Categories

Most Viewed

14 जानेवारी 1948 भाषण

राजकारणाच्या दोऱ्या विद्येशिवाय हाती येणार नाहीत.

बुधवार तारीख 14 जानेवारी 1948 रोजी मुंबईतील ‘धोबी तलाव नाईट स्कूल’ मधील विद्यार्थ्यांचा वक्तृत्व चढाओढीचा समारंभ सिद्धार्थ कॉलेजमध्ये सायंकाळी 8 वाजता साजरा झाला. या समारंभाची दोन वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येत होती. पहिले वैशिष्ट्य हे की, ‘ए’ ‘बी’ सी या अक्षरांना कसे फाटे फोडावेत. हे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या या छोट्या समारंभास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठ्या आत्मियतेने हजर राहिले होते. दुसरे वैशिष्ट्य विद्यार्थ्यांच्या मनोनिग्रहाचे होते. ज्या तरुणांना, दारिद्र्यामुळे बालवयातच शाळेच्या पायऱ्या हिरमुसल्या चेहऱ्यानी उतराव्या लागल्या व पोटाची गुजराण करण्यासाठी गिरणी कारखान्याच्या स्वाधीन व्हावे लागले. अशा 350 तरुणांनी फिरुन जोम धरुन नोकरी करीत करीत या नाईट स्कूलमध्ये अध्ययन चालविलेले आहे, अशा विद्यार्थ्यांचा हा समारंभ होता. अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे वाईस चेअरमन श्री. डी. जी. जाधव यांची योजना केली होती. श्री. हुदलीकर, श्री. केळशीकर व श्री. भास्करराव भोसले ह्या तिघांची निवाडा-कमिटी नेमली होती. वक्तृत्त्वाच्या चढाओढीसाठी तीन विषय ठेवण्यात आले होते.
(1) अस्पृश्य तरुणाचे कर्तव्य
(2) मला हिंदू धर्माबद्दल काय वाटते ?
(3) सिनेमा पहाणे चांगले की वाईट ?

नऊ विद्यार्थ्यांनी या चढाओढीत भाग घेतला होता. (1) कु. हाटे. (2) कुमार कांबळे (3) कु. जाधव या अनुक्रमाने चढाओढीचा निकाल लागला.

नाईट स्कूलचे संचालक, वादविवाद मंडळाचे सेक्रेटरी व समारंभाचे अध्यक्ष यांनी समयोचित भाषणे केल्यानंतर, टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेबांनी आपले भाषण सुरू केले. ते म्हणाले,

प्रिय मित्रहो,
आज जो वक्तृत्त्व चढाओढीचा समारंभ झाला त्यात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्यांच्या व माझ्या विचारात बराच फरक होईल असे मला वाटते. ज्यांनी या चढाओढीमध्ये भाग घेतला त्यांचे कार्य मोठ्या उत्सुकतेचे झाले असे त्यांचे त्यांना देखील वाटत असेल असं म्हणवत नाही. तथापि आपले वक्तृत्त्व फार उत्कृष्ट झाले नाही म्हणून निरुत्साही होण्याचे फारसे कारण नाही. हा तुमचा पहिलाच प्रसंग असेल. ज्यांनी कंबर कसून एवढ्या श्रोतृसमुदायापुढे बोलण्याचे धैर्य दाखविले ते कौतुकास पात्र आहेत.

वक्तृत्त्व ही एक कला आहे. ती दीर्घोद्योगाने कमवावी लागते. काही जणांना ती उपजतही येत असेल. महाराष्ट्रात नामदार गोखले पट्टीचे वक्ते होते, याबद्दल कोणीही शंका घेणार नाही. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात नामदार गोखले प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यावेळी कोणातरी पाहुण्याचे व्याख्यान त्या कॉलेजमध्ये झाले. त्या पाहुण्याचे आभार मानण्याचे काम नामदार गोखल्यांकडे सोपविले होते. नामदार गोखल्यांनी आपले भाषण लिहून काढले होते. एवढेच नव्हे तर पाठही केले होते. पण त्यावेळी कोणीतरी खूण केली आणि नामदार गोखले गोंधळून गेले नि 1-2 मिनिटातच सभागृहाबाहेर पडले.

या गोष्टीमुळे त्यांना अद्दल घडून आली. मेकॉले नावाच्या ग्रंथकर्त्याची पुस्तके नामदार गोखलेंनी मुखोद्गत करण्याचा सपाटा चालविला, सर्वच्या सर्व मेकॉले त्यांना अगदी तोंडपाठ होता.

मुंबईचे सर मेथा प्रसिद्ध वक्ते म्हणून गणले जातात. ते आपली भाषणे लिहून काढून तोंडपाठ करीत असत. त्यांच्या हॉलच्या सर्व बाजूला आरशे असत. भाषण करताना आपले आविर्भाव ते आरशात पाहात असत. एवढेच नव्हे तर आपल्या मिशा, आपले केस, आपले हातवारे कसे दिसतात हे त्या आरशाच्या हॉलमध्ये ते पहात असत.

सध्या मिस्टर चर्चिल यांना हाउस ऑफ कॉमन्समध्ये इंग्रजी भाषेवर मोठे प्रभुत्त्व असलेला, असे मानतात. ते देखील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जाण्यापूर्वी आपले भाषण लिहून नेतात. चर्चिल आयत्यावेळी बोलणारा वक्ता नव्हे प्रेक्षकांकडून शब्द निघावेत, आपल्याला कुशाग्रणी गणण्यात यावे यासाठी तो शेलके वाक्प्रचार आपल्या शर्टच्या स्टिक् कफावर लिहून नेत असतो. कोणी विरोध केला तरच चर्चिल भाषणात रंगतो. हे मिस विकिलसनला माहीत. तेव्हा मजूर पक्षाने त्यांच्या भाषणाला विरोध करून त्यास रंगण्याची संधी द्यावयाची नाही असे ठरविले. त्यावेळी चर्चिलचे भाषण अगदीच निष्प्रभ ठरले.

तेव्हा तुम्ही देखील निराश होण्याचे काही कारण नाही. लोकसत्ताक राज्य असलेल्या युगात उत्कृष्ट वक्तृत्त्वाची फार आवश्यकता आहे. जो शत्रुची देखील आपल्या प्रभावी वक्तृत्त्वाने मने वळवून घेतो तोच महापुरूष होय.

ही कला अवगत होण्यासाठी अविरत श्रम केले पाहिजेत. मी देखील प्रथमत भेदरट होतो. एलफिन्स्टन कॉलेजमध्ये मी जेव्हा प्रोफेसर होतो त्यावेळी विद्यार्थ्यांपुढे भाषण करताना माझे मन द्विधा होई. उच्चवर्णीयांपुढे महाराचा पोरगा बोलताना त्याची टिंगल होईल, अशी भीती मला वाटत असे. मी वादविवाद मंडळामध्ये फारसा भाग घेतला नाही. मी चांगला बोलू शकेन असे त्यावेळी मला वाटत नसे. मी इंग्रजी भाषा चांगल्या तऱ्हेने लिहितो, निदान माझे मला तरी त्यावेळी वाटत असे.

मी फार पराकाष्ठेचे प्रयत्न याबाबतीत केले आहेत. 13-13 वेळा मी माझे भाषण लिहून काढले आहे. यापेक्षा कोणालाही काही अधिक सांगता येणार नाही अशी जेव्हा माझ्या मनाची पक्की खात्री होईल तेव्हाच मी भाषण करीत असे.

आज थोडे जे काही मी बोलू शकतो ते पूर्वपरिश्रमाने अवगत केलेल्या ज्ञानामुळेच बोलतो, असे म्हणावे लागेल,

आज झालेल्या विद्यार्थ्यांच्या भाषणाकडे मी वक्तृत्त्वाच्या दृष्टीने पाहात नाही. भाषणाकडे माझे लक्ष दुसऱ्याच दृष्टीने होते. सर्वांच्या भावनांमध्ये मला एकच सूर दिसला. ही उल्लेखनीय गोष्ट आहे. माझ्या मनाला पटू लागले की मी वीस वर्षे शेतकऱ्याप्रमाणे शेती केली, नांगरट केली, दगडधोंडे बाजूला काढले. तिच्यामध्ये अंकुर फुटला आहे. हे पाहून मला आनंद वाटतो. मी असंख्य लोकांपुढे भाषणे केली आहेत. चिक्कार लोक माझ्या भाषणात येत असत. त्यावेळी मला वाटत असे, ही माझी बुवाबाजी तर नव्हे ना? पण जी आजच्या तरुणांमध्ये जागृती दिसून आली त्यावरून त्यांना संसारात दर्जाने राहावयाचे आहे. पूर्वजांप्रमाणे कलंकित म्हणून राहावयाचे नाही. हा एकच सूर सर्वांच्या भाषणात मला दिसून आला.

शिक्षण व विद्या या गोष्टीशिवाय आपला उद्धार होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक कार्ये अंगिकारिली. राजकारणात माझा विशेष महत्त्वाचा काळ गेला. सध्या राजकारणाच्या दो-या उच्चवर्णियांच्या हातात आहेत. तशाच हाती ठेवण्यासाठी उच्चवर्णियांची धडपड चाललेली आहे. त्या दो-या मा-याच्या जागा पटकाविण्यासाठी जी विद्या पाहिजे ती अजून उच्चवर्णियाखेरीज उच्च प्रतीच्या इतरांना प्राप्त झालेली नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच असे काही म्हटले जाते. त्याचप्रमाणे राजकारणाच्या दो-या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत. राजकीय सत्ता हाती यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविलेले आहेत पण त्यांना यश येत नाही. ह्या तफावतीचे अधिष्ठान हेच आहे. इंजिनिअर, कलेक्टर वगैरे जागा फक्त उच्चवर्णियांनाच शिक्षणामुळे मिळतात. शंभरपैकी जवळ जवळ 99 इंजिनिअर 99 कलेक्टर असे उच्चवर्णियांचे असतात. त्यामुळे त्यांच्या हाताखालील जागा ते आपल्या लोकांना देत असतात.

ह्या नाईट स्कूलचा फायदा तुम्हाला फक्त कारकून होण्यासाठी होणार नसून त्यामुळे तुम्ही मा-याच्या जागादेखील काबीज करण्यासाठी होणार आहे. रात्रीच्या शाळेचा प्रयत्न स्तुत्य आहे. या शाळेला मला जे जे सहाय्य देता येईल ते मी जरूर देईन. वार्षिक एक हजार रुपयांची ग्रँट नाईट स्कूलला देण्याचे मी निश्चित केले आहे. तसेच जे काही 200 ते 300 रुपये क्रमिक पुस्तकांसाठी लागतील तेही देईन. म्हणजे जे जे म्हणून मला देता येईल ते सर्व काही देईन. तुम्ही सर्वांनी याचा फायदा करून घेतला पाहिजे.

तुम्ही स्वच्छ राहिले पाहिजे. मला येथे काही झकपक कपडे घातलेले विद्यार्थी दिसले. कुठल्याशा मॅगझीनच्या अंकात जे आर्टिकल महार व महाराष्ट्र समग्र छापले आहे त्यात महारांच्या झकपक पोषाखाबद्दल लिहिले आहे. ती वस्तुस्थिती नसून स्तुती आहे. एक नूर आदमी व दस नूर कपडा अशी म्हण आहे. बाहेर पडताना तुमचा पोषाख स्वच्छ पाहिजे. कपडा पाहूनच तुमच्याबद्दल प्रथम आदर वाटला पाहिजे.

माझा बराच पैसा कपड्यावर जातो. माझे शर्ट, पँट नि कॉलर किती आहेत याचा मला देखील अंदाज नाही. एवढे खरे की माझे कपडे डझनांनी भरतील. त्यांचा इतका कंटाळा आला आहे की, वाटते एक दिवस त्या सर्वांचा लिलाव करावा.

जसे तुम्ही स्वच्छ राहिले पाहिजे तसे स्वाभिमानानेही राहिले पाहिजे. पाटील मी तुमच्या जोड्यातलाच आहे हे विचार सोडून दिले पाहिजेत. मरण बरे पण उपमर्द सहन करणार नाही, असे तुम्ही म्हटले पाहिजे.

तुम्ही भरपूर वाचन केले पाहिजे. रोज एक अर्धे पुस्तक संपविण्याचा सराव तुम्ही केला पाहिजे. आपली नवी इमारत झाली म्हणजे एक ते दोन हजार विद्यार्थ्यांची सोय होईल, असे काही करता येईल. दिवसभर काम करून रात्री 8 ते 10 पर्यंत तुम्ही शिक्षण घेता हे भूषणावह आहे. तुम्हास मी यश प्राप्ती चिंतितो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password