बुद्धमेळा भरविण्यात आला आहे. चार महिन्याच्या अगोदर हा विहार अपुरा बांधलेला होता. लवकरच हे बांधकाम सुरू करता येईल की नाही याबद्दल आमचा आम्हाला भरवसाही नव्हता! पण बाबासाहेबांनी 4 महिन्यांपूर्वीच विहारास भेट दिली आणि काय आश्चर्य ! इतके दिवस पडून असलेले बांधकाम सुरू झाले. आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हा फक्त बाबासाहेबांच्या आशिर्वादाचा प्रभाव आहे. काही काही माणसाचा प्रभावही असा असतो. त्यांनी हातात माती घेतली तर तिचे सोने होते. जी काही कामे बाबासाहेबांनी हातात घेतली ती सर्व कामे सर्वांगसुंदर वठली आहेत. उदाहरणार्थ सिद्धार्थ कॉलेज इत्यादी. गौतम बुद्धाबद्दल बाबासाहेब एक पुस्तक लिहित असल्याचेही त्यांनी सांगितले.

बरोबर 6.10 ला बाबासाहेब भाषण करायला उठल्याबरोबर टाळ्यांचा अतिप्रचंड कडकडाट झाला. पुनश्च जयघोषाने वातावरण बराच वेळ दुमदुमून गेले, बाबासाहेब म्हणाले,

प्रिय भगिनींनो आणि बंधुजनहो,
मी या ठिकाणी उपस्थित झालो आहे तो तुमच्यापुढे व्याख्यान देण्याकरिता नव्हे. मला वाटले हा मेळावा संपलासुद्धा असेल. पण काल माझे मित्र प्रो. भागवत मला भेटले व त्यांनी सांगितले की, मेळावा पुष्कळ दिवस चालणार आहे. मला इथे येण्याइतका वेळ नव्हता; पण लोकांच्या आग्रहामुळे मला नाही म्हणता आले नाही आणि मी हजर झालो. अशा समारंभाला हजर राहाण्याचे परिणाम काय होतात हे मला चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. मी आपणापुढे बोलण्यासाठी कसलीही पूर्व तयारी करून आलो नाही.

शतकानुशतके धर्माचा दिवस मानायचा झाला तर तो कोणता मानावा ? तर असे वाटेल की शिवरात्र मानावी राम जयंती वा कृष्ण जयंती मानावी. हिंदू धर्माच्या संस्कृतीने नियोजित केलेल्या दिवसाशिवाय दुसरा दिवस आमच्या मनात येत नाही. बुद्धाचा दिवस मानावा ही भावना कोणाच्याही मनात येत नाही! आश्चर्य आहे! असे का व्हावे याचे कारण समजत नाही.

बुद्ध या देशात 80 वर्षे जगला. त्या देशात त्याने आपल्या आयुष्याची 45 वर्षे घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्या वर्षे प्रचारात जवळ मोटार नव्हती साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश कल्याणाकरिता तो जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरश: पायी फिरला. 1200 वर्षापर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले. अनंत हाल सोसले. त्याचे नावही या देशात निघत नाही.

केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो. खऱ्याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हातरी जय होईलच. आज ती वेळ आली आहे. 1200 वर्षांचा धर्म पुनरपि या देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे. (प्रचंड टाळ्या)

हिंदू धर्म एका नाल्यासारखा आहे. दोन नाल्यांचा मिळून संगम होतो व त्याचा तिसरा नाला बनतो. तसा हिंदू धर्म त्या नाल्यासारखा झाला आहे. एका नाल्यातले पाणी स्वच्छ असते व दुसऱ्यातील घाणेरडे असते. या दोहोंचा संगम घाणेरडा. तसेच हिंदू धर्माच्या नाल्यात दोन तऱ्हेचे पाणी वाहून आले आहे. स्वच्छ असा बौद्ध धर्माचा नाला आणि ब्राह्मणी धर्माचा गलिच्छ नाला. या दोहोंच्या संगमामुळे हिंदू धर्माचा नाला घाणेरडा झाला आहे. त्यातील घाणेरडे आणि स्वच्छ पाणी निराळे केले पाहिजे. तरच घाण साफ करता येईल.

येथील भिक्षुमित्राने सांगितले की, पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते. पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपे नाही. म्हणून मी आणि माझे लोक मिळून आम्ही काही नियम करणार आहोत. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध हे चालणार नाही.

शिवाय ज्या हिंदुलोकांना बौद्ध दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मुळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही.

ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे व बौद्ध धर्म शिकावा. त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाही तर बारा भाईची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धर्मच पाळा इतर काही नाही.

हल्ली धर्माला ग्लानी आली आहे. पण मी म्हणतो की धर्माची सर्वांनाच आवश्यकता आहे. माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे. धर्माशिवाय समाज जगणार नाही आणि तो धर्म बौद्ध धर्मच पाहिजे. समता, प्रेम, बंधुभाव या सर्व गोष्टी जगाच्या उद्धाराकरिता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मातच सापडतील. मी आज 20 वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्व धर्माचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्मच स्वीकारायला पाहिजे, असे माझे मत झाले आहे.

विचार करा ! हा देश एका काळी सुसंस्कृत झाला होता म्हणून सांगतात. मग 5 कोटी अस्पृश्य त्यात कसे निपजले ? जवळ जवळ 5/7 कोटी लोकांना चोऱ्यामा-या करण्याव्यतिरिक्त दुसरा जीवनमार्ग नसावा, हे कसे झाले ? अस्पृश्यता सांगणारा जगात एकही धर्म नाही. त्या काळच्या व आजच्या सुसंस्कृत पुढाऱ्यांनी प्रयत्न का केला नाही. चोऱ्यामा-या करून जगणारी जात ज्या संस्कृतीत पैदा होते तिला सुसंस्कृती म्हणता येईल काय ? असल्या जमातींना सुधारण्याचा लोकांनी प्रयत्न केला नाही त्याअर्थी तीत काहीतरी वैगुण्य निश्चित आहे. या हिंदू धर्मात 5 कोटी अस्पृश्य आणि 5 ते 10 कोटी लोक चोऱ्यामाऱ्या करणारे का आहेत ? कारण या धर्मात दोष आहेत.

हे नवीन कार्य पारखून बघा, त्याचा अभ्यास करा. त्यात सामील व्हा ! या सुमंगल कार्यात आपण सामील झालात म्हणून मी तुमचे अभिनंदन करतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password