Categories

Most Viewed

14 जानेवारी 1946 भाषण 1

कर्तृत्ववान नसली तरी चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत.

तारीख 14 जानेवारी 1946 रोजी सोलापूर येथील प्रचंड जनसमुदायासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दणदणीत असे भाषण केले. आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब म्हणाले,

निवडणुकीबाबत माझ्या अस्पृश्य बांधवांना दोन शब्द सांगण्याची जरुरी मला वाटत नाही. पण काही मंडळीच्या आग्रहाखातर मला बोलावे लागत आहे. माझ्या समाजावर माझा संपूर्ण विश्वास आहे. सर्व अस्पृश्य समाज शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या मागे आहे. याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. दुसऱ्या कोणाला समजत नाही इतका अस्पृश्य समाज जाणता झाला आहे. त्याला हित-अहित कळते. आमची संघटना इतकी मजबूत आहे की, मी दिल्लीला बसून घंटा वाजवून इशारा दिला की, माझा समाज मी सांगितलेला आदेश निष्ठेने पाळतो.

मध्यप्रांतात हरिजनांच्या सहा जागा काँग्रेसला कशा मिळाल्या, असा आक्षेप घेतला जातो. पण याला माझे उत्तर असे की, मैदानावर उतरले म्हणजे राज्य घेतले, असे कसे म्हणता येईल ? आमच्या अस्पृश्यांचा अभेद्य किल्ला मुंबई प्रांतात आहे. तो जर विरोधी पक्षांनी सर केला तर टोपी काढून शरण येऊ.

काँग्रेसचा प्रचार आज विमाने, रेल्वे व मोटारी यांचे साहाय्याने जोरात सुरु आहे. मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो:

देशातील सारी जनता आपल्यामागे आहे अशी फुशारकी नि घमेंड मारणारे हे लोक विमानाने का उडतात? सारा देश घुसळून का काढतात ? हा धिंगाणा का चालू आहे ? मी निवडणूक प्रचारासाठी अवघ्या चार पाच ठिकाणी गेलो. जनता जर कॉंग्रेसच्या मागे आहे तर पैसे, विमाने, मोटारी घेऊन पोतराजासारखे हिंडता का ?

आगामी निवडणूक म्हणजे काही आटापाट्याचा खेळ नव्हे. येणारी निवडणूक हा संग्राम आहे. हे युद्ध आहे. कौरव-पांडवांप्रमाणे ही लढाई होणार आहे. कौरव-पांडवांचे युद्ध टाळावे म्हणून कृष्णाने शिष्टाई केली. पण सुईच्या अग्रावरील मातीसुद्धा पांडवांना मिळणार नाही, असे घमेंडीचे उत्तर दुर्योधनाने कृष्णाला दिले. युद्ध टाळावे म्हणून मी गांधींना पत्र लिहून तडजोडीचे प्रयत्न केले. आपला मान सन्मान खिशात ठेवून मी समाजाचे हितासाठी पुढारपणाची पर्वा न करता राऊंड टेबल परिषदेतल्या सामन्याची पुनरावृत्ती होऊ नये, वितुष्ट वाढू नये म्हणून उभयतांनी राजकीय मागण्यांची तजवीज करावी म्हणून गांधींना पत्र लिहिले. तुमच्या आमच्यात समदृष्टिकोन नाही असे गांधींनी उत्तर देऊन माझी समझोत्याची मागणी अमान्य केली. मी पत्र लिहिण्यापूर्वी काही महिने हेच गांधी, जिनांचे घरी जाऊन त्यांचे गळ्यात गळा घालीत होते. मी विचार केला गांधी जिनांना भेटतात तर मलाही भेटतील. गांधी- जीना यांचेमध्ये कोणता समदृष्टिकोन होता हे राजकारण तज्ज्ञांनाच माहीत! राज्य काही तुम्ही एकट्याने कमावले नाही. दोघांनी कमावले असे असताना दुर्योधनाने सांगितल्याप्रमाणे सुईच्या अग्रावरील मातीही देण्यास हे गांधी तयार नाहीत. कृष्णशिष्टाई संपल्यावर कृष्णाने दुर्योधनास सांगितले, तुमची बाजू तुम्ही सांभाळा. गांधींनी दुर्योधनाची भूमिका पत्करल्यावर अस्पृश्य समाजात जर काही पराक्रम, पौरुषत्व असेल तर या युद्धात शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे उमेदवार निवडून देऊन तुमची बाजू तुम्ही सांभाळा. आमची बाजू आम्ही सांभाळतो ‘ असे गांधी व काँग्रेसला रोखठोक उत्तर दिले पाहिजे.

भावी राज्यघटना ठरविताना अस्पृश्यांची बाजू आपणच खंबीरपणे मांडणार आहोत. हे इलेक्शन साधे नाही. मास्तरांचा पगार, शेतसारा कमी करणे. बुंदीचे जेवण, इत्यादी साध्य करण्याचे हे इलेक्शन नाही. तर इंग्रज सरकार येथून निघून गेल्यावर सत्ता कोणाचे हाती राहाणार हे भावी घटनेत ठरवावयाचे आहे.

निवडणुकीची संधी साधून अनेक पोकळ जाहीरनामे निघाले आहेत. पण त्यात अर्थ नाही. जाहीरनाम्याप्रमाणे या थापेबाजांनी काहीच केले नाही तर आपण अस्पृश्य काय करणार? कोणाकडे रडगाणे नि दाद मागणार ? हे भांडण सत्तेसाठी आहे.

तुकड्यासाठी दुसऱ्याचे तोंडाकडे पाहाण्याची वेळ समाजावर येऊ नये. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे यासाठी राजकीय सत्तेची जरुरी असते. ती मिळविण्यासाठी आम्ही झगडत आहोत.

पाटलाने मारले तर पोलिसापासून कलेक्टरपर्यंत एकमेकांचे सोयरे असल्यामुळे बिचा-या अस्पृश्यांची दाद कोणीही घेत नाही. दिवाणही त्यांच्याच जातीचा. जन्मभर आमचा समाज गुलामगिरीतच राहणार का ? जे इंग्रजी राज्यात तेच भावी राज्यात होऊ नये म्हणूनच आम्ही झगडत आहोत. जोपर्यंत हिंदुचे हाती राजकीय सत्ता राहील तोपर्यंत ही गुलामगिरी नष्ट होणार नाही. या निवडणुकीत आमचे दलित फेडरेशन दे दान सुटे गिराण प्रमाणे मताची भीक मागत नाही. आमचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून आम्हास सत्ता हवी, ती मताचे रुपाने समाजाने आम्हाला द्यावी, आमचा तो हक्क आहे.

यावेळी अस्पृश्य समाज जागृत झाला नाही तर पेशवाईतल्या प्रमाणे कंबरेला खराटा व गळ्यात थुंकण्यासाठी मडके अडकविण्याची पाळी आल्याशिवाय राहाणार नाही. दलित फेडरेशनने उभा केलेला उमेदवार निमित्त मात्र आहे. उमेदवाराशी खाजगी मतभेद हेवेदावे विसरुन दिलेले मत उमेदवाराला नसून फेडरेशनला आहे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. फेडरेशनचा उमेदवार म्हणजे प्रत्यक्ष मी उभा आहे, असे समजा.

कायदे कौन्सिलमध्ये मारवाडी, बामणाच्या मांडीला मांडी लावून 15 ते 20 अस्पृश्य सन्मानाने बसू शकतील, असा दर्जा तुमच्यात मी निर्माण केला. या अभेद्य संघटनेस चुना, सिमेंट लावून ती मजबूत करण्याचे मार्गावर मी आहे. आपला किल्ला अभेद्य राहील असे आपण वागले पाहिजे. हिंदू व मुसलमान या दोघांनी संगनमत केले आणि आपल्या किल्ल्यावर हल्ला केला तरी आमचा हा किल्ला अभेद्य राहील. त्याला धक्काही लागणार नाही अशी व्यवस्था मी केली.

कोणाच्या खाजगी दोषाकडे कोणी लक्ष देऊ नये. अस्पृश्यात भेदाभेद आहेत असा कांगावा करुन आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत पण वस्तुस्थिती तशी नाही. मुंबईच्या गेल्या प्राथमिक निवडणुकीत महार मतदार बहुसंख्य असता चांभार उमेदवार उभा करून त्याला निवडून आणला. काँग्रेसचे तिकीट असले तरी ब्राह्मण, ब्राह्मण उमेदवाराला व मराठा, मराठा उमेदवाराला मते देतो पण आमचे फेडरेशन हा भेद जाणत नाही.

मिनिस्टर करू, अमुक करू, तमुक देऊ अशी नानाप्रकारची आमिषे बाजूला सारून आमचे फेडरेशनचे मागे आमचा समाज आहे. हे सिद्ध झाले आहे. आमच्या उमेदवार विरुद्ध नाना कंड्या उठविल्या जातात. पण लक्षात ठेवा तावून सुलाखून पारख केलेल्या उमेदवारांची मी निवड केली आहे. तत्त्वाला जागणारी ती माणसे आहेत.

मुंबई असेंब्लीत काँग्रेस मंत्रीमंडळाचा कारभार 2 वर्षे 7 महिने चालू असता स्वतंत्र मजूर पक्षाचे 15 निष्ठावंत सभासद कोणाला हार गेले नाहीत. त्यांना फोडण्याचे भगीरथ प्रयत्न झाले. परंतु आमची 15 माणसे वादविवादात शिस्तीत, राजकारणात ध्येयनिष्ठेची होती.

विद्वान, कर्तृत्वान माणसे नसली तरी मला चालतील पण निष्ठेची माणसे हवीत, विद्येचा तुटवडा मी भरून काढण्यास खंबीर आहे. जो विकला जातो, लोभाला चळी पडतो. त्याचा काही उपयोग नाही. आपल्यावर व भावी पिढीवर येणारे संकट नाहीसे करुन पुढच्या पिढीचा मार्ग सुकर करणे आपले कर्तव्य आहे. दोन हजार वर्षे आपले पूर्वज गुलामगिरी मुकाट्याने सहन करीत आले आहेत. ती गुलामगिरी आपण सहन करणार काय ? (नाही.. जनतेचे उद्गार) दरेक पिढीचे पुढच्या पिढीवरचे संकट नाहिसे करण्याचा प्रयत्न करणे कर्तव्य आहे.

वीस वर्षे खटपट करुन मुसलमानांनी जे मिळविले ते अवघ्या दोन वर्षात आम्ही मिळविले ही काय कमी महत्त्वाची गोष्ट आहे ?

मी सध्या दिल्लीला राहात आहे. माझ्या टेबलवर एक घंटी आहे. मी घंटी वाजविल्यावर जसा चटदिशी माझा जमादार माझ्यापुढे हजर होतो, त्याचप्रमाणे दिल्लीहून मी स्वीच दावले की मुंबईला ताबडतोब प्रकाश मिळतो. माझा हा जो आत्मविश्वास आहे तो खोटा नाही. खरा आहे. वस्तुस्थितीच्या पायावर उभारलेला आहे. मुंबईचे कालचे इलेक्शन पाहा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या भंडारे यांना 12,899 मते व देवरूखकर यांना 11,334 इतकी मते पडली. काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ खावी लागली. मुंबईचे इलेक्शन हिंदुस्थानच्या इतिहासात कायमचे राहील.

लोकांना असे वाटते की, मुस्लिम लीग संघटित आहे. मुस्लिम लीगचे जास्त उमेदवार निवडून आले. मला असे सांगावयाचे आहे की फेडरेशनची शक्ती मुस्लिम लीगपेक्षाही अधिक संघटित आहे. त्याचे कारण आहे. मुस्लिम कोटाचे आत राहातात. आम्ही कोटाच्या बाहेर राहतो. आम्ही बाहेर राहून देखील शत्रुला बेदम मार देऊ शकतो. अशा परिस्थितीत अस्पृश्यांना राजकारण समजत नाही म्हणणे मूर्खपणा आहे.

आज मुख्य भांडण कशात आहे ? इंग्रज सरकार या देशातून निघून गेल्यावर कोण राज्य करणार? हिंदू मुसलमान का हिंदू आणि मुसलमान मिळून ? आपल्याला पुष्कळ आमिषे दाखविण्यात येतात. पण तुम्ही सर्वांनी मुख्य भांडण समजून घेतले पाहिजे. आमचे जे भांडण आहे ते सत्तेचे भांडण आहे. आम्हाला सत्ता पाहिजे. हिंदुचे राज्य नको आहे, भीक नको आहे. खरेखुरे स्वराज्य पाहिजे आहे. आमचा खरा लढा काँग्रेसशी आहे. मुसलमान जे मागतात ते कॉंग्रेस त्यांना देते. मुसलमान शेकडा पंचवीस आहेत. त्यांना शेकडा तेहतीस पूर्णांक एकद्वितीअंश जागा कबूल आहेत. आता ते 50 टक्के मागणी करतात. तेही द्यावयास सिमला परिषदेचे वेळी काँग्रेसवाले सिद्ध झाले. आमचा वाजवी हक्क असताना आम्हाला काय उत्तर ? सुईच्या अग्रावर जेवढी माती राहील तेवढीही मिळणार नाही ! (शेम-शेम-शेम) पुनरुपी पेशवाई कधीही न येऊ द्यायची असेल तर तुम्ही जागरुक राहिले पाहिजे. मी मुंबई असेंब्लीकरिता तुमच्या जिल्ह्यात जिवाप्पा ऐदाळेला उभे केले आहे. जिवाप्पा केवळ निमित्तमात्र आहे. सर्वकाही मी आहे, मला मते द्या. (प्रचंड टाळ्या).

मी जातीभेदाच्या अगदी विरुद्ध आहे. मी मांगाबरोबर भंग्याबरोबर जेवतो जातीभेदाचा मी कट्टर शत्रू आहे. आपापसातील जातीभेद लवकर नाहिसे व्हावेत या मताचा मी आहे. हे जातीभेद ब्राह्मणानी उत्पन्न केले आहेत. माझ्या फेडरेशनमध्ये जातीभेदाला कायमचीच माती दिलेली आहे. मांग, भंगी, चांभार इत्यादी सर्वांना मी समानतेने वागवतो. मी महार जातीत जन्मलो हा काही माझा दोष नाही. मुंबईत शेकडा 90 टक्के महार होते. पण मुंबईल चांभार समाजाचे देवरूखकर यांना उभे केलेले आहे. सुतार सुताराला मत देणार, कासार-कासाराला मत देणार, असे मुळीच चालावयाचे नाही. सर्वांनी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या उमेदवारालाच मत दिले पाहिजे. दुसरे उदाहरण, नाशिक म्युनिसीपालिटीमध्ये भंगी उभा केला. शेकडा 90 टक्के महार मतदार होते. महारांनी निवडून आणला.

खानदेशामध्ये एका मांग उमेदवारास तिकीट दिले होते. दुर्दैव बिचाऱ्याचे वाटेत त्याची मोटार बिघडली. नॉमिनेशन पेपरच्या वेळेत तो स्वतः हजर राहू शकला नाही. गेल्या दोन महिन्यापूर्वी विलायतेस उच्च शिक्षणासाठी 30 विद्यार्थी आपले पाठविले. त्यात मांग आहेत. चांभार आहेत. ढोर आहेत व भंगीही पण आहेत. माझ्याजवळ जातीविषमतेला थारा नाही.

विजापूर-अहमदनगर-बेळगाव तीन ठिकाणी मला येणे अशक्य आहे. हिंदुस्थानातील सर्व प्रांत ओरडतात की तुम्ही आमच्या प्रांतात अद्याप का आला नाही ? मला सांगायला अभिमान वाटतो, मुंबई इलाख्यात राजकीय प्रगती अनुपम झाली आहे. विजापूर जिल्ह्यातील काही लोक येथे आल्यासारखे दिसतात. त्यांनी काळे यांना मते द्यावी व अहमदनगरच्या मतदारांनी रोहमला मते द्यावीत.

मरणाचे भय कोणाला ? एक गांगुर्डे मेला तर काय झाले ? बाकीची 300 माणसे जखमी आहेत. ती जरी मेली तरी त्याचे काय? माझे असे एक सहा महिने जात नाहीत की, मला “तुला गोळीने ठार मारु. खून करू” अशा प्रकारची निनावी पत्रे येत नाहीत. सगळ्यांनी निडर राहून या इलेक्शनमध्ये गुलामगिरीची बेडी तोडण्यासाठी फेडरेशनचा उमेदवार निवडला पाहिजे. हा अखिल अस्पृश्यांचा संग्राम आहे हे लक्षात ठेवा. सैन्यात जशा तऱ्हेने रणशिंग फुकल्याबरोबर सर्व शिपाई एकदम गोळा होतात तसेच प्रत्येक स्त्री-पुरुषाने पोलिंग स्टेशनवर स्वतः जाऊन आपल्या उमेदवाराला मत दिले पाहिजे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password